पूर्वार्ध
इयत्ता तिसरीचा वर्ग सुरू होता. गुरुजी हजेरी घेत होते. एवढ्यात दरवाज्याकडे एक मुलगा पाठीवर दप्तर घेऊन उभा असलेला दिसला. गुरुजींनी त्याच्याकडे पाहिले आणि ‘आत ये’ म्हणाले. तो मुलगा आत आला, जुनी ठिगळं मारलेली खाकी पँट आणि सदरा, बारीक केस आणि थोडीशी शेंडी असा अवतार होता. कदाचित एक-दोन महिन्यांपूर्वी त्याची मुंज झालेली असावी. गुरुजी आम्हा मुलांना म्हणाले, “हा एक नवीन विद्यार्थी आपल्या वर्गात आला आहे.” त्याच्याकडे बघून म्हणाले, “हं! काय नाव तुझे? कुठून आलास? या आधी कुठल्या शाळेत होतास?”
तो मुलगा मान वर करुन म्हणाला, “मी पांडुरंग वसंत दामले. गाव कलंबिस्त, ता. सावंतवाडी.”
गुरुजी म्हणाले, “बरं, बरं, म्हणजे बांद्याजवळ. मग घरी कोण कोण असतं?”
“घरी फक्त आई. वडील दोन वर्षांपूर्वी वारले. भाऊ-बहीण कोणी नाही.”
गुरुजी म्हणाले, “मग या गावात कोण राहतं?”
तो म्हणाला, “या गावात माझी चुलत बहीण मणेरीकरांकडे दिली आहे. तिच्या घरी राहून शाळेत येणार. आमच्या गावापासून सहा मैलांवर शाळा आहे. म्हणून या गावात आणि या शाळेत आलो.”
गुरुजी म्हणाले, “बस बस.” आणि तो शेवटच्या रांगेत वासू आणि दिनूच्या बाजूला बसला.
ही माझी पहिली ओळख पांडू दामलेशी.
शाळेच्या मधल्या सुट्टीत हुतूतू खेळायचो. पांडू बाजूला उभा राहून खेळ पाहायचा. पण खेळायला यायचा नाही. खरंतर आम्हा सर्वांपेक्षा तो उंच होता आणि त्याचे पाय लांब होते. त्यामुळे तो हुतूतू चांगला खेळेल, असा आमचा अंदाज होता. मी त्याला म्हटले, “अरे ये ना खेळायला.”
हेही वाचा – एक स्त्री म्हणून माझं काय चुकलं?
पांडू म्हणाला, “माझ्याकडे एकच चड्डी आहे, ती फाटली तर उद्या काय घालू? आणि ताईची सासरची मंडळी फार तापट आहेत. जरा काही झाले तर मला उपाशी ठेवतील.”
मी गप्प झालो. आम्ही बाकी मुले श्रीमंत नसलो तरी, घरी आई होती आणि उपाशी राहात नव्हतो.
आमची सकाळची साडेसातची शाळा. पण पांडू नेहमी उशिरा येत होता. गुरुजींच्या पण हे लक्षात आले. पण ते दुर्लक्ष करत होते. एकदा तर तो चक्क नऊ वाजता घामाघूम होऊन वर्गात आला. गुरुजी ओरडले, “दामले उभा रहा. कालचा वर्गपाठ दाखव… आणि रोज का उशीर होतो? उद्यापासून उशीर झाला तर वर्गात घेणार नाही. जा तिकडे कोपर्यात ओणवा उभा रहा.”
पांडू जाऊन कोपर्यात ओणवा झाला. गुरुजी शिकवत होते. अर्ध्या तासानंतर त्यांच्या लक्षात आले. दामले ओणवा आहे. ते म्हणाले, “जा जाग्यावर जाऊन बस आणि सांग तुला रोज का उशीर होतो? आणि तुझा गृहपाठ का अपुरा असतो?”
पांडू मुसमुसत म्हणाला, “ताईच्या सासरची माणसे फार छळतात. सगळी घरची कामे करून घेतात. शाळेतून गेल्यावर गुरांना चरायला नेणे, गुरांना गोठ्यात बांधणे, गवतकाडी घालणे, भांडी घासणे आणि रात्री भांडी घासून झाली की, सगळी लाइट बंद. बरे कंदील-दिवा पण पेटवायचे नाही. पुस्तक वाचायला किंवा गृहपाठ करायला देत नाहीत.”
गुरुजी गप्प झाले. म्हणाले, “बस तू.” त्यावेळपासून गुरुजी पांडूला शिक्षा करायचे बंद झाले. मला पांडूची खूप दया आली. मी त्याला म्हटले, “तू माझ्या शेजारी पहिल्या रांगेत बस” आणि पांडू माझ्याशेजारी बसू लागला. त्यावेळपासून तो माझा जवळचा मित्र झाला. मी त्याला माझी पाटी दाखवू लागलो. गृहपाठ दाखवू लागलो. माझी पुस्तके घरी न्यायला देऊ लागलो. तो गुरे चरायला नेताना पुस्तके नेऊ लागला. त्याचा थोडा-थोडा गृहपाठ पुरा व्हायला लागला.
आमची हुतूतूची मॅच पाचवी बरोबर ठरली. मी पांडूला म्हटले, “तू चांगला उंच आहेत. तू खेळ ना रे. मी माझ्या मोठ्या भावाचे कपडे तुला देतो.” मी खरोखरच माझ्या भावाच्या चड्ड्या, बनियन आणि शर्ट त्याला दिले. पांडू खूश झाला आणि खेळू लागला. खरंतर, आमच्या वर्गात सर्वात चांगला तोच खेळत होता! मी घरुन येताना पांडूसाठी बटर, बिस्किटे आणून देत होतो. तसेच, आमच्या वर्गातील दाजी त्याला चिंचा, आवळे, बोंडू, आंबे आणत होता. पांडू वर्गात फार हुशार नव्हता. त्याचे भाषाविषय चांगले होते. पण गणित कच्चे होते.
आम्ही पाचवीत असताना शाळेच्या क्रीडा स्पर्धा सुरू होत्या आणि आमच्या शाळेची मॅच गावातील दुसर्या शाळेबरोबर होती. पांडू आमचा हुकमी एक्का. मॅचचे ठिकाण गावाबाहेर होते. म्हणून आम्ही सर्व सकाळी लवकर मैदानाकडे गेलो. पांडूला घरुन बाहेर पडण्याचा प्रश्न होताच. पण शाळेत परीक्षा आहे, असे ताईला सांगून तो मैदानाकडे आला. खेळ रंगात आला होता. एवढ्यात पांडूच्या ताईचे सासरे हातात गुरांना मारतात ती काठी घेऊन मैदानात आले आणि शिव्या घालत त्यांनी पांडूची गचांडी पकडून तिथल्या तिथे गुरासारखे मारू लागले.
आमचे गुरुजी त्यांना काही सांगण्याचा प्रयत्न करत होते, पण त्या गृहस्थांनी गुरुजींनापण शिव्या घालायला सुरुवात केली. पांडू त्यांना हिसका देऊन पळाला आणि त्याच्या पाठीमागे काठी उगारुन ताईचे सासरे,,, आम्ही सारे सुन्न होऊन पाहात होतो. त्या दिवसापासून पांडू जो मैदानातून पळाला तो परत शाळेत आला नाही.
दिवस जात होते. पांडू परत आईकडे कलंबिस्तला गेला, असे कळले. पांडू दामले नावाचा मित्र आयुष्यातून वजा झाला होता. आम्ही बाकी मुले गावातच एसएससी झालो. पुढील शिक्षणासाठी बाहेरगावी गेलो. काहीजण नोकरीला लागले. काहीजण घरची शेती बागायती सांभाळू लागले. मी पण मोठ्या शहरात जाऊन पदवीधर झालो. नोकरीला लागलो आणि जिल्ह्यात एका मोठ्या शहरात स्थायिक झालो.
या दरम्यान एका हौशी नाट्य ग्रुपकडे आकर्षित झालो. नाटके, एकांकिका करू लागलो. असेच एकदा एका स्पर्धेच्या निमित्ताने बेळगावला एकांकिका करण्यास गेलो. वरेरकर नाट्यमंडळामध्ये रात्रौ दहाची एकांकिका. नऊ वाजता मेकअप करत असताना कुणीतरी म्हणाले, ‘तुला भेटायला कुणीतरी आले आहे.’ मी बाहेर येऊन पाहतो, तो पांडू दामले! आता उंच झाला होता. अंगाने भरला होता. अंगावर भारी नाही, पण बरे कपडे होते. मी त्याला कडकडून मिठी मारली… “म्हटले मित्रा होतास कुठे? आणि मी इथे आलो आहे, हे तुला कसे कळले?”
हेही वाचा – एका संपाची कहाणी
पांडू म्हणाला, “या वाटेने जाताना जाहिरात पाहिली. त्यात तुझे नाव दिसले. म्हणून तुला भेटायला आलो. मी आता बेळगावात असतो. माझ्या मामेभावाची छोटीशी आयुर्वेदिक औषध कंपनी आहे. त्या कंपनीत सेल्समन म्हणून काम करतो. टेम्पोत औषधे भरून गावोगावी जातो. त्या टेम्पोबरोबर मी ऑर्डर्स घ्यायला जातो. आता माझे बरे चालले आहे.”
मी खूश झालो. एवढ्या आयुष्यात पांडूला सुख कसले ते मिळाले नव्हते. आता तरी सुखाने दोन घास खाईल! माझा नोकरीचा पत्ता त्याने घेतला. त्यानंतर तो महिन्या-दोन महिन्यांनी माझ्या ऑफिसमध्ये येत राहिला. शाळेचे जुने दिवस, जुने मित्र, हुतूतूच्या मॅचेस अनेक अनेक आठवणी आम्ही काढल्या… पांडूची बांद्याला नंदू केमिस्टशी मैत्री होती. हा नंदू केमिस्ट पांडूच्याच गावचा होता.
असेच पाच-सहा महिने गेले. मी पांडूची वाट पाहात होतो. पण पांडू इकडे फिरकलाच नाही. त्याचा फोन वगैरे मला माहीत नव्हता आणि चौकशी करायची कुठे? एवढ्यात लक्षात आले, बांद्याचा नंदू केमिस्ट याचा मित्र आहे. त्या बाजूला जाताना मी नंदू केमिस्टला भेटलो. नंदू म्हणाला, पांडू गावी आलाय. भावाने कंपनीतून काढून टाकले. याचे फारसे शिक्षण नाही. आता गावी येऊन भिक्षुकी करतो आणि थोड्याफार केळी-पोफळी आहेत. स्वयंपाक त्याला पहिल्यापासून येतोच.
मी खूश झालो. म्हटले चला, पांडू गावात मजेत आहे, नंदू म्हणाला, बहुतेक तुमच्या मित्राचे लग्न ठरतेय. कोलगांवची मुलगी पाहुणे घर बघायला येऊन गेली. तुम्हाला पत्रिका येईलच. मी भलताच आनंदी झालो. चला पांडू एकदाचा स्थिर होऊ दे. लहानपणापासून त्याने काढलेले हाल माझ्या डोळ्यासमोर आले.


