Saturday, August 2, 2025

banner 468x60

Homeललितखुलला मुखचंद्रमा...

खुलला मुखचंद्रमा…

प्रमोद मनोहर जोशी

पुराणकाळापासून ते आज तागायत स्त्रीला नटण्याचं आणि आरशात आपली प्रतिमा न्याहाळण्याचं वेड आहे .आज माझी याच विषयावरची कविता आहे.

सजून धजून बघते मी गं
आरशात प्रतिमा
बिंब पाहूनी प्रतिबिंबित ते
खुलला मुखचंद्रमा II धृ II

श्रावणसरीच्या शतधारांनी
सचैल मुक्त नाहले
ऊन हळदीचे उटणे म्हणूनी
सर्वांगी लाविले
उजळून आले जसा घनतमी
बहरून ये चंद्रमा

बिंब पाहूनी प्रतिबिंबित ते
खुलला मुखचंद्रमा II1II

नितळ मुलायम मुखकमलावरी
लेप चंदनी दिला
सौभाग्याचे लेणे भाळी
सिंदूर तो लाविला
आणि कपाळी हळूच लाविली
चंद्रकोर कुंकुमा

बिंब पाहूनी प्रतिबिंबित ते
खुलला मुखचंद्रमा। II2II

तलम रेशमी कचपाशाची
वेणी तिपेडी रुळे
हळूच त्यावरी हसूनी बघती
निशिगंधाची फुले
गजऱ्यावर त्या नजरा होती
कित्येकांच्या जमा

बिंब पाहूनी प्रतिबिंबित ते
खुलला मुखचंद्रमा II3II

सतेज सुंदर कमलनयनी त्या
कज्जल रेख दिली
ओठांवरती हळूच फिरविली
थोडीशी लाली
हलती डुलती कर्णफुलेही
वाढविती मधुरीमा

बिंब पाहूनी प्रतिबिंबित ते
खुलला मुखचंद्रमा II4II

मेंदी भरल्या हाती सजला
हिरवा बिल्वर चुडा
पैठणी नेसून ल्याले पैंजण
अंगठीत तांबूस खडा
नाकामधली नथ ही सांगते
मीच खरी सुषमा

बिंब पाहूनी प्रतिबिंबित ते
खुलला मुखचंद्रमा II5II

आता पाहते वाट प्रियाची
आतुरतेने अशी
रुपगर्विता आसुसले मी
त्याच्या स्पर्शासी
हळूच हृदयी धरूनी मला तो
म्हणेल मग “प्रियतमा”

बिंब पाहूनी प्रतिबिंबित ते
खुलला मुखचंद्रमा II6II


मोबाइल – 9422775554 / 8830117926

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!