Saturday, August 2, 2025

banner 468x60

Homeललितआपल्यातले गुण ओळखून ते वाढवा

आपल्यातले गुण ओळखून ते वाढवा

यश:श्री

प्रसिद्ध साहित्यिका दुर्गा भागवत यांनी, माणसाबद्दल एक छान मत मांडलं आहे. त्या म्हणतात – ‘माणूस मागे का पडतो? कारण तो मनात स्वतःला कमी समजत असतो म्हणून! परंतु प्रत्येकात काहीना काही तरी, विशेष असतो, तो विशेष जर जोपासला तर तो पुढे जातो. नाही तर, आपल्या देशात एवढे मोठे पुढारी झाले नसते. पण हा विशेष अतिशय कौशल्यानं जोपासला पाहिजे. हे कौशल्य जातीनिहाय होतं. म्हणून वेगवेगळ्या कारागिरांचे संच प्रत्येक देशात निर्माण झाले. आपला देश प्राचीन असल्यानं जातीभेदाला वेगळा आकार आला आणि त्याच्याविरुद्ध इथल्याच लोकांनी सुधारणा घडवून आणल्या. या सुधारणा घडविणारे सगळ्या जातीतले लोक होते.’

महाराष्ट्राचा इतिहास हा सुधारणावाद्यांचाच आहे. अगदी छत्रपती शिवाजी महाराजांपासून भारताचे घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापर्यंत. दुर्गाबाईंनी म्हटलंच आहे, ‘मागास जातीत जन्मलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं उदाहरण लक्षात घेण्यासारखं आहे. त्यांच्या लहानपणी कुणाही ज्योतिषानं सांगितलं नव्हतं की, हा मुलगा मोठेपणी देशाचा नेता होणार आहे. आपल्यातले गुण ओळखावे आणि ते वाढवावेत. पण त्याचबरोबर दुसऱ्यामध्ये जे कसब आहे त्यालाही मान दिला पाहिजे.’

यंदाच्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कारासाठी शिल्पकार राम सुतार यांना जाहीर करून, याचीच प्रचिती दिली आहे. नुकतीच वयाची शंभरी पूर्ण करणाऱ्या राम सुतार यांनी जगातील सर्वात उंच पुतळा, ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’चे (182 मीटर उंच) डिझाइन तयार केले आहे. एवढेच नव्हे तर, मुंबईतील इंदू मिल येथे उभे राहात असलेल्या आंबेडकर स्मारकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार होत आहे. अशा रीतीने विविध कलांची जोपासना करणारे राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख आहेच.

चिखलाचे गोळे करून तिला आकार देणाऱ्या कुंभाराची ‘विश्वकर्म्या’शी बरोबरी केली जाते. तसंच, आपल्या परिश्रमाने काळ्या मातीच्या कुशीत धान्य पिकविणाऱ्या शेतकऱ्याला जगाचा ‘अन्नदाता’ म्हटलं जातं. ही कामं अगदी शेवटपर्यंत चालणारी आहेत. हे कसब त्यांच्या वंशानं हाती घेतलेल्या कामांवरून सिद्ध होतात, असे दुर्गाबाई सांगत.

देशात पारंपरिक अस्मिता आहे. तिची वृद्धी करून आपलीही प्रगती करून घ्यायची, ही सवय प्रत्येक माणसानं लावून घेतली, तर प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रात यशस्वी ठरू शकतो. बैलगाडीचं चाक पहिलं बनविलं गेलं नसतं, तर भगवान विष्णूच्या चक्राचा महिमा कळला नसता. आतासुध्दा चक्राचं महत्त्व कमी झालेलं नाही. अगदी मोटारीपासून विमानापर्यंत सर्वांना चाकं असतात. ‘चक्र’ ही मानवी संस्कृतीची पहिली देणगी आहे, असे दुर्गाबाई भागवत यांनी एका लेखात म्हटलं आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!