डॉ. अस्मिता हवालदार
‘महाभारत’ इतके भुरळ घालणारे आहे की, त्यावर भरपूर लेखन झालेलं आहे. लेखनच का प्रत्येक कलाविष्कार, मग शिल्प असो, चित्र असो, नाटक असो, कविता असो… विपुल प्रमाणात निर्माण झालं आणि अनेक भाषांतून भाषांतरित सुद्धा झालं. इरावती कर्वे यांनी लिहिलेलं महाभारत वेगळं आहे, कारण त्यात प्रत्येक व्यक्तिरेखेचा ऊहापोह केला आहे… तोही प्रांजळ, पूर्वग्रह न ठेवता! कोणाचेही उदात्तीकरण करून किंवा दैवत्व बहाल करून नाही. प्रत्येक व्यक्तिरेखेला माणूस मानून त्याच्या गुणदोषांचं, काव्यातल्या स्थानाचं वर्णन केलेलं दिसतं. त्यामुळे परिपूर्ण कोणीच नाही, सर्वांना चुकण्याचा अधिकार आहे, सर्वांच्यात मानवी गुण आहेत हे अधोरेखित होतं. ही कादंबरी नाही; त्यामुळे जे लिहिलं आहे, ते तत्थ्यांवर आधारित आहे. भांडारकर संस्थेच्या महाभारताच्या चिकित्सित (क्रिटीकल) आवृत्तीला प्रमाण मानून लिहिले आहे. महाभारतावरच्या कादंबऱ्या वाचून जी मते तयार झाली आहेत, ती पुसून कोऱ्या मनाने हे पुस्तक वाचायला हवे.
यात विदुर, कुंती, कर्ण, भीष्म, गांधारी, कृष्ण, पाच पांडव, द्रौपदी अशा प्रत्येक पात्रांवर वेगवेगळे निबंध आहेत. त्यांच्या सूक्ष्म निरीक्षणातून निष्कर्ष काढले आहेत, त्यामुळे वाचताना ‘हे आधी कसं लक्षात नाही आलं?’ असं किती तरी वेळा वाटत राहतं. लहानपणापासून असंख्य वेळा ही कथा ऐकली वाचली असेल, पण तिचं तेज, सौंदर्य या लेखनातून समजतं.
महाभारताच्या कथेची सुरुवात शांतनू राजाचे पिता प्रपतीपासून सुरू होते. शांतनू आणि गंगेचा विवाह, अष्टवसू, भीष्माचा जन्म, गंगेचे निघून जाणे, सत्यवती या प्रसंगांबद्दल सांगितल्यावर भीष्माच्या प्रतिज्ञेबद्दल लेखिका लिहिते, ‘प्रतिज्ञा केल्याने काय साधले? हस्तिनापूरचे कल्याण झाले का? हस्तिनापुराची रक्षा करणे हे त्याचा स्वधर्म होता. त्याच्या आड प्रतिज्ञा आली, ते सर्वात दुर्दैवी होतं. कारण जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात त्याला हार मानावी लागली. संपूर्ण आयुष्य इतरांसाठी जगताना तो असहाय्य, विवश झालेला दिसतो.’
विदुर आणि धर्म यांच्यात असलेला जिव्हाळा लेखिकेचे लक्ष वेधून घेतो. हे दोघे पितापुत्र तर, नव्हते न, अशी शंका येते. त्यासाठी त्यांनी काही पुरावे दिले आहेत. विदुर सर्वात योग्य असूनही त्याला राजा होता आले नाही, कारण तो दासीपुत्र होता. पण तो कुंतीचा धाकटा दीर होता. त्यावेळच्या नियमांप्रमाणे धाकट्या दीराकडून नियोग करून घेता येत असे. त्यामुळे धर्म विदुराचा पुत्र असू शकतो…, असा तर्क त्यांनी दिला आहे.
कुंतीने राणीपद फार कमी उपभोगले. विधवा कुंती आपल्या मोठ्या दीराकडे पाच मुलांना घेऊन आश्रयाला आली होती. त्यामुळे द्रौपदी विवाह होऊन येईपर्यंत तिची अवस्था दीनवाणी होती. तिच्या मुलांना समाजाने मान्यता दिली, हे तिचे मोठे सुख होते. ‘द्रौपदी तिघांनी वाटून घ्या’, असे म्हणू शकली असती, पण माद्रीबद्दल तिला कितीही मत्सर वाटत असला तरी तिच्या मुलांना तिने आपली मुले मानल्याने ‘पाच जणांच्यात वाटून घ्या’, असे ती म्हणाली. तिच्या या वर्तनामुळे पाच जण कायम एकत्र राहिले. युयुत्सु, कौरवांचा सावत्र भाऊ पांडवांना येऊन मिळाला, तसे पांडवांच्या बाबतीत झाले नाही ते याचमुळे. ‘माद्री ‘रती मती गती’मध्ये कुंतीपेक्षा श्रेष्ठ होती. कुंतीचा सवती मत्सर आणि सावत्र मुलांवरचे प्रेम, मुलांना हक्क मिळवून देण्यासाठी लढायला प्रवृत्त करणे, कर्णाला युद्धाआधी भेटायला जाणे आणि नंतर मोठ्या दीराची सेवा करण्यासाठी सर्व सुखांचा त्याग करून वानप्रस्थाला जाणे… असे बरे वाईट मानवी गुण लेखिकेने दाखवले आहेत.
कर्ण एकच प्रश्नाचे उत्तर शोधत होता – ‘मी कोण?’ त्याला माहीत होते की, तो जन्माने क्षत्रिय आहे, पण त्याचा सांभाळ सूतांनी केल्यामुळे तो सूतपुत्र मानला गेला. त्याला कोणी क्षत्रिय मानले नाही… अगदी दुर्योधनाने सुद्धा! दुर्योधन त्याला मित्र म्हणत असे, पण नाते स्वामी-सेवकाचे होते. कर्णाला जेव्हा समजले की, तो कुंतीपुत्र आहे, तेव्हा खूप उशीर झाला होता. कर्णाचे चरित्र प्रांजळपणे, पारदर्शी लिहिले आहे. त्यामुळे कर्ण नायक किंवा खलनायक न वाटता माणूस वाटू लागतो. नंतर निर्माण झालेल्या साहित्यात कर्णाची व्यक्तिरेखा ‘सर्वगुणसंपन्न नायक’ अशी असली तरी मूळ महाभारतातले वास्तव वेगळे आहे.
हेही वाचा – परतवारी… ही देखील ऐश्वर्यवारीच!
द्रोणाचार्य जितके पांडवांचे गुरू होते, तितकेच अश्वत्थाम्याचे पिता होते आणि कौरवांचे सेनापती होते. द्रुपदावर सूड उगवणारे आणि सभेत पांडवांची बाजू घेणारे, कौरवांचे सेनापती आणि अश्वत्थामा मृत्यू पावल्याची बातमी कळल्यावर हताश झालेले… अशा वेगवेगळ्या भूमिका निभावणारे द्रोण मुळात ब्राह्मण आहेत, पण क्षमा-शांती वगैरे गीतेत सांगितलेले कुठलेच लक्षण त्यांच्यात नाही. तरी ते निंद्य नाहीत, असे लेखिका म्हणते. अश्वत्थामा मात्र याउलट आहे. लढाईच्या शेवटच्या दिवशी दुर्योधनाला मदत करायचे सोडून तो पळून जातो पांडवाना मारायच्या वल्गना करतो, द्रौपदीच्या मुलांना मारतो, शेवटी चिरंजीवित्वाचा शाप मिळतो. लेखिका लिहिते, ‘त्याने स्वधर्म सोडला, परधर्म साध्य झाला नाही. आत्मविस्मृतीचे इतके अविस्मरणीय उदाहरणं दुसरे नाही.’
खांडववन जाळण्याचा प्रसंग सांगताना असे नाव का पडले असेल? याचे विवेचन रोचक आहे. कृष्णार्जुनांनी हा दाह का केला? याचे सयुक्तिक उत्तर मात्र मिळत नाही. इंद्रप्रस्थाशी कुठलाही राजवंश निगडीत नाही, पांडव तिथे फार कमी काळ राहिले. तथापि, माणसाच्या तामसी वृत्तीतून निर्माण झालेल्या क्षणभंगुर, नेत्रदीपक, हृदयद्रावक अशा आसुरी संपत्तीचे ते एक स्वप्नवत दर्शन ठरते. इंद्रप्रस्थ आणि मयसभा याकडे अशा दृष्टीकोनातून पाहिलेच नव्हते.
कृष्णावरचा लेख मला सर्वात आवडला. कृष्ण महाभारतात प्रथम दिसला तो द्रौपदी स्वयंवराच्या वेळी. हरिवंशामधला कृष्ण आणि हा कृष्ण यात फरक आहे. राधा, गोपी, सुदामा यात येत नाहीत. कृष्णाला वासुदेव व्हायचे होते म्हणजे काय? असे लेखिका विचारते. याचे उत्तर सापडले नाही, परंतु ही पदवी असावी! कृष्णाला भविष्य दिसत असल्यामुळे त्याने सगळे मुद्दामून घडवून आणले, हे लेखिका मान्य करत नाही. तसेच, कृष्णाने स्वार्थासाठी भारतीय युद्ध घडवून आणले, हेही त्या अमान्य करतात. तो पराक्रमी, कुशाग्र बुद्धीचा, कुशल राजकारणी होताच, त्याबरोबर मित्रत्वाचे नाते जपणारा होता. कौरवांशी वैर नसताना तो अर्जुनाच्या मैत्रीसाठी पांडवाच्या बाजूने लढला. त्याने अर्जुनाची कडक शब्दात निंदा केली, पण त्याची साथ सोडली नाही. याहून अधिक लेखिका विस्तृत लिहिते. जरासंध, शिशुपाल, दुर्योधन, कर्ण इत्यादी पात्रांबरोबरचा त्याचा व्यवहार कुठलाही पूर्वग्रह न ठेवता सांगते. तसेच गीतेत अहिंसा सांगितलेली नाही, असेही ठामपणे म्हणते. कृष्णाची जी प्रतिमा मनात आहे, त्यापेक्षा वेगळी प्रतिमा तयार होत असली तरी आपल्या मनातले त्याचे देवत्व कमी होत नाही, हे मात्र खरे. शेवटी लेखिका म्हणते, कृष्णाने गीता केवळ सांगितली नाही, तो गीता जगला.
शेवटच्या निबंधात युग आणि युगांत म्हणजे काय? समजावले आहे. सर्व निबंधांचे सार यात आले आहे. भारतीय युद्धानंतर पांडवांच्या, कृष्णाच्या नातवांना वेगवेगळी राज्ये मिळाली. क्षत्रिय धर्माचे रूप बदलले, पण तो सुरक्षित राहिला. महाभारत काळात भक्तीमार्ग, विभूतीपूजन, पंथपूजन नव्हते. त्याकाळी यज्ञ संस्कृती होती, त्यामुळे कोणी नायिका मंदिरात जाते आहे, असा प्रसंग नाही, असे निरीक्षण लेखिकेने नोंदवले आहे.
दैवकल्पना, भक्तीभाव, एकेश्वरी पंथ, कठीण वास्तव विसरण्याचा प्रयत्न हे महाभारतात नव्हते. त्यामुळे महाभारत युगांत आहे. महाभारतातल्या कथा आणि नंतरच्या काळात लिहिल्या गेलेल्या कथा यातला फरक त्यांनी दाखवून दिला आहे. दुष्यंत-शकुंतलेचे उदाहरण देऊन पटवून दिला आहे. कालिदासाने रंगवलेले दुष्यंत-शकुंतला कथानक मूळ कथेपेक्षा वेगळे आहे. कणखरपणे आयुष्याचा विचार केल्यावर भक्तीमार्गाचा स्वप्नाळूपणा आणि विभूतीपूजा समाजाने कशी पत्करली? असा प्रश्न त्या विचारतात. त्याचबरोबर महाभारत वाचता आले आणि सिंधूलिपीसारखे अनाकलनीय राहिले नाही, हे मोठे भाग्य मानतात. लेखिका शेवटी सांगते की, तिला महाभारतात स्वतःचे प्रतिबिंब दिसते.
हेही वाचा – रारंग ढांग… क्षणभंगूर जीवनाचे वास्तव
इरावतीबाईंचे हे संशोधनात्मक निबंध महाभारतकालीन इतिहास तत्थ्यांसहित सांगतात. त्या पुरातत्ववेत्या असल्यामुळे शास्त्रीय दृष्टीकोनातून निबंध लिहिले आहेत. भौगोलिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय परिस्थितीबरोबर रूढी परंपरा यांचा प्रभाव लक्षात घेत त्या व्यक्तिरेखांच्या मनाचा वेध घेतला आहे. कुठलेही वर्णन अतिशयोक्ती नाही, पूर्वग्रहदूषित नाही कुठलेही विधान पुराव्याशिवाय नाही, असे हे परिपूर्ण अभ्यासात्मक लेखन आहे.
मलपृष्ठावर लिहिले आहे, मानवी प्रयत्न निष्फळ असतात, हा धडा मनावर बिंबवण्यासाठी तर महाभारत रचलेले नाही ना, असे सारा वेळ वाटते. प्रत्येक व्यक्ती एका विशिष्ट परिपाकाकडे अटळपणे जात असते. त्या व्यक्तीची व्यथा आपली स्वतःची व्यथा होते.
खरेतर, या पुस्तकाबद्दल किती सांगावे, असे मला झाले आहे. हे पुस्तक वाचणे एक अनुभव आहे. तो ज्याचा त्याने अनुभवावा आणि ‘जय’ नावाच्या इतिहासाच्या दर्शनाने दिपून जावे…