रोजच्या जेवणात वेगळेपणा आणण्याचा प्रयत्न गृहिणींचा असतो. यासाठी काही नवनवीन प्रयोग केले जातात… असेच काही प्रकार ‘फूड कॉर्नर’मध्ये देत आहोत. मसालेभात, मुगाची उसळ, सांबार, भिशीभेळ करताना टिप्स वापरून पाहा.
- पुलाव सुशोभित करण्यासाठी वरून खोवलेले किंवा किसलेले खोबरे, तळलेले कांदे, तळलेले फ्लॉवरचे तुकडे, कांद्याच्या गोल चकत्या, गाजराचा वाफाळलेला किस, बटाट्याच्या काचऱ्या, मैदा आणि मावा मिसळून तळलेले लहान लहान गोळे इत्यादींचा उपयोग करावा. डिश छान दिसते.
- मसालेभात करताना तिखट हवे असेल त्या प्रमाणात आलं, हिरवी मिरची, काळी मिरी आणि भरपूर कोथिंबिरीसह वाटण तयार करावे. भाताला उकळी आल्यावर त्यात वाटण, गोडा मसाला आणि चवीपुरती साखर घालावी. (वाटण फोडणीत परतू नये) मसालेभाताला सुंदर रंग तर येतोच; पण चवही अतिशय खुमासदार येते.
हेही वाचा – Kitchen Tips : दह्याची कोशिंबीर, वांग्याचे भरीत आणि टोमॅटो प्युरी करताना…
- डाळ नेहमी भाजून दळायला द्यावी, म्हणजे ती हलकी होते आणि पौष्टिकपण असते. कोणताही पदार्थ केला तरी चविष्ट लागतो. पिठले, लाडू केले तरी बाधत नाही. कोणत्याही पदार्थाला रंग चांगला येतो. पालेभाजी करताना हे पीठ लावले तर कढईला लागत नाही. भाजी चविष्ट लागते.
- गोडं वरण, भात उरला असेल, तर तेलाची फोडणी करून त्यात मेथी, कढीपत्ता, लाल मिरची घालून थोडासा कांदा, बटाटा, नारळ, मीठ आणि पाणी घालून त्यात भात आणि वरण घालावे. हे सर्व खातेवेळी त्यावर तूप घ्यावे. हा भिशीभेळीचा प्रकार होतो. अन्नाची नासाडी पण होत नाही आणि गरम पदार्थ खावयास चांगला लागतो.
- मोड आलेल्या मुगाची उसळ केलीत, तर त्यांची सालं फेकून न देता, त्यात भिजलेली हरभऱ्याची डाळ किंवा डाळीचे पीठ, लसूण, जिरे, कोथिंबीर, तिखट, हळद, मीठ वाटताना घालून सांडगे करावेत. तेलावर वाफवून तसेच खावेत किंवा रस्सा करावा.
हेही वाचा – Kitchen Tips : लाल भोपळ्याचे रायते, कोफ्ता करी, आलू-मटर करताना…
- सांबार करताना फोडणीच्या तेलात आले आणि लसूण बारीक वाटून टाकावे. तसेच एक चमचा लालभडक तिखट फोडणीतच टाकावे. अर्धा चमचा साखर टाकावी. सांबार हॉटेलप्रमाणे होते. रंगही छान येतो.
तुमच्याही ‘स्पेशल रेसिपी’ किंवा अशा काही ‘किचन टिप्स’ असतील तर, avaantar.recipe@gmail.com या ईमेलवर किंवा 9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवा. या वेबसाइटच्या ‘फूड कॉर्नर’ या कॅटेगरीत त्या प्रसिद्ध केल्या जातील.


