मागील लेखात आपण शिशुगटातील जीवनव्यवहार शिक्षण याबाबत माहिती घेतली. आता या लेखात आपण बालगटातील जीवनव्यवहार शिक्षण याविषयी माहिती घेणार आहोत. सुरुवातीला शिशुगटातील जीवन व्यवहारातील विविध उपक्रमांची मुलांकडून उजळणी करून घेण्यात येते. मुलं हे उपक्रम साधारणतः पहिल्या आठवड्यातच चांगल्या प्रकारे करू लागतात. बालगटातील मुलांना उपक्रम देताना स्थूलाकडून सूक्ष्माकडे या तत्त्वाचा अवलंब करण्यात येतो.
मुलांना वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या उपक्रमांबद्दल आपण आता जाणून घेणार आहोत.
जीवनव्यवहार शिक्षणातील उपक्रम
- कपड्यांचा घड्या घालणे
रुमालाच्या घडीनंतर छोट्या बाळाचे कपडे मुलांना घडी घालण्यासाठी दिले जातात. अगोदर कपड्यांच्या घड्या कशा घालायच्या हे दाखवून नंतर मुलांकडून सराव करून घेण्यात येतो.
- वर्गवारी करणे
बालगटातील मुलांना सारख्या दिसणार्या भाज्या दाखवून त्यांची वर्गवारी करून घेण्यात येते. उदाहरणार्थ भेंडी, श्रावणघेवडा, गवार इत्यादी.
- धान्य निवडणे
शिशुगटाप्रमाणे धान्यात खडे न मिसळता दोन धान्ये एकत्र करुन मुलांना धान्ये वेगळी करण्यास शिकवले जाते. उदाहरणार्थ गहू आणि तांदूळ, ज्वारी आणि गहू, तूर डाळ आणि मसूर डाळ इत्यादी.
- भाजी निवडणे
मेथी, पालक या पालेभाज्या निवडण्याचे मुलांना शिकविले जाते. नंतर कोथिंबीरही निवडायला देता येऊ शकते. भाज्या निवडताना भाज्यांचे देठ बाजूला काढण्यास सांगितले जाते.
- ताक करणे
हा उपक्रम साधारणपणे होळीपौर्णिमेनंतर उन्हाळा सुरू झाल्यावर घेतला जातो. आदल्या दिवशी दूध पातेल्यात ओतून ते पातळ द्रव स्वरूपात आहे, हे मुलांना दाखवले जाते. नंतर त्यात विरजणासाठी थोडे दही घालून मिश्रण ढवळले जाते आणि ते पातेले झाकून गार पाण्यात ठेवण्यात येते. दुसरे दिवशी घट्ट दही तयार होते. या सर्व प्रक्रिया मुलांना दाखवण्यात येतात. नंतर दही रवीने घुसळून त्यात थोडे पाणी घालून ताक करण्यात येते. मुलांना घुसळण्याची क्रियाही शिकवली जाते. तद्नंतर, मीठ, साखर, हिंग घालून मुलांना ताक पिण्यास दिले जाते. हे सर्व करताना स्वच्छता काटेकोरपणे पाळण्यास शिकवले जाते.
- केर काढणे
जमिनीच्या एका चौकोनात कागदाचे तुकडे आणि काही टाकाऊ वस्तू टाकून केर व्यवस्थित काढून सुपलीत भरायला शिकवले जाते आणि मुलांकडून केर काढून घेतला जातो.
- भांडी घासणे
स्वतःचा डबा आणि पाणी पिण्याचे भांडे मुलांना घासून स्वच्छ करायला शिकवले जाते.
हेही वाचा – बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील जीवनव्यवहार शिक्षण
वरील सर्व कृतींची प्रात्यक्षिके मुलांना दाखविण्यात येतात आणि मुलांकडून या कृती करून घेतल्या जातात. या कृती वानगीदाखल दिल्या असून अशा अनेक आणि तत्सम गोष्टी मुलांना नक्कीच शिकवता येतील. साहजिकच, अशा प्रकारच्या सर्व उपक्रमांमुळे बालगटातील जीवनव्यवहार शिक्षणातून मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचा पाया मजबूत होतो.
पुढील लेखात आपण बालशाळेतील खेळ याबाबत जाणून घेणार आहोत.
नम्र निवेदन
गेल्या अकरा वर्षांपासून आम्ही उभयतां ‘निरामय आरोग्य संकल्पना’ यशस्वीरीत्या राबवत आहोत. असंख्य पुरुष आणि महिला साधकांनी संकल्पनेचा लाभ घेतला आहे. संकल्पना जाणून घेऊन लाभार्थी होण्यासाठी मोबाइल 9881943593 यावर 🙏/👌/👍 / 👏 / तत्सम चिन्हाने व्हॉट्सॲप मेसेज करून प्रतिसाद द्यावा.
हेही वाचा – बालशाळेतील अभ्यासक्रम : शिशुगटातील जीवनव्यवहार शिक्षण


