रंगूनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा
गुंतूनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा…
नुकतेच हे गीत ऐकण्यात आले. पूर्ण गाण्यातील या दोन ओळी जास्त मनाला भावल्या. पण लगेचच विचार आला की, माणूस तर समाजप्रिय प्राणी आहे. मग हे कसे शक्य आहे?
माणूस जन्माला आल्याबरोबर लगेचच काही नाती त्याच्या भोवती जमा होतात. यामध्ये आई, बाबा, आजी, आजोबा, काका, काकू, मामा, मामी, मावशी, आत्या, ताई, दादा यांचा पहिला नंबर लागतो. या सर्वांबरोबर जमवून घेईपर्यंतच ‘मित्र’ आपल्या आयुष्यात येतो आणि सगळे जगच बदलून जाते. त्यानंतर समोर येतात ते आपले शिक्षक! अनेक चांगले-वाईट अनुभव घेऊन आपण पुढे पुढे चालत असतो. यानंतर कायदेशीर नाती आयुष्यात येतात…
सर्व नाती जपताना तारेवरची कसरतच करावी लागते. नाते कोणतेही असो तडजोड ही करावीच लागते. कोण नात्याला किती महत्त्व देते, यावर तडजोड अवलंबून असते.
खरंतर, नाती ही झाडासारखी असतात, असे म्हणतात. सुरुवातीला काळजी घ्यावी लागते, एकदा का ती बहरली की, आयुष्यभर कोणत्याही परिस्थितीमध्ये सावली देतात. हे जरी खरं असले तरी, सुरुवातीलाच दम धरणे अवघड असते. आपण कोणतेही नाते बहरूच देत नाही.
लहानपणी किती छान असते ना, पहिली काही वर्षं आपल्याला काही समजत नसते. त्यातच नाती एकेक करून समोर येतात. मग कोण कसे आहे, हे आपण समजायला लागतो. (अगदी लहान मुलाचे जरी बघितले तरी ते स्पर्शाने समजते, हे नाते कसे आहे! त्याला योग्य वाटले नाही तर, ते रडायला लागते.) पण ही 4-5 वर्षं साधारणपणे नाती समजायला लागलेली असतात. मग जर लहानपणी आपण एखादे नाते समजायला एवढा वेळ घेत असू तर, मोठे झालो म्हणून लगेच एकाच भेटीत कसे ठरवू शकतो की, हा माणूस कसा आहे ते? आपण मोठे झालो म्हणजे समोरची व्यक्ती पण मोठी झालेली असतेच ना? म्हणजेच, तेव्हाही सगळेच बदलत असते, त्यामुळे तेथे पण वेळ घेणे महत्त्वाचेच… (काही माणसे असतात extraordinary त्यांना समजतही असेल, पण प्रत्येक वेळी अंदाज बरोबर ठरेलच असे नाही ना!)
नातं हे अक्षरासारखे असावे जितकी जास्त गिरवू तितकी अधिक लक्षात रहातात. जितकी अधिक वाचू तितकी चांगली समजतात. प्रत्येक नात्याला काही वेळ द्यायला हवा. पूर्ण विचार करून एखाद्या व्यक्तींबद्दल आपले मत बनवावे.
प्रत्येक नातं हे काचेच्या बरणीप्रमाणे हाताळावे… सावकाश. थोडासा जरी धक्का लागला तरी बरणी फुटून सगळीकडे तुटलेल्या काचांचा पसारा होईल. मग उचलणे अवघड होईल… त्यापेक्षा बरणी संभाळलेलीच चांगली.
म्हणून नाती ही रेशमाच्या धाग्यांप्रमाणे असावीत, एकमेकाना गुंफून ठेवणारी. म्हणजेच प्रत्येकाची स्वत:ची जागा ही इतरांसाठी रेशमाच्या धाग्याप्रमाणे असावी. गुंफलेला प्रत्येक मोती वेगळा त्याचे अस्तित्व वेगळे पण धागा एक, तोपण न दिसणारा! म्हणजेच प्रत्येक व्यक्तीला तिचे स्वत:चे अस्तित्व आहे, हे मान्य करून आपल्या नात्याच्या बंधनात त्याला अडकवून ठेवायचे. आपले जसे प्रत्येक व्यक्तीबरोबर वेगळे नाते असते, तसेच समोरच्याचे पण आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.
हेही वाचा – घरासमोरची रांगोळी आणि बरेच काही…
अगदी साधे उदाहरण द्यायचे झाले तर, प्रत्येकाचे आपापल्या आई-वडिलांबरोबरचे नाते वेगळे असते. त्याबद्दलच्या भावना व्यक्त करण्याची पद्धत वेगळी असते. मग प्रत्येकाचे विचार सारखे कसे असू शकतील? त्यामुळे सर्वांनी नात्यांना आपापली space द्यावी हेच महत्त्वाचे.
‘गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा…’ असे म्हणण्यापेक्षा ते पाय तसेच गुंतवून ठेवावेत. पाय गुंतलेले आहेत म्हणून स्वत: पडायचे नाही आणि इतरांना पण पडू द्यायचे नाही. सगळ्यांनी एकमेकाना समजून घेऊन हातात हात घेऊन चालायला हवे. परिस्थितीमुळे एकमेकांच्या जवळ येण्याची संधी मिळाली आहे, त्याचे सोने करायचे की नाही? हे सर्वांनीच ठरवायचे आहे. मिळालेल्या संधीचा उपयोग नाती मिळवण्यासाठी करावा ना की नाती गमावण्यासाठी! हीच नाती आपल्याला येणाऱ्या परिस्थितीमध्ये लढण्याची ताकद देणार आहे. काठ्यांची गोष्ट सगळ्यांना माहिती आहेच- एक एक काठी तोडली गेली, पण जेव्हा त्या बांधून एकत्र केल्या, तेव्हा तोडणे अवघड झाले. नात्यांचे पण असेच आहे. “नाते प्रेमाचे की नात्यात प्रेम” हे खूप महत्त्वाचे!
हेही वाचा – आठवणींचे कपाट!
आणि म्हणूनच
हे बंध रेशमाचे ठेवू जपून जीवा
धागा अतूट हाच प्राणात गुंतवावा
बळ हेच दुर्बलांना देती पराक्रमाचे
तुटतील ना कधीही हे बंध रेशमाचे


