पूर्वार्ध
स्नेहल ऑफिसला जायची तयारी करत होती. आता हा शेवटचा महिना नोकरीचा. एक एक दिवस संपतोय, आता काही शेवटचे दिवस… पस्तीस वर्षांच्या नोकरीत दहा शाखांमध्ये बदली झाली, पण मुंबईतल्या मुंबईत. बाहेर ती गेली नाही, बढती होती पण नाकारली. आता पुढे काय करायचे? नोकरी धंदा न करणाऱ्या बायका घरी काय करतात? कसा वेळ घालवतात? याचा स्नेहलला प्रश्न पडे. आता तिच्यावर ही वेळ आली होती. महिन्यानंतर आपणही घरीच. नवरा दोन वर्षांपूर्वी निवृत्त झालाय. पण त्याचा वेळ जातो मजेत… एकतर महिन्यातले दहा दिवस तो गावी असतो, इथे असतो तेव्हा त्याचे मित्रमंडळ… कुठे कुठे ट्रिप्स सुरू असतात त्याच्या… शिवाय नाटकावर प्रेम! त्या लाइनमधली अनेक मित्रमंडळी… त्यामुळे कधी शिवाजी मंदिरच्या कट्ट्यावर… कधी रवींद्रच्या पार्किंगमध्ये… पण आपले काय?
स्नेहल नेहेमीच्या गाडीत आणि नेहमीच्या डब्यात बसली, तेव्हा सुद्धा हे विचार तिचा पाठलाग करत होते. अचानक तिला कोकणातील आपले घर आठवले. आयुष्याच्या या टप्प्यावर शांतता हवी. पण कोकणातील त्यांचे घर गजबजलेले होते… सख्खी, चुलत अशी पंधरा ते वीसजण एकत्र राहात होती! त्या घरात कायमचे रहाणे जमायचे नाही.
…पण नवऱ्याला त्या घराच्या आजूबाजूला पण शांत जागा बघायला सांगितली तर? होय, नवऱ्याला सांगायचे… अशी शांत जागा बघ, आजूबाजूला आंब्या-काजूची झाडे हवी, भरपूर पाणी हवे आणि शांतता हवी!
संध्याकाळी स्नेहल घरी आली. शंकर, तिचा नवरा नाटकाला जायचा होता, म्हणजे रात्री आठनंतरच येणार होता. तिने येताना आणलेले मासे साफ केले आणि थोड्या माशांची आमटी केली आणि थोडे मासे फ्राय करायला तिखट-मीठ लावून ठेवले. आता शंकर आला की, ताट घेता-घेता मासे तळायचे, असे तिने ठरवले.
रात्री नऊच्या सुमारास शंकर घरी आला. तो हातपाय धुवेपर्यत तिने मासे तव्यावर टाकले… तोपर्यंत शंकर कपडे बदलून आला आणि जेवणासाठी खुर्चीवर बसला. घरात तळलेल्या माशांचा वास पसरला होता, त्यामुळे शंकरची भूक अनावर झाली.
त्याच्या ताटात भाकरी आणि कालवण वाढता वाढता स्नेहल बोलू लागली…
“मला वाटते, आपण गावाकडे थोडीशी जागा पाहावी…”
“काय?” माशाचा काटा काढता काढता शंकर दचकून म्हणाला.
“होय… मी आता निवृत्त होणार, मग या मुंबईत काय करायचे? कसा दिवस घालवायचा? हा प्रश्न आहे. आपले गावचे घर आहे, पण ते सामायिक! त्या घरात माणसे भरपूर, येणारे जाणारे सतत, शिवाय शेती-बागायती, गुरे… त्त्यांचा व्याप मोठा. त्या घरात आणखी दोघांची भर नको, त्याऐवजी त्याच परिसरात स्वतंत्र जागा घेऊन घर बांधले तर बरे…”
“पण आपले घर असताना, अजून एक घर?”
“नाही, आपले घर आहेच, पण त्याच्याजवळ दुसरे अजून एक घर, बागायती असली म्हणजे बरे. म्हणजे माझा पण वेळ जाईल त्या बागेत. शिवाय, आपले नवीन घर हे शहरासारख्या सुखसोयीयुक्त असले म्हणजे माझ्या मैत्रिणींना, भावाबहिणींना बोलवता येईल चार दिवसांसाठी!”
शंकरला बायकोचे म्हणणे पटले. शिवाय, तो तिला जपत होता. कारण.. कारण, एक फार मोठा धक्का त्या दोघांनी सोसला होता… पंधरा वर्षांपूर्वी त्त्यांची लाडकी लेक, एका विचित्र कविळीने देवाघरी गेली होती.
“ठीक आहे, मी आता गावी गेलो की संतोषला सांगतो…”
“पण जागा बघताना थोडी मोठी बघा, म्हणजे एका घरापुरती नको, अजून कुणाला घर बांधायचे असल्यास बांधू शकेल आणि पाणी भरपूर पाहिजे…”
“ठीक आहे,” असं म्हणून शंकर समाधानाने जेवू लागला.
झोपायला गेल्यावर शंकर मनातल्या मनात विचार करत होता… ‘या घटकेला मला स्नेहल आहे आणि स्नेहलला मी आहे… तिसरे कुणी नाही! एक होती लाडोबा, दोघांचा जीव… पण गेली. कदाचित तिचे तेवढेच आयुष्य होते, मोठा धक्का बसला. आजूबाजूला सर्व होते, तरीपण आपले ते आपलेच ना! तिच्या जाण्याने स्नेहल पुरती खचली, पण तिच्या मैत्रिणी पार्वती, रंभा आणि त्त्यांचे कुटुंबीय… त्यांनीच सावरले स्नेहलला. दोन महिन्यानंतर तिला बँकेत घेऊन गेली ती मंडळी, तिचे मन रमवले त्यांनीच… परत पूर्वीची स्नेहल उभी राहिली त्यांच्याचमुळे…’
‘आपण, आपली नोकरी, मित्रमंडळी आणि नाटक नावाचे वेड.. त्या वेडाने सावरलो आपण.. खरंच सावरलो आपण? छे… नुसते नाटक सावरण्याचे… आपण तेव्हाच मेलो खरेतर! आपण नाटक करत असतो, हसत असतो, ट्रिप्स करत असतो… पण आतून? आतून रोज रडत असतो आपण… कधी नव्हे तो स्नेहलने गावी जागा घ्यायची इच्छा व्यक्त केली आहे… घर बांधायचे.. भरपूर पाणी, झाडे… नवीनवीन झाडे लावायची… एक कुत्रा सोबतीला अन् एक मांजर…’
सुखस्वप्न डोळ्यांसमोर आणत आणत शंकर झोपी गेला.
0000
पंधरा दिवसांनी शंकर गावी गेला तेव्हा चुलत भावाला म्हणाला… “संतोष, एक आठ-दहा गुंठे जागा असेल तर बघ या भागात…”
“काय करूचा आसा?”
“स्नेहल आता रिटायर होता ना या महिन्यात, तेची इच्छा आसा एक मुंबईसारखे सोयी असलेला घर बांधूचा… म्हणजे इकडेच आमी रवाक येऊ, शिवाय कोणी मित्रमंडळी, नातेवाईक पण येऊन चार दिवस राहू शकतीत. आपला जुना घर जरी आसला तरी ता शेतकऱ्याचा घर रे, तेच्यात आधुनिक सोई कसे असतले?”
“बरा… शंकरभाई, आपले गुंडू काका आसत ना, तेंची जमीन देऊची आसा…”
“आंss, गुंडू काका जमीन विकतत?”
“होय. तेंचो मुलगो अमेरिकेक, आता गुंडू काका एकटेच, ते पण अमेरिकेक जातत मुलाकडे… सध्या ते तेंच्या मुलीकडे कणकवलीत आसत… माका म्हणा होते, तेंचो वीस गुंठेयाचो प्लॉट विकूचो आसा म्हणून…”
“अरे व्वा.. ह्या छानच झाला… आपण उद्याचं जाऊया कणकवलीक…”
दुसऱ्या दिवशी शंकर आणि संतोष मोटरसायकलने कणकवलीत गेले. गुंडू काकाची मुलगी तेलीआळीत रहात होती, तिच्या घरी पोहोचले. त्या दोघांना पहाताच गुंडू काकांना खूप आनंद झाला.
“अरे शंकर, किती दिवसांनी दिसत? दोघाय मुंबईक रावतव… पण भेट होणा नाय… बरा वाटला… संतोष आणि तू दोघाय इलात, बरा वाटला..”
“काका, मागे तुमी माका म्हटलात, तुमची गावातली वीस गुंठे जमीन देऊची आसा म्हणून… शंकराक होई आसा…”
“अरे वा! शंकर म्हणजे घरातलो.. बरा झाला म्हणजे जमीन घरातच रवात.”
“पण काका, दर किती? माका झेपाक होयो…” – शंकर.
“अरे झेपतलो.. तुका जास्ती सांगाचय नाय…”
शंकर आणि गुंडू काका यांची बोलणी झाली आणि व्यवहार पक्का झाला. शंकरने फोन करून स्नेहलला सर्व बातमी सांगितली. चार दिवसांत शंकरने पैसे दिले आणि रजिस्ट्रार ऑफिसमध्ये जाऊन खरेदीखत केले आणि जमीन ताब्यात घेतली.
शंकर संतोषसह खरेदी केलेल्या जमिनीकडे गेले. चांगली मातीची जागा होती, शिवाय चार आंबा झाडें, दोन फणस आणि एक जांभळीचे झाड होते. जवळून ओढा वहात होता, त्याला उन्हाळ्यात सुद्धा पाणी होते. म्हणजे या जमिनीत विहीर खणली तर पाणी निश्चित होते. संतोषने विहीर बांधून देणाऱ्या माणसाची भेट घेतली, त्याने अंदाजे वीस फुटावर निश्चित पाणी मिळणार असा अंदाज वर्तवला. एकांदरीत सर्व गोष्टी मनासारख्या झाल्या… शंकर सर्व गोष्टी बायकोला कळवत होता. या बातम्या ऐकून तिला पण आनंद होत होता.
शंकरने तीन हजार दगड, पाच ब्रास वाळू आणि गोल दगडाची ऑर्डर दिली आणि तो मुंबईस परतला.
0000
स्नेहल रोजच तिच्या खास मैत्रिणी पार्वती आणि रंभा यांना फोन करून आपल्या जमीन खरेदीची बातमी सांगत होती. एक दिवस पार्वती तिला म्हणाली,
“स्नेहल.. अग तुम्ही वीस गुंठे जागा घेतली आहे तर, त्यातील पाच गुंठे जमीन माझ्यासाठी ठेव, म्हणजे आम्ही पण तुझ्या शेजारीच घर बांधू…”
“हो ग पारू! म्हणजे तू माझी शेजारी होशील… मी यांना म्हणते तसं.”
पार्वती स्नेहलशेजारी घर बांधते आहे हे ऐकून रंभा हिनेही आपल्यासाठी पाच गुंठे जागा ठेवायला सांगितली. शंकरला ही बातमी कळली, तेव्हा त्यालाही बरे वाटले; कारण त्यांना पण एवढी जमीन नको होती आणि दहा गुंठे जमिनीचे पैसे मिळाले तर घर बांधण्यासाठी वापरता येणार होते.
हेही वाचा – नमन नटवरा… जयवंत सरांच्या निराशेचे कारण काय?
त्या दिवशी स्नेहल, पार्वती आणि रंभा यांनी ठरवले, घराचे काम सुरू करण्याआधी मुंबादेवीला नमस्कार करून येऊ. म्हणून तिघींनी महालक्ष्मी स्टेशनवर जमायचे ठरविले. स्नेहल गोरेगावहून निघाली. तिने पार्वतीला फोन केला, तेव्हा तिला कळले ती पण मुलुंडवरून निघाली आहे. रंभा माहीममध्ये राहत होती… ती पण निघाली. सकाळी अकरा वाजता तिघी मैत्रिणी महालक्ष्मी स्टेशनवर दोन नंबर प्लॅटफॉर्मवर भेटल्या. प्लॅटफॉर्मवरील गर्दी कमी होताच, तिघी जिना चढायला लागल्या. त्यांना स्टेशनमधून बाहेर पडायचं होत… पुढे रंभा, मधे पार्वती आणि तिच्या मागे स्नेहल अशा पायऱ्या चढता चढता पाचव्या पायरीवर असताना स्नेहलच्या छातीत कळ आली आणि गडगडत खाली जाऊ लागली… मागून येणाऱ्या माणसाने तिला अडवले आणि तो ओरडू लागला…
“गिर गयी.. गिर गयी…”
लोक धावू लागले… खालून वरून लोक जमा झाली. वरची पायरी चढता चढता पार्वतीने मागे पाहिले… स्नेहल नव्हती… लोक दुसऱ्या पायरीकडे धावत होती… पटकन पार्वती मागे वळली… तिने पाहिले कुणा एका पुरुषाने स्नेहलला पकडले होते आणि तो ओरडत होता… वर गेलेली रंभा पण धावत खाली आली… गर्दी बाजूला सारून ती स्नेहलच्या दिशेने झेपावली… तोपर्यंत लोक ओरडू लागले होते… “डॉक्टर… डॉक्टर… कोई डॉक्टर है…” एक मुलगी पुढे झाली.
“हां. मै डॉक्टर हूं… देखती हूं..” म्हणत तिने स्नेहलची नाडी पाहिली. कान छातीला लावून छातीची धडधड तपासली…
“हॉस्पिटल में लेके जाना चाहिये… अर्जन्ट…”
तोपर्यंत रेल्वे पोलीस आले.. स्ट्रेचर मागविले गेले आणि बाहेर ॲम्ब्युलन्स आली… ती ॲम्ब्युलन्स जसलोकच्या दिशेने धावू लागली.


