‘खवय्येगिरी’ आणि ‘महाराष्ट्र’ हे समीकरण मांडताना पुरणपोळी, मिसळ किंवा वडापाव जितके महत्त्वाचे आहेत, तितकीच महत्त्वाचे स्थान आहे, ते ‘भडंग’चे! प्रवासात सोबतीला असणारा, चहाच्या वेळेचा गप्पांचा फड रंगवणारा आणि जिभेवर रेंगाळणारी चव देणारा हा पदार्थ आहे.
भडंगचा उगम प्रामुख्याने सांगली जिल्ह्यातील ‘जयसिंगपूर’ आणि कोल्हापूर परिसरात झाला असे मानले जाते. या भागातील हवामान आणि तिथल्या लोकांची तिखट-झणझणीत खाण्याची आवड यातूनच या चिवड्याचा जन्म झाला असावा. ‘भडंग’ या शब्दाचा अर्थच मुळी ‘प्रचंड’ किंवा ‘मोठ्या प्रमाणात’ असा होतो. कदाचित, जुन्या काळी हा चिवडा मोठ्या प्रमाणावर एकत्र बनवला जात असे, म्हणून त्याला हे नाव पडले असावे.
इतर चिवड्यांमध्ये लसणाचा वापर ऐच्छिक असतो, परंतु भडंगची खरी ओळख त्याच्या ‘लसणीच्या’ फोडणीत दडलेली आहे. तेलात खमंग तळलेला, ठेचलेला लसूण आणि लाल तिखटाचा वापर यामुळे याला एक गडद आकर्षक रंग आणि जिभेला चटका लावणारी चव प्राप्त होते.
हेही वाचा – Recipe : विदर्भ स्पेशल… गोळाभात
सामान्यतः भडंगमध्ये डाळ्यांचा (पंढरपुरी डाळं) वापर होतो. पण मी या वेळेस एक छोटासा बदल म्हणून डाळ्यांऐवजी ‘फुटाणे’ वापरले आहेत. फुटाण्यांचा तो नैसर्गिक खमंगपणा आणि मुरमुऱ्यांसोबत येणारा त्यांचा दाणेदार कुरकुरीतपणा या चिवड्याची लज्जत अधिकच वाढवतो. फुटाणे हे प्रथिनांचा उत्तम स्रोत असल्यामुळे हा चिवडा चवीसोबत आरोग्यालाही उत्तम ठरतो. भडंगमधे कधीतरी हा बदल करून पाहा, फुटाण्यांच्या सोबतीने भडंग जास्त कुरकुरीत आणि चवीला उत्कृष्ट लागतो.
भडंग खाण्याची प्रत्येक भागाची आपली एक वेगळी पद्धत आहे. सांगली-कोल्हापूर भागात हा चिवडा कच्चा कांदा, कोथिंबीर आणि लिंबू पिळून खाल्ला जातो, तर अनेक ठिकाणी तिखट भडंग आणि वाटीभर दूध… असे एक वेगळे पण, लोकप्रिय कॉम्बिनेशन आवडीने खाल्ले जाते.
साहित्य
- मुरमुरे – अर्धा किलो
- शेंगदाणे – एक वाटीभर
- फुटाणे – एक वाटीभर
- खोबऱ्याचे काप – एक वाटीभर
- कढीपत्ता – तीन ते चार काड्या
- हिरव्या मिरच्या – सात ते आठ (काप करून घ्यावेत)
- लसूण – एक छोटी वाटी (ठेचलेला)
- तिखट – दोन चमचे
- हळद – दीड चमचा
- मीठ – चवीनुसार
- पिठीसाखर – दोन चमचे
- मोहरी – दोन टीस्पून
- जिरे – दोन टीस्पून
- हिंग – एक चमचा
- धणे पावडर – दोन टीस्पून
- जिरे पावडर – दोन टीस्पून
- तेल – दोन ते तीन पळ्या (किंवा गरजेनुसार)
- तिखट शेव – दोन वाट्या
कृती
- प्रथम मुरमुरे चाळून स्वच्छ करून घ्यावे.
- गॅसवर कढई गरम करून त्यामध्ये मुरमुरे पाचेक मिनिटे गरम करून घ्यावेत; म्हणजे ते अजून कुरकुरीत होतात.
- नंतर कढईत तेल तापवून मंद आचेवर प्रथम खोबऱ्याचे काप, शेंगदाणे आणि नंतर फुटाणे या क्रमाने तळून घ्यावेत.
- मग वाटीभर ठेचलेला लसूण लालसर तळून घ्यावा.
- त्याच तेलामधे फोडणी करण्यासाठी मोहरी, जिरे टाकून ते तडतडल्यावर त्यात एक चमचा हिंग टाकून लगेच हिरव्या मिरच्यांचे काप टाकावेत.
- ते थोडे परतून झाले की, कढीपत्ता टाकून तो कुरकुरीत होईपर्यंत परतावा.
- गॅस बंद करून त्याच तेलात एक चमचा हळद, दोन चमचे तिखट, प्रत्येकी एक चमचा धणे, जिरे पावडर टाकावी. (यामधील तिखटाचे प्रमाण आवडीनुसार ठरवू शकता.)
- चवीनुसार मीठ आणि पिठीसाखर टाकून या फोडणीतच मुरमुरे, शेंगदाणे, फुटाणे, खोबऱ्याचे काप टाकून सर्व मिश्रण चांगले मिक्स करून घ्यावे.
- तयार झालेल्या या खमंग भडंगमध्ये दोन वाट्या तिखट शेव टाकावी.
हेही वाचा – Recipe : विदर्भ स्पेशल… दाणेभात अन् ठेचा
कुरकुरीतपणा टिकवण्यासाठी काही टीप्स
- चिवडा करण्यापूर्वी मुरमुरे मंद आचेवर थोडे कोरडे भाजून घेतल्यास तो दीर्घकाळ कुरकुरीत राहतो.
- लसूण सालीसकट ठेचल्यास त्याचा स्वाद तेलात अधिक चांगल्या प्रकारे उतरतो.
- 3) चिवडा पूर्ण थंड झाल्यावरच हवा बंद डब्यात भरावा, जेणेकरून तो मऊ पडणार नाही.
तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता.
या ईमेलवर किंवा
9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर
तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.


