सार्थ ज्ञानेश्वरी
अध्याय अकरावा
बाप साक्षात्काराचा वेधु । कैसा देशधडी केला बोधु । हा गुरुशिष्यसंबंधु । विपायें नांदे ॥370॥ देवा तुझां ये दर्शनीं । जें वैकल्य उपजलें आहे अंतःकरणीं । तें सावरावयालागीं गंवसणी । धैर्याची करितसें ॥371॥ तंव माझेनि नामें धैर्य हारपलें । कीं तयाहीवरी विश्वरूपदर्शन जाहलें । हें असो परि मज आतुडविलें । उपदेशासी ॥372॥ जीव विसंवावयाचिया चाडा । धांवाधांवी करितसे बापुडा । परि सोयही कवणेकडा । न लभे एथ ॥373॥ ऐसें विश्वरूपाचिया महामारी । जीवित्व गेलें आहे चराचरीं । जी न बोलें तरि काय करीं । कैसेनि राहें ॥374॥
दंष्ट्राकरालानि च ते मुखानि दृष्ट्वैव कालानलसन्निभानि । दिशो न जाने न लभे च शर्म प्रसीद देवेश जगन्निवास ॥25॥
पैं अखंड डोळ्यांपुढें । फुटलें जैसें महाभयाचें भांडें । तैशीं तुझीं मुखें वितंडें । पसरलीं देखें ॥375॥ असो दांतदाढांची दाटी । न झांकवे मा दोंदों वोठीं । सैंघ प्रळयशस्त्रांचिया दाट कांटी । लागलिया जैशा ॥376॥ जैसें तक्षका विष भरलें । हो कां जे काळरात्रीं भूत संचरलें । कीं अग्नेयास्त्र परजिलें । वज्राग्नि जैसें ॥377॥ तैशीं तुझीं वक्त्रें प्रचंडें । वरी आवेश हा बाहेरी वोसंडे । आले मरणरसाचे लोंढे । आम्हांवरी ॥378॥ संहारसमयींचा चंडानिळु । आणि महाकल्पांत प्रळयानळु । या दोहीं जैं होय मेळु । तैं काय एक न जळे ॥379॥ तैसीं संहारकें तुझीं मुखें । देखोनि धीरु कां आम्हां पारुखे । आतां भुललों मी दिशा न देखें । आपणपें नेणें ॥380॥ मोटकें विश्वरूप डोळां देखिलें । आणि सुखाचें अवर्षण पडिलें । आतां जापाणीं जापाणीं आपुलें । अस्ताव्यस्त हें ॥381॥ ऐसें करिसी म्हणोनि जरि जाणें । तरि हे गोष्टि सांगावी कां मी म्हणें । आतां एक वेळ वांचवी जी प्राणें । यां स्वरूपप्रळयापासोनि ॥382॥
हेही वाचा – Dnyaneshwari : ज्या मज संहाररुद्र वासिपे, ज्या मजभेणें मृत्यु लपे
अर्थ
काय आश्चर्य आहे? विश्वरूपाच्या प्रत्यक्ष दर्शनाचा काय छंद लागला होता? त्या दर्शनाने माझे ज्ञान देशोधडी केले. असा गुरुशिष्यसंबंध क्वचितच सापडेल! ॥370॥ देवा, तुझ्या या दर्शनाने अंत:करणामध्ये जो विस्कळितपणा उत्पन्न झाला आहे, तो विस्कळितपणा सावरण्याकरिता मी धैर्याची गवसणी करीत आहे. ॥371॥ तो माझ्या नावाने धैर्य अगदीच नाहीसे झाले आणि त्यावर विश्वरूप दृष्टीस पडले, मग काय विचारता? हे राहू द्या, परंतु मला उपदेशात चांगले गुरफटून टाकलेत. ॥372॥ विश्रांती घेण्याच्या इच्छेने बिचारा जीव धावाधाव करीत आहे, परंतु या विश्वरूपात त्याला कोठेही आश्रय मिळत नाही. ॥373॥ याप्रमाणे विश्वरूपाच्या महामारीने चराचरांतील जीवित्व गेले आहे. महाराज, हे न बोलावे तर काय करावे आणि कसे राहावे? ॥374॥
आणि दाढांच्या योगाने विक्राळ आणि प्रलयकाळाच्या अग्नीप्रमाणे (दिसणारी) तुझी मुखे पाहूनच (मी इतका गर्भगळित झालो आहे की) मला दिशाभूल झाली आहे, मला काही सुख वाटत नाही, हे देवाधिदेवा, जगन्निवासा, (आता) प्रसन्न हो. ॥25॥
ज्याप्रमाणे मृत्यूचे भांडे फुटावे, तशी तुझी विशाल तोंडे एकसारखी पसरलेली मी पाहात आहे. ॥375॥ हे असू दे, जशी प्रलयकाळच्या शस्त्रांची दाट कुंपणे एकसारखी लागावीत, तशी दातदाढांची गर्दी उडून गेली आहे. इतकी की, प्रत्येक मुखातील दात आणि दाढा, या त्या मुखाच्या दोन दोन ओठांनी देखील झाकल्या जात नाहीत. ॥376॥ तक्षक सर्प हा मूळचाच विषारी असून त्याच्या तोंडात जसे आणखी विष भरावे, किंवा अमावस्येची रात्र ही जशी पूर्ण काळोखामुळे मूळचीच भय उत्पन्न करणारी असून, तिच्यात आणखी पिशाच्यांचा संचार व्हावा, किंवा वज्राग्नी हा जसा स्वभावत:च अत्यंत दाहक असून त्याने आणखी अग्नीअस्त्र धारण करावे, ॥377॥ त्याप्रमाणे तुझ्या विश्वरूपाची तोंडे मूळचीच भयंकर असून त्यात आणखी त्यांचा आवेश त्यात न मावता बाहेर वाहात आहे. (तेव्हा) मला असे वाटते की, तो वाहात असलेला आवेश नसून ते जणू काय आमच्यावर मरणरसाचे लोंढेच आले आहेत. ॥378॥ प्रलयकाळचा प्रचंड वारा आणि महाप्रलयकाळचा अग्नी, हे जेव्हा एकत्र होतात, तेव्हा काय एक जळणार नाही? ॥379॥ तशी तुझी संहार करणारी मुखे पाहून आमचे धैर्य तर नाहीसे झाले. आता मी वेडा झाल्यामुळे मला दिशा दिसत नाहीत. एवढेच नव्हे तर, माझी मलाही ओळख नाहीशी झाली, असे झाले आहे. ॥380॥ विश्वरूप डोळ्याने जरासे पाहिले नाही, तोच सुखाचा दुष्काळ पडला. म्हणून आता तू आपले हे अस्ताव्यस्त रूप आवरून घे. ॥381॥ तू असे करशील असे जर मला ठाऊक असते, तर ‘ही गोष्ट मला सांगा’ असे मी कशाला म्हटले असते? आता या स्वरूपप्रलयापासून माझे एकवार प्राण वाचवा, महाराज! ॥382॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : ऐसें वाऊनि महाभयाचें भोज, एथ काय निपजवूं पाहातोसि काज


