परिणिता रिसबूड
बाई
बाई म्हणून जन्माला आलीस
बाईपणाचा गौरव कर
एकदातरी मनमोकळे
सखे तू जगून बघ
बाईच्या जातीला शोभेल तसे
सांभाळल्या ना रिती भाती
जिच्या हाती पाळण्याची दोरी
ती जगाते उद्धरी
या जगात एकदा स्वतःला पण add करून बघ
एकदातरी मनमोकळे जगून बघ
करीयर आणि संसार
सांभाळताना दमलीस ना!
खांद्याला खांदा लावून
सिद्ध करताना भागलीस ना!
सुपरवुमन भूमिकेतून एकदातरी बाहेर पडून बघ
एकदातरी मनमोकळे जगून बघ
आणि शेवटी एक महत्त्वाचे
विचारते तुला सई
24×7 असतेस कशी तू ‘बाई’च?
बाई माणूस ते मनुष्य प्राणी
प्रवास एकदा करून बघ
एकदा फक्त एकदा तरी मनमोकळे तू जगून बघ
हेही वाचा – Poetry : आवर्त, काही दिवस, गुंफण अन् मी…
स्माईल प्लिज
नक्की माहीत असते आपल्याला
आपल्या चेहऱ्याची कोणती बाजू
फोटोसाठी असते योग्य
मग आपण नेहमीच तसेच वळतो
कॅमेऱ्याला फेस करतो
आयुष्यातीलही दिवस काही
असतात असेच ‘फोटोजनिक’
मग आपण नेहमीच मागे वळतो
जुन्याच क्षणांना फेस करतो
आठवून ते फोटो क्लीक
मनातच म्हणतो स्माईल प्लिज
अस्तित्व
माझ्या देखत माझी चिता पेटवली गेली
पण
गर्दीत कोणाला माझे अस्तित्वच कळले नाही
आता मी पण भूत झाले आहे
भुतांच्या स्पर्धेत मी पण भाग घेतलाच पाहिजे सक्तीने
आणि तरीही
मला आतून माणूसपणाची पालवी
फुटतच आहे
त्याचे काय करू?
हेही वाचा – Poetry : हाऊस वाइफ, हुरहूर अन् नातं
शिक्का
तुम्ही तुम्हीच आहात, याचा काय पुरावा आहे तुमच्याकडे?
पॅन कार्ड, रेशन कार्ड की आधार कार्ड?
प्रश्न अस्तित्वाचा होता आणि पुरावा कागदी होता.
सरकारी दरबारी त्याचाही ‘रेट’ ठरला होता
तुमची ओळख ते ठरवणार होते
आम जनतेत त्याची गणना करणार होते
हे आता एक बरे झाले
आता नको शोधायला स्वतःची ओळख
केली जाईल तुमची पुराव्याने पारख
पांढरे, रंगीत रेशन कार्ड ठरवेल तुमचा क्लास
बँक स्टेटमेंट देतील तुम्हाला मिळवून ग्रीन कार्ड
पण….
तरीही पडलाच प्रश्न अस्तित्वाचा
कस लागला जर स्वत्वाचा
तर…..
डोळे मिटून आत बघा
माणूसपणाचा शिक्का पुसटच दिसेल.


