दर्शन कुलकर्णी
आज, भारतीय सौर : 1 आषाढ शके 1947
अर्थात,
दिनांक : 22 जून 2025, वार : रविवार, तिथि : द्वादशी 25:22, नक्षत्र : भरणी 17:38
योग : सुकर्मा 16:57, करण : कौलव 14:56
सूर्य : मिथुन, चंद्र : मेष 23:03, सूर्योदय : 06:01, सूर्यास्त : 19:18
पक्ष : कृष्ण, मास : ज्येष्ठ, ऋतू : ग्रीष्म, सूर्य अयन : दक्षिणायन
संवत्सर : विश्वावसू, शालिवाहन शक : 1947, विक्रम संवत : 2081, युगाब्द : 5127
योगिनी भागवत एकादशी
अयन करी दिन
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
हेही वाचा – गेले ते दिन गेले…
दिनविशेष
महानुभाव साहित्याचे संशोधक विष्णू कोलते
प्रसिद्ध मराठी ग्रंथकार आणि महानुभाव साहित्याचे साक्षेपी संशोधक तसेच संपादक, विष्णू भिकाजी कोलते यांचा जन्म 22 जून 1908 रोजी विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यात मलकापूर तालुक्यातील नरवेल गावी झाला. नागपूर विद्यापीठातून त्यांनी बी.ए. (1929) आणि एम. ए. (1931) केले. एम्. ए.च्या परीक्षेत मराठीत सर्वप्रथम आल्याबद्दल बेहरे पारितोषिक तसेच सर्व विषयांच्या विद्यार्थ्यांतील प्रथम क्रमांकाबद्दल मलक सुवर्णपद मिळाले. 1931 साली ते एलएलबी झाले. तेव्हापासून 1966मध्ये निवृत्त होईपर्यंत ते सरकारी महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक होते. 1948मध्ये महानुभाव पंथाच्या तत्त्वज्ञानासंबंधी लिहिलेल्या प्रबंधासाठी त्यांना डॉक्टरेट मिळाली. 1966 ते 1972 या काळात ते नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू होते. लव्हाळी हा त्यांचा काव्यसंग्रह 1933 साली प्रसिद्ध झाला. साहित्यसंचार (1965) आणि प्राचीन मराठी साहित्य संशोधन (1968) या ग्रंथांतून त्यांचे अनुक्रमे अर्वाचीन तसेच प्राचीन साहित्यासंबंधीचे स्फुटलेखन संकलित झालेले आहे. विदर्भ साहित्य संमेलनाच्या गोंदिया येथील अधिवेशनाचे (1948) आणि महाराष्ट्र साहित्य संमेलनाच्या भोपाळ येथील अधिवेशनाचे (1967) ते अध्यक्ष होते. 8 एप्रिल 1998 रोजी त्यांचे निधन झाले.
प्रसिद्ध मराठी-निर्माते दिग्दर्शक बाबूराव पेंढारकर
मराठी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते बाबूराव पेंढारकर यांचा जन्म 22 जून 1896 रोजी कोल्हापूरमध्ये झाला. बाबूरावांनी चित्रमहर्षी बाबूराव पेंटर यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या महाराष्ट्र फिल्म कंपनीमध्ये प्रवेश करत 1920 सालच्या सैरंध्री या पहिल्या मूकपटात विष्णूची लहानशी भूमिका करून अभिनयाचा श्रीगणेशा केला. त्यानंतर, सुरेखाहरण (1921), भक्त दामाजी (1922), वत्सलाहरण, सिंहगड’ (1923), कल्याण खजिना (1924) अशा मूकपटांच्या निर्मितीमध्ये बाबूरावांनी आपले सक्रिय योगदान दिले. कोल्हापुरात 1929मध्ये प्रभात फिल्म कंपनी स्थापन झाल्यावर बाबूराव पेंढारकर हे व्यवस्थापकपदी रुजू झाले. गोपाल कृष्ण (1929), राणी साहेबा अर्थात बजरबट्टू, खुनी खंजर, उदयकाल (193), ‘जुलूम’, ‘चंद्रसेना’ (1931) या मूकपटांच्या निर्मितीची बाजू त्यांनी सांभाळली. यातल्या बजरबट्टूमध्ये पेंढाकर यांनी खलनायकाची भूमिका साकारली होती. 45 वर्षांच्या कारकीर्दीमध्ये पेंढारकर यांच्या नावावर 7 मूकपट, 49 मराठी, 21 हिंदी चित्रपट आणि 5 नाटके आहेत. 9 नोव्हेंबर 1967 रोजी त्यांचे निधन झाले.
हेही वाचा – शाळेचा पहिला दिवस