सार्थ ज्ञानेश्वरी
अध्याय दहावा
महर्षीं आणि या देवां । येरां भूतजातां सर्वां । मी आदि म्हणोनि पांडवा । जाणतां अवघड ॥68॥ उतरलें उदक पर्वत वळघे । कां वाढतें झाड मुळीं लागे । तरी मियां जालेनि जगें । जाणिजे मी ॥69॥ का गाभेवनें वटु गिंवसवे । तरंगीं सागरु सांठवे । कां परमाणूमाजीं सामावे । भूगोलु हा ॥70॥ तरी मियां जालियां जीवां । महर्षीं अथवा देवां । मातें जाणावया होआवा । अवकाशु गा ॥71॥ ऐसाही जरी विपायें । सांडुनि पुढील पाये । सर्वेंद्रियांसि होये । पाठिमोरा जो ॥72॥ प्रवर्तलाही वेगीं बहुडे । देह सांडुनि मागलीकडे । महाभूतांचिया चढे । माथयावरी ॥73॥
यो मामजमनादिं च वेत्ति लोकमहेश्वरम् । असंमूढः स मर्त्येषु सर्वपापैः प्रमुच्यते ॥3॥
तैसा राहोनि ठायठिके । स्वप्रकाशें चोखें । अजत्व माझें देखे । आपुलिये डोळां ॥74॥ मी आदीसि परु । सकळलोकमहेश्वरु । ऐसिया मातें जो नरु । यापरी जाणे ॥75॥ तो पाषाणांमाजि परिसु । रसांमाजी सिद्धरसु । तैसा मनुष्याकृति अंशु । तो माझाचि जाण ॥76॥ तो चालतें ज्ञानाचें बिंब । तयाचे अवयव ते सुखाचे कोंभ । परी माणुसपणाची भांब । लोकाचि भागु ॥77॥ अगा अवचिता कापुरा- । माजीं सांपडला हिरा । वरि पडलिया नीरा । न निगे केवीं ॥78॥ तैसा मनुष्यलोकाआंतु । तो जरी जाहला प्राकृतु । तऱ्ही प्रकृतिदोषाची मातु । नेणिजे तेथ ॥79॥ तो आपसयेंचि सांडिजे पापीं । जैसा जळत चंदनु सर्पीं । तैसा मातें जाणे तो संकल्पीं । वर्जूनि घालिजे ॥80॥
हेही वाचा – Dnyaneshwari : घटीं थोडेसें उदक घालिजे, तेणें न गळे तरी वरिता भरिजे…
अर्थ
मोठाले ऋषी आणि देव यांना आणि दुसरे जेवढे म्हणून प्राणी आहेत त्या सर्वांना मीच कारण आहे. म्हणून अर्जुना, मला जाणणे, त्यांना कठीण आहे. ॥68॥ पर्वतावरून खाली आलेले पाणी जर पुन्हा पर्वतावर चढेल, अथवा वाढणारे झाड शेंड्याकडून मुळाकडे येईल, तर माझ्यापासून झालेल्या जगाकडून मी जाणला जाईन. ॥69॥ अथवा वडाच्या सूक्ष्म अंकुरात जर वडाचे विस्तीर्ण झाड सापडले जाईल अथवा लाटेमध्ये जर समुद्र साठवला जाईल अथवा ही पृथ्वी जर परमाणूत सापडली जाईल, ॥70॥ असे होईल तर अर्जुना, माझ्यापासून उत्पन्न झालेल्या प्राण्यांना, महर्षींना अथवा देवांना माझी ओळख होण्याचा योग आहे. ॥71॥ असा जरी मी जाणण्याला कठीण आहे, तरी कदाचित जो कोणी बाह्य वृत्ती टाकून (देहादी अनात्म तत्वांकडे जाणारी वृत्ती काढून) सर्व इंद्रियांकडे पाठमोरा होतो (वृत्ती अंतर्मुख करतो). ॥72॥ देहादी अनात्म तत्वांकडे जरी त्याची प्रवृत्ती झाली तरी, तेथून वेगाने माघारी फिरतो; स्थूल, सूक्ष्म आणि कारण हे देह मागे टाकून (विचाराने यांचा निरास करून) पंचमहाभूतांच्याही माथ्यावर (जो) चढतो, (पंचमहाभूतांचा निरास करतो.) ॥73॥
जो मला जन्मरहित, अनादि आणि लोकमहेश्वर असे जाणतो, तो मानवांमध्ये ज्ञानी आहे आणि तो सर्व पापांपासून मुक्त होतो ॥3॥
याप्रमाणे चांगल्या रीतीने त्या ठिकाणी स्थिर राहून शुद्ध आत्मप्रकाशाच्या योगाने, आपल्या डोळ्यांनी (प्रत्यक्ष) माझे जन्मराहित्य (जो) जाणतो, ॥74॥ मी आरंभाच्या पलीकडील (अनादि) आहे आणि सर्व लोकांचा मुख्य ईश्वर आहे, अशा मला जो पुरुष याप्रमाणे जाणतो, ॥75॥ तो पुरुष पाषाणांमध्ये परीस जसा श्रेष्ठ किंवा सर्व रसांत अमृत जसे श्रेष्ठ, त्याप्रमाणे तो मनुष्याच्या आकाराने असलेला माझा (श्रेष्ठ) अंश आहे, असे समज. ॥76॥ तो ज्ञानाची चालती मूर्ती आहे, त्याचे अवयव ते सुखाला फुटलेले अंकुर आहेत, परंतु (त्याच्या ठिकाणी दिसणारा) माणूसपणा हा लोकांच्या दृष्टीला होणारा भ्रम आहे. ॥77॥ अर्जुना, हिरा जर अकस्मात कापरात सापडला आणि त्यावर जर पाणी पडले, तर त्या पाण्याकडून तो विरघळल्याशिवाय भिन्न असा बाहेर निराळा कसा पडणार नाही? (तर पडेल. हिरा कापरासारखा पाण्यात विरघळणार नाही.) ॥78॥ त्याप्रमाणे मनुष्यप्राण्यात जरी तो शरीरधारी दिसला, तरी पण त्याच्या ठिकाणी जन्ममृत्यू आदिकरून प्रकृतीदोषांची गोष्टही माहीत नसते. ॥79॥ त्या पुरुषाला आपोआपच पापे टाकून जातात. ज्याप्रमाणे आग लागलेल्या चंदनाच्या झाडाला वेढा घालून असलेले साप सोडून जातात, त्याप्रमाणे मला जो ओळखतो, तो संकल्पांकडून टाकला जातो. ॥80॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : मी कवण केतुला, कवणाचा कैं जाहला…


