सदानंद आणि सावित्रीबाई पुण्यातील त्यांच्या प्रशस्त बंगल्यात राहत होते. एकेकाळी राज आणि वरदच्या धावपळीने गजबजलेला तो बंगला आता शांततेच्या सावलीत उभा होता. भिंतींवरची छायाचित्रे अजूनही स्मृती जागृत करत होती — शाळेतील बक्षिसे, वाढदिवस, कौटुंबिक सहली आणि मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी घेतलेल्या कष्टांची आणि त्यागाची.
सदानंद एका खासगी कंपनीतून निवृत्त झाले होते, त्यामुळे पेन्शन नव्हतं. नियमित उत्पन्नाचा कोणताही स्रोत नव्हता. घराची रचना अशी होती की, त्यातील कोणताही भाग वेगळा करून भाड्याने देता येत नव्हता.
मोठा मुलगा राज आणि सून नेहा दिल्लीत राहात होते. धाकटा मुलगा वरद आणि रीना नागपूरमध्ये स्थायिक झाले होते. दोन्ही मुलं आई-वडिलांना दरमहा पैसे पाठवत होते. हल्ली त्या पैशांसोबत काही विषारी शब्द हमखास कानावर पडत होते.
“बाबा, आमचेही खूप खर्च आहेत.”
“आई, शक्य तेवढं पाठवलं आहे.”
“आम्हालाही आमच्या भविष्याचा विचार करावा लागतो.”
शब्द साधे होते, पण त्यात नकळत उपकाराची धार होती.
मुलांच्या शिक्षणासाठी स्वतःच्या इच्छा, प्रवास, दागिने, कपडे आणि कितीतरी छोट्या-मोठ्या हौशी बाजूला ठेवणाऱ्या सदानंद आणि सावित्रीबाईंच्या मनाला हे शब्द खोलवर बोचत असत.
एका रात्री सावित्रीबाई म्हणाल्या, “अहो, आता मुलांकडून पैसे घेताना अपराध्यासारखं वाटतं. आपण हा बंगला विकायचा का? भरपूर पैसे मिळतील. त्यातून मुलांना थोडे देऊ आणि भाड्याच्या घरात आपल्या पैशांवर जगू या.”
सदानंद काही वेळ विचारात पडले. मग त्यांच्या चेहऱ्यावर एक खट्याळ हास्य उमटलं…
“आपल्याला पैसे नकोत, सावित्री. आपल्याला मुलांच्या मनातलं प्रेम परत हवं आहे.”
“ते कसं मिळणार?”
“खूप सोपं आहे. फक्त बघत रहा.”
उन्हाळ्यात राज आणि नेहा एक आठवड्यासाठी पुण्याला आले. रात्री झोपताना नेहा कपाटातून चादरी काढत असताना तिला एक तपकिरी लिफाफा दिसला. त्यावर लिहिलं होतं — “माझे इच्छापत्र.”
आई-बाबा झोपल्यावर तिने तो लिफाफा राजला दिला. राजने तो उघडला. त्यात लिहिलं होतं —
“माझ्या पश्चात माझ्या सर्व मालमत्तेपैकी 70% हिस्सा माझा मोठा मुलगा राज यास आणि 30% हिस्सा माझा धाकटा मुलगा वरद यास मिळावा.”
राजच्या डोळ्यांत चमक आली. नेहाच्या मनात स्वप्ने तरळली. त्या दिवसापासून राज आणि नेहाचे आई-बाबांवरील प्रेम भलतेच वाढले. बोलण्यातील तुसडेपणाची जागा प्रेमाने घेतली. दिल्लीला परत गेल्यावर चौकशीचे फोन वाढले. न मागता पैसे येऊ लागले. “अजून पाठवू का?” “किती पाठवू?” अशी विचारणा होऊ लागली.
“बाबा, पैशांचा विचार करू नका…”
“आई, जास्त कष्ट करू नकोस, जरा आराम पण कर…”
आटलेलं प्रेम पुन्हा दृश्य झालं होतं.
दोन महिन्यांनी वरद आणि रीना आले. कपाटात त्यांनाही एक लिफाफा दिसला. त्यात लिहिलं होतं —
“माझ्या पश्चात माझ्या सर्व मालमत्तेपैकी 70% हिस्सा माझा धाकटा मुलगा वरद यास आणि 30% हिस्सा माझा मोठा मुलगा राज यास मिळावा.”
वरद आणि रीना आनंदित झाले. नागपूरहून येणारी रक्कमही वाढली. फोनवरचा आवाज मृदू झाला. दोन आठवड्यांनी येणारा फोन दोन दिवसांनी येऊ लागला. आपलेपणा वाढला, आदर वाढला…
हेही वाचा – सदानंद सर अन् सावित्रीबाईंची स्वप्नपूर्ती!
काळ सरकत गेला. सदानंद आणि सावित्रीबाईंच्या लग्नाला चाळीस वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने संपूर्ण कुटुंब बंगल्यात एकत्र जमले. घर सजले, अंगणात रोषणाई झाली. जुन्या फोटोंचा स्लाइड शो पाहताना सगळ्यांचे डोळे नकळत पाणावले…
जेवणानंतर सदानंदांनी सर्वांना एकत्र बोलावले. त्यांच्या हातात दोन लिफाफे होते.
“आज मला तुमची माफी मागायची आहे,” सदानंद म्हणाले.
सगळे स्तब्ध झाले.
“यातील एका इच्छापत्रात लिहिले आहे – राजला सत्तर टक्के हिस्सा, तर दुसऱ्यात लिहिले आहे – वरदला सत्तर टक्के हिस्सा. या दोन्ही इच्छापत्रांवर ना तारीख आहे ना सही. त्यांना कोणतीही कायदेशीर किंमत नाही.”
राज आणि वरद अवाक् झाले.
सदानंदांचा आवाज थरथरला…
“मला माफ करा. तुम्हाला फसवण्याचा माझा हेतू नव्हता. आम्हाला तुमच्याकडून पैशांपेक्षा जास्त प्रेम हवं होतं आणि ते या दोन कागदांनी परत आणलं. घरातील हरवलेला जिव्हाळा परत आणला.”
घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती
तिथे असावा प्रेम-जिव्हाळा, नकोत नुसती नाती
राज उठला. त्याने वडिलांना घट्ट मिठी मारली… “बाबा, माफी तुम्ही नाही, आम्ही मागायला हवी.”
नेहा अश्रू पुसत म्हणाली, “आम्ही हिश्शाच्या मोहाने जवळ आलो; पण या काळात समजलं की, आमच्यावर निस्सीम प्रेम करणारे तुमच्याशिवाय दुसरे कोणी नाही.”
वरद वडिलांच्या पायापाशी बसला…
“तुम्ही आम्हाला आमचंच खरं रूप दाखवलंत.”
रीना म्हणाली, “या घरात सिमेंट आणि विटा नाहीत; इथे तुमचा त्याग आहे, अतोनात कष्ट आणि तेवढंच जास्त प्रेम आहे.”
घर तुटलं नाही तर एकसंध आहे, हे पाहून सावित्रीबाईंच्या डोळ्यांत समाधान चमकत होतं.
हेही वाचा – म्हातारा-म्हातारी आणि मृत्यूपत्र!
काही महिन्यांनी बातमी आली की, बंगल्याजवळून नवीन महामार्ग जाणार होता. एक मोठा बिल्डर बंगला विकत घेण्यासाठी तब्बल दोन कोटी रुपये देण्यास तयार झाला.
दिवाळीला सर्व परत एकत्र आले, तेव्हा सदानंदांनी बंगला विकण्याचा मानस सांगितला. सदानंद म्हणाले, “बंगला विकला तर आम्हाला तुमच्याकडून पैसे घेण्याची गरज उरणार नाही.”
राजने ताबडतोब म्हटलं, “बाबा, हा बंगला विकायचा नाही.”
वरद म्हणाला, “हे घर म्हणजे आमच्या आयुष्याचं मूळ आहे.”
नेहा म्हणाली, “दोन कोटी रुपये मिळतील; पण इथल्या आठवणी, त्यांचं काय?”
रीना म्हणाली, “या घरात आईंच्या स्वयंपाकाचा सुगंध आणि बाबांच्या कष्टांचा श्वास आहे.”
राजने वडिलांचा हात हातात घेतला.
“आम्ही पैसे पाठवत राहू…”
वरदने वाक्य पूर्ण केलं.
“पण कर्तव्य म्हणून नाही!”
नेहा म्हणाली, “हिश्शाच्या अपेक्षेने नाही…”
रीना हसत म्हणाली, “…तर आपुलकी म्हणून!”
त्या रात्री सदानंद आणि सावित्रीबाई ओसरीवरील झोपाळ्यावर बसले होते. अंगणातील रातराणीचा सुगंध दरवळला होता. बंगला रोषणाईने नाही तर, नात्यांमधील ओलाव्याने उजळून निघाला होता. घराला घरपण आलं होतं.
सावित्रीबाई हळूच म्हणाल्या, “अहो, त्या दोन कागदांनी म्हणजे इच्छापत्रांनी चमत्कार केला.”
सदानंद हळूवार हसत म्हणाले, “नाही सावित्री, चमत्कार कागदांनी नाही केला.”
“मग?”
सदानंद आकाशाकडे पाहत म्हणाले, “इच्छापत्र तर फक्त निमित्त होतं. खरं कारण आपल्या मुलांच्या मनात जिवंत असलेलं प्रेम — जे फक्त अव्यक्त आणि अदृश्य झालं होतं.”
ती दोन्ही इच्छापत्रं फाडत सदानंद म्हणाले,
“संपला या क्षणी
हा खेळ कागदांचा…
उरला फक्त आता
ओलावा नात्यांचा…”


