एक जोडपं ओपीडीत आलं होतं. दोघांनाही किरकोळ विषाणूजन्य संसर्ग होता, पण आपल्याकडं बोलता बोलता गाडी कुठं पोहोचेल याचा नेम नसतो… “हे नीटनेटके, व्यवस्थित रहात नाहीत, त्यामुळं ‘नकारात्मक उर्जा’ तयार होऊन घरात ‘आजारपण’ येतात,” असं तिचं म्हणणं होतं तर, “वातावरणच संसर्गजन्य आहे, आता काय चार वेळा अंघोळ करू किंवा लुंगी इस्री करून नेसू का?” असा त्याचा प्रतिवाद होता…
तिचं म्हणणं तत्वत: बरोबर होतं आणि त्याचं तांत्रिकदृष्ट्या… पण हे सगळं झाले ठोकताळे; निदान नव्हे.
आपल्याकडं बूट-चपला काढून रांगेत ठेवणारांना ‘ओसीडी’ आहे असं म्हटलं जातं, पण ते तसं नसतं! आधीच रांगेत लावलेली पादत्राणेही यांना वेडीवाकडी दिसतात आणि ते नीट करायला धावतात, त्याला ‘ओसीडी’ म्हणतात..
हेही वाचा – आस्तिक आणि नास्तिक
या दाम्पत्याला एक झेनकथा सांगितली, तीच तुम्हालाही सांगतो…
जपानस्थित शिराकामी नावाच्या निबिड जंगलात अगदी खोलवर निसर्गाच्या कुशीत, झाडांच्या गर्द सावलीत वसलेल्या एका झेन मठात एक वयोवृद्ध झेनगुरु राहत होते, त्यांचं नाव होतं हचिरो.
त्यांच्याकडं दूरून दूरून लोक येत… कुणी दुःख घेऊन, कुणी आजार, कुणी शारिरीक दुखणी घेऊन तर, कुणी फक्त उत्तरांच्या शोधात…!
एके दिवशी फुमितो आणि मिसाकू हे दोन मित्र झेनगुरूंकडं आले… यातला फुमितो म्हणाला, ”गुरूवर्य माझ्या गावात जो कुणी तापानं आजारी पडला की, त्याला मी लगेच थंड कडू काढा देतो, कारण ताप म्हणजे शरीरात उष्णता वाढलेली असते. थंडगार काढा दिला की, तो उतरतोच, हा माझा ठोकताळा आहे.”
आता मिसाकूची वेळ होती. तो शांतपणं म्हणाला, ”मी आधी रुग्णाला पाहतो, विचारतो, त्याचं म्हणणं ऐकतो. कधी ताप असला तरी पण कारणं वेगवेगळी असतात, कधी संसर्ग असतो तर कधी भीती, कधी फक्त थकवा असतो तर, कधी तीव्र मानसिक दुःख. मला नीट काय ते समजल्याशिवाय मी कुठलंच औषध देत नाही.”
हचिरो गालातल्या गालात हसले. त्यांनी दोघांनाही मठाच्या मागील बागेत नेलं; तिथं दोन झाडं होती. पहिलं झाड कोमेजलेलं होतं, त्यांची पानं पिवळी पडली होती अन् माती कोरडी होती. दुसरं झाडही तसंच कोमेजलेलं दिसत होतं…
हचिरोंनी फुमितोला विचारलं, “हे झाड का कोमेजलं असेल रे?”
तो पटकन म्हणाला, “पाणी नाही मिळालं. लगेच पाणी घातलं पाहिजे.”
त्यानं धावत जाऊन शेजारच्या हौदातनं बादलीभर पाणी आणून झाडाच्या मुळांशी ओतलं…
मग गुरुजी दुसऱ्या झाडाकडं वळले आणि दुसऱ्याला अर्थात मिसाकूला विचारलं, “आणि हे झाड?”
मिसाकू खाली बसला, त्यानं माती हातात घेतली… मुळाजवळ पाहिलं अन् म्हणाला, “इथं पाणी आहे गुरुजी, पण मुळं कुजलेली दिसतात. याला जास्त पाणी घातलं गेलंय…”
हचिरो हलकेच मान हलवत म्हणाले, ”पहिल्या झाडाला पाणी मिळालं… ते थोड्याच दिवसांत ताजंतवानं होईल… पण दुसऱ्या झाडालाही तसंच लगेच पाणी दिलं असतं तर, ते मेलंच असतं त्याऐवजी माती बदलली, मुळांना हवा दिली आता तेही हळूहळू पण सावरेल…”
हेही वाचा – मन ‘आता’वर टिकून राहणं गरजेचं!
अजून स्पष्टिकरण देत हचिरो म्हणाले, “ठोकताळा म्हणजे सावली पाहून आकार ओळखण्यासारखं आणि यथोचित निदान म्हणजे सावलीसोबत प्रकाश, दिशा आणि वेळ समजून घेणं… ताप म्हणजे आजार नव्हे, दुखणं म्हणजे कारण नव्हे आणि फक्त दिसणं म्हणजे सत्य नव्हे. जो पटकन निष्कर्ष काढतो, तो कधी कधी बरोबर ठरतो, पण जो नीट पाहतो तो क्वचितच चुकतो.”
दोन्ही मित्र समाधानी झाले. त्या दिवसांनतर फुमितोनं औषध देण्याआधी प्रश्न विचारायला सुरुवात केली आणि मिसाकूनं ‘मौनाचं’ महत्त्व अधिक खोलवर समजून घेतलं…
झेन मठातल्या एका फलकावर लिहिलेलं वाक्य मात्र दोघांच्याही मन:पटलावर कायमचं बिंबलं ‘ठोकताळा वेळ वाचवतो, पण यथोचित निदान आयुष्य.’


