मी, आई आणि बाबा दरवर्षी आठ दिवस सुट्टीमध्ये गावी जातो. मी यावर्षी नववीत गेलो. आमच्या गल्लीच्या पुढच्याच गल्लीत तात्याकाका राहतो. तो बऱ्याच वेळा माझ्याशी गप्पा मारतो. मीही त्याला खूप प्रश्न विचारतो. तात्याकाका एकटा राहतो. काकू वारल्या कधीच… म्हणजे मला तर आठवतच नाही. त्याचा एकुलता एक मुलगा साकेत शहरात नोकरी करतो.
यावेळी काय झाले कोणास ठाऊक, पण आई गावी आल्या आल्या मला म्हणाली, “कौस्तुभ, तात्याकाकाने काहीही सांगितले तर, त्याला उलट प्रश्न विचारायचे नाहीत. तो जे सांगेल ते निमूट ऐकून घ्यायचे.”
“का पण?”
“मी सांगते म्हणून.”
आईही काहीही सांगते… आता विचारायला काय हरकत आहे? पण आईने सांगितलेले मी ऐकतो. आईचे नेहमीच बरोबर असते. तर, एक-दोन दिवसांनी तात्याकाका आला आणि मला घेऊन शेताकडे गेला. मग त्याने विचारले, “किती टक्के मिळाले आठवीत?” मी त्याला सांगितले, “94%.”
तोच पुढे सांगू लागला की, “त्याचा मुलगा साकेतही असाच हुशार होता शाळेत असताना. आता तो मोठ्या कंपनीत कामाला आहे आणि त्याचा पगार लाख-दोन लाख रुपये आहे.”
मी एकदम म्हणालो की, “माझ्या बाबांना तर फक्त पन्नास हजारच पगार आहे तरी, बाबा दरवेळी गावी येताना आजोबा-आजीसाठी धोतर, शर्ट, लुगडे घेऊन येतात तर, साकेतदादा तुझ्यासाठी कपडे पाठवत नाही का? किती जुने झाले तुझे शर्ट पॅन्ट?”
हेही वाचा – होप फॉर द बेस्ट!
तर, त्याचा चेहरा एकदम उतरला आणि घाईघाईत डोळ्यांतले पाणी पुसत तो म्हणाला, “अरे त्याला वेळ मिळत नाही यायला गावी. पण तो आला की, घेऊन येईल माझ्यासाठी कपडे.”
मी अजून काही विचारणार होतो, पण तेवढ्यात आईने सांगितलेले आठवले आणि मी चूप बसलो. घरी आल्यावर मी हे आईजवळ बोललो तर, आई मलाच ओरडली. यात ओरडण्यासारखे काय आहे?
असेच चार दिवस गेले आणि साकेतदादा ज्या शहरात राहतो त्याच शहरात राहणारा दत्तू गावी आला आणि आमच्या घरी येऊन म्हणाला की, तात्याकाकांच्या साकेतने शहरात मोठा फ्लॅट घेतला… एखाद कोटी रुपयांचा. तात्याकाकालाही ही बातमी कळाली आणि तो धावत घरी आला… दत्तूही साकेतचा फ्लॅट कसा सुंदर आहे, किती प्रशस्त मोठा आहे, हे सांगू लागला…
मी एकदम म्हणालो, “तात्याकाका, तुझे घर तर किती जुने झाले आहे, मागच्या बाजूला तर पडलेच आहे तर, साकेतदादा इथले घर का बांधून देत नाही तुझ्यासाठी?”
हे ऐकून तात्याकाका एकदम कावराबावरा झाला. बाबा एकदम माझ्यावर ओरडले, “बंड्या… बाहेर जा खेळायला. मोठ्या माणसात तुझे काय काम?”
मी बाहेर आलो, पण मला हे समजलेच नाही की, साकेतदादाने जर एवढे मोठे घर विकत घेतले तर, तात्याकाकाचे घर दुरुस्त करायला काय हरकत? रात्री मला आई पुन्हा ओरडली. त्यामुळे मी तात्याकाकापासून दूरच राहायचे ठरवले. उगाचच्या उगाच बोलणी कोण खाणार?
पण असे किती दिवस दूर राहणार?
एकदा दत्तू आणि तात्याकाका, तात्याकाकांच्या घराच्या ओट्यावर बसले होते आणि मोबाइल बघत होते. मोबाइलपासून दूर राहायचे. दुसऱ्यांचे मोबाइल तर चुकून पण पाहायचे नाही, अशी आईची सक्त ताकीद होती; त्यामुळे मी तात्याकाकाकडे जाणार नव्हतो, पण मोबाइल बघताना तात्याकाका डोळे पुसताना दिसला आणि मी लगेच मोबाइलमध्ये काय आहे, ते बघायला गेलो. तर, मोबाइलमध्ये एक सात-आठ वर्षांचा मुलगा केक कापत होता, नवीन कपडे घालून आणि त्या खोलीत खूप फुगे होते, काही त्याच्या वयाची मुले होती… त्या मुलाने केक कापताच त्या मुलांनी टाळ्या वाजवल्या आणि मग त्या मुलाच्या आईवडिलांनी त्याला केकचा एकेक घास भरवला. त्या मुलाच्या वाढदिवसाचा तो व्हीडिओ होता, पण त्यात एवढे रडण्यासारखे काय?
“कोण आहे हा? आणि तात्याकाका तू का रडतोयस?”
“अरे, हा तात्याचा नातू आहे. किरण नाव आहे त्याचे…” दत्तू बोलला.
“तात्याकाकाचा नातू? शक्यच नाही. सगळ्यांचे नातेवाईक सुट्टीत गावी येतात. नातूही येतात. हा कसा आला नाही. इतक्या वेळी गावी येऊन मी एकदाही कसा बघितला नाही त्याला?”
हेही वाचा – सासू, सून अन् लेक…
एक सुस्कारा सोडून दत्तू म्हणाला, “तुझी गोष्ट जाऊदे, कोणीच बघितला नाही तात्याकाकाचा नातू. अगदी तात्याकाकाने सुद्धा!”
मला हे ऐकून वाईट वाटले आणि त्यापेक्षाही जास्त वाईट वाटले, ते तात्याकाका एकदम रडू लागला हे पाहून.
मला आईने अगदी बजावून सांगितले होते की, तात्याकाकाला काही उलट विचारायचे नाही. पण आज तर मी तात्याकाकाला काही विचारलेच नाही, दत्तूलाच विचारले! तरीही, तात्याकाका रडू लागला. या मोठया लोकांचे तर मला काही समजतच नाही… आई ओरडेल हे माहीत असूनही मी तात्याकाकाला विचारले “तू का रडतोस? तुला काकूंची आठवण येते का?” तर, तात्याकाका जास्तच जोरात रडू लागला. तात्याकाकाला रडवलं, हे समजले तर आई पुन्हा मलाच रागवेल… मला तर काय करावे समजतच नाही… पण का कोण जाणे माझेही डोळे भरून आले आहेत.


