भाग – 28
आरूने पटकन दरवाजा लावल्यावर शिवचा हात दरवाजात सापडला… थोडंसच लागलं होतं आणि रक्तही थोडंसच आलं होतं, पण आरू घाबरून गेली होती. तिच्यामुळेच त्याला लागलं, म्हणून वाईट वाटलं तिला. या गडबडीत ती हे देखील विसरून गेली की, तिच्या अंगावर साडी नाही, फक्त ब्लाऊज आणि पेटीकोटवर ती होती! तिच्या डोळ्यातलं पाणी गालावर ओघळून आलं आणि तिच्या मुसमुसण्याचा आवाज शिवच्या कानावर आला… तेव्हा तो भानावर आला.
“आरा… आराधना… प्लीज रडू नकोस. काय झालंय? तू… तू शांत हो आधी…” जवळ येत तिच्या खांद्याला हात लावत तो अडखळून बोलत होता आणि तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होता.
पण ती आता जास्तच रडायला लागली… त्याच्या जवळ येण्याने वेगळीच बेचैनी जाणवली. पोटात जास्तच कसं तरी होऊ लागलं… हृदयाची गती तर इतकी वाढली की, ती तोंडाने श्वास घेऊ लागली…
तिची ही विचित्र अवस्था पाहून शिवला आता तिच्या तब्येतीचीच काळजी लागली… आणि तिची हालत खराब झाली होती ते त्याच्या जवळ येण्याने! अंगावर साडी नाही आणि अशा अवस्थेत आपण त्यांच्या समोर आहोत, या विचाराने जास्तच तिला ओशाळून येत होतं.
पण त्याला तर तिची काळजी वाटायला लागली होती… तिची अवस्था पाहून तो विसरून गेला की, तिच्या अंगावर साडी नाहीये! तो जवळ येऊन तिला गोंजारत होता.
“काय होतंय तुला. तू… तू शांत हो बरं आधी! नॉर्मल श्वास घे… नाही, थांब… आपण डॉक्टरकडे जाऊया… नाहीतर, डॉक्टरला बोलवतो… ” तो तिच्या कमरेत हात घालून तिला उचलून घेण्याचा प्रयत्न करत बडबडत होता.
हेही वाचा – शिव आणि दिनकरराव वाद पाहून आरू हादरली
त्याची बडबड ऐकून ती जास्तच घाबरली आणि तिला गृहप्रवेशापूर्वीचा प्रसंग आठवला. त्याने कोणाचीही पर्वा न करता तिला उचलून आणलं होतं आणि आता परत उचलून बाहेर घेऊन गेला तर…?
“माझ्या अंगावर साडी नाही. तुम्ही बाहेर जाणार…” तिने सगळा जोर एकवटून त्याला धक्का दिला आणि त्याला पाठमोरी उभी राहिली. दोन्हीं हातांनी छातीवर क्रॉस करून भीतीने अजूनही तिचं अंग थरथरत होतं.
“ओ शीट्! काय होतंय मला? मी का असा मूर्खासारख वागतोय… सॉरी मी… मी बाहेर जातो, कोणाला तरी पाठवतो…” असं म्हणत, तो स्वतःवरच रागवत, केसांतून हात फिरवत बाहेर निघून गेला ..
दार लावल्याचा आवाज आला आणि तिने मागे वळून पाहिलं… दार बंद होतं. पण तरीही परत आला तर? नकोच… तिने पुढे होऊन दार आतून लॉक केलं आणि पळत बाथरूममध्ये जाऊन साडी गुंडाळून बाहेर आली.
“असं का होतंय मला? ते जवळ आले की, अंगात विचित्रच काहीतरी होतंय. कुणाला तरी विचारायला पाहिजे… पण कोणाला? ते नंतर बघू आधी साडीचं बघायला पाहिजे! तरी आई सांगत होती, ‘साडी नेसून बघत जा. लगीन झाल्यावर नेसता यायला पाहिजे. तुझंच आपलं लई शहानं डोकं…’ आईचा एक शब्द म्हणून ऐकायचा नसतो, बस आता बोंबलत! बिना साडीची त्यांच्या समोर होते… नुसत्या परकर आणि ब्लाऊजवर! आता बाहेर गेल्यावर कसं जाऊ त्यांच्यासमोर?” स्वतःशीच बडबड करत आरू साडी इकडून तिकडून गुंडाळून बघत होती.
लग्नात तिला भावनाने तयार केलं होतं. त्यामुळे साडी नेसायची तिला अडचण आली नव्हती. पण आता बाथरूममध्ये गेल्यावर तिच्या लक्षात आलं, तिला तर साडीच नेसता येत नाही! दार वाजल्यावर तिला वाटलं, भावना आली असेल म्हणून तिने पटकन दार उघडून बाहेर आली होती.
तिची साडी नेसायची धडपड सुरू होती, तोच पुन्हा दार वाजलं आणि तिला धडकीच भरली… आपोआप हात छाती वर गेला…
“को…. कोण?” तिने घाबरतच विचारलं.
“अगं आरू, मी आहे ताई… दार उघडतेस का?” भावनाचा आवाज आला तसा मोकळा श्वास घेत आरूने हुश्श केलं आणि पुढे होऊन दार उघडलं.
“आरु अगं हे काय? तू साडी अशी का गुंडाळी आहेस?” भावना तिची नेसलेली साडी पाहून हसत सुटली.
“तू नंतर हास बरं ताई! आधी मला नीट कर,” आरू वैतागून म्हणाली.
“नीट कर… नीट कसं करू तुला? तू काय मशीन आहेस का, जे बिघडलं म्हणून नीट करायचं!” आरूचं बोलणं ऐकून भावनाला जास्तच हासू आलं.
“ताई, नको ना हासू…” आता आरू रडवेली होत म्हणाली.
“बरं बरं नाही हसत! ये इकडे नीट करते तुला… आणि काय हे? सतत रडत का असतेस? थोड्या थोड्या गोष्टींना डोळ्यातून पाणी येतंय तुझ्या!” भावना तिला व्यवस्थित साडी नेसून देत म्हणाली.
“नाही काही! असंच…” आरुचा आवाज बारीक झाला होता.
“आरू काय झालं?” भावनाने काळजीपोटी विचारलं.
“काही नाही मला भूक लागली आता…” आरु विषय बदलत, पोटावरून हात फिरवत म्हणाली.
“हं, चल झालं… आता आपण बाहेर जाऊ, तुझ्या सासूबाईंचा मगाशीच निरोप आलाय, जेवण तयार आहे तर या खाली,” भावना.
“हो झालंच माझं… चल नाही… बाहेर नको, मी नाही येतं,” आरूला अचानक शिवचा विचार आला आणि पुन्हा हृदय धडधडलं!
“का…? आता आता काय झालं?” भावनाने विचारलं.
“काही… काही नाही, मला भूक नाही… तू… तू जा ताई जेवून ये,” आरू अडखळत छातीवर हात ठेऊन म्हणाली.
“आरू, तुझं ना मला कळतच नाही? काय चालू असतं या एवढूशा डोक्यात काय माहीत!” भावना वैतागून म्हणाली.
“कुठं.. कुठं काय? काहीच चालू नाही माझ्या डोक्यात! मला झोप आलीय…” ती बेडकडे जात म्हणाली.
“आरू अगं आजच लग्न झालंय तुझं! अगं नवीन नवरीसारखी थोडं तरी वाग!! लग्नानंतरचे काही कार्यक्रम असतील तुमचे, खाली सगळे वाट पाहत असतील… चल बरं तू… तुझ्यु नादात ना, माझं चेंज करायचं पण राहून गेलं. जाऊ दे आल्यानंतर करेन,” भावनाने बडबड करतच तिला हाताला धरून बाहेर नेलं.
“कसलं नवीन लग्न आणि कसली नवीन नवरी? या घराला पाहून वाटतं तरी आहे का, हे लग्नघर आहे म्हणून! ना कोणी पाहुणेरावळे आहेत… आपल्या गावाकडे कसे घर भरून पाहुणे असतात आणि नवरीला बघायला जमलेले चिलेपिले तर किती गोंधळ घालतात… इथं काहीच नाही तसलं!” तिची बडबड काही बंद होत नव्हती, खाली येईपर्यंत!
खाली हॉलमध्ये सगळे जमले होते. नऊ वाजून गेले होते… सगळेच जेवणासाठी खोळंबले होते. खाली येताच भावनाने हळूच आरूचा हात दाबून तिला डोळयांनीच ‘शांत हो’ म्हणून सांगितलं. कारण, लीला आजीची रागीट नजर आरूवरच होती आणि तिची बडबड तिथे असलेल्या सगळ्यांनीच ऐकली असणार, हेच वाटत होतं.
हेही वाचा – शिवचा हात दरवाजात सापडला अन्…
आजी रागात पाहात होत्या तर, दिनकरराव कोऱ्या चेहऱ्यानेच तिथे उपस्थितीत होते. समर आणि आकाश गालातल्या गालात हसत होते. सुधा यांच्या चेहऱ्यावर मिश्रीत भाव होते. पण त्यांनी लगेच स्वतःला सावरलं आणि त्या त्यांच्याजवळ आल्या. कारण आजी काही म्हणायच्या आत परिस्थिती त्यांना सावरावी लागणार होती.
आरूने समोर बघितलं… आपोआपच तिची नजर शिवला शोधत होती. पण तो तिला दिसलाच नाही आणि तिने मनातच सुटकेचा निःश्वास टाकला.
“बरं झालं ते नाहीत इथे…” ती मनातच म्हणाली.
“चला आता जेवून घेऊ, या भूक लागली असेल ना…” सुधा म्हणाल्या.
“…आणि हो वहिनी जेवण झाल्यावर आपण एक गेम खेळणार आहोत. ज्याने नक्कीच तुम्हाला बोअर होणार नाही…” समर हसत म्हणाला.
“गेम? म्हणजे खेळ ना! कोणता खेळ खेणार आहोत?” खेळाचं नाव ऐकूनच आरूच्या चेहऱ्यावर उत्साह पसरला.


