Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Bookshelf : ‘हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ’ कादंबरीचा आवाका मोठा

    April 21, 2026

    रिटर्न गिफ्ट

    April 21, 2026

    घटस्फोटाची याचिका? नव्हे, अतिअपेक्षांचा मृत्यूलेख!

    April 21, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, April 22
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Bookshelf : ‘हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ’ कादंबरीचा आवाका मोठा
    ललित

    Bookshelf : ‘हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ’ कादंबरीचा आवाका मोठा

    डॉ. अस्मिता हवालदारBy डॉ. अस्मिता हवालदारApril 21, 2026No Comments9 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, पुस्तक वाचन, पुस्तकसंग्रह, मी मराठी, अभिजात मराठी, Bookshelf, हिंदू कादंबरी, भालचंद्र नेमाडे हिंदू कादंबरी, जगण्याची समृद्ध अडगळ, हिंदू संस्कृती, हिंदू धर्म, पुरातन हिंदू धर्म, हिंदू धर्माचा इतिहास,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link
    भाग – 1

    ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक भालचंद्र नेमाडेंची पहिली कादंबरी कोसला लोकप्रिय आहे. ‘हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ’ या कादंबरीवर उलटसुलट प्रतिक्रिया आल्या. त्यांचे भाषण वादग्रस्त झाले. त्यांनी भाषणात व्यक्त केलेल्या मतांशी मी अजिबात सहमत नाही. त्यांच्या राजकीय मतांशी सुद्धा सहमत नाही. तरीही Seperate Art from the artist हे मनापासून पटल्यामुळे हे पुस्तक वाचायचे ठरवले.

    ‘हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ’ हे नाव पुस्तकाला का दिले असेल? असा प्रश्न पडतो. अडगळही आणि समृद्ध सुद्धा! इंग्लिशमध्ये oxymoron म्हणतात तसं. अडगळीतले सामान, अडगळीची खोली हेच डोळ्यासमोर येते तर, समृद्ध म्हटल्यावर वैभवशाली, गौरवशाली असे काही. दिवाळीची सफाई करताना माळ्यावर ठेवलेले जुने सामान दरवर्षी पुसून पुन्हा ठेवतो. त्यातले काही तोडकेमोडके रंग उडालेले असले तरी हवेहवेसे असते. त्यातच लहानपणीची बाहुली आणि तुटकी क्रिकेटची बॅट मिळते, जिच्याबरोबर आपले बालपण चिकटलेले असते. काही कुजलेले, तुटलेले असते ते मात्र टाकून द्यावे लागते… हीच अडगळ पण हवीहवीशी; जाणीवेने समृद्ध असलेली.

    एकूण 586 पानांचे आणि सहा भागांत विभागलेले पुस्तक असून अनेक पात्र आहेत. नायक एक असला तरी महत्त्वाची पात्रंही खूप आहेत. इतकी पात्र असून सुद्धा त्यांना परिपूर्ण केलं आहे. धर्म या शब्दाचे भाषांतर रिलीजन असे होऊ शकत नाही. धारयति इति धर्मः अशी व्याख्या आहे… जगण्याची रीत. सिंधू नदीच्या पल्याड राहणारे लोक हिंदू.

    सिंधू सरस्वती संस्कृतीपासून स्वातंत्र्योत्तर काळापर्यंतचा, विसाव्या शतकापर्यंतचा, कालखंड वर्णन करताना या देशातल्या निसर्ग, भूगोल, परंपरा, धर्म, चालीरीती, जाती, वर्ण, सामाजिक व्यवस्था, भाषा, आर्थिक स्थिती, राजकारण, शिक्षण, स्त्रिया इत्यादी सर्व अंगांचा ऊहापोह केला आहे. थोडक्यात, संस्कृतीचा सांगोपांग विचार. काळानुसार झालेली स्थित्यंतरे दाखवली आहेत. ग्रामव्यवस्था कोलमडून पडण्याचा आणि शहरीकरणाचा बदल कसा आणि का झाला, हे कथेतून सांगताना माणसाच्या जाणीवेवर झालेला परिणाम ते सांगतात.

    वेगवेगळ्या स्त्रियांची पात्रे रंगवताना स्त्रीचे वास्तव दाखवले आहे. बालविवाह, वैधव्य, सासरी होणारा त्रास, लादलेली बाळंतपणे, परित्यक्ता, संन्यासिनी, गणिका, भटक्या जमातीतली स्त्री, वैदू स्त्री, चारित्र्यहीन स्त्री, कर्तबगार, प्रेमळ, बुद्धिमान स्त्री, प्रेमळ सावत्र आई, सवती, गावासाठी शील त्यागणारी स्त्री, संशोधिका, बंडखोर स्त्री, पुरोगामी स्त्री असे विविध पदर उलगडून दाखवले आहेत.

    हेही वाचा – Bookshelf : अर्थपूर्ण जगण्याचा दृष्टीकोन देणारे Man’s search for meaning

    विद्यापीठ, शिक्षण पद्धती, सरकारी कर्मचारी, न्यायव्यवस्था, वाहतूक, पत्रकारिता, वैद्यकीय सेवा, सर्वदूर पसरलेला भष्टाचार अशा विविध अंगांचा लेखाजोखा मांडला आहे. कटू तितक्याच वास्तवाची जाणीव करून देणारे भाष्य केले आहे. कादंबरीचा आवाका मोठा असून इतिहासाचा शोध केवळ उत्खनने, भौतिक पुरावे, शिलालेख, लेखन इत्यादी भौतिक पुराव्यांवर सीमित न ठेवता, जाणिवांच्या आधारे घेणाऱ्या संशोधकाची ही कथा आहे. ज्यांना भारताचा प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहास थोडाफार माहीत आहे, त्यांना कादंबरीतले संदर्भ समजणे तुलनेने सोपे जाईल; अन्यथा अनेक शब्दांचे संदर्भ समजणार नाहीत. उदा. रोझेटा शिळा, अजित केशकंबली.

    भारताचा इतिहास शुद्ध रुपात केवळ इतिहास म्हणून फारसा लिहिला गेला नाही. कल्हण या काश्मिरी कवीचे राजतरंगिणी हा अपवाद, अन्यथा जसा तारीख, वार, स्थान वगैरेंसहित इतिहास लिहिणे अपेक्षित आहे, तसा लिहिला गेला नाही. महाभारताला जय नावाचा इतिहास म्हटले आहे. त्यात पात्रांच्या, कथेच्या आधारे रंजकता आणून लिहिताना नीती-अनीती, विवेक अविवेक, पापपुण्य, चालीरीती, रूढी परंपरा यांचाही समावेश आहे. त्यामुळे ती केवळ कोरडी जंत्री नाही. यामुळे भारतीय इतिहास हा परकीय इतिहास लेखनाच्या कसोटीवर समजून घेताना मुख्यत्वे पुरातत्वाचा आधार घ्यावा लागतो.

    हिंदू धर्म हा एकईश्वरीय धर्म नाही, एक धर्मग्रंथ, एक धर्मगुरू, एक प्रेषित तसेच काटेकोर नियम नाहीत. यात आस्तिक नास्तिक दर्शने (वेदांना प्रमाण मानणारे न मानणारे) किंवा ईश्वर मानणारे, भक्तीसंप्रदाय, ईश्वर न मानणारे सगळे समाविष्ट होतात. ते सगळे हिंदूच आहेत. अजित केशकंबली, संजय बेलठीपुत्र, मक्खली गोसाल इत्यादी दार्शनिक मतेही आहेत. इतरांच्या मतांना सन्मान दिला जातो, त्यांच्यावर विचार लादले जात नाहीत. भारतीय संस्कृतीत असलेल्या लवचिकपणामुळे इतकी आक्रमणे होऊनही हिंदू धर्म टिकला, असे लेखक म्हणतात. इतर धर्मांना भारतीय समाज मान्यता देतो, सामावून घेतो… ‘जगा आणि जगू द्या’ या तत्वाप्रमाणे. पण सत्तालोलुप जगात हे तत्व टिकले नाही.

    विविध रंग, पोत असलेल्या धाग्यांचा गोफ विणल्यावर जसा दिसेल तशी ही भारतीय संस्कृती आहे.पण या चांगुलपणाची ,सहिष्णुतेची फार मोठी किंमत मोजावी लागली आहे… नायक खंडेराव विठ्ठलचे हे स्वगत आहे. हा सिंधू संस्कृतीपासून आजपर्यंतच्या या भूमीचा, संस्कृतीचा प्रतिनिधी आहे. सध्या तो पुरातत्वात पी.एचडी करतोय आणि त्याने सिंधू लिपीचा अर्थ लावला आहे. सिंधू लिपी हे एक मोठे कोडे आहे, ते ज्या दिवशी सुटेल त्या दिवशी भारताच्या इतिहासाला वेगळे प्रमाण मिळेल.

    जगाचा इतिहास दोन कालखंडात विभागला आहे- सोप्या भाषेत सांगायचे तर लिखित पुरावे मिळण्यापूर्वीचा आणि लिखित पुरावे मिळाल्यानंतरचा कालखंड. पण भारताचा तीन कालखंडात प्रागैतिहासिक, इतिहासपूर्व, ऐतिहासिक. कारण, सिंधू संस्कृतीतली सिंधू लिपी अजून वाचता आलेली नाही. ती वाचण्याचे दावे मात्र अनेक झाले आहेत. सिंधू सरस्वती संस्कृती ही भारताची इसपू साडेचार हजार वर्षांपूर्वीची संस्कृती आहे. कादंबरीच्या सुरुवातीला ही संस्कृती नांदलेली स्थाने लिहिली आहेत. उदा. मोहोन्जो दारो, हडप्पा, लोथल. मोहोन्जो दारो जसे होते अगदी तसेच त्याचे वर्णन केले आहे. सिंधू संस्कृतीबद्दल जी माहिती मिळाली आहे, त्याचाही जशाच्या तसा वापर केला आहे. उदा. तिथले रस्ते, कठोर शासन व्यवस्था आणि तिथे मिळालेले नर्तकीचे शिल्प, जिला ते प्रिया घोषा म्हणतात. घोषा नावाच्या वैदिक काळात असलेल्या विदुषीने वेदात ऋचा रचल्या आहेत. वेदिक संस्कृती म्हणजेच सिंधू संस्कृती आहे का? हाही एक प्रश्न आहे.

    खंडेराव मोरगावातला शेतकरी असून त्याने शेतीवाडी सोडून शिकायचे ठरवले. डॉ. सांखलियांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास सुरू होतो. त्याला केवळ भौतिक पुराव्यावर नाही तर, जाणीवेच्या आधारे संशोधन करायचे असते, जे पुरातत्वाच्या दृष्टीने अयोग्य आहे, असे मार्गदर्शकांचे मत असते. मंडी नावाची त्याची युरोपीय सहाध्यायी विद्यार्थिनी लोककथा, समजुती यांचा आधार घेऊन संशोधन करायला, याच्या गावात जाते. डॉ. जलील हे पाकिस्तानी संशोधक संस्कृतचे अभ्यासक होते. ते बोलता बोलता पाकिस्तान हिंदुस्तान शब्दांची सरमिसळ करतात. लेखक यातून दोन्ही प्रांतांच्या संस्कृतीची अभिन्नता दाखवतो आहे. फाळणी गांधीजींच्या मुळे झाली, असे म्हणताना कारण मात्र अजब देतात! विभाजन होऊनही संस्कृती पुसली गेली नाही.

    खंडेराव भल्या मोठ्या संयुक्त कुटुंबाचा सदस्य आहे. त्याच्या संन्यासिनी झालेल्या तिरोनी आत्याचा शोध घेताना ती काबूलला मठात असण्याची शक्यता, त्याला ऐकीव माहितीवरून कळते. तिरोनी आत्याचा जन्मच देवाला वाहण्यासाठी होता. मुलगी होण्यासाठी मागितलेला हा पहिला नवस असावा, असे लेखक म्हणतो. पुरुषप्रधान संस्कृतीचे फलित असलेली ही आत्याची रंजक कथा आहे.

    खंडेरावचे वडील मृत्युशय्येवर असल्याची बातमी येताच रोज हजारो वर्षांपूर्वीची प्रेते जमिनीतून उकरून अभ्यास करणारे सहाध्यायी हळवे होतात. समोर उभा ठाकलेला मृत्यू भीषण असतो. लेखकाच्या मते मृत्यूला संबोधताना ‘शांत होणे’ असे नास्तिक म्हणतात, पण यज्ञ संस्कृतीतही हेच म्हणत होते.

    रोझेटा शिळेचा उल्लेख येतो. रोझेटा शिळा मिळाल्यामुळे इजिप्तची चित्रलिपी वाचता आली. या शिलेवर एकच लेख पुरातन ग्रीक, हायरोग्लाफिक आणि डेमोटिक लिपीत लिहिलेला आहे. तशी शिळा सिंधू लिपीसाठी मिळायला हवी, जेणेकरून ती वाचता येईल.

    भूतकाळातल्या प्रचंड हिंदुस्तानातून भविष्यकाळातल्या एकमेकांवर भुंकणाऱ्या लढाईखोर राष्ट्राचे नागरिक झालो, असे लेखक लिहितात.

    रेल्वेच्या डब्यात प्रवाशांचे संवाद सांगताना एका शाळामास्तराची कथा खंडेराव सांगतो. शाळामास्तर अशा गावी शाळा चालवत असतो, जिथे डाकूंचे राज्य असते आणि त्यात सरकारी कामे! तो म्हणतो, सुट्टी कोणाकडे मागणार? तिथे कोणी सरकारी अधिकारी फटकत नाही. शिकवण्याचे काम सोडून इतर कामे करावी लागतात. क्षोभकारक वर्तन आणि अक्षोभकारक वर्तन किंवा पापपुण्य परिस्थिती, व्यक्ती सापेक्ष असते, अशी चर्चा होते.

    इथे पुस्तकाचा पहिला भाग संपतो. प्रत्येक भागाच्या सुरुवातीला सिंधू संस्कृतीतले छापे (सील) काढले आहेत. त्यांच्यावर एकशिंगी प्राणी, पशुपतिनाथ वगैरे चित्र आहेत.

    दुसऱ्या भागात सुरवातीलाच सातपुडा आणि जंगलाचा भाग यांची इंग्रजांनी स्वार्थासाठी कशी वाट लावली, हे सांगितलं आहे. इंग्रजांचं त्यांच्या देशाच्या निसर्गाचं प्रेम आणि आपल्या निसर्गाला ओरबाडणे, हा दुटप्पीपणा आहे. मोरगावाची भौगोलिक स्थिती वर्णन करताना ते जातीव्यवस्थेबद्दल सांगतात. जाती कर्माने ठरत होत्या, पण नंतरच्या काळात जन्माने ठरू लागल्या. प्रत्येक जातीचे असलेले महत्त्व सांगताना महारांचा अधिकार ते सांगतात. त्यांचे काम गावाच्या संरक्षणाचे असल्याने पाटील असो की देशमुख, कोणालाही ते गस्त घालताना गावाच्या वेशीजवळ हटकू शकत होते. भटक्या फिरत्या लोकांची पालं पाटलाच्या परवानगीने गावाबाहेर असत. तेही गावाचे रक्षण करत आणि गावाची कामे करून देत. कुंभार मातीची भांडी बनवत. त्यांनी केलेले बैल सिंधू संस्कृतीतल्या बैलांसारखे दिसत.

    लेखक लिहितात, सगळी मातीची भांडी वापरातून बाद झाली तरी, मडके मात्र राहील. मोरगावात बाहेरून आलेले लोक समाविष्ट झाले, तिथलेच झाले अगदी धोब्यापासून सिंध्यांपर्यंत. हिंदूत वर्ग सिद्धांत लागू होत नाही. गावात सामावून घेण्यासाठी नवीन आलेल्या लोकांनी गावाची कामे करून गरज भागवायची आणि स्वत:चे पोट भरायचे. फुलांच्या पाकळ्या जशा वेगवेगळ्या पण तरीही एकत्र बांधलेल्या असतात तशाच या जाती आणि गाव!

    लभान्या जातीचे लोक त्यांच्या विचित्र मोकाट जीवनशैलीमुळे गावात सामील झाले नाहीत, पण त्यांची हिंदूंनी कत्तलही केली नाही. याच जातीच्या रोमानी लोकांना हिटलरने मारले. पेंढारी गावावर हल्ला करून उद्ध्वस्त करीत, पण ते इंग्रजांशी सलोखा करणाऱ्यांना शत्रू मानत. फक्त यशवंतराव होळकरांना आपला राजा मानत. लुटीत स्त्रियांना विकायचे आणि अनाथ मुलांना कोणाला तरी सांभाळायला द्यायचे, त्यांना पाळगुत म्हणत. हा काळ पेशव्यांचे राज्य संपून इंग्रजांचे शासन सुरू झाल्याचा काळ आहे.

    मोरगावातले लोहार जुने लोखंड वापरून तलवारी बनवण्यात तरबेज होते .इंग्रजांनी त्यांचे हातपाय तोडून टाकले. हे सर्व देशभर घडले होते. यानंतर होळकर आणि इंग्रज यांच्यातल्या लढाईत सामान्य लोकांच्या जगण्यावर कसा परिणाम झाला, ते शाहीर पोवाड्यातून सांगतात. पेंढारी आणि इंग्रजातली लढाई, मोरगावचे धास्तावलेपण, नागोराव पहलवान आणि दोन लभान्या बायका सगळी हकीकत पोवाड्यात येते. युद्धाच्या काळात ब्रिटिशांनी मुलांना युरोपात लढायला नेलं. काही तिथेच मृत्युमुखी पडले. त्यांच्या घरातल्या लोकांना पेन्शन मिळून ते श्रीमंत झाले. साधारण तीन लाख भारतीय सैनिक युद्धात मारले गेल्याची इतिहासात नोंद आहे.

    स्वातंत्र्य मिळाल्यावर परिस्थिती फारशी बदलली नाही. महारवाड्यातले चार सोडून बाकीचे सगळे बौद्ध झाले. चारपैकी एक वारकरी होता आणि एक जत्रेत चमत्कार करून पैसे मिळवणारा होता.

    जोडणारा वाईट की तोडणारा? हे सांगणे कठीण आहे. तोडणाऱ्या जिनांनी मुसलमानांना स्वतंत्र केलं आणि गांधींसारखे जोडणारे फाटका समाज जोडू शकले नाहीत, असा युक्तिवाद खंडेराव करतो. दुष्काळाच्या काळात जाती गडद झाल्या. हिंदू धर्मात एक देव, एक धर्मग्रंथ नसल्यामुळे कडक कायदे नसल्याने हे शक्य झालं.

    पुण्य म्हणजे काहीही फायदा नसताना उलट आपलाच तोटा करून घ्यायची बुद्धी. देवच कोणाचं न कोणाचं रूप घेऊन परीक्षा पाहतो. घरातल्या भाकरीचा एक तुकडा दुरडीत शिल्लक ठेवावा, तो लक्ष्मीसाठी. दोन्ही हातांनी गोधडी शिवणारी गोंडीण, मुलीच्या डोळ्याखाली कपाळावर गोंदून देणारी, चतकोर भाकरीच्या तुकड्याच्या बदल्यात या बायका काम करायच्या.

    गरज आणि उणीव यांच्यातला माणुसकीचा फरक, अशा वाक्यांतून आणि प्रसंगांतून लेखक आपल्या संस्कृतीचे वेगळेपण दाखवतात. पाश्चात्य संस्कृती म्हणजे अतिउत्तम असे काही नाही, हेही दाखवतात.

    वस्तू फुकट न घालवायची वृत्ती, अनावश्यक खर्च टाळण्याची वृत्ती भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. गरजेपुरते घ्यावे हा मूलमंत्र. निकोबारच्या आदिवादी जातीतला मुलगा मासे मारताना समोर आलेला मोठा मासा मारत नाही, कारण ती मासोळी गर्भारशी असते. हे त्याला बघून समजतं आणि तिला मारण्यापेक्षा तो भुकेसाठी अजून कष्ट करायचे ठरवतो, ही संस्कृती.

    इंग्रजांनी आपल्या देशात सुधारणा केली किंवा रेशनवर स्वस्त धान्य दिलं, असं म्हणणाऱ्या भावडूला हुशार वसंत सांगतो की, अगदी उपाशी मारायचं नसतं, थोडफार द्यायचं असतं. म्हणजे उठाव होत नाही. इंग्रजांनी भलं केलं म्हणणारे लोक त्यांचे धार्जिणे असतात. इंग्रजांबद्दल अशा जाणून बुजून त्यांनीच पसरवलेल्या गैरसमजुतींवर लेखक कडाडून टीका करतात.

    हेही वाचा – Bookshelf : हसवता हसवता समाजाची कुरूप बाजू दाखविणारी ‘रामनगरी’!

    रेशनच्या दुकानापुढे लागलेल्या मोठ्या रांगा, लाचखोरी, पोलिसांनी दंडुके मारणे, निकृष्ट धान्यवाटप यामुळे खंडेरावाला वैषम्य वाटते. पण त्याचा निरुपाय असतो. कादंबरीतले एक पात्र म्हणते, चरखा चालवून मिल बंद पडणार नाहीत आणि हाती नांगर धरलास तर बैलच होशील. एकीकडे गांधींची अहिंसा म्हणायची आणि दुसरीकडे न्युक्लीयर बॉम्ब करायचा!

    गावात दुष्काळी कामांत रस्ता बांधायचे काम सरकार सुरू करते. 48 डिग्री तापमानात गावातल्या बायका सुद्धा हे काम करतात. खंडेरावाची मावशी सुद्धा हे काम करायला जाते. ती यांच्या घरी आश्रयाला असते. तिचा आग्रह असतो की, तिच्या मुलीचा विवाह शहरी मुलाशीच व्हायला हवा. जमीनदार असला तरी गावातला नको. मुलींना आणि पालकांना शहराचे आकर्षण वाटते, कारण दरमहा हाती येणारा पैसा, तोही कमी कष्टात!! त्यामुळे उपवधू तरुण शहरात जायला लागले.

    मुलींबद्दल लेखक लिहितात, मुलगी म्हणजे सारखीसारखी पडणारी आधाराशिवाय उभी न राहू शकणारी ठकी. मुलींची लग्न जमवताना नकार येत राहिल्यावर तडजोड करावी लागते. तडजोड म्हणजे शेतकऱ्याच्या घरात मुलगी देणे. मुलगी सून करून आणली की, आयती मजुरीण मिळते. शेतीची कामे खूप असतात, जीवन कष्टप्रद असते. लक्ष्मी जैनांची देवता आहे. लक्ष्मीचा वरदहस्त असला तरी, तिथेही मुलींच्या नशिबी कष्ट आहेतच.

    क्रमशः
    Avatar photo
    डॉ. अस्मिता हवालदार

    डॉ. अस्मिता हवालदार नायर दंत रुग्णालयातून BDS. टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून MA Indology; Diploma in Archeology Mumbai University. 27 वर्षे इंदूरमध्ये प्रॅक्टिस करते. विविध मासिक, दिवाळी अंकातून कथा आणि लेख प्रसिद्ध होतात. ‘विजयनगर हृदयस्थ साम्राज्य’, ‘विजयनगरचे शिल्प काव्य’, ‘विजयनगरचे लेपाक्षी मंदिर’ ही पुस्तके आणि ‘आव्हानांचे लावून अत्तर’ हा कथासंग्रह प्रकाशित.

    Related Posts

    रिटर्न गिफ्ट

    April 21, 2026 ललित

    घटस्फोटाची याचिका? नव्हे, अतिअपेक्षांचा मृत्यूलेख!

    April 21, 2026 ललित

    काळोखाच्या दारावरती नक्षत्रांच्या वेली

    April 21, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    रिटर्न गिफ्ट

    By दिलीप कजगांवकरApril 21, 2026

    जवळ जवळ दोन तास नेहा साड्या बघत होती, परंतु आवडलेल्या साड्या तिच्या बजेटमध्ये बसत नव्हत्या…

    घटस्फोटाची याचिका? नव्हे, अतिअपेक्षांचा मृत्यूलेख!

    April 21, 2026

    काळोखाच्या दारावरती नक्षत्रांच्या वेली

    April 21, 2026

    …अन् संदीपने स्वतःचा स्वाभिमान वाचवला!

    April 20, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Bookshelf : ‘हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ’ कादंबरीचा आवाका मोठा

    April 21, 2026

    रिटर्न गिफ्ट

    April 21, 2026

    घटस्फोटाची याचिका? नव्हे, अतिअपेक्षांचा मृत्यूलेख!

    April 21, 2026

    काळोखाच्या दारावरती नक्षत्रांच्या वेली

    April 21, 2026

    Dnyaneshwari : अर्जुना तुवां एक दावा म्हणितलें, आणि तेंचि दावूं तरी काय दाविलें

    April 21, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 21 एप्रिल 2026

    April 21, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 274
    • अवांतर 182
    • आरोग्य 103
    • थर्ड अंपायर 4
    • पंचांग आणि भविष्य 392
    • फिल्मी 45
    • फूड काॅर्नर 197
    • मैत्रीण 18
    • ललित 571
    • शैक्षणिक 77
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Bookshelf : ‘हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ’ कादंबरीचा आवाका मोठा

    April 21, 2026

    रिटर्न गिफ्ट

    April 21, 2026

    घटस्फोटाची याचिका? नव्हे, अतिअपेक्षांचा मृत्यूलेख!

    April 21, 2026
    Most Popular

    Bookshelf : ‘हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ’ कादंबरीचा आवाका मोठा

    April 21, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.