रोजच्या जेवणात वेगळेपणा आणण्याचा प्रयत्न गृहिणींचा असतो. यासाठी काही नवनवीन प्रयोग केले जातात… असेच काही प्रकार ‘फूड कॉर्नर’मध्ये देत आहोत. प्रोटिनयुक्त मोदक, मोड आलेले धान्य सहा महिने टिकवणे, टेस्टी पिठले, झटपट कटाची आमटी बनविताना या टिप्स वापरून पाहा.
- मोड आलेली मटकी (लगेच करायची नसली किंवा जास्त झाली असेल तर) कडकडीत उन्हात चांगली वाळवावी. (अशी वाळलेली मटकी ताटात टाकल्यास त्याचा आवाज होतो.) वाळलेली मटकी कोरड्या डब्यात भरून ठेवावी. जेव्हा उसळ करायची असेल तेव्हा दोन-अडीच तास अगोदर गार पाण्यात भिजत ठेवावी. ताज्या मोड आलेल्या मटकीप्रमाणे तयार होते. यात कुठल्याही प्रथिनांचा किंवा व्हिटॅमिन्सचा नाश होत नाही. याप्रमाणे मोड आलेली इतरही कडधान्ये ठेवता येतील. कोरडी मोड आलेली धान्ये पाच-सहा महिने टिकतात.
हेही वाचा – Kitchen Tips : कढीपत्त्याची चटणी, कोकम सार…
- मूगडाळ, हरभराडाळ, उडीदडाळ, तांदूळ समप्रमाणात दळून आणावे. मोड आलेल्या हिरव्या मुगास थोड्या तेलात वाफ द्यावी. त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, ओल्या नारळाचा चव, लिंबाचा रस, हिरव्या मिरच्या वाटून, थोडे मीठ आणि साखर घालावी. हे मिश्र डाळीच्या पिठाची उकड उकडीच्या मोदकाप्रमाणे काढावी. लाटून पारी तयार करावी. त्यामध्ये वरील सारण भरावे आणि मोदक तयार करून ते मोदकपात्रात उकडावेत. चटणीत दही घालून हे मोदक खाण्यास द्यावेत. भरपूर प्रोटिनयुक्त, पौष्टिक असे हे मोदक कॅलरीजची भीती बाळगणाऱ्यांनी मनावर दडपण न ठेवता खावेत.
- डाळीचे पीठ कालवून जेव्हा पिठले करतो, त्या वेळेस त्या कालविलेल्या पिठात थोडे तेलाचे मोहन घालावे आणि नंतर निर्लेपच्या फ्रायपॅनमध्ये फोडणी करून त्यावर पिठले केल्यास छानसे होते.
हेही वाचा – Kitchen Tips : भाज्यांना दाटपणा आणणारे कूट, लसूण पावडर…
- कटाच्या आमटीसाठी पुरण शिजवून पाणी काढावे लागते. पुरण न शिजवता ही आमटी तुम्हाला पुढीलप्रमाणे करता येईल – अर्धी वाटी छोले गरम पाण्यात सोडा घालून रात्री भिजत घालावेत. सकाळी हे छोले कुकरमधून काढावेत. नंतर या पाण्यालाच कटाच्या आमटीप्रमाणेच फोडणी आणि मसाला टाकावा. झटपट सुंदर आमटी तयार होते.
तुमच्याही ‘स्पेशल रेसिपी’ किंवा अशा काही ‘किचन टिप्स’ असतील तर, avaantar.recipe@gmail.com या ईमेलवर किंवा 9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवा. या वेबसाइटच्या ‘फूड कॉर्नर’ या कॅटेगरीत त्या प्रसिद्ध केल्या जातील.


