लेखक श्री ना पेंडसे यांचे ‘तुंबाडचे खोत’ म्हणजे, दोन खंडांत, चार भागांत 1358 पानांत लिहिलेली ही तुंबाड गावाच्या खोतांच्या घराण्याची कथा आहे. जगबुडी नदीकाठी नांदलेल्या एका घराण्याच्या चार पिढ्यांची द्विखंडात्मक दीर्घकथा असे सुरुवातीला लिहिले आहे. सन 1725 ते 1942 पर्यंतचा घराण्याच्या तुंबाड आणि लिंबाड या दोन वंशशाखांचा इतिहास आहे. सव्वाशे वर्षांचा कालखंड. मलपृष्ठावर लिहिले आहे की, तुंबाडच्या खोतांच्या कुलवृत्तांचा ही बखर एखाद्या रम्याद्भूत आणि उग्रभीषण कहाणीसारखी आहे. लेखकाने कोकणाच्या संस्कृतीवर सत्य वाटावी, इतकी काल्पनिक सृष्टी निर्माण केली आहे. अशी संस्कृती प्रत्यक्षात नांदली असावी, या व्यक्ती खऱ्या असाव्यात याबद्दल शंका उरत नाही, इतकी ही कादंबरी सशक्त आहे. त्यावेळी भारतात राजकीय उलाढाली होत होत्या, सत्तांतर होत होते. राजेशाही संपुष्टात आली होती. इंग्रजी राजवट सुरू होऊन नंतर स्वातंत्र्य चळवळ सुरू झाली, 1920 सालचा प्लेग, लोकमान्य टिळकांचे नेतृत्व, महात्मा गांधींचा उदय, चलेजाव, भारत छोडो, गांधींची आमरण उपोषणे, स्वातंत्र्यप्राप्ती, पाकिस्तानला दिलेले पंचावन्न कोटी, गांधीहत्या, गांधीहत्येनंतर झालेली जाळपोळ वगैरे कथेच्या ओघात येत जाते, कथा पुढे सरकत जाते आणि पुस्तकात वाचलेला इतिहास प्रत्यक्षात लोकांवर काय परिणाम करत होता? हे समजते.
त्यातली पात्रे या घटनांशी संलग्न आहेत, राजकारणात सक्रिय आहेत. जणू रंगमंचावर पाठी काळाचा पडदा सरकतो आहे आणि समोर पात्रे त्यांची कहाणी सांगत आहेत. गांधींच्या शिकवणुकीवर पूर्ण श्रद्धा ठेवून संपत्ती, घरदार सोडून हातात खराटा घेतलेले सुप्रसिद्ध यशस्वी बापू वकील आहेत, गांधींचे तत्वज्ञान फोल आहे असे म्हणणारा संताजी आहे आणि आधी गांधीवादी असलेला नंतर गांधीवाद अजिबात न पटणारा नरसू सुद्धा आहे. पु.लं.चा अंतू बर्वा जे गांधीवादाबद्दल सांगतो त्याची कारणे इथे सापडतात.
ख्रिस्ती मिशनरी लोकांची शाळा नजरेत खुपायला लागल्यावर त्यापेक्षा चांगली शाळा काढण्याचे स्वप्न खोत पाहतात. त्यासाठी अतोनात कष्ट करतात. मूळचा हिंदू माणूस नंतर इस्लाम स्वीकारल्यावरसुद्धा आपली मुळे विसरत नाही, रामाचे मंदिर बांधतो. जगबुडी नदीची ओटी भरतो आणि अचानक एक दिवस पाकिस्तान झाल्यावर त्याला हे अमान्य होते. असे समाजात घडलेले बदल लेखकाने टिपले आहेत. वडापाव हॉटेलमध्ये कधी मिळू लागला आणि कात्री कधी आली, हेही लेखकाने नमूद केले आहे.
भाऊसाहेब दीक्षित आपल्या घराण्याचे मूळ शोधण्यासाठी तुंबाडला येतात. इथून कादंबरी सुरू होते. त्यांना खोतांच्या घराण्याचा इतिहास ऐकायला मिळतो, ते हे कथन आहे. तुंबाड शाखेची सुरुवात भिकाजीपंत खोतांपासून होते आणि लिंबाडची नाना खोतांपासून. पानिपतच्या लढाईत पाय गमावलेल्या वीर भिकाजी पंतांच्या तीन मुलांपैकी एक नाना खोत. बाकीचे दोघे तुंबाडला राहतात. फक्त भिकाजींच्या नावापुढे पंत हे विशेषण का आले? याचाही उलगडा कथेत होतो. ओड्डल या विचित्र नावाची गमतीशीर कथा आहे.
हेही वाचा – Bookshelf : ‘नाच ग घुमा’… लेखिकेला रिंगणाच्या बाहेर पडायचेच नाही!
या कादंबरीत असंख्य पात्र आहेत, माणसाच्या स्वभावाच्या असंख्य छटा आहेत. त्यातच कोकण, निसर्ग आणि खोती हीसुद्धा पात्रेच आहेत. धर्म आणि रीतीरिवाजांचा समाजमनावर विलक्षण पगडा आहे. जाती-पोटजाती घट्ट रुजल्या असताना पुढच्या पिढीत या अदृश्य पण मजबूत भिंती पडायला सुरवात होते, समाजसुधारक पुढाकार घेतात तो कालखंड स्पष्ट दिसतो. गोऱ्या रंगाचे आकर्षण दिसते. दैवी शक्तींवर असलेली भक्ती, श्रद्धा संपूर्ण समाज जीवनाला नियंत्रित करते. टेंभूर्णी, गिर्हाडी देवी या देवता रक्षणकर्त्या देवता आहेत. भूतखेतांवर, अघोरी प्रथांवर विश्वास आहे, इतका की, ती पायातली बोजड बेडी वाटते, पण याच श्रद्धेमुळे किंवा भीतीमुळे माणसे काही प्रमाणात का होईना नियमांना, नीतीला धरून वागतात.
कादंबरीत काही स्थळांचे वर्णन येते. उदा. हरणटेंभा, जगबुडी नदी, होर (जिच्यात लोक उडी मारून जीवन संपवत), बोरपाडी, बांडेराम मंदिर वगैरे. ही स्थळे माणसांइतकीच जिवंत वाटतात. लेखकाने तीन फाशांचा खेळ, जगबुडी नदीचे संस्कृत स्तोत्र, गिर्हाडी देवीचे अजब नैवेद्य कल्पनेतून निर्माण केले आहेत.
जॉर्ज ऑरवेलच्या द अॅनिमल फार्म या सुप्रसिद्ध कादंबरीत एक वाक्य आहे Power corrupts, absolute power corrupts absolutely . खोती ही सत्ता आहे, खोत त्या भागाचा राजाच असतो. इंग्रजी अंमल आल्यावरसुद्धा त्यांची प्रांतावरची पकड कायम राहिली. सत्ता आणि धन दोन्ही येते तेव्हा माणसाची बुद्धी भ्रष्ट होते, स्वच्छंद, अनिर्बंध वर्तन होते, समाजाने घालून दिलेले नियम डावलले जातात. तेच नेमके झाले. त्याची ही कथा. लेखकाचे कौशल्य असे की घटना वाचताना उत्कंठा शिगेला पोहोचते, या समस्येची उकल कशी होणार? या विचाराने मन चलबिचल होऊ लागते आणि शेवट अगदीच अनपेक्षित होतो. हे कथन असल्यामुळे लहान घटनांचे धागेदोरे एकमेकांत विणलेले आहेत; त्यामुळे काळजीपूर्वक वाचावे लागते. अन्यथा संदर्भ लक्षात येत नाही. कथनाची शैलीही वैशिष्ट्यपूर्ण आहे. संवादातून पुढच्या कथेचे सूत्र हलकेच सोडून दिलेले असते. त्याचा पाठपुरावा आपण करत राहतो.
त्याकाळी कोकणातल्या लोकांचा दावे लावणे, कोर्टात लढणे हा तर छंदच म्हणायला हवा. कुठल्याही गोष्टीचा बाऊ करायचा, हेकेखोरपणा करायचा आणि दावे लावायचे. पण प्रत्यक्षात मारामारी करण्याच्या घटना कमीच घडतात. हेही वैशिष्ट्यच! गांधी हत्येनंतर जी जाळपोळ झाली, ती या लोकांना खेदजनक तितकीच आश्चर्याचीही वाटली, ती याचमुळे.
नैतिकता म्हणजे काय? हा प्रश्न लेखक मनात उत्पन्न करतो. समाजाने घालून दिलेले नियम खरेच पाळले जातात का? की केवळ उघडकीस येत नाहीत तोपर्यंतची धूळफेक असते? पाप-पुण्याची कल्पना संकल्पना किती लवचिक असते, हवी तशी वाकवली जात असते. पण तरीही मनात सतत एक प्रश्न येत राहतो, व्यभिचार खरंच इतका बोकाळलेला होता? इतका की, त्याबद्दल लाजलज्जा सुद्धा उरली नव्हती? काही प्रसंगांत पात्रांचे विकृत वागणे पाहून किळस येते. ही समाजाची काळी बाजू समोर येते. मानावी मनाची गुंतागुंत अगम्य वाटते.
गणेशशास्त्री विद्वान, बुद्धिमान वैद्य आणि तितकेच निर्मोही. गुरूला दिलेल्या वचनाला बांधलेले. त्यामुळे एकही पैसा न घेता रुग्णांची सेवा करून त्यांच्या पूर्वजांनी घालवलेला मानसन्मान वाड्याला परत मिळवून देतात. गोदा, गणेश शास्त्री आणि ताई या तीन वंदनीय व्यक्ती लेखकाने दाखवल्या आहेत, पण त्यांचेही ‘माणूसपण’ दाखवून दिले आहे. त्यांना देवत्व दिले नाही. खलनायकी व्यक्ती रंगवताना त्यांची बाजूही लेखक सांगतो, तो अगदीच गडद रंगात रंगवलेला नाही तर, ग्रे छटा आहे.
आधीच्या पिढीतल्या स्त्रिया आणि नंतरच्या काळातल्या स्त्रिया यात फरक दिसतो. आधीच्या काळात विधवा स्त्रीचे केशवपन करण्याची क्रूर पद्धत, तिला सोसाव्या लागणाऱ्या हालअपेष्टा आणि नंतरच्या काळात स्त्रियांचे पुनर्विवाह, आंतरजातीय विवाह इथपर्यंत स्त्रियांनी केलेला प्रवास दिसतो. मुलींचे लग्नाचे वय आठपासून सोळापर्यंत वाढलेले दिसते. आधीच्या मावशी, आत्या, काकू या विधवा स्त्रिया गुणी असून त्यांना काही किंमत नसते, पण नंतरची स्त्री उदा. अनुराधा आपल्या हक्कांसाठी झगडते. तिच्या बाजूने उभे राहणारे पुरुष आहेत, तसेच स्त्रियाही आहेत.
‘चक्रवत परिवर्तन्ते सुखानि च दुखाःनि च’ या उक्तीचा प्रत्यय कथा वाचताना येत राहतो. वैभवाचे शिखर ते दारिद्र्य, पुन्हा वैभव, पुन्हा दारिद्र्य हे चक्र पिढी दर पिढी सुरु राहते आणि हेच माणसाचे जीवन आहे, याची अनुभूती होते. निसर्ग नियमांच्या चौकटीतच जगावे लागते. त्याविरुद्ध जायचा प्रयत्न केला तर, परिणामांना तोंड द्यावे लागते. संन्याशाला भजी खायची इच्छा होते, एकजण संन्यास घेतल्यावर पुन्हा गृहस्थाश्रमात येतो अशी उदाहरणे लेखक देतो. त्याचबरोबर देशसेवेसाठी सर्वस्व अर्पण करणारी, प्राणाहुती देणारी पात्र आहेत.
‘’पूर्वीच्या काळी असं नव्हतं,’ ’हे वाक्य सतत ऐकत असतो. ही कादंबरी वाचल्यावर प्रश्न पडतो, काय नव्हतं? माणसं तेव्हाची आणि आजची सारखीच! त्यांच्या गरजा, भावना सारख्याच त्यामुळे अभिव्यक्तीसारखीच. नीती अनीतीच्या कल्पना काळानुसार बदलत गेल्या. इतकेच. कटकारस्थाने, सत्तालोलुपता, धनाचा लोभ, द्वेष, मत्सर, सूड अशा सगळ्या नकारात्मक भावना होत्या आणि आजही आहेत. प्रेम, जिव्हाळा, ममता, ध्येयवाद, निष्ठा, धार्मिकता, त्याग या सकारात्मक भावनाही तितक्याच आहेत. लेखकाने पटवून दिले आहे, की काळ कोणताही असो माणूस तोच असतो.
हेही वाचा – Bookshelf : मनात खोलवर प्रभाव पाडणाऱ्या ‘चौघीजणी’
भाऊसाहेब त्यांचे पूर्वज शोधायला आले होते. त्यांना माहिती मिळाली का? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी पूर्ण कादंबरी वाचावी लागते. पहिल्या खंडातल्या काही अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरे दुसऱ्या खंडात मिळतात. एकेक रहस्य उलगडत जाते, जणू लोकरीचा बिंडा उलगडत जावा… पण ही लोकर अनेक धाग्यांची अनेक रंगांची आहे.
या कादंबरीची तुलना काही समीक्षकांनी महाभारताशी केली आहे, हे मात्र मला योग्य वाटत नाही. महाभारताप्रमाणे यात अनेक पात्रे, अनेक विषय आहेत, हे खरे; तरीही ती उंची गाठलेली नाही. किंबहुना अशी तुलनाच करणे अयोग्य आहे. कादंबरी खूप मोठी असल्यामुळे वाचकाचा उत्साह कदाचित टिकणार नाही, पूर्ण वाचून होणार नाही. काही प्रसंगांची पुनरावृत्ती होते आहे, असेही वाटते आणि काही वेळा अनैतिकतेचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे का? असेही वाटते. सर्वे गुणाः कांचनम आश्रयन्ते! हे प्रखर सत्य समोर येते. साहित्यात समाजाचे प्रतिबिंब पडलेले असते.
लेखकाने कथानकाची सुरेख हाताळणी केली आहे. आवाका मोठा असूनही सर्व पात्रांना न्याय दिला आहे, परिपूर्ण केली आहे… वाचायला बराच वेळ लागत असला तरी कादंबरी नक्कीच वाचायला हवी.


