सुहास गोखले
(निवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अंमलीपदार्थ विरोधी कक्ष)
पुराणकथा वाचताना, पूर्वीच्या काळी ऋषीमुनी आपल्या शिष्यांसह जंगलात फिरताना दिशा आणि वेळेचा अंदाज येण्यासाठी आकाशस्थ नक्षत्रांचा वापर करण्याची पद्धत वापरली असेल, असा अंदाज येतो. या निमित्ताने त्यांनी आपल्या खगोलशास्त्राचा अभ्यास कथानिर्मितीसाठी केला असावा आणि त्यातूनच पुराणकथांचा जन्म झालेला असावा. गेल्या दोन लेखांत अश्विन, भरणी, कृत्तिका, रोहिणी, मृग आणि आद्रा या नक्षत्रांची माहिती पाहिली. आज आपण पुढच्या तीन नक्षत्रांची माहिती आणि पौराणिक कथा पाहुया.
पुनर्वसू : आर्द्रा नक्षत्राच्या थोडे पुढे पूर्वेकडे पाहिल्यास आपणास दोन ठळक तारे आढळतील. त्यांना पुनर्वसू असे म्हणतात. या नक्षत्राचे नाव जरी पुनर्वसू हे एकच असले तरी या नक्षत्रामध्ये दोन प्रमुख तारका आहेत. या दोन तारकांपैकी पूर्वेकडील ताऱ्यास ‘प्लक्ष’ तर पश्चिमेकडील ताऱ्यास ‘कश’ असे म्हणतात. आसपास जरी इतर अनेक तारे असले तरी, हे नक्षत्र त्याच्या जोडीवरून लगेच ओळखता येते.
एका वैदिक कथेनुसार पुनर्वसू हे असुर आहेत. यज्ञ करून अतिशक्तीशाली बनण्यासाठी त्यांनी एका यज्ञाचे आयोजन केले. साहजिकच, या यज्ञाला देवतांचा विरोध असणारच! यज्ञ सुरू होण्यापूर्वी इंद्र एका ब्राह्मणाच्या वेषात तेथे पोहचला. आपल्याजवळील सोन्याच्या विटांचा यज्ञामध्ये वापर केल्यास यज्ञाचे फळ चांगले असेल, असे ब्राह्मणाच्या वेषातील इंद्राने सांगितले. ठरल्यानुसार ती सोन्याची वीट यज्ञ कुंडात मांडण्यात आली आणि यज्ञ सुरू झाला. पण मधेच ब्राह्मणाने वीट परत मागितली.
हेही वाचा – अश्विन, भरणी, कृत्तिका… नक्षत्रांच्या पुराणकथा
देवांचा देव इंद्र याच्याकडे तपस्वींचा तपोभंग करण्याचे काम का असायचे, हे समजत नाही. आता या असुरांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला, कारण जर वीट यज्ञातून काढावी तर यज्ञ मोडणार होता. येथे तो ब्राह्मण देखील हट्टाला पेटला आणि कुणाच्या काही लक्षात येण्यापूर्वीच यज्ञातून ती वीट काढून घेतली आणि आकाशात भिरकावली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे कोणताही विचार न करता ते दोन असुर आकाशातली ती वीट पकडण्यासाठी धावले, पण ती वीट काही त्यांच्या हाती आली नाही. ती वीट म्हणजे चित्रा नक्षत्र आणि तिच्या मागोमाग धावणारे दोन असुर म्हणजेच पुनर्वसू.
पुष्य : सर्व नक्षत्रांमध्ये ठळक आणि ओळखता येणारे नक्षत्र म्हणजे मृग तर सर्वात अंधुक आणि ओळखण्यास त्रासदायक नक्षत्र म्हणजे पुष्य. हे नक्षत्र शोधण्यासाठी इतर नक्षत्रांची मदत घ्यावी लागते.
पुनर्वसूच्या थोड्या अंतरावर एक टपोरी चांदणी दिसते मघा! मघा आणि पुनर्वसू या दोन नक्षत्रांमध्ये एक धूसरसा तारकासमूह दिसतो. तरी देखील या नक्षत्रातील त्यातल्यात्यात ठळक चांदण्याकडे पाहिल्यास त्या त्रिकोणी आकारात आढळतात. हा समूह म्हणजेच पुष्य नक्षत्र. पुष्य नक्षत्रालाच प्राचीनकाळी ‘तिष्य’ असे नाव होते.
या नक्षत्रातील सर्व तारका अंधुक असल्यामुळे प्राचीनकाळी पुष्य नक्षत्रामध्ये गुरू आला असता गुरू हा ग्रह असल्याचे ओळखले. म्हणून गुरूचा जन्म पुष्य नक्षत्रामध्ये झाला, असे वेदात म्हटले आहे. तेव्हापासून गुरू ग्रहाचा आणि पुष्य नक्षत्राचा संबंध अशा प्रकारे जोडला जातो की, जर एखाद्या गुरुवारी गुरू ग्रह पुष्य नक्षत्रात आला तर, त्यास ‘गुरू पुष्य योग’ मानण्यात येतो. ‘गुरू पुष्य योग’ हा आपल्या येथे शुभ मुहूर्त मानण्यात येतो.
गुरुला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा करण्यास बारा वर्ष लागतात. म्हणजे बारा वर्षांनी गुरू पुष्य नक्षत्रात येतो. परंतु, आज चंद्र पुष्य नक्षत्रात आला आणि त्या दिवशी जर गुरुवार असेल तरी तो गुरू पुष्य योग मानला जातो. तथापि, या मुहूर्तावर लग्न लागत नाहीत.
हेही वाचा – नक्षत्र रोहिणी, मृग, आद्रा अन् पुराणकथा…!
अश्लेषा : पुष्य नक्षत्राच्या बाजूलाच पाच थोड्याशा फिकट चांदण्या दिसतात. या पाच तारकांच्या पंचकास आश्लेषा किंवा सर्प नक्षत्र म्हणतात. कल्पना केल्यास या पंचकाचा आकार सर्पाच्या फण्यासारखा दिसेल. त्यालाच आश्लेषा पंचक म्हणतात.
अनेक संस्कृतींमध्ये या नक्षत्राचा संबंध सर्पाबरोबर जोडलेला आहे. आकाशात या सर्पाची पूर्ण आकृती आश्लेषा नक्षत्रापासून सुरू होऊन हस्त नक्षत्रापर्यंत संपते. आकाशात या सर्पाने सुमारे 100 अंशाचा भाग व्यापलेला आहे.
आपल्या येथे त्या सर्पास ‘वासुकी’ असे म्हणतात तर, ग्रीक पुराणात त्याचे नाव ‘हायड्रा’ असे आढळते. इजिप्शियनांना या सर्पाचा आकार नदीसारखा वाटला म्हणून त्यांनी त्यास ‘स्वर्गीय नाइल’ असे नाव दिले.
(क्रमश:)