सार्थ ज्ञानेश्वरी
अध्याय अकरावा
अहो वांसरू देखिलियाचि साठीं । धेनु खडबडोनि मोहें उठी । मग स्तनामुखाचिये भेटी । काय पान्हा न ये ॥40॥ पाहा पां तयां पांडवाचेनि नांवें । जो कृष्ण रानींही प्रतिपाळूं धांवे । तयांतें अर्जुनें जंव पुसावें । तंव साहील काई ॥41॥ तो सहजेंचि स्नेहाचें अवतरण । आणि येरु स्नेहा घातलें आहे माजवण । ऐसिये मिळणी वेगळेपण । उरे हेंचि बहु ॥42॥ म्हणोनि अर्जुनाचिया बोलासरिसा । देव विश्वरूप होईल आपैसा । तोचि पहिला प्रसंगु ऐसा । ऐकिजो तरी ॥43॥
अर्जुन उवाच – मदनुग्रहाय परमं गुह्यमध्यात्मसंज्ञितम् । यत्वयोक्तं वचस्तेन मोहोऽयं विगतो मम ॥1॥
मग पार्थु देवातें म्हणे । जी तुम्ही मजकारणें । वाच्य केलें न बोलणें । कृपानिधे ॥44॥ जैं महाभूतें ब्रह्मीं आटती । जीव महदादींचें ठाव फिटती । तैं जें देव होऊनि ठाकती । तें विसवणें शेषींचें ॥45॥ होतें हृदयाचां परीवरीं । रोंविलें कृपणाचिये परी । शब्दब्रह्मासिही चोरी । जयाची केली ॥46॥ तें तुम्हीं आजि आपुलें । मजपुढां हियें फोडिलें । जया अध्यात्मा वोवाळिलें । ऐश्वर्य हरें ॥47॥ ते वस्तु मज स्वामी । एकिहेळां दिधली तुम्हीं । हें बोलों तरि आम्ही । तुज पावोनि भिन्न कैंचे ॥48॥ परि साचचि महामोहाचां पुरीं । बुडालेया देखोनि सीसवरी । तुवां आपणपें घालोनि श्रीहरी । मग काढिलें मातें ॥49॥ एक तूंवांचूनि कांहीं । विश्वीं दुजियाची भाष नाहीं । कीं आमुचें कर्म पाहीं । जे आम्ही आथी म्हणों ॥50॥ मी जगीं एक अर्जुनु । ऐसा देहीं वाहे अभिमानु । आणि कौरवांतें इयां स्वजनु । आपुला म्हणें ॥51॥ याहीवरी यांतें मी मारीन । म्हणें तेणें पापें के रिगेन । ऐसें देखत होतों दुःस्वप्न । तों चेवविला प्रभु ॥52॥
हेही वाचा – Dnyaneshwari : हें सारस्वताचें गोड, तुम्हींचि लाविलें जी झाड…
अर्थ
अहो, वासरू पाहिले की, लागलीच प्रेमाने गाय खडबडून उभी राहते, मग प्रत्यक्ष तिच्या स्तनाची आणि त्याच्या मुखाची गाठ पडल्यावर तिला पान्हा येणार नाही काय? ॥40॥ पाहा बरे, त्या पांडवांचे नाव ऐकल्याबरोबर जो कृष्ण त्यांचे रक्षण करण्याकरिता रानातही धाव घेतो, त्याला अर्जुनाने विचारावे आणि मग आपण सांगावे, एवढे तरी सहन होईल काय? ॥41॥ तो श्रीकृष्ण परमात्मा स्वभावत:च प्रेमाची मूर्ती असून त्या प्रेमास अंमल आणणारा अर्जुन, हा उत्तेजक पदार्थ घातला आहे. अशा एक होण्याच्या प्रसंगी त्यांचे वेगळेपण राहिले, हेच फार आहे. ॥42॥ म्हणून अर्जुनाच्या बोलण्याबरोबर श्रीकृष्ण सहजच विश्वरूप धारण करील, तोच पहिला प्रसंग असा आहे, तर तो ऐकावा. ॥43॥
अर्जुन म्हणाला, (हे श्रीकृष्णा) माझ्यावर अनुग्रह करण्याकरिता अध्यात्म नावाचे अत्यंत गुह्य असे जे भाषण तू बोललास, त्याने हा माझा मोह नि:शेष नाहीसा झाला. ॥1॥
मग अर्जुन कृष्णाला म्हणाला, कृपासागरा, जे बोलता यावयाचे नाही, ते तुम्ही माझ्याकरिता बोललात. ॥44॥ ज्यावेळी पंचमहाभूते ब्रह्मामध्ये नाहीशी होतात आणि जीव तसेच महत्-तत्व वगैरे यांचा पत्ता नाहीसा होतो, त्यावेळी देवा, आपण जे (ब्रह्मरूप) होऊन राहता ते शेवटचे विश्रांतीस्थान आहे. ॥45॥ जी स्वरूपस्थिती वेदांसही कळू न देता (आपण आपल्या) अंत:करणरूपी घरात कृपणासारखी पुरून ठेवली होती ॥46॥ ती आज तुम्ही आपल्या अंत:करणातील गुप्त गोष्ट माझ्यापुढे प्रकट केली. या अध्यात्मज्ञानावरून शंकराने आपले ऐश्वर्य ओवाळून टाकले आहे. ॥47॥ महाराज, अशी जी वस्तू, ती तुम्ही मला एका क्षणात दिलीत, असे म्हणावे तर आम्ही तुम्हापासून वेगळे (तरी) कोठे आहोत? ॥48॥ पण खरोखर मोहाच्या महापुरात मी डोक्यापर्यंत बुडतो आहे, असे पाहून श्रीकृष्ण, तुम्ही आपण स्वत: उडी घालून मग मला बाहेर काढले. ॥49॥ एक तुझ्याशिवाय या अखिल विश्वामध्ये दुसर्याची कशाची वार्ता नाही. (अशी वास्तविक स्थिती असताना) आमचे दुर्दैव पाहा की, आम्ही अभिमानाने, आम्ही कोणीतरी एक आहोत, असे समजतो. ॥50॥ जगामध्ये मी एक अर्जुन आहे, असा देहाच्या ठिकाणी अभिमान बाळगतो, आणि या कौरवांना आपले भाऊबंद म्हणतो. ॥51॥ यावर देखील यांना मी मारीन आणि त्या पापाच्या योगाने मग मला कोणती गती मिळेल, असे म्हणत होतो. याप्रमाणे मी वाईट स्वप्न पाहात होतो, तो त्या मला महाराज, आपण जागे केले. ॥52॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : मी जरी सलगीचा चांगु, तरी काय आइसीहुनी अंतरंगु…


