सार्थ ज्ञानेश्वरी
अध्याय अकरावा
एकसरें ऐश्वर्यतेजें पाहलें । तया चमत्काराचें एकार्णव जाहलें । चित्त समाजीं बुडोनि ठेलें । विस्मयाचां ॥186॥ जैसा आब्रह्म पूर्णोदकीं । पव्हे मार्कंडेय एकाकी । तैसा विश्वरूपकौतुकीं । पार्थु लोळे ॥187॥ म्हणे केवढें गगन एथ होतें । तें कवणें नेलें पां केउतें । तीं चराचरें महाभूतें । काय जाहलीं ॥188॥ दिशांचे ठावही हारपले । आधोर्ध्व काय नेणों जाहले । चेइलिया स्वप्न तैसें गेले । लोकाकार ॥189॥ नाना सूर्यतेजप्रतापें । सचंद्र तारांगण जैसें लोपे । तैसी गिळिली विश्वरूपें । प्रपंचरचना ॥190॥ तेव्हां मनासी मनपण न स्फुरे । बुद्धि आपणपें न सांवरे । इंद्रियांचे रश्मी माघारे । हृदयवरी भरले ॥191॥ तेथ ताटस्थ्या ताटस्थ्य पडिलें । टकासी टक लागलें । जैसें मोहनास्त्र घातलें । विचारजातां ॥192॥ तैसा विस्मितु पाहे कोडें । तंव पुढां होतें चतुर्भुज रूपडें । तेंचि नानारूप चहूंकडे । मांडोनि ठेलें ॥193॥ जैसें वर्षाकाळींचे मेघौडे । कां महाप्रळयींचें तेज वाढे । तैसें आपणेनवीण कवणीकडे । नेदीचि उरों ॥194॥ प्रथम स्वरूपसमाधान । पावोनि ठेला अर्जुन । सवेचि उघडी लोचन । तंव विश्वरूप देखे ॥195॥
हेही वाचा – Dnyaneshwari : ऐसें तेणें वेदांतवेद्यें, सकळ लोकआद्यें…
अर्थ
एकदम भगवंतांच्या स्वरूपऐश्वर्याचे तेज प्रकट झाले. त्यामुळे जसे कल्पान्ताच्या वेळी सर्व जलमय होते, त्याप्रमाणे अर्जुनाला त्यावेळी सर्व चमत्कारमय झाले आणि आश्चर्याच्या गर्दीत त्याचे चित्त बुडून गेले. ॥186॥ ज्याप्रमाणे ब्रह्मलोकापर्यंत व्यापलेल्या उदकात एकटाच मार्कंडेय ऋषी पोहत होता, त्याप्रमाणे विश्वरूपी आश्चर्यात अर्जुन लोळू लागला. ॥187॥ अर्जुन म्हणाला, एवढे मोठे येथे आकाश होते, ते कोण कोठे घेऊन गेला? ते स्थावरजंगम पदार्थ आणि महाभूते कोठे गेली? ॥188॥ पूर्वादि दिशांचे मागमूसही राहिले नाहीत. वर, खाली हे कोण जाणे कोठे गेले? जागे झाल्यावर ज्याप्रमाणे स्वप्न नाहीसे होते, त्याप्रमाणे सृष्टीचा आकारही नाहीसा झाला. ॥189॥ अथवा सूर्याच्या तेजाच्या सामर्थ्याने चंद्रासह सर्व नक्षत्रांचा समुदाय लोपून जातो, त्याप्रमाणे या विश्वरूपाने ही सृष्टीची रचना गिळून टाकली. ॥190॥ तेव्हा मनाला मनपण स्फुरेनासे झाले. (मनाचे संकल्प विकल्प करणे बंद झाले). तसेच, बुद्धि आपण आपल्याला सावरेनाशी झाली. (बुद्धी कोणत्याही गोष्टीविषयी निश्चय करेनाशी झाली) आणि इंद्रियांच्या वृत्ती (आश्चर्याने चकित होऊन) माघारी परतून हृदयात साठवल्या. (इंद्रियवृत्ती अंतर्मुख झाल्या). ॥191॥ त्या स्थितीत स्तब्धपणाला स्तब्धता प्राप्त झाली आणि एकाग्रतेस एकाग्रता आली. जणू काय, ज्ञानमात्राला मोहन अस्त्रच घातले! ॥192॥ याप्रमाणे चकित होऊन तो कौतुकाने पाहू लागला, तो पुढे जे चार भुजांचे स्वरूप होते, तेच अनेक रूपे घेऊन चारही बाजूंना नटून राहिले. ॥193॥ ज्याप्रमाणे वर्षाऋतूत येणारे मेघ किंवा महाप्रलयाच्या वेळचे तेजही पसरून जिकडे तिकडे व्यापतात, त्याप्रमाणे आपल्या स्वरूपाशिवाय (त्या विश्वरूपाने) कोणतीही जागा शिल्लक ठेवली नाही. ॥194॥ (दिलेल्या दिव्य दृष्टीने) विश्वरूप पाहिल्याबरोबर प्रथम त्याला समाधान प्राप्त झाले. (व त्याने डोळे मिटून घेतले आणि पुन्हा) लगेच डोळे उघडून पहातो तो विश्वरूप त्याच्या दृष्टीस पडले. ॥195॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : जिये अनादिभूमिके निटे, चराचर हें चित्र उमटे
(साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)
विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,
IXZVpuvKFwKH6gb0NBN51t?mode=r_c
या लिंकला क्लिक करून WhatsApp group जॉइन करा.


