Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    …तर इतरांकडे पाहण्याची घाई कमी होते!

    May 21, 2026

    नीला-विनायक प्रेमकहाणी अन् भूतबंगला..

    May 21, 2026

    Kitchen Tips : मसालेभात, मुगाची उसळ, सांबार, भिशीभेळ बनविताना…

    May 21, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Friday, May 22
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » अखेर अग्रवाल शेठनीच अशोकला दिला न्याय!
    ललित

    अखेर अग्रवाल शेठनीच अशोकला दिला न्याय!

    दीपक तांबोळीBy दीपक तांबोळीMay 21, 2026No Comments6 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीसाहित्य, मराठीलेख, मराठीआर्टिकल, मी मराठी, अभिजात मराठी, कथाविश्व, अशोकला मिळाला न्याय, कथा अशोकच्या मेहनतीची, कहाणी अशोकच्या ईमानदारीची, मराठी व्यावसायिक, बेरोजगारीचा प्रश्न, इंजिनिअर अशोक, अग्रवाल शेठचा न्याय, व्यावसायातील जोखीम, व्यवसायातील मराठी माणसं,
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    “अरे बापरे! तुम्ही तर मेकॅनिकल इंजिनीअर आहात अशोक; मग तुम्ही ऑफिस असिस्टंटसाठी का अप्लाय केलात?” अग्रवाल शेठनी विचारलं.

    अशोक ओशाळवाणं हसला. मग म्हणाला, “काय करणार सर, दोन वर्षं झालीत बी.ई. होऊन, पण अजून नोकरी नाही. घरची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नाही त्यामुळे…”

    “काय करतात वडील तुमचे?”

    “गणपती मंदिराजवळ फुलांचं दुकान आहे सर आमचं…”

    “ओह! पण तुम्हाला कल्पना आहे ऑफिस असिस्टंटला काय काय काम असतात ती?”

    “हो सर. सगळी नॉन-टेक्निकल काम असतात. पण ईलाज नाही सर… माझ्या आईवडिलांना माझ्याकडून फार अपेक्षा होत्या. मी मात्र दोन वर्षांपासून रिकामा बसून आहे. ते मला बोलत नाहीत, पण त्यांची मन:स्थिती मी समजू शकतो. या नोकरीमुळे कमीतकमी मी कुठेतरी गुंतल्याचं आणि काहीतरी कमवत असल्याचं समाधान तरी त्यांना मिळेल.”

    अग्रवाल शेठ विचारात पडले. गेल्या तीन महिन्यांपासून त्यांच्या फॅक्टरीत एक इंजिनीअरची जागा रिकामी होती. अशोकला तिथे पाठवता आलं असतं, पण त्याला इंजिनीअरचा पंधरा-वीस हजार पगार द्यावा लागला असता. शेठ महाधूर्त होते… त्यांनी खेळी खेळायचं ठरवलं…

    “ठीक आहे अशोक. तुम्ही उद्यापासून येऊ शकता. तुम्हाला पाच हजार पगार देऊ आम्ही. ऑफिसची सर्व कामं तुम्हाला करावी लागतील.”

    “येस सर…” अशोक खूश होऊन म्हणाला. जसा तो उठायला लागला शेठ म्हणाले, “अजून एक, आता तुम्ही इंजिनीअर आहात तर, आमच्या फॅक्टरीत गरज लागली तर जाल ना?”

    “जाईन की सर. ते आवडेल मला…”

    शेठ हसले. त्यांचा हेतू साध्य झाला होता.

    हेही वाचा – पुस्तकांचा ठेवा अन् खरा वारसदार!

    दोन-तीन दिवस ऑफिसमध्ये काम केल्यावर अशोकला फॅक्टरीत बोलावण्यात आलं. कामकाज समजावून देण्यात आलं आणि दुसरा इंजिनीअर मिळेपर्यंत तिथेच काम करावं, असं सांगण्यात आलं. अशोकलाही आपल्या शिक्षणाशी संबधित काम मिळालं, याचा आनंद झाला. थोड्या दिवसातच तो फॅक्टरीत रुळला. मेहनती आणि हुशार असल्याने उत्पादनाशी संबधित सर्व बारकावे त्याने पटकन आत्मसात केले. क्वालिटी आणि क्वान्टिटी वाढवण्यासाठी त्याने बऱ्याच सुधारणा केल्या, त्या चांगल्याच यशस्वी ठरल्या. त्याच्या लक्षात आलं की, इथले कामगार खूप बेशिस्त आहेत. वेळीअवेळी मशिन्स बंद करून तंबाखू, गुटखा खाणं, केव्हाही चहा प्यायला जाणं, काम सोडून गप्पा मारत बसणं असे उद्योग चालायचे. प्रॉडक्शन मॅनेजरला सांगून त्याने त्याच्यावर बंधनं आणली. त्यामुळे कामगार दुखावले, पण उत्पादन वाढलं. कंपनीचा नफा वाढू लागला.

    तीन महिने झाले तरी दुसरा इंजिनीअर आला नाही आणि अशोकचा पगारही पाच हजाराच्या वर गेला नाही. वीस-पंचवीस हजार पगार घेणारे दुसरे इंजिनीअर्स आता त्याची टिंगलटवाळी करू लागले. महाधूर्त असणाऱ्या अग्रवाल शेठनी त्याचा पाच हजारांत कसा बकरा केला, यावर हशा पिकू लागला. अशोकलाही ते समजत होतं, पण जोपर्यंत दुसरी नोकरी मिळत नाही, तोपर्यंत ही नोकरी सोडून चालणार नव्हतं. परत आईवडिलांवर ओझं व्हायची त्याची तयारी नव्हती.

    मध्यंतरी अग्रवाल शेठनी सगळ्या इंजिनीअर्सची मीटिंग घेतली. त्यात त्यांनी अशोकची खूप प्रशंसा केली. “कमी पगारातही अशोकचा परफॉर्मन्स एक्सलन्ट असून वीस-पंचवीस हजार पगार घेणाऱ्या इंजिनीअर्सनी त्यांच्याकडून काही शिकलं पाहिजे,” असं ते म्हणाले… तेव्हा अशोकची छाती अभिमानाने फुलून आली. अग्रवाल शेठनी त्याला पगारवाढीचंही आश्वासन दिलं.

    अशोकला आता फॅक्टरीत 11 महिने झाले होते. अग्रवाल शेठनी त्याला दिलेलं पगारवाढीचं आश्वासन पाळलं नाही. तो निराश झाला, पण ईमानदारीने काम करणं त्याने सोडलं नाही. कधीतरी शेठना दया येऊन ते पगार वाढवतील, अशी त्याला खात्री होती.

    त्यातच एक दुर्दैवी घटना घडली. फॅक्टरीत कामगार युनियनची निवडणूक होऊन गुंड प्रवृत्तीचे प्रतिनिधी निवडून आले. त्यांनी फॅक्टरीतील वातावरण बिघडवून टाकलं. अशोकच्या रोजच कामगारांशी कटकटी होऊ लागल्या.

    एक दिवस तंबाखू खाण्यावरून एका कामगाराशी अशोकचा वाद झाला. वाद इतका विकोपाला गेला की, त्याचं पर्यावसान हाणामारीत झालं. आजूबाजूच्या कामगारांनी आपापल्या मशिन्स बंद केल्या आणि अशोकला मारायला सुरुवात केली. सिक्युरिटीने वाद सोडवला, पण अख्ख्या  फॅक्टरीतल्या कामगारांनी कामबंद आंदोलन सुरू केलं. जोपर्यंत फॅक्टरीत अशोक आहे, तोपर्यंत काम सुरू होणार नाही, अशी भूमिका कामगारांनी घेतली. फॅक्टरीच्या डायरेक्टर्सची तातडीने बैठक झाली आणि त्यात अशोकला फॅक्टरीतून काढून टाकायचा निर्णय घेण्यात आला.

    दुसऱ्या दिवशी अग्रवाल शेठनी अशोकला ऑफिसमध्ये बोलावून घेतलं. काय होणार याची पुसटशी कल्पना असल्याने, धडधडत्या ह्रदयाने अशोक केबिनमध्ये शिरला.

    “या अशोक बसा. जे घडलं ते वाईट घडलं,” अग्रवाल शेठनी बोलायला सुरुवात केली… “यात तुमची काही चूक आहे, असं मला वाटत नाही. पण माझा काही इलाज नाही. बोर्ड ऑफ डायरेक्टर्सने तुम्हाला काढून टाकायचा निर्णय घेतला आहे.”

    अशोकचे डोळे अश्रूंनी भरुन आले.

    “सर, मी जे काही केलं ते फॅक्टरीच्या हितासाठीच होतं…”

    “मला मान्य आहे. एक वर्षापासून मी तुम्हाला ओळखतोय. पण तुम्ही जाणताच दोन दिवसांपासून फॅक्टरी बंद आहे. लाखोंचं नुकसान होतंय. एका माणसासाठी एवढं नुकसान आम्ही सहन करू शकत नाही.”

    “सर पण प्लीज मला काढू नका. मी ऑफिस असिस्टंट म्हणूनही काम करायला तयार आहे…”

    “तिथे तर दोन माणसं अगोदरच काम करताहेत. त्यामुळे ते शक्य होणार नाही.”

    “सर, मी माझ्या आईवडिलांना कसं तोंड दाखवू?”

    दुःखाने अशोकच्या डोळ्यातून आता अश्रू वाहू लागले. अग्रवाल शेठनी खांदे उडवले.

    “तुमचा हिशोब तयार आहे. कॅशियरकडून घ्या…” अशोक जड अंतःकरणाने उठला. दरवाजाजवळ जाऊन त्याने दरवाजा उघडला…

    “थांबा अशोक…” अशोक वळला, त्याने चमकून शेठकडे पाहिलं.

    “या फॅक्टरीतून तुम्हाला काढलं असलं तरी, आमची नाशिकची कंपनी तुम्ही जॉइन करू शकता!”

    अशोकला आपण काय ऐकतो आहोत, ते समजेना!

    “काय म्हटलात सर?”

    “होय, अशोक तुम्ही योग्य तेच ऐकताहात…”

    “सर, पण तिथे तुम्ही पाच हजार पगार द्याल ना मला?” अशोक अजूनही संभ्रमावस्थेतच होता.

    “नाही अशोक, तिथे तुम्हाला पाच नाही, पन्नास हजार रुपये पगार मिळणार आहे!”

    “सर, चेष्टा करताय माझी,” अशोक अविश्वासाने म्हणाला.

    “नाही अशोक तिथे तुम्ही सुपरवायझर नाही तर, प्रॉडक्शन मॅनेजर म्हणून जाताय. तुमची हुशारी, मेहनत पाहून कधीपासूनच ते माझ्या मनात आलं होतं. ती संधी आज अशा प्रकारे चालून आली. तुमच्यावर नशिबाने, कामगारांनी आणि आम्हीसुद्धा खूप अन्याय केला. आता न्याय करायची वेळ आलीय…”

    हेही वाचा – जोशी सर… भलेपणाचा वसा

    अशोक आनंदला.

    “सर, पण मला दोन दिवस वेळ द्या, पुढची सगळी व्यवस्था करायला…”

    “काहीच गरज नाही अशोक. तिथे टू बीएचकेचा वेल फर्निश्ड फ्लॅट रेडी करून ठेवलाय. बाकी सर्व व्यवस्थाही झाली आहे. तुम्ही फक्त बॅग पॅक करा. उद्या सकाळी तुम्हाला घ्यायला गाडी येईल. तुम्ही जोपर्यंत नोकरीत रहाल तोपर्यंत ती कायम तुमच्याकडेच राहील.”

    अशोकच्या डोळ्यांतून आता आनंदाश्रू वाहू लागले. तो पुढे येऊन शेठजींच्या पाया पडू लागला. शेठजींनी त्याला उचलून छातीशी धरलं.

    “अशोक एक गोष्ट मला नेहमी खटकते. तुम्ही मराठी तरूण का नोकरीच्या मागे लागता? जेवढी मेहनत तुम्ही महिना पाच हजारांसाठी वर्षभर केलीत, तेवढ्या मेहनतीत तुम्ही स्वतःच्या व्यवसायात महिन्याला दोन लाख कमवू शकता…”

    “सर, आमच्याकडे भांडवलाचा प्रश्न असतो. ते असलं तरी कुटुंबाचा आणि आमच्या समाजाचा आम्हाला पाठींबा नसतो. त्यातून धंदा नाही चालला तर, नुकसानाची भीती असते…”

    “अहो, तुम्ही पाण्यात पडायची तयारी तर ठेवा… पोहता तुम्हाला आपोआपच येईल! तुम्हाला सांगू मी दोनदा दिवाळखोर झालोय… भीक मागायची वेळ आली होती माझ्यावर… पण चिकाटी ठेवली तर, माणूस तरून जातो…! ठीक आहे. यापुढे मराठी तरुणांना व्यवसायात आणण्याची जबाबदारी तुमची! दोन मराठी तरुणांना जरी तुम्ही व्यवसाय सुरू करून दिलात तरी तुम्ही समाजाला न्याय दिला असं मी म्हणेन…”

    Avatar photo
    दीपक तांबोळी

    निवृत्त रेल्वे अभियंता. 2018पासून लेखनास सुरुवात केली. आतापर्यंत 6 कथासंग्रह आणि 1 संपादित कथासंग्रह प्रकाशित. 8वा कथासंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर. महाराष्ट्रातील विविध नामांकित साहित्य संस्थांचे 35 राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

    Related Posts

    …तर इतरांकडे पाहण्याची घाई कमी होते!

    May 21, 2026 ललित

    नीला-विनायक प्रेमकहाणी अन् भूतबंगला..

    May 21, 2026 ललित

    मी, मार्था मॅम आणि राधा…

    May 20, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    …तर इतरांकडे पाहण्याची घाई कमी होते!

    By रेवती निलेश पांडेMay 21, 2026

    काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर सहज एक रील बघितली. त्या रीलमध्ये एक अतिशय छोटी मुलगी होती. नीट…

    नीला-विनायक प्रेमकहाणी अन् भूतबंगला..

    May 21, 2026

    मी, मार्था मॅम आणि राधा…

    May 20, 2026

    Bookshelf : निशाणी डावा अंगठा… आपली फक्त हतबलता!

    May 19, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    …तर इतरांकडे पाहण्याची घाई कमी होते!

    May 21, 2026

    नीला-विनायक प्रेमकहाणी अन् भूतबंगला..

    May 21, 2026

    Kitchen Tips : मसालेभात, मुगाची उसळ, सांबार, भिशीभेळ बनविताना…

    May 21, 2026

    अखेर अग्रवाल शेठनीच अशोकला दिला न्याय!

    May 21, 2026

    Dnyaneshwari : कीर्ती आठवितां वेळोवेळां, भोगितसें महासुखाचा सोहळा

    May 21, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 21 मे 2026

    May 21, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 304
    • अवांतर 186
    • आरोग्य 112
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 426
    • फिल्मी 48
    • फूड काॅर्नर 212
    • मैत्रीण 19
    • ललित 641
    • शैक्षणिक 81
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    …तर इतरांकडे पाहण्याची घाई कमी होते!

    May 21, 2026

    नीला-विनायक प्रेमकहाणी अन् भूतबंगला..

    May 21, 2026

    Kitchen Tips : मसालेभात, मुगाची उसळ, सांबार, भिशीभेळ बनविताना…

    May 21, 2026
    Most Popular

    …तर इतरांकडे पाहण्याची घाई कमी होते!

    May 21, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.