यावर्षी नागपूरच्या रेशीमबाग येथे भरलेल्या ‘महालक्ष्मी सरस’ या प्रदर्शनात जाण्याचा योग तीन वर्षांनी आला. तीन वर्षांपूर्वी मी अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथे ‘दत्तकृपा शेवई केंद्र’ चालवणाऱ्या हिराताई शेकोकार यांच्याकडून पालक शेवया आणि बिटरूट शेवया या प्रदर्शनात विकत घेतल्या होत्या. त्या वेळेस त्यांचे शेवयांमधील हे नाविन्यपूर्ण प्रकार मनाला भावले. त्यानंतर मागील दोन वर्षांपासून त्यांच्याकडून मी दोन-तीनदा या विविध प्रकारच्या शेवया आणि पापडा (जो विदर्भात प्रसिद्ध आहे) हिराताईंकडून ॲानलाइन विकत मागवला. आमचे हे सगळे व्यवहार कुरिअरद्वारे चालायचे. हिराताईंच्या व्हॅाट्सॲप नंबरवर मला हव्या असलेल्या पदार्थांची ॲार्डर टाकल्यावर लगेच चार ते पाच दिवसांत नागपूरला घरपोच हे वाळवणाचे पदार्थ मिळायचे. याशिवाय, बाकी आमच्यात तसे फारसे काही बोलणे व्हायचे नाही. परंतु यावेळी रेशीमबागेतील प्रदर्शनात गेल्यावर हिराताईंनी मला एवढ्या गर्दीतून बरोबर ओळखले आणि हाक मारून विचारले की, “ताई, मला ओळखलं का?” मीपण त्यांचा स्टॅाल शोधतच होते. त्यांना मला भेटून खूप आनंद झाला होता. त्यांच्या मुलाने आमचा दोघींचा फोटोपण काढला. त्यांच्यासोबत मला फोटो काढताना पाहून तेथील लोकांचे कुतूहल वाढले आणि हिराताईंनी त्यांना माझ्याबद्दल सांगितले की, त्यांच्याकडून घेतलेल्या शेवयांच्या या ताई रेसिपी करतात आणि त्या रेसिपींचे फोटो देखील हिराताईंनी मला, तिथे जमलेल्या लोकांना दाखवायला सांगितले. ते फोटो आणि त्यांच्या रेसिपीज् पाहून त्या दिवशी नक्कीच हिराताईंचा माल खपला असेल, कारण मी निघेस्तोवर त्यांच्या स्टॉलवर गर्दी बरीच वाढली होती….
हिराताईंच्या येथे पालक, बिटरूट शेवयांसोबत टोमॅटो शेवई, पाइनॅपल शेवई विक्रीला असतात. त्यापैकी मी पालक शेवया, बिटरूट शेवया आणि पाइनॅपल शेवया वापरल्या आहेत. बिटरूट आणि पाइनॅपल शेवयांची खीर केली तर, पालक शेवईचा उपमा केला होता… जो चविला उत्तम होतो. आता मला त्यांच्याकडील टोमॅटो शेवया वापरून पाहायला आवडेल. याशिवाय, त्यांच्याकडे विदर्भातील प्रसिद्ध वाळवणाचा पापडा हा प्रकार सुद्धा मिळतो जो नाश्त्याकरिता उत्तम पर्याय आहे!
हेही वाचा – आठवडी बाजारातील भातकं!
‘महालक्ष्मी सरस’ प्रदर्शन हे केवळ एक प्रदर्शन नसून महाराष्ट्रातील ग्रामीण अर्थव्यवस्था आणि महिला सक्षमीकरणाचा एक अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. महाराष्ट्र शासनाच्या ‘उमेद’मार्फत (महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान) आयोजित केले जाणारे हे प्रदर्शन ग्रामीण कारागिरांच्या कष्टाला हक्काची बाजारपेठ मिळवून देते. या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता गटांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे, हा आहे. गृहिणींना उद्योजिका बनवण्यामध्ये या प्रदर्शनाचा मोठा वाटा आहे. यामुळे महिलांच्या हातात थेट आर्थिक उत्पन्न येते, ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास आणि निर्णयक्षमता वाढते. शहरातील पैसा ग्रामीण भागात वळवण्याचे हे एक प्रभावी माध्यम आहे. मध्यस्थांची (Middlemen) साखळी मोडीत काढून, कारागिरांना त्यांच्या मालाचा योग्य मोबदला मिळतो. दरवर्षी कोट्यवधी रुपयांची उलाढाल या प्रदर्शनातून होते, जी ग्रामीण अर्थचक्राला गती देते.
या प्रदर्शनात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील दुर्मीळ हस्तकला, वारली चित्रकला, पैठणी, कोल्हापुरी चपला आणि मातीची भांडी पाहायला मिळतात. एवढेच नाही तर, या प्रदर्शनात धनगरी घोंगडी, ज्याला कांबळ देखील म्हटले जाते, तेपण येथे विक्रीस उपलब्ध होते. यंत्रयुगाच्या काळात या पारंपरिक कला टिकवून ठेवण्याचे आणि त्या नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे काम ‘महालक्ष्मी सरस’ करते. ग्रामीण महिलांना आपले उत्पादन शहरात कसे विकायचे, पॅकेजिंग कसे असावे आणि ग्राहकांच्या आवडीनिवडी काय आहेत, याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण या प्रदर्शनामुळे मिळते. अनेक बचत गटांच्या उत्पादनांना येथूनच ‘ब्रँड’ म्हणून ओळख मिळते.
महालक्ष्मी सरसचे खास आकर्षण म्हणजे तेथील खाद्यदालन! ज्वारीची भाकरी, पिठलं, झणझणीत नागपूरी सावजी मटण/ चिकन रस्सा, कोकणी मासे आणि पुरणपोळी यासारख्या अस्सल मराठमोळ्या पदार्थांची चव शहरवासीयांना एकाच छताखाली चाखायला मिळते. यावेळेस तर येथे कोकणातील प्रसिद्ध पातोळ्या, रस शिरवाळे, उकडीचे मोदक, सोलकढी यांचेपण स्टॅाल्स पहायला मिळाले. थोडक्यात सांगायचे झाले तर, ‘महालक्ष्मी सरस’ हे केवळ वस्तूंच्या खरेदी-विक्रीचे ठिकाण नसून, ते ग्रामीण महाराष्ट्राची संस्कृती, जिद्द आणि अस्मितेचे दर्शन घडवणारा एक मोठा उत्सव आहे. महालक्ष्मी सरस प्रदर्शनात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणारे गृहउद्योग हे केवळ व्यवसाय नसून त्या त्या भागाची संस्कृती आणि तिथल्या कष्टकरी महिलांच्या जिद्दीचे दर्शन आहे.
या प्रदर्शनाचा सर्वात मोठा आणि लोकप्रिय विभाग आहे, घरगुती आणि पारंपरिक पदार्थांच्या गृहउद्योगांचा! ज्यामधे कोल्हापुरी कांदा-लसूण मसाला, खान्देशी मसाला, कोकणी मालवणी मसाला आणि सोलापुरी शेंगदाणा चटणी, वायगांवची हळद, भिवापूरी मिर्चीचे तिखट, कांडप यंत्रावर केलेले विविध प्रकारचे मसाले, घरगुती पद्धतीने बनवलेले कैरी, लिंबू, मिरचीचे लोणचे आणि नाचणी, तांदूळ, बटाट्याचे पापड-कुरडया, मुगवड्या, कळण्याच्या वड्या वगैरे… शिवाय सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या डाळी, तांदूळ (उदा. आंबेमोहर, वाडा कोलम) आणि हातसडीचे तांदूळ इत्यादी. या प्रदर्शनामुळे अनेक छोटे गृहउद्योग आज मोठ्या ब्रँडमध्ये रूपांतरित झाले आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी महिलांनी गोळा केलेला शुद्ध मध आज शहरांमधील मोठ्या दुकानांपर्यंत पोहोचला आहे. कोकणातील महिला बचत गटांनी पॅकेजिंग सुधारल्यामुळे त्यांच्या सुक्या मासळीला मुंबई-पुण्यासारख्या शहरांत मोठी मागणी निर्माण झाली आहे. महत्त्वाची गोष्ट ही आहे की, या प्रदर्शनातील उत्पादने विकत घेताना आपण थेट एका ग्रामीण कुटुंबाला आणि त्यांच्या मेहनतीला पाठिंबा देत असतो. यातील बहुतांश उत्पादने ही रसायनमुक्त आणि नैसर्गिक असतात, जे आपल्या आरोग्यासाठीही उत्तम असतात. ग्रामीण भागातील महिलांना त्यांच्या गावात राहून ग्राहकांच्या नेमक्या आवडीनिवडी कळत नाहीत. या प्रदर्शनात हजारो शहरी ग्राहक येतात, त्यांच्याशी थेट संवाद साधल्यामुळे ग्राहकांना कोणत्या प्रकारची चव आवडते? कोणत्या रंगाच्या किंवा डिझाइनच्या वस्तूंना जास्त मागणी आहे? वस्तूंची किंमत किती असावी? हे सर्व थेट व्यावहारिक ज्ञान त्यांना मिळते.
मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या विक्रीमुळे महिलांना आर्थिक व्यवहारांचे व्यवस्थापन समजते. क्यूआर कोड (QR Code), गूगल पे किंवा कार्ड पेमेंट कसे वापरावे, याचे तंत्र त्या आत्मसात करतात. कच्चा माल, वाहतूक आणि स्टॉलचा खर्च वजा करून प्रत्यक्ष नफा कसा मोजावा, याचे शिक्षण त्यांना मिळते. जेव्हा एखादी ग्रामीण महिला आपल्या हाताने बनवलेली वस्तू मोठ्या आत्मविश्वासाने शहरी ग्राहकाला विकते, तेव्हा तिचा आत्मविश्वास कैक पटीने वाढतो. संवाद कौशल्य सुधारल्यामुळे त्या केवळ कारागीर न राहता एक ‘व्यावसायिक’ म्हणून घडू लागतात. महालक्ष्मी सरस प्रदर्शनात सहभागी होणे, ही ग्रामीण महिला बचत गटांसाठी एक मोठी संधी असते. याची नोंदणी प्रक्रिया ही मुख्यत्वे ‘उमेद’अंतर्गत (महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान) राबवली जाते.
हेही वाचा – दहा पैशाला एक ‘सिंगल’!
‘महालक्ष्मी सरस’ या प्रदर्शनात यावेळेस मला कोकणातील एका महिला उद्योजिका सीमा कदम यांच्याशी संवाद साधता आला. सीमा कदम या रत्नागिरीतून आलेल्या होत्या. जसे हिराताईंच्या विविध शेवयांनी मला भुरळ पाडली होती, तशी सीमा कदम यांच्या कांडप यंत्रावर तयार केलेल्या गोडा मसाला, मालवणी मसाला, गरम मसाला, फिशफ्राय आणि करी मसाला, चिकन तसेच मटण मसाला, ताजे रसरशीत ओलसर कोकम, कोकमाचे आगळ, कोकम सरबत, टपोरा काजू इत्यादी गोष्टींनी मोहात पाडले आणि त्या मी विकतही घेतल्या. आता त्यांचा एकदा आस्वाद घेतला की, मग सीमाताईंचे कौतुक करायला, त्यांची विविध उत्पादने खरेदी करायला आणि त्यांना भेटायला – जेव्हा केव्हा हे प्रदर्शन नागपुरात भरेल, तेव्हा आवर्जून त्यांच्या स्टॉलवर जाईन हे निश्चित! अचलपूरच्या हिराताई शेकोकार आणि रत्नागिरीच्या सीमाताई कदम यांचे नाव त्यांच्या उत्पादनांमुळे माझ्या कायम स्मरणात राहील! महालक्ष्मी सरस या प्रदर्शनातील या दोन महिला उद्योजकांशी माझे चांगले सूर जुळले आहेत! आपण सर्वजण जेव्हा अशा प्रदर्शनांना भेट देतो आणि तिथून काही खरेदी करतो, तेव्हा आपण नकळतपणे एका ग्रामीण कुटुंबाच्या स्वावलंबनाचा आधार बनत असतो. चला तर मग, या आपल्या मातीतील या अस्सल कौशल्याचा अभिमानाने स्वीकार करूया!


