Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    त्याचा फोन अन् तेच नेहमीचंच…

    March 19, 2026

    Dnyaneshwari : घटीं थोडेसें उदक घालिजे, तेणें न गळे तरी वरिता भरिजे…

    March 19, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 19 मार्च 2026

    March 18, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, March 19
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » त्याचा फोन अन् तेच नेहमीचंच…
    ललित

    त्याचा फोन अन् तेच नेहमीचंच…

    स्नेहा सुतारBy स्नेहा सुतारMarch 19, 2026No Comments6 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठी साहित्य, मराठी आर्टिकल, मी मराठी, अभिजात मराठी, मराठी कथा, मराठी लेख, मराठी लेखक, त्याचा फोन, प्रियकराचा फोन, प्रियकराचे फोनवर बडबड, प्रियकराकडून अपेक्षाभंग, प्रियकराचा मिस्ड कॉल, ती आणि तो, तिचे रागावणे, प्रेमकथा, गोव्याची प्रेमकथा,
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    अगरबत्तीचा मंद सुवास आणि सोबतच आईच्या पावलांचा आवाज… एकदम तिला प्रसन्न वाटलं. रात्र सरून पहाटेचा अंगणातला प्राजक्ताचा सडा… आंबोलीला कावळेसादला डोळे मिटून चेहऱ्यावर घेतलेले दवासारखे मऊसूत पावसाच्या थेंबांचे तुषार…  अंबाबाईच्या मंदिरात पहिल्या पावलाला मंदिराच्या पायरीचा झालेला थंडगार स्पर्श… संध्याकाळच्या वेळी आईचं देवघरातून असं बाहेर येणं… सोबत अगरबत्ती आणि हातात दिवा… ती मागे देवघरात सोडून आलेल्या धूप आणि भीमसेनी कापराचा मंद सुवास… हे सगळं रंध्रारंध्रांना एक एक करून जागं करणारं… दिवसभराची मरगळ कुठल्या कुठे पळवणारं… आईने दार उघडलं… दोघीही एकमेकींना बघून हसल्या… आईचं स्तवन सुरू असल्यामुळे काही न बोलताच तिने तिला आत जायला वाट केली.

    घरी आल्यावर तिला आता बरं वाटलं. हॅण्डबॅग आपल्या रूममध्ये ठेऊन, दुपट्टा हुकला लावून, हातातलं घड्याळ, बांगड्या तिने टेबलवरच्या बॉक्समध्ये ठेवल्या. टॉवेल आणि बदलायचे कपडे घेऊन ती वॉश घ्यायला बाथरूममध्ये गेली. बाहेर येते तोवर आई चहाचं आधण ठेऊन किचन कट्ट्याशी उभी होती. बाथरूमच्या दाराचा आवाज झाल्यावर आईने प्रश्न केला,

    “कशी झाली आजची मीटिंग? कोण होतं आज? टीचर आलेल्या का?”

    “होय अगं, आलेल्या टीचर. त्यांना मीटिंग झाल्यावर अजून कुठे कार्यक्रम होता म्हणून त्या परस्पर गेल्या चहानंतर कार्यक्रमाला. कंटाळा आला गं… बसमध्ये चिक्कार गर्दी बघ.”

    हेही वाचा – स्वप्नं आणि प्रवास

    “हो, कळलं ते मला तोंडावरूनच! ये पटकन चहा झालाय. खायला काय देऊ? चकली आहे बघ… की चपाती देऊ दुपारची? रोल करून बुडवून खा चहात.”

    “अंSSS… दे चपातीच. एक चकली पण दे.”

    आईने प्लेटमध्ये चपाती आणि एक चकली ठेवली. तिने ती प्लेट घेतली आणि एका हातात चहाचा पेला घेऊन तिने तो डायनिंग टेबलवर ठेवला. हातातली प्लेट पण ठेवली आणि खुर्चीवर मांडी घालून बसली. चपातीचा रोल करून तिने चहात बुडवला आणि चपाती छान चहात भिजून जाईपर्यंत तशीच त्यात धरून राहिली. आईचं काय काय सुरूच होतं. दुपारपासून काय झालं, बाजूच्या काकूंनी आज तिच्या भाजीला काय म्हटलं, कुमार आंटीनी वाटीतून कसलीशी मिठाई आणलेली ती कशी होती, तिच्यासाठी ठेवलीये, आज बाबा मधल्या वेळात ऑफिसमधून आलेले, चहाची हुक्की आली म्हणून… काय काय चालूच! ती चपातीकडे बघत हं… हं… करत बसली.

    “अगं नुसतं हूं हूं काय करतेयस. मी काय बोलतेय ते जातंय तरी का डोक्यात?”

    “अगं ऐकतेय गं… ऐकतेय मी! हं काय म्हटली आंटी? दूध अच्छा नहीं मिलता हैं? मग जा म्हणावं गावात, नाहीतर म्हैस घेऊन ये एक. खाली बांधायची पार्किंगमध्ये. येता जाता हवं त्यांनी चारा घाला म्हणून चारा ठेवायचा सिक्युरिटी काकांच्या केबिनमध्ये…”

    “काहीतरीच!!!” म्हणून आईने हसून भाजीचं पातेलं उचलून गॅसवर गरम करायला ठेवलं. भाजी ढवळत आई पुन्हा दिवसभरातल्या गोष्टी तिला सांगू लागली…

    “उस में ऐसे नहीं डालने का… वो थोडा थोडा डालके ढवळते रेहने का ऐसे ऐसे… मी सांगितलं हिला एक आणि हिने केलं एक की गं! बेसनमध्ये घातलं एवढं लोटाभर तूप!!! झाली बिरबिरीत कॅडबरी त्याची. मग आली माझ्याकडे भाभी जरा आके देखो. भाभीको काय कामं आहेत? गेली भाभी निस्तरायला!”

    “शक्तिमान आहेस तू तिची गं… अजून कुणाकडे जाणार ती. बघू काय केलंय ते?” म्हणून तिने आईकडून वाटी मागून घेतली. तीच कुमार आंटीने दिलेली… बेसन बर्फी. तिने जरासा तुकडा मोडून घेतला आणि तोंडात टाकला. डोळे झाकून घेतले आणि ती तो तुकडा जिभेवर ठेऊन त्यात विरघळून घेली. तुपाचा छान फ्लेवर चढलेली बेसनची बर्फी विरघळत गेली… आहाहाहा!

    “छान झालीये गं आई… तुझा हात लागलाय ना… म्हणजे होणारच ती!”

    “अगं, जरा अजून वेलची डालो म्हटलं… आणि ते तूप नाही का बघ कसं लागतंय प्रत्येक कणाला. चांगलं ढवळत रहो म्हटलं… फोन वाजतोय बघ गं तुझा? सायलंटवर आहे का? घुरघुरतोयसा?”

    होय. फोन वाजत होता. मीटिंगमध्ये सायलंटवर ठेवलेला फोन तसाच राहिला. तिला आठवणच नव्हती. तिने रूममध्ये जाऊन फोन बघितला. त्याचाच फोन होता. ती खिडकीजवळ आली आणि खिडकीत बसली. फोन उचलला.

    “अगं आहेस कुठे? कुठे गायब?”

    घ्या… चोराच्या उलट्या बोंबा!

    “आहे रे इथेच, ही काय!”

    “अरे आहे इथेच म्हणजे फोनबिन बघायचा की नाही? किती कॉल केले तुला?”

    “कधी??”

    “हे काय आताच!”

    तिने फोनवर बघितलं. एक मिस कॉल पडलेला होता.

    “अरे हो की रे! बापरे!!! किती मिसकॉल्स!!”

    “गप नौटंकी! काय चाललंय? आज अगं जरा ऑफिसचं काम संपलं तसं जरा मॉलमध्ये जाऊन आलो. तुझी आठवण आली तिथे एक शर्ट बघून. तुला आवडतो ना पिवळा शर्ट तो माझा… तसाच होता एक. घेऊन आलो. मस्त आहे कॉटनचा. थंड थंड लागतो अंगाला असा. येताना अगं तुला सांगतो ट्रॅफिक जाम. पुण्याची संध्याकाळ म्हणजे अजून काय मिळणार नशिबात? हा आता येतोय बघ फ्लॅटकडे. पोहोचत आलो…”

    “हं…”

    “अगं तुला सांगतो आज जो फिरलोय ना सकाळपासून. ऑफिसला पण उशिराच गेलेलो. आज जसं म्हटलं त्या साळवेना भेटून येऊयात. पुस्तकं ठेवलेली त्यांनी. तिथे गेलो तर सोडेचनात. त्यांच्या मिसेस म्हटल्या डोसे केलेयत खाऊन जा. मग काय, आग्रह मोडवेना. मग आलो ऑफिसला तर आज पावसामुळे तसं रटाळच चाललेलं सगळं. त्यात आज मिश्रा नाही. सगळी जबाबदारी माझ्यावर. मग म्हटलं चला लेकोहो, तुम भी क्या याद रखोगे. पाऊस थांबेना, तर चला म्हटलं लवकर. आलो मग मी पण. लवकर आलो तर म्हटलं मॉलला जाऊयात. बाकी तू काय केलंस आज दिवसभर?”

    “अरे मी पण नव्हते ना घरी. काल नाही का सांगितलं मीटिंग आहे आज पणजीत. तिकडेच होते. आले मघाशीच. चहा वैगेरे घेतला. बोलत बसलेले आईसोबत.”

    “कशी आहे गं आई? बाबा आले का?”

    “आहे रे, बरीय. बाबा नाही अजून आले. येतील आता.”

    “बरं ऐक ना, मी करतो हा तुला कॉल एक दहा मिनिटांत. गाडी पार्क करतो, घरात जातो. आवरून करतो तुला. बोलू आपण.”

    “ओके. चालेल. कर हा फोन. मी वाट बघतेय.”

    “हो चल…”

    फोन ठेवल्यावर ती तशीच बसून राहिली. असा काय हा माणूस???? मी रागावलेले… ते कुठे गेलं? काहीच झालं नाही असं सगळं!! मी आहे तरी की नाही याच्या खिजगणतीत??? येडाय का हा? माणसात तरी आहे की नाही? की दगड आहे? अरे मी इकडे तळमळतेय न बोलता हा झोपून गेलाय, दुसऱ्या दिवशी जाब विचारल्यावर. Sorry बोललाय. तरी मी ऐकलं नाही काही, कारण रोज रोज हेच असतंय आणि आता फोन करून पुन्हा आहेस कुठे एवढे कॉल केले????? जणू काहीच झालं नाही. अरे, जरा बघावं माणसाचं काय झालंय, काय चाललंय… याच्या लेखी मी एवढी रात्रभर वाट बघत राहिले, दुसऱ्या दिवशी माझी चिडचिड झाली, मला वाईट वाटलं, मला दुखलं, तरीही मी दिवसभर याची वाट पाहतेय की, हा येईल बोलायला वाईट वाटून, याचा फोन नाही, मेसेज नाही… ए काय गं, असा काय तो मेसेज… आणि मला आता एक मिस कॉल पडल्यावर तुला किती फोन केले??? हा माणसात नाहीच आहे गडी!

    हेही वाचा – घरी येताना आठवली लीला अन् पूजाची कहाणी!

    खिडकीतून उठून तिने याचा विचारच करायचा नाही आता, असं ठरवलं. इतक्यात दारावर टकटक ऐकू आली. ती दार उघडायला गेली, तर खिडकीतून बाबा आलेले दिसले. हसून तिने दार उघडलं.

    “अरे, तू कधी आलीस?”

    “मघाशीच. झालं काम काकांकडचं? फॉर्म झाला भरून? की आजपण सर्व्हर डाऊन?”

    “अगं नाही, झालं झालं आज काम. कंटाळलो बघ तीन दिवस फॉर्मच भरतोय त्यांचा. या सरकारी योजना आणि बिजना… कागदोपत्री हातोहात व्हायच्या तेच बरं होतं. ऑनलाइन केलंय तर, नीट सर्व्हर नाही, नेटवर्क नाही, साइट खराब… असलंच एकेक! तारीख संपायच्या आधी झालं ते बरं. नशीब म्हणायचं दिन्याचं आणि माझं पण! नाहीतर हल्ली रोज ऑफिस झालं की, ड्युटी लागल्यासारखं दिन्याकडे जात होतो.”

    “होय हो बाबा चालायचं. झालं ना काम. काकांना म्हणावं आता वाट बघत बसा पुढचा मेसेज येण्याची… येईल चार-पाच दिवसांत. मग पुढची प्रोसेस. चला, आवरा तुम्ही. मी बसते जरा वाचत.” असं म्हणून ती आपल्या बेडरूममध्ये गेली. मोबाइल चार्जिंगला लावून तिने ब्लूटूथ स्पीकर ऑन केला. मोबाइल आपोआप कनेक्ट झाला. तिने प्लेलिस्ट काढली. तिला आज शांत शांत व्हायचं होतं. गाण्यांचे कसलेच अर्थ नकोत कळायला, कसलेच शब्द नकोत कळायला. कुणीतरी सोबत असावं, जे गात रहावं. आपल्यासाठी… माझ्यासाठी… आम्हा दोघांसाठी गाणारं… बस!!! साऊथची प्लेलिस्ट… तिने सरळ प्ले टॅप केलं आणि मोबाइल बाजूला ठेऊन पुस्तक हातात घेतलं. गाणं सुरू झालेलं…

    न्याबगम… मौदैदी मनम येंगदी…

    अर्थ नकळता… शब्द न कळता… फक्त आत काहीतरी सुखावह वाटतं होतं… शांत… मन शांत करणारं… अगदीच शांत…  नदीच्या शांत पात्रासारखं निश्चल…

    न्याबगम… वरगदी उल तविकदे…

    क्रमश:


     

    स्नेहा सुतार

    Related Posts

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026 ललित

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026 ललित

    रामने शिवला थेटच विचारलं, ‘आरू का रडली?’

    March 16, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    By Team AvaantarMarch 16, 2026

    पराग गोडबोले दोन दिवस ऑफिसच्या कामानिमित्त पुण्यनगरीत होतो. पुण्याची आणि माझी नाळ तशी बालपणापासून जोडलेली,…

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    रामने शिवला थेटच विचारलं, ‘आरू का रडली?’

    March 16, 2026

    कॉलेज मैत्रीण छाया 52 वर्षांनी भेटली, पण…

    March 15, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    त्याचा फोन अन् तेच नेहमीचंच…

    March 19, 2026

    Dnyaneshwari : घटीं थोडेसें उदक घालिजे, तेणें न गळे तरी वरिता भरिजे…

    March 19, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 19 मार्च 2026

    March 18, 2026

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 241
    • अवांतर 171
    • आरोग्य 88
    • फिल्मी 43
    • फूड काॅर्नर 181
    • मैत्रीण 16
    • ललित 500
    • वास्तू आणि वेध 354
    • शैक्षणिक 72

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Advertise

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn