सार्थ ज्ञानेश्वरी
अध्याय अकरावा
जयाची सोय वेदा नाकळे । तयाचे सकळावयव एकेचि वेळे । अर्जुनाचे दोन्ही डोळे । भोगिते जाहले ॥209॥ चरणौनि मुकुटवरी । देखत विश्वरूपाची थोरी । जे नाना रत्न अलंकारीं । मिरवत असे ॥210॥ परब्रह्म आपुलेनि आंगें । ल्यावया आपणाचि जाहला अनेगें । तियें लेणीं मी सांगें । काइसयासारिखीं ॥211॥ जिये प्रभेचिये झळाळा । उजाळु चंद्रादित्यमंडळा । जे महातेजाचा जिव्हाळा । जेणें विश्व प्रकटे ॥212॥ तो दिव्यतेज शृंगारु । कोणाचिये मतीसी होय गोचरु । देव आपणपेंचि लेइले ऐसें वीरु । देखत असे ॥213॥ आपण आंग आपण अलंकार । आपण हात आपण हातियेर । आपण जीव आपण शरीर । देखे चराचर कोंदलें देवें ॥214॥ मग तेथेंचि ज्ञानाचां डोळां । पहात करपल्लवां जंव सरळा । तंव तोडित कल्पांतीचिया ज्वाळा । तैसीं शस्त्रें झळकत देखे ॥215॥ जयांचिया किरणांचेनि निखरेपणें । नक्षत्रांचे होत फुटाणे । तेजें खिरडला वन्हि म्हणे । समुद्रीं रिघों ॥216॥ मग काळकूटकल्लोळीं कवळिलें । नाना महाविजूंचें दांग उमटलें । तैसे अपार कर देखिले । उदितायुधीं ॥217॥
दिव्यमाल्याम्बरधरं दिव्यगन्धानुलेपनम् । सर्वाश्चर्यमयं देवमनन्तं विश्वतोमुखम् ॥11॥
कीं भेणें तेथूनि काढिली दिठी । मग कंठमुगुट पहातसे किरीटी । तंव सुरतरूंची सृष्टी । जयापासोनि कीं जाहली ॥218॥ जियें महासिद्धींचीं मूळपीठें । शिणली कमळा जेथ वावटे । तैसीं कुसुमें अति चोखटें । तुरंबिलीं देखिलीं ॥219॥ मुगुटावरी स्तबक । ठायीं ठायीं पूजाबंध अनेक । कंठीं रुळताति अलौकिक । माळादंड ॥220॥
हेही वाचा – Dnyaneshwari : सा विस्मितु पाहे कोडें, तंव पुढां होतें चतुर्भुज रूपडें
अर्थ
ज्या विश्वरूपाचा मार्ग वेदाला कळत नाही, त्या विश्वरूपाची सर्व अंगें अर्जुनाच्या दोन्ही डोळ्यांनी एकाच वेळी पूर्णपणे पाहिली ॥209॥ जे विश्वरूप अनेक प्रकारच्या रत्नांच्या अलंकारांनी शोभत होते, त्या विश्वरूपाचा विस्तार अर्जुन पायांपासून मुकुटापर्यंत पाहू लागला. ॥210॥ जे अनेक अलंकार, देव (परब्रह्म) आपल्या अंगावर घालण्याकरिता आपण बनला, ते अलंकार कशासारखे आहेत म्हणून मी सांगू? ॥211॥ ज्या प्रभेच्या कांतीने चंद्रसूर्यमंडळें प्रकाशित होतात आणि जी प्रभा महातेजाचे (प्रलयकाळाच्या तेजाचे) जीवन आहे आणि ज्या प्रभेने विश्व दिसावयास लागते ॥212॥ ते दिव्य तेज असलेले अलंकार कोणाच्या बुद्धीस विषय होतील? असे दागिने देवाने स्वत:च आपल्या अंगावर धारण केले आहेत, असे अर्जुनाने पाहिले. ॥213॥ देव आपणच अवयव, आपणच दागिने, आपणच हात, आपणच शस्त्र, आपणच जीव आणि आपणच देह वगैरे सर्व बनले होते. फार काय सांगावे? सर्व स्थावर-जंगमात्मक विश्व देवानेच भरले आहे, असे अर्जुनाने पाहिले. ॥214॥ मग तेथे (विश्वरूपात) ज्ञानदृष्टीने अर्जुन हाताचे सरळ पंजे पाहू लागला, तेव्हा तेथे त्या हाताच्या पंजात प्रलयकाळच्या अग्नीच्या ज्वाळांना तोडणारी शस्त्रे झळकत असलेली त्याने पाहिली. ॥215॥ ज्यांच्या (शस्त्रांच्या) किरणांच्या प्रखरपणाने नक्षत्रांचे फुटाणे होतात, आणि ज्यांच्या (शस्त्रांच्या) तेजाने मागे सरलेला अग्नी ‘समुद्रात प्रवेश करावा’ असे म्हणावयास लागला ॥216॥ मग काळकूट विषाच्या (जणू काय) लाटाच बनल्या आहेत अथवा प्रलयकाळच्या विजेचे अरण्य प्रकट झाले आहे, तसे उगारलेल्या शस्त्रांसहित अगणित हात (त्याने) पाहिले. ॥217॥
दिव्य पुष्पे आणि अस्त्रे धारण केलेले, दिव्य गंधाची ज्यास उटी केली होती, सर्व आश्चर्यांनी युक्त, अनंत, सर्वतोमुख आणि दिव्य स्वरूप असलेला असा (देव अर्जुनाने पाहिला). ॥11॥
त्या हातातील असंख्य शस्त्रांच्या भयाने तेथून दृष्टि काढून, मग जेव्हा अर्जुन कंठ आणि मुकुट पाहावयास लागला, तेव्हा कल्पतरूची सृष्टी ज्यापासून झाली, ॥218॥ जी फुले महासिद्धींची मूळ स्थाने (आहेत) आणि श्रम पावलेली लक्ष्मी जेथे विश्रांती पावते, अशी अतिशुद्ध फुले मस्तकावर धारण केलेली त्याने पाहिली. ॥219॥ मुकुटावर फुलांचे घोस होते, मस्तकावर ठिकठिकाणी निरनिराळ्या पूजा बांधलेल्या होत्या आणि गळ्यात फुलांचे अवर्णनीय हार शोभत होते. ॥220॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : पैं ज्ञानदृष्टीचेनि अवलोकें, परि वदनांचा शेवटु न टके


