Monday, March 2, 2026

banner 468x60

Homeललितयामिनी आणि 8 अन्-नोन कॉल्स…

यामिनी आणि 8 अन्-नोन कॉल्स…

नितीन फलटणकर

आता कुठे सूर्याने ढगांच्या पल्ल्याड डोकवायला सुरुवात केली होती. सतत एनरजेटीक असलेला तो आज व्हिटामिन डी कमी झाल्यासारखा आळसावलेला, थकलेला वाटत होता. पावसाळा नसतानाही पावसाळी वातावरण होतं… हवेत गारवा होता. सकाळचे 7 वाजले असतील. मंदार बेडवरच सारखा कूस बदलत होता. रात्रभर त्याला झोप नव्हती. एकतर यामिनी (त्याची बायको) रात्री माहेरहून उशिराने आली होती अन् दुसरे म्हणजे रात्री एका अन्-नोन कॉलने त्याची झोप उडवली होती. तो कसाबसा डोळे चोळत उठला. बेडरूममध्ये जात त्याने यामिनी उठली का, हे पाहिले. ती झोपलेलीच होती. ती झोपताना सहसा चादर घेत नसे, पण आज तिच्या अंगावर चादर होती. पूर्णपणे ओढलेली.

ती आईकडे गेली होती, दोन दिवस माहेरी. परतताना रेल्वेला गर्दी असल्याचे आणि गाडी लेट असल्याचे ती बोलली होती. रात्री तिला परतायला उशीरही झाला होता. रात्रीचा 1 वाजला होता. म्हणून कदाचित थकल्यामुळे तिने आज अंगावर पूर्णपणे चादर घेतली असेल, असे त्याला वाटले. रात्री फोनची रिंग वाजत असल्याने आणि यामिनीची झोपमोड होऊ नये म्हणून मंदार हॉलमध्ये आला. अनोळखी नंबरचा विचार करत असतानाच कधी झोप लागली, हे त्यालाही कळले नाही.

सकाळी मंदारने मोबाइल चेक केला. रात्री 12 वाजताचे 8 अन्-नोन नंबरवरून आलेले कॉल त्याला दिसले. या फोन कॉलमुळे त्याची झोप उडाली होती. त्यातील एक कॉल त्याने रिसिव्ह केला होता. कुणा महिलेचा आवाज होता… ‘अरे, ऐक माझा ॲक्सिडेंट झालाय…’ त्यानंतर तो कॉल अचानक कट झाला. आवाज जरा ओळखीचा होता… पण आठवत नाही कुणाचा? पुन्हा एकदा त्याने यामिनी काय करतेय, हे पाहिले. ती तशीच झोपलेली होती.

मंदारला सुटी असल्याने त्यानेच स्वत: चहा करून घेतला. यामिनीला आज पूर्ण आराम करू द्यायचा. ती स्वत: उठेपर्यंत तिला उठवायचेच नाही, हे त्याने ठरवले होते… त्यामुळे त्यानेच बेडरूमचा दरवाजा बंद करून घेतला.

हेही वाचा – किरण म्हणतो, मला बाबा बदलायचाय!

रात्रीच्या कॉलने त्याला पुरते डिस्टर्ब केले होते. कुणाचा आवाज? कोण असेल ‘ती’ कसला अपघात? चुकून कुणाचा नंबर लागला असेल तर? मग तिच्या नातेवाईकांना आपण कळवले पाहिजे. तिने माझा नंबर लावला म्हणजे, नक्कीच माझ्या नंबरशी साधर्म्य असणारा तो नंबर असेल… एखादे डिजिट चुकले असेल…. असे त्याला वाटले. त्याने सारे डिजिट बदलून नंबर लावून पाहिले… खात्री केली, कुणाचाही अपघात झाला नव्हता. हे ऐकल्यावर त्याला समाधान वाटले. पण मग त्या बाई कुणाला फोन लावत असतील? मरू दे… डोक्याचा ताण हलका करण्यासाठी त्याने एक सिगारेट पेटवली. बेडरूमचे दार त्याने आधीच घट्ट बंद केल्याने यामिनीला स्मेल जाण्याचा धोका नव्हता. तरी खबरदारी म्हणून त्याने बाल्कनीत जात झुरके घ्यायला सुरूवात केली. पहिल्या कशपासून त्याला जरा हलके वाटायला लागले. आज त्याने पेपरही चाळला नाही की, घराबाहेर पडलेले दूधही त्याने आत घेत तापवले नाही. आदल्या दिवशीच्या दुधावरच त्याने चहा करून घेतला होता.

सकाळचे 9 वाजायला आले तरी, यामिनी उठलेली नव्हती. त्यानेही तिला उठवण्याचा प्रयत्न केला नाही. बाल्कनीतून आत आल्यानंतर त्याने पेपर चाळला. रेल्वेतून पडून एका महिलेचा मृत्यू ही बातमी त्याला दिसली. ‘कधी रेल्वे सुधारणार? आणखी किती लोकांचे प्राण जाणार?’ असं मनाशीच पुटपुटत त्याने पेपर खाली ठेवला. टीव्हीवरच्या बातम्या पहाव्यात, असे त्याला वाटले. त्याने टीव्ही ऑन करताच न्यूज चॅनल लावले. चॅनलवर पेपरचीच बातमी होती. एक महिला रेल्वेतून पडली. तिची अद्याप ओळख पटलेली नाही. महिलेची पर्स आणि बॅग चोरट्यांनी लांबवली होती… एका नंबरवरून जखमी महिलेने तिच्या कुटुंबीयांना फोन  लावण्याचा प्रयत्न केला, पण प्रतिसाद मिळाला नाही. त्या महिलेला उपचारासाठी नाशिक येथील सरकारी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

हेही वाचा – मला बाबा बदलायचाय…, ऐकून केतन हादरलाच!

जखमी महिलेने ज्या व्यक्तीच्या फोनवरून नंबर लावला होता, ती व्यक्ती टीव्हीवर घटना सांगत होती. ‘वो मॅडम गिरी, उसकी पर्स किसीने चुराया था। मैने उनके हसबंड को मेरे 98XXXXXX20 इस नंबर से फोन लगाया। काफी बार फोन लगाने के बाद एकबार मराठी में वो कुछ बोली और बेहोश हो गई। हम उन्हे तुरंत अस्पताल ले गए।‘ मंदारला धक्काच बसला. त्याच्या डोळ्यातून घळाघळा पाणी आले. काय करावे त्याला सूचत नव्हते. त्याने आपला मोबाईल शोधला. कॉल हिस्ट्रीमध्ये तो गेला. त्याने नंबर पाहिला.98XXXXXX20 तोच नंबर होता. आता मंदारचे धाबे दणाणले. त्याने पळत जात बेडरूमचा दरवाजा उघडला. बेडवर केवळ चादर पडलेली होती. यामिनी तिथे नव्हतीच. तो फोन… तो फोन… यामिनीचा होता… असं म्हणत त्याने जोरात टाहो फोडला…

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

माधवी माहुलकर avaantar.com on Poetry : अपूर्ण अन् रातराणी…
डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!