Thursday, July 31, 2025

banner 468x60

Homeललितकाय फक्त हाऊसवाइफ?

काय फक्त हाऊसवाइफ?

आराधना जोशी

सगळ्यांच्याच अंगात पिकनिकचा उत्साह संचारला होता. अगदी पाच वर्षांच्या मुलांपासून ते 75-80 वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांपर्यंत… खूप मोठा ग्रुप होता. त्यामुळे अनेकजण एकमेकांना ओळखत नव्हते. म्हणूनच पिकनिकच्या आयोजकांनी मुक्कामी पोहोचल्यावर एकमेकांची ओळख करून देण्याचा कार्यक्रम सुरू केला. एकेकजण आपलं नाव, कुठे राहतो, काय करतो याची माहिती देत होते. सत्तरी पार केलेल्या वसुधाची वेळ आली, तशी तिने आपलं नाव सांगितलं आणि मी हाऊसवाइफ असल्याचा उल्लेख केला, त्याबरोबर एकीने जवळपास किंचाळत, “काय फक्त हाऊसवाइफ? तुम्ही आयुष्यात कधीच नोकरी वगैरे केली नाही?” असा सगळ्या ग्रुपसमोरच वसुधाला प्रश्न विचारला.

प्रश्न‌ ऐकल्यावर वसुधा चपापली. हा प्रश्न तिला अगदी अनपेक्षित होता. मात्र वसंत म्हणजे तिचा नवरा बायकोची बाजू घेत म्हणाला, “हाऊसवाइफ असणं म्हणजे तुम्हाला एवढं कमीपणाचं का वाटतं? ती तर 24X7 असणारी नोकरी आहे, त्यात कधीही सुट्टी नाही, हाफ डे नाही, आजारपणाच्या सुट्ट्या नाहीत. कधी केला आहे का हा विचार?” प्रश्न विचारणारी बाई गप्प झाली. मात्र वसुधेच्या डोक्यात विचारचक्र सुरू होतं.

वसंत आणि वसुधाचा प्रेमविवाह. पण घरच्यांच्या संमतीने झालेला. खरंतर, दोन्ही कुटुंबं एकमेकांचे शेजारी होते, एकमेकांच्या सुखदु:खाला धावून जाणारी होती. त्यामुळे लग्नाला विरोध असा झालाच नाही. मात्र लग्नानंतर वसंतला मुंबईत सरकारी नोकरी लागली आणि वसुधेला गावाला ठेवून तो एकटाच मुंबईत आला. नवे ठिकाण, नवी नोकरी, रहायला जागा नाही. अशावेळी बायकोला बरोबर न्यायचं कसं? हा मोठा प्रश्न होता. हळूहळू मुंबई कळायला लागली, समजायला लागली. राहण्यासाठी जागेचीही सोय झाली आणि वसुधा गावाहून मुंबईत दाखल झाली. नव्या नवलाईचा संसार सुरू झाला होता.

वसुधेच्या सासर, माहेरी गोतावळा भरपूर मोठा होता. त्यात हे दोघं मुंबईत आल्यामुळे इथे काम असलं की, अनेकजणांचा मुक्काम वसंत आणि वसुधेच्याच घरी असायचा. पुढे दोघांचा संसार वाढायला लागला, एक मुलगी, एक मुलगा झाल्यानंतर त्यावेळच्या पद्धतीप्रमाणे चौकोनी कुटुंब पूर्ण झालं होतं.

हेही वाचा – आयुष्यातले सुगंध… सुगंधी आयुष्य

वसंतही सरकारी नोकरीतील प्रमोशनसाठी विविध परीक्षा देत क्लास वन गॅझेटेड ऑफिसर झाला. मुंबईत स्वतःच घर घेता आलं नसलं तरी, सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या घराचा मात्र वसंतला लाभ घेता आला होता. पण मुलांच्या शिक्षणात व्यत्यय नको म्हणून शाळा मात्र त्याच राहिल्या. ‌ऑफिसर झाल्यानंतर वसंतचं काम वाढलं, तसं वसुधेवरच्या जबाबदाऱ्या आणखी वाढल्या. दोन्ही मुलांच्या शाळांच्या वेळा सांभाळत, त्यांना शाळेत पोहोचवणं, परत घरी आणणं, त्यासाठी जवळपास पाऊण तासाचा लोकल ट्रेनचा प्रवास करणं, कामाला बाई ठेवणं त्यावेळी शक्य नसल्याने सगळी कामं वसुधेने करणं, त्यात सतत येणाऱ्या पै-पाहुण्यांची सरबराई करणं, मुलांचे अभ्यास, इतर काही ॲक्टिव्हिटीजसाठी मुलांना त्या त्या ठिकाणी घेऊन जाणं, परत आणणं, बाजारहाट, वाणसामान, शिक्षणासाठी रहायला आलेले पुतणे, भाचे, भावंडे यांना हवं नको ते बघण्यात वसुधेचा संपूर्ण दिवस जायचा.

यथावकाश दोन्ही मुलांची शिक्षणे पूर्ण झाली. मुलगी मीडियात तर मुलगा बॅंकिंग क्षेत्रात गेला. कालांतराने मुलीचे लग्न झाले, तिलाही मुलगी झाली आणि नातीला सांभाळण्याची जबाबदारी परत एकदा वसुधेवर पडली. वसुधा दिवसभर बिझी रहायला लागली. मुलीच्या ऑफिसमध्ये नव्या कार्यक्रमाची आखणी सुरू होती, त्याची जबाबदारी लेकीवर आहे याचा एकीकडे अभिमान वाटत असताना, आता नातीची आबळ होणार हे लक्षात आल्यावर वसुधेने एक वेगळा निर्णय घेतला. फिडिंगवर असणाऱ्या तीन महिन्यांच्या नातीला घेऊन रोज संध्याकाळी वसुधा आणि वसंत लेकीच्या ऑफिसला जायला लागले. नातीचं पोट भरलं की, लेकीच्या काळजीपोटी तिथे थांबून तिला सोबत करायला लागले. अनेकदा रात्री उशिरा लेक आणि नातीला घेऊन घरी यायला लागले. परत सकाळी चारला उठून वसुधेचा दिवस सुरू होत होता.

हेही वाचा – लोकल ट्रेन आणि मोबाइल एटिकेट्स

…आणि तरीही समोरून वसुधेला प्रश्न विचारला गेला होता फक्त हाऊसवाइफ? बाकी काहीच नाही? मग आजपर्यंत केलेली उठाठेव, धावपळ, इतरांसाठी खस्ता खाणं, आल्या-गेल्यांचा हसतमुखानं पाहुणचार करणं याला काहीच किंमत नाही? नवऱ्याला मिळणाऱ्या पैशांमध्ये टुकीने संसार करणं, त्यातूनही शक्य तेवढी बचत करणं, मुंबईत घर घ्यायचं म्हटल्यानंतर पुरेसे पैसे नसताना आपले दागिने बॅंकेत गहाण ठेवून पैसे उभं करणे, याची किंमत शून्य? केवळ नोकरी केली की, मगच आपण आयुष्यात काहीतरी साध्य करतो? आपल्या चॉइसने हाऊसवाइफ किंवा हल्लीच्या भाषेत होम-मेकर असणं म्हणजे इतकं लो-लेव्हल काम आहे का? ती घरीच तर असते म्हणून अनेकांकडून गृहीत धरलं जाणं यात तिचा, तिच्या मनाचा विचार किती वेळेला केला जातो? अशा असंख्य प्रश्नांनी वसुधा सध्या भंजाळून गेली आहे. तुमच्याकडे आहेत का याची उत्तरं?

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!