सार्थ ज्ञानेश्वरी
अध्याय अकरावा
कृतांताचिया जावळी । जें एकचि विश्वातें गिळी । तियें कोटीवरील सगळीं । गिळितासि शस्त्रें ॥396॥ चतुरंगा परिवारा । संजोडियां रहंवरां । दांत न लाविसी मा परमेश्वरा । कसा तुष्टलासि बरवा ॥397॥ हां गा भीष्माऐसा कवणु । सत्यशौर्यनिपुणु । तोही आणि ब्राह्मण द्रोणु । ग्रासिलासि कटकटा ॥398॥ अहा सहस्रकराचा कुमरु । एथ गेला गेला कर्णवीरु । आणि आमुचिया आघवयांचा केरु । फेडिला देखें ॥399॥ कटकटा धातया । कसें जाहलें अनुग्रहा यया । मियां प्रार्थूनि जगा बापुडिया । आणिलें मरण ॥400॥ मागां थोडिया बहुवा उपपत्ती । येणें सांगितलिया विभूती । तैसा नसेचि मा पुढती । बैसलों पुसों ॥401॥ म्हणोनि भोग्य तें त्रिशुद्धी न चुके । आणि बुद्धिही होणारासारिखी ठाके । माझां कपाळीं पिटावें लोकें । तें लोटेल काह्या ॥402॥ पूर्वीं अमृतही हातां आलें । परि देव नसतीचि उगले । मग काळकूट उठविलें । शेवटीं जैसें ॥403॥ परि तें एकबगीं थोडें । केलिया प्रतिकारामाजिवडें । आणि तिये अवसरींचें तें सांकडें । निस्तरविलें शंभू ॥404॥ आतां हा जळता वारा कें वेंटाळे । कोणाही विषा भरलें गगन गिळे । महाकाळेंसि खेळें । आंगवत असे ॥405॥ ऐसा अर्जुन दुःखें शिणतु । शोचित असे जिवाआंतु । परि न देखे तो प्रस्तुतु । अभिप्रावो देवाचा ॥406॥ जे मी मारिता हे कौरव मरते । ऐसेनि वेंटाळिला होता मोहें बहुतें । तो फेडावयालागीं अनंतें । हें दाखविलें निज ॥407॥ अरे कोण्ही कोणातें न मारी । एथ मीचि हो सर्व संहारीं । हें विश्वरूपव्याजें हरी । प्रकटित असे ॥408॥ परि वायांचि व्याकुळता । ते न चोजवेचि पंडुसुता । मग अहा कंपु नव्हता । वाढवित असे ॥409॥
हेही वाचा – Dnyaneshwari : पैं अखंड डोळ्यांपुढें, फुटलें जैसें महाभयाचें भांडें
अर्थ
जी शस्त्रे यमाची भावंडे आहेत आणि ज्या शस्त्रांपैकी एकच, सर्व विश्वाला गिळील अशी कोट्यवधी शस्त्रे तू गिळीत आहेस. ॥396॥ हत्ती, घोडे, रथ, पायदळ असा चतुरंग सेनेचा परिवार आणि घोडे जोडलेले रथ यास परमेश्वरा, तू दात न लावता गिळीत आहेस आणि त्या योगाने कसा चांगला संतुष्ट झाला आहेस बरे! ॥397॥ अहो, भीष्मासारखा खरेपणात प्रसिद्ध आणि शौर्यात तरबेज असा दुसरा कोण आहे? तो देखील आणि द्रोणाचार्य ब्राह्मणही अरेरे, तू गिळलास. ॥398॥ अहाहा! सूर्याचा मुलगा जो वीर कर्ण, तो आपल्या मुखात गेला हो गेला आणि आमच्याकडचे सर्व (योद्धे) तर तू केसासारखे नाहीसे केलेले मी पाहात आहे. ॥399॥ हाय, हाय! ब्रह्मदेवा, भगवंताच्या या अनुग्रहाने कसे झाले? या विपरीत फलप्राप्तीच्या योगाने असे झाले की, मला आपले विश्वरूप दाखवा, अशी भगवंतांची प्रार्थना करून या दीन जगास (स्थितिकाली) मी मरण आणले. ॥400॥ आणि मागे देवाने थोड्याबहुत युक्तीने विभूती सांगितल्या; परंतु त्या व्यापकपणाप्रमाणे देव मला दिसेना, म्हणून विनंती करण्यास मी सरसावलो. ॥401॥ म्हणून जे भोगावयाचे आहे, ते कधीही चुकणार नाही आणि जसे होणार असेल, त्यासारखी बुद्धी होते. माझ्या प्रारब्धात लोकांनी मला दोष द्यावा असे असेल, ते चुकेल कसे? ॥402॥ पूर्वी (समुद्रमंधनकाली) अमृतदेखील देवांच्या हाती लागले (तेव्हा देवांनी उगी बसावे की नाही?) परंतु देव उगी बसले नाहीत. मग शेवटी ज्याप्रमाणे कालकूट विष समुद्रमंथनापासून उत्पन्न केले; ॥403॥ परंतु ते एक प्रकाराने थोडे होते. कारण ती केलेली गोष्ट निराकारण करण्याजोग्या गोष्टींपैकी एक होती आणि त्या वेळचे ते संकट शंकराने निवारण केले. ॥404॥ पण हल्लीचा जो हा विश्वरूपाचा प्रकार, हा प्रत्यक्ष पेटलेला वाराच आहे, तर तो कसा आवरेल? विषाने भरलेले आकाश कोणास गिळता येईल काय? महाकाळाबरोबर खेळता येईल काय? असे कोणाच्या अंगी सामर्थ्य आहे? ॥405॥ याप्रमाणे अर्जुन दुःखाने कष्टी होऊन मनामध्ये शोक करीत होता. परंतु तो सांप्रत देवाचे मनोगत काय आहे, हे ओळखत नव्हता. ॥406॥ कारण, मी अर्जुन मारणारा आणि हे कौरव माझ्या हातून मरणारे, अशा मोठ्या मोहाने तो घेरला होता, ती भुरळ दूर करण्याकरिता श्रीकृष्णाने हे विश्वरूपरूपी आपले खास स्वरूप त्याला दाखविले. ॥407॥ ‘अर्जुना, वास्तविक कोणी कोणाला मारीत नाही. यात मी स्वतःच सर्वांचा नाश करतो.’ हे तत्व विश्वरूपाच्या निमित्ताने श्रीकृष्ण उघड करून दाखवीत आहे. ॥408॥ परंतु ते अर्जुनास न कळल्यामुळे तो व्यर्थ शोकाकुल होऊन नसलेली भीती उगीच वाढवीत आहे. ॥409॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : कैसा नव्हता प्रळयाचा वेळु, गोखा तूंचि मिनलासि काळु


