नरू जोरात सायकल चालवत होता, त्याच्या पाठीमागे शिऱ्या बसला होता. शिऱ्या घड्याळ बघत म्हणाला, “साडेसहा वाजले की रे, जोरात घे…”
“घेतो रे, पन चढ हाय न्हवं…”
“अरे, सात वाजले की सर दरवाजा बंद करत्यात… जल्दी.”
नरूने जोरात सायकल घेतली आणि पावणेसात वाजता सायकल हॉलच्या पायऱ्याला लावली. दोघे घाम पुसत उभे राहिले. लहानशी वाऱ्याची झुळूक आली, त्याने त्या दोघांना बरे वाटले. मग नरूने हळूच हॉलचा दरवाजा ढकलला… हॉलमध्ये जयवंत सर खुर्चीत बसून पुस्तक वाचत होते. त्यांच्यासमोर, बाकावर आठ मुले आणि चार मुली, दोन वयस्क पुरुष आणि एक वयस्क स्त्री पण बसली होती. नरू आणि शिरीष आत जाऊन एका बाकावर बसले…
सात वाजले तसे जयवंत सरांनी हॉलचा दरवाजा आतून बंद केला. मग ते बोलू लागले, “यंदा स्पर्धा 25 नोव्हेंबरपासून सुरू होते आहे, तेव्हा यावर्षीच्या आपल्या नाटकाची तालीम सुरू करायला हवी. यंदा आपल्या संस्थेने गिरीष कर्नाड यांचे ‘तुघलक’ हे नाटक निवडले आहे. तसे हे खर्चिक नाटक आहे, कारण या नाटकासाठी ऐतिहासिक ड्रेपरी हवी, लेव्हल्स करायला लागतील, म्युझिकवर खूप मेहनत करायला लागेल. आपल्या संस्थेने मंजूर केलेल्या रकमेत हे नाटक करणे कठीण आहे म्हणून आपल्या सर्वाना अंगमेहनत करून कमीतकमी खर्चात नाटक उभे करायला लागेल.”
“तुमच्यापैकी सर्वांनाच भूमिका मिळेल, असे नाही; पण नाटकासाठी इतर कामे जास्त आव्हानात्मक असतात. बॅकस्टेज अत्यंत महत्त्वाचे… कारण आपला हौशी ग्रुप आहे, व्यावसायिक नव्हे. आपल्या सर्वांनाच बॅकस्टेज पण करायला लागेल. या नाटकातील भूमिकेनुसार मी कलावंत निवडले आहेत, त्याची लिस्ट उद्या मिळेल. प्रकाशयोजना, संगीत, नेपथ्य कोण करणार, हे आपण ठरवू. त्या सर्वांना माझी आणि माझ्या पत्नीची मदत असेल. भूमिका ठरल्यानंतर कलाकारांनी पंधरा दिवसांत आपले संवाद पाठ करणे अपेक्षित आहे, मग मुव्हमेंट दिल्या जातील, मग नेपथ्य लावून तालमी, मग प्रकाश, संगीतसह मुव्हमेन्ट ठरतील…”
हेही वाचा – एक स्त्री म्हणून माझं काय चुकलं?
त्यानंतर जयवंत सरांनी नाटकाचे थोडे वाचन केले आणि मंडळी घरी गेली.
नरू आणि शिरीष परत सायकलवरुन घरी निघाले, आता हवेत थंडी होती… शिरीष या ग्रुपमध्ये दोन वर्षे लहान भूमिका करत होता… नरू त्याच्याबरोबर यंदा प्रथमच येत होता. नरू बोलू लागला,
“शिऱ्या, हे जयवंत सर कसे आहेत, म्हणजे बरीच वर्षे नाटक करतात काय?”
“होय, वीस वर्षे तरी ते नाटक करतायत… सुरुवातीला दुसऱ्या ग्रुपमध्ये होते, पण तिथं त्यांचं बिनसलं तेव्हापासून ते आणि त्त्यांची बायको वेगळी झाली आणि त्यांनी हा ग्रुप सुरु केला, दरवर्षी नाटक काढतात, पण म्हणावं तसं यश अजून मिळालं न्हाई त्यास्नी… पण स्वतः मात्र बेस्ट काम करत्यात, त्त्यांची बायको पण बेस्ट काम करते.”
“पन मला देतील काम स्टेजवर?”
“बहुतेक न्हाई, या ग्रुपमधील जुनी अनुभवी लोक हायेत. हे नाटक सरांनी काढलंय ते लय अवघड हाय… बोलताना फापलायला व्हणार! इनोदी नाटक असतं तर जमतंय कसतरी, पन या नाटकात जुनीच टीम असणार, तुला बॅकस्टेजला घेनार, पन खरं नाटक बॅकस्टेज करता करता समजतं… मी पन दोन वरस बॅकला होतो, बघू यंदा स्टेजवर चान्स देत्यात काय?”
दोघ सायकलवरून घरी गेली. दुसऱ्या दिवशी पुन्हा सात वाजता सर्व जमली, आज अजून बरीच लोक आली होती, वयाने मोठी लोक होती, स्त्रिया होत्या. नरू गप्प बसून पाहात होता.
कलाकारांची निवड झाल… यावेळी शिरीषला शहाबुद्दीनची भूमिका मिळाली. स्वतः जयवंत सर मोहम्मद बिन तुघलक ही कठीण भूमिका करणार होते. वाचन सुरू झाले… हे नाटक चौदाव्या शतकातील आणि इस्लामी वातावरणातील… त्यामुळे बरेच उर्दू शब्द आणि वाक्ये होती. पण जयवंत सरांनी नाटकाचा व्यवस्थित अभ्यास केला होता, त्यामुळे प्रत्येक कलाकाराला ते व्यवस्थित मार्गदर्शन करत होते. हळूहळू कलाकारांच्या तोंडात वाक्ये बसायला लागली…
पण काही कलाकार कधी येत होते, कधी दांडी मारत होते. जयवंत सरांची चिडचिड होत होती… रोज कुणाला ना कुणाला लेक्चर द्यावे लागत होतं. काही दिवसांनी एक स्त्री कलाकार यायची बंद झाली. तिची तात्पुरती तालीम दुसरी कलाकार करू लागली. शेवटी जयवंत सर आणि त्त्यांची पत्नी तिच्या घरी गेली, तेव्हा तिने, “मला लहान भूमिका दिली, म्हणून माझे त्या भूमिकेत मन लागत नाही,” असे सांगून काम करण्यास नकार दिला. पुन्हा शोधाशोध करून नवीन स्त्री मिळविली, पुन्हा तिची पहिल्यापासून तालीम सुरू… एका पुरुष कलाकाराची दुसऱ्या शहरात बदली झाली, म्हणून पुन्हा नवीन माणूस शोधला…
एक दिवस घरी जाताना नरू शिरीषला म्हणाला, “दरवर्षी असंच कोनी ना कोनी नाटक मधीच सोडून जातंय काय?”
“होय बाबा, यालाच नाटक म्हणत्यात… पडदा वर जाईपर्यंत काय काय होईल सांगता यायचं न्हाई.”
“मग जयवंत सरांना लय तरास होतं असेल?”
“होय, सर दिवसभर साखर कारखान्यात नोकरीला जात्यात, घरसंसार हायेच आणि रात्रीचं नाटक, त्यात रोज असली टेन्शन…”
“आनी त्त्यांची घरवाली?”
“ती बी नोकरीं करते, यांच्या नाटकात काम करते.”
अनेक अडचणी, संकटे दूर करून नाटकाला आकार येत होता, कलाकारांचे पाठांतर बऱ्यापैकी झाले. मग जयवंत सर नेपथ्याच्या मागे लागले. एका सुताराला बोलावून लेव्हल्सची मापे दिली, मागे कमान करायला दिली. म्युझिकसाठी एका स्टुडिओत जयवंत सरांनी दोन रात्री जागून कॅसेट तयार केली. यंदा प्रकाशयोजनेकरिता ग्रुपमधील मनीषवर जबाबदारी दिली, अर्थात त्याला मार्गदर्शन जयवंत सरांचेच होते.
जसजशी स्पर्धेची तारीख जवळ येत होती, तसतशी रात्रीची जागरणे वाढत होती. आता रविवारी पूर्ण दिवस आणि बाकी दिवशी रात्री दोनपर्यंत नाटकाची तालीम, मग संगीताची तालीम करून जयवंत सर पहाटे चार वाजता घरी पोहोचत होते, परत सकाळी डबा घेऊन आठला बाहेर पडत होते.
नाटकाची ड्रेपरी तयार झाली, त्या दिवसापासून कलाकार आपली ड्रेपरी घालून तालीम करू लागले. घरी जाताना नरू शिरीषला म्हणाला, “मग आता नाटक एकदम स्टेजवर बागायचं?”
“न्हाई रे बाबा, आता कुठलं तरी स्टेज घेणार भाड्याने तीन रात्रीसाठी आनी तिथं लाईट जोडून नेपथ्य उभं करून नाटकाच्या वेळी करायची तशी प्रॅक्टिस करायची, त्यावेळी सर त्यांच्य नाटकातल्या मित्रमंडळींना बोलावत्यात, आनी त्यास्नी सूचना करायला सांगत्यात…”
“एका नाटकासाठी इतकी धडपड, मेहनत करायची?”
“होय बाबा, ही स्पर्धा हाय! इथं बरीच नाटक होनार… मुंबई पुन्यातून परीक्षक येत्यात, त्यांना आवडायला हवं… मग स्पर्धेत पयल, दुसरं आलं तर अंतिम स्पर्धेला जायला मिळतं. त्यासाठी ही धडपड…”
नाटकासाठी एक स्टेज मिळालं. तेथे दुसऱ्या दिवशी जमायचं ठरल. नरू आणि शिरीष तेथे पोहोचले तेव्हा जयवंत सरांची पत्नी धावपळ करून स्टेज लावून घेत होती. सर कुठे दिसत नव्हते. शिरीषने चौकशी केली तेव्हा कळले, सरांना काल रात्री उलट्या होऊ लागल्या, चक्कर येऊ लागली म्हणून डॉकटर गुळवणी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलंय. सर्वजण काळजीत होते, नाटक चार दिवसांवर आले आणि प्रमुख भूमिका करणारा कलाकार हॉस्पिटलमध्ये! थोडीफार तालीम झाली. मग घरी जाण्याआधी नरू आणि शिरीष हॉस्पिटलमध्ये गेले. सरांना सलाइन लावलेले होते… लांबून त्यांना पाहून ते घरी आले.
दुसऱ्या दिवशी शिरीष आणि नरू स्टेजकडे आले, तर जयवंत सर लाइट जोडून पाहात होते. नरूने शिरीषच्या हातात हात दिला. काल हॉस्पिटलमध्ये झोपलेला माणूस आज तालीम घ्यायला हजर होता… मग दोन दिवस रंगीत तालीम झाली. नरुने संपूर्ण नाटक पहिल्यांदा पाहिले. किती अवघड भाषा… मोठे मोठे संवाद… अनेक ग्रुप्स… मुस्लिम कपडे… लेव्हल्स… त्यावरील हालचाली… प्रकाश आणि संगीत सांभाळत कलाकार नाटक पुढे नेत होते. आलेले पाहुणे नाटक पाहून खूश झाले, त्यांनी काही सूचना पण केल्या!
इकडे नाट्यस्पर्धा सुरू झाली होती. ‘तुघलक’ नाटकाला तिसरा दिवस मिळाला होता.
नाटकाच्या दिवशी सर्वांनी स्वतः प्रॉपर्टी, स्पॉट्स उचलून आणले आणि स्टेजवर मांडले. तीन रंगीत तालमी झाल्या होत्या, त्यामुळे स्पर्धेतील प्रयोग उत्तम आणि खणखणीत झाला. स्वतः जयवंत सरांनी मोहम्मद बिन तुघलक उत्तम साकारला. सर्वच कलाकारांनी चांगले काम केले. तीन परीक्षक होते, त्यातील एक स्त्री परीक्षक होती. परीक्षक आत येऊन सर्वाना विशेष करून जयवंत सरांना भेटून गेले. ‘नाटकाचा प्रयोग छान झाला,’ असे कौतुक समीक्षकांसह अनेक प्रेक्षकांनी केलं. खूप मेहनत करून नाटक उभे केले होते. या कौतुकाचा स्वीकार जयवंत सर आणि त्यांची पत्नी घेत होती.
दुसऱ्या दिवशी ती दोघं आणि ग्रुपमधील इतरजण एका स्टॉलवर चहा पित असताना जयवंत सरांचा छोटा मोबाइल वाजला. नवीन नंबर पाहून जयवंत सरांनी “हॅल्लो.. हॅल्लो” केले.
पलीकडून एका बाईचा आवाज आला, “नमस्कार, तुमचे नाटक आणि भूमिका उत्तम झाली…”
“थँक्स, कोण बोलतंय?”
“मी राधिका, या स्पर्धेची परीक्षक.”
जयवंतल सरांना आश्चर्य वाटले… “बोला मॅडम, का फोन केला होता?”
“स्पर्धेचे सीनिअर परीक्षक आहेत ना सुधीर सर, त्यांना तुम्हाला भेटायचे आहे. त्यांनी तुम्हाला निरोप द्यायला सांगितले… केव्हा येऊ शकता? शक्यतो एकटे या किंवा तुमच्या ग्रुपमधील कुणी असलं तरी चालेल…”
हेही वाचा – …अन् यमुनाकाकीच्या लक्षात आले, ‘शेवटी आहे कोण?’
जयवंत सरांच्या डोक्यात चक्र फिरू लागली, काही तरी गडबड आहे… सावध राहा.
“उद्या येतो मॅडम सकाळी 11 वाजता.”
“या, आम्ही सारे असू, गेस्ट हाऊसमध्ये आहोत आम्ही.”
“होय, येतो…” म्हणून जयवंत सरांनी मोबाइल ठेवला.
जयवंत सर एक मिनिट विचार करू लागले – परीक्षकांनी का बोलावले असेल? असे एवढ्या वर्षांत कुठल्या परीक्षकांनी गेस्टहाऊसवर बोलावल्याचे ऐकले नव्हते, हे काहीतरी नवीन…
त्त्यांचे फोनवरील बोलणे ऐकत असलेली क्षमा म्हणाली, “त्या शेखरचे पहिल्या दिवशी नाटक झाले ना, त्यालाही काल बोलावलेले म्हणे…”
“बरे, आपण उद्या जायचे… शिरीष आणि नरू तुम्ही माझ्यासमवेत यायचे आणि…” जयवंत सरांनी शिरीषच्या कानात काहीतरी सांगितले. शिरीषने मान हलवली. उद्या 10 वाजता ते दोघे जयवंत सरांच्या घरी येणार होते.
दुसऱ्या दिवशी नरू आणि शिरीष जयवंत सरांकडे आले. सरांनी एक वस्तू शिरीषकडे दिली, ती त्याने पॅंटच्या खिशात ठेवली आणि रिक्षा करून तिघे निघाले… तिघे रेस्टहाऊसमध्ये पोहोचले आणि चौकशी करून राधिका मॅडमच्या सूटमध्ये आले, त्यांना पहाताच राधिका मॅडमने बाजूच्या सूटमधील सुधीर सर आणि मोहन सरांना बोलावले. तिघे येऊन खुर्चीत बसले, मग सुधीर सर बोलू लागले,
“जयवंत, तुमचे नाटक छानच झाले. पण तशी इतर ग्रुपची पण नाटकें चांगलीच होतात. स्पर्धेत पहिला किंवा दुसरा नंबर आला तरच तुम्ही अंतिम स्पर्धेत जाणारं आणि ते आमच्या हातात आहे.”
जयवंतने शिरीषकडे पाहिले… शिरीषने हळूच मान हलवली आणि हात खिशात घातला.
“बोलायला हरकत नाही ना, ही तुमचीच माणसे आहेत ना?”
जयवंत सरांनी मान हलवताच सुधीर बोलायला लागले,
“आम्ही या आधी सुद्धा बऱ्याच ठिकाणी परीक्षक म्हणून काम केलं आहे. स्पर्धेचा निकाल आमच्या हातात असतो… तुम्हाला पहिला नंबर हवा असेल तर, आम्हाला तिघांना प्रत्येकी एक लाख द्यावे लागतील!”
“काय?” अनपेक्षितपणे जयवंत सर चित्कारले.
“होय, दुसरा हवा असेल तर प्रत्येकी पंचाहत्तर हजार…” राधिका मॅडम मधेच म्हणाल्या.
“…आणि ग्रुप्स पैसे देतात बरं का!” तिसरे परीक्षक म्हणाले.
“काल तो स्वप्नील आला होता, त्याला पण हेच सांगितलं… आणि अंतिम फेरीत नंबर हवा असल्यास त्याची पण व्यवस्था होईल.”
“मी एकटा एवढ्या पैशांचा निर्णय घेऊ शकत नाही, ग्रुपला विचारून सांगतो…”
“हो सांगा आणि हे तुमच्या आमच्यात ठेवा बरं का…!”
“येतो सर…” म्हणून तिघे बाहेर पडले.
बाहेर पडून रस्त्यावर आल्यावर जयवंत सर शिरीषला म्हणाले, “आता बाहेर काढ…”
शिरीषने खिशात लपविलेला पॉकेट रेकॉर्डर बाहेर काढला आणि चालू केला… त्यात सारे सांभाषण व्यवस्थित रेकॉर्ड झाले होते.
सायंकाळी सहा वाजता…
शहरातील बरेच नाट्यकर्मी, प्रतिष्ठित व्यक्ती, प्रोफेसर जमले होते. वर्तमानपत्र वार्ताहर, टीव्ही चॅनेल रिपोर्टर कॅमेरामनसह हजर होते. सर्व लोकांसमोर आणि वार्ताहरांसमोर जयवंत सरांनी परीक्षकांसोबतचे रेकॉर्डिंग ऐकवले आणि सर्वांना धक्का बसला. सांस्कृतिक क्षेत्रात एवढे अध:पतन कोणी कल्पिले नव्हते. आजपर्यत पैशांची मागणी करणारे परीक्षक कोणी पाहिले नव्हते…
दोन मिनिटांत ही बातमी सर्वदूर पसरली. सर्व ठिकाणहून फोनावर फोन सुरू झाले… कलेक्टरनी स्पर्धा रद्द केली. परीक्षकांची नाट्यकर्मिंनी आणि जनतेने शी थू केले. पोलीस बंदोबस्तत त्याना शहराबाहेर हाकलले. दुसऱ्या दिवशी अनेक वर्तमानपत्रात ही ठळक बातमी होती. पुढे कधीही या परीक्षकांना कोणी बोलावले नाही…
जयवंत सर निराश झाले. आपण आणि आपल्यासारखे अनेकजण निष्ठेने नाटक करतात.. रात्रीचा दिवस करून सोबत्यांना घेऊन स्पर्धेत उतरतात… आपली तब्येत, संसार, पैसे याचा विचार न करता दोन-दोन महिने जागरणे करून उपयोग काय? असे परीक्षक पैशासाठी हवा तसा निकाल देणार…
जयवंत सर मग लहान मुलांची नाट्यशिबीरे घेऊ लागले, पण स्पर्धेच्या नाटकापासून कायमचे दूर झाले.


