Sunday, September 21, 2025

banner 468x60

Homeललितसदाफुली... आयुष्यातील सुख

सदाफुली… आयुष्यातील सुख

उमा सुहास काळे

काही गोष्टी या मुळी माणसांना आनंद देण्यासाठीच निर्माण झाल्या असाव्यात. त्यांच्या अस्तित्वाने मन प्रसन्न, प्रफुल्लित होत जातं. त्यांचं रंग, रूप वेगवेगळ्या पद्धतीनं सौंदर्यांची निरनिराळी परिभाषा ठरवीत असतं. याचं उत्तम उदाहरण म्हणजे रोज नित्य फुलणारी फुले.

टवटवीत फुले बघितली की, आपल्या चेहऱ्यावर आपोआप हास्य फुलतं… फुलांचा गुच्छ बघितला की, आपल्याला पण खूप ताजतवानं वाटतं. जर का तो फुलांचा ताटवा झाडावर फुलला असेल तर क्या कहना! तो ताटवा बघितला की, डोळ्यांना खूप सुखद समाधान लाभतं.

हेही वाचा – मालकी नव्हे, माणुसकी हवी…!

फुलांच नशीबही माणसांच्या नशिबासारखं असतं. काही फुलं देवाच्या चरणी विराजमान होतात, काही फुलदाणीत सजतात तर, काही अस्तित्व नसल्यासारखी फुलतात आणि झाडावरच सुकतात.

अशीच अस्तित्व नसलेली सदाफुलीची फुलं जणू माझ्याजवळ त्यांच्या अंतरंगातील व्यथा उलगडतात. सुंदर गुलाबी, जांभळा आणि पांढराशुभ्र असे मोहक रंग लाभून, कुठल्याही पोताची जमीन लाभून, कमीजास्त पाणी लाभले तरी न कुरकरता सदाफुली प्रसन्न हसत डवरते, बारमाही ताटवे फुलविते…. तरीही ना तिला देवाजवळ स्थान मिळतं ना फुलदाणीत.

अगदी क्षणभरासाठी उदास वाटलं, पण लगेच एक वाक्य आठवलं… “नजर बदला सगळं जग बदलेल”. त्या क्षणी जाणवलं, घरातील वयोवृद्ध माणूस तसा सगळ्या बाबींमधून निवृत्त झालेला असतो, पण तरीही त्याच फक्त अस्तित्व, त्याचा वावर आपल्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. त्याचा साधा सल्लाही आपल्यासाठी खूप महत्त्वपूर्ण असतो.

हेही वाचा – पुढे जायचं तर जुनं मागे टाकावंच लागेल!

त्याचप्रमाणे या सदाफुलीचे सुद्धा. ती आपले फुलणे सोडत नाही. खरंच, कर्मयोगी धीरोदात्त माणसांसारखं तिचं अस्तित्व मला तरी मोहवतं. आज ही सदाफुलीची आठवायचे कारण म्हणजे अलीकडेच राहुल लाळे सरांच्या सदाफुलीबद्दल लिहिलेल्या चार ओळी खूप आवडल्या. त्या खालीलप्रमाणे –

माळेत वाहिली नाही
वेणीत माळली नाही
गुच्छात गुंफली नाही
कुणी हुंगली नाही
तरी…
डोलणं सोडत नाही
फुलणं थांबत नाही
हसताना थकत नाही…

खरंच, माणसाने हेच शिकावे आणि वागावे, आचरणात आणावे, तेव्हा सुख म्हणजे नेमकं काय, याची अनुभूती नक्कीच येईल.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!