सार्थ ज्ञानेश्वरी
अध्याय अकरावा
रुद्रादित्या वसवो ये च साध्या विश्वेऽश्विनौ मरुतश्चोष्मपाश्च । गन्धर्वयक्षासुरसिद्धसंघा वीक्षन्ते त्वां विस्मिताश्चैव सर्वे ॥22॥
हे रुद्रादित्यांचे मेळावे । वसु हन साध्य आघवे । अश्विनौदेव विश्वेदेव विभवें । वायुहि हे जी ॥332॥ अवधारा अग्नि हन गंधर्व । पैल यक्षरक्षोगण सर्व । जी महेंद्रमुख्य देव । कां सिद्धादिक ॥333॥ हे आघवेचि आपुलां लोकीं । सोत्कंठित अवलोकीं । हे महामूर्ती दैविकी । पाहत आहाती ॥334॥ मग पाहात पाहात प्रतिक्षणीं । विस्मित होऊनि अंतःकरणीं । करित निजमुकटीं वोवाळणी । प्रभुजी तुज ॥335॥ ते जय जय घोष कलरवें । स्वर्ग गाजविताती आघवे । ठेवित ललाटावरी बरवे । करसंपुट ॥336॥ तिये विनयद्रुमाचिये आरवीं । सुरवाडली सात्त्विकांची माधवी । म्हणोनि करसंपुटपल्लवीं । तूं होतासि फळ ॥337॥
रूपं महत् ते बहुवक्त्रनेत्रं महाबाहो बहुबाहूरुपादम् । बहूदरं बहुदंष्ट्राकरालं दृष्ट्वा लोकाः प्रव्यथितास्तथाहम् ॥23॥
जी लोचना भाग्य उदेलें । जीवा सुखाचें सुयाणें पाहलें । जे अगाध तुझें देखिलें । विश्वरूप इहीं ॥338॥ हें लोकव्यापक रूपडें । पाहतां देवाही चवकु पडे । याचें सन्मुखपण जोडे । भलतयाकडूनी ॥339॥ ऐसें एकचि परि विचित्रें । आणि भयानकें तेवींचि बहु वक्त्रें । बहुलोचन हे सशस्त्रें । अनंतभुजा ॥340॥ हे अनंत चारु चरण । बहु उदर आणि नानावर्ण । कैसें प्रतिवदनीं मातलेपण । आवेशाचें ॥341॥ हो कां जे महाकल्पाचां अंतीं । तवकलेनि यमें जेउततेउतीं । प्रळयाग्नीचीं उजिती । आंबुखिलीं जैसीं ॥342॥ नातरी संहारत्रिपुरारीचीं यंत्रें । कीं प्रळयभैरवांचीं क्षेत्रें । नाना युगांतशक्तीचीं पात्रें । भूतखिचा वोढविलीं ॥343॥ तैसीं जियेतियेकडे । तुझीं वक्त्रें जीं प्रचंडें । न समाती दरीमाजीं सिंहाडे । तैसे दांत दिसती रागीट ॥344॥ जैसें काळरात्रीचेनि अंधारें । उल्हासत निघतीं संहारखेंचरें । तैसिया वदनीं प्रळयरुधिरें । काटलिया दाढा ॥345॥ हें असो काळें अवंतिलें रण । कां सर्वसंहारें मातलें मरण । तैसें अतिभिंगुळवाणेपण । वदनीं तुझिये ॥346॥
हेही वाचा – Dnyaneshwari : तूं आदिमध्यांतरहितु, स्वसामर्थ्यें तूं अनंतु
अर्थ
(एकादश) रुद्र, (द्वादश) आदित्य, (अष्ट) वसु, साध्य, विश्वेदेव, अश्विनीकुमार, वायू आणि पितर, गंधर्व, यक्ष, राक्षस आणि सिद्ध यांचे समुदाय सर्व विस्मययुक्त झालेले तुझ्याकडे पाहात आहेत. ॥22॥
हे अकरा रुद्र आणि बारा आदित्य यांचे समुदाय, आठ वसु आणि साध्य नावाचे बारा देव, हे सर्व, दोन अश्विनीकुमार, वैभवयुक्त विश्वेदेव आणि वायुदेवता देखील हे महाराज, ॥332॥ ऐका, अग्नी आणि गंधर्व, पलीकडे असलेले यक्षांचे आणि राक्षसांचे सर्व समुदाय; महाराज, इंद्र ज्यामध्ये श्रेष्ठ आहे असे देव आणि सिद्ध आदिकरून ॥333॥ हे सर्व आपापल्या लोकांत उत्कंठेने आपली दिव्य मूर्ती पाहात आहेत, हे पाहा. ॥334॥ मग पाहात पाहात प्रत्येक क्षणात मनामध्ये चकित होऊन हे देवा, ते तुला आपल्या मुकुटाने ओवाळीत आहेत. ॥335॥ त्या ‘जय, जय’ अशा घोषांच्या मंजुळ शब्दाने ते सर्व स्वर्गामध्ये गजर करतात आणि आपले दोन्ही हात चांगले जोडून नमस्कार करतात. ॥336॥ त्या नम्रतारूपी वृक्षांच्या अरण्यामध्ये अष्टसात्विक भावरूपी वसंत ऋतू अनुकूल झाला म्हणून (त्यांच्या) करसंपुटरूपी पालवीला तू फल प्राप्त झाला आहेस. ॥337॥
हे महाबाहो, अनंत मुखे आणि नेत्र असलेले, अनंत बाहू, मांड्या आणि पाय असलेले, अनंत उदरे असलेले, अनंत दाढांच्या योगे भीषण असलेले तुझे प्रचंड रूप पाहून, हे लोक व्याकुळ झाले आहेत, तसा मीदेखील व्याकुळ झालो आहे. ॥23॥
महाराज, यांनी जे तुझे अगाध विश्वरूप पाहिले, ते त्यांच्या डोळ्यांचे भाग्य उदयाला आले आहे, अथवा त्यांच्या जीवाला सुखाचा सुकाळ उगवला (प्राप्त झाला). ॥338॥ हे लोकांना व्यापणरे रूप पाहून देवांनाही दचका पडतो. वाटेल तिकडून यास पाहिले असता, हा समोर असा वाटतो. ॥339॥ याप्रमाणे आपले एकच स्वरूप आहे, परंतु विचित्र आणि भयानक अशी त्याला अनेक मुखे, अनेक नेत्र आणि शस्त्र धारण केलेले असे अगणित हात आहेत. ॥3440॥ या विश्वरूपास अगणित सुंदर पाय आहेत, अनेक पोटे आहेत आणि नाना प्रकारचे रंग आहेत, आणि प्रत्येक मुखाच्या ठिकाणी क्षोभाचा मस्तपणा कसा आहे! ॥341॥ अथवा महाप्रलयाच्या शेवटी जोर बांधलेल्या यमाने जशा काही जिकडे तिकडे प्रलयाग्नीच्या आगट्या पेटविल्या आहेत. ॥342॥ अथवा संहार करणार्या श्रीशंकराचा तोफखाना किंवा प्रलयकाळच्या भैरवदेवांचे समुदाय उत्पन्न व्हावेत, अगर प्राण्यांच्या नाशासाठी युगांतशक्तीची पात्रे पुढे सरसावली आहेत, ॥343॥ त्याप्रमाणे जिकडे तिकडे तुझी प्रचंड तोंडे मावत नाहीत आणि दरीमध्ये जसे सिंह, तसे तुझ्या मुखात दात उग्र दिसतात. ॥344॥ प्रलयकाळच्या गडद रात्रीत नाश करणारी पिशाच्चे जशी उल्हासाने संचार करतात, त्याप्रमाणे प्रलयकाळच्या नाश पावणार्या प्राण्यांच्या रक्ताने या मुखातील दाढा भरलेल्या आहेत. ॥345॥ हे असो, काळाने जसे काय युद्धास आमंत्रण करावे, अथवा सर्वांच्या संहारकाली जसे मरण माजून राहाते, त्याप्रमाणे तुझ्या मुखात अत्यंत भयानकपणा आहे. ॥346॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : हे तुझेनि आंगिकें तेजें । जाळूनि सर्व कर्मांचीं बीजें


