Thursday, January 15, 2026

banner 468x60

Homeललितनिनादच्या कंपनीची औषधं कोहिनूर हॉस्पिटलकडे का नव्हती?

निनादच्या कंपनीची औषधं कोहिनूर हॉस्पिटलकडे का नव्हती?

भाग – 1

निनाद आजगांवकर कोहिनूर हॉस्पिटलच्या पायऱ्या चढत होता. कोहिनूर हॉस्पिटलमधील डॉ. अंजली या दुपारी 12 वाजता फक्त चार मेडिकल रिप्रेझेन्टेटिव्हना भेटत होत्या. निनादने 15 दिवसांपूर्वी बाहेरच्या रिसेपशनिस्टकडे आपले नाव दिले होते. कोहिनूर हॉस्पिटल हे या शहरातील प्रसिद्ध हॉस्पिटल आहे. डॉ. विजय पाटील आणि डॉ. सौ. स्नेहलता पाटील यांचे हॉस्पिटल गेली 30 वर्षे या शहरात सेवा देत आहे. डॉ. विजय पाटील हे स्त्रीरोग तज्ज्ञ आणि डॉ. सौ. स्नेहलता पाटील या बालविकारतज्ज्ञ म्हणून 30 वर्षांपूर्वी या शहरात आले. सुरुवातीला फक्त कन्सल्टिंग करणाऱ्या पाटील दाम्पत्याने नंतर शहारात जागा घेऊन हॉस्पिटल बांधले. गेल्या 30 वर्षात या हॉस्पिटलची खूप प्रगती झाली. हॉस्पिटलवर अजून मजले चढवले गेले. तसेच आजूबाजूची जमीन खरेदी करुन हॉस्पिटलची शाखा काढण्यात आली.

सर्व अत्याधुनिक मशिनरी, अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर्स, लॅबोरटरी, मेडिकल शॉप, अॅम्ब्युलन्स यांनी हॉस्पिटल परिपूर्ण झाले. डॉ. अंजली या पाटील दाम्पत्याच्या एकुलत्या एक कन्या. अंजली ही लहानपणापासून अत्यंत हुशार. तिने पुण्यात बी.जे. मेडिकलमधून एम.बी.बी.एस. केले आणि नंतर एम.डी. (स्त्रीरोग) या पदव्या घेतल्या. त्यानंतर गेली पाच वर्षे त्या आपल्या घरच्या हॉस्पिटलमध्ये स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून काम करतात. डॉ. अंजली या 29 वर्षांच्या असून अविवाहित आहेत. डॉ. अंजली या पुण्यासारख्या शहरात बरीच वर्षे राहिल्याने त्यांचे विचार आईवडिलांपेक्षा वेगळे आहेत. त्यांच्याकडे गरीबांसाठी कळवळा आहे. ज्यांची ऐपत नाही त्यांना कमीत कमी खर्चात उपचार मिळायला हवेत यासाठी त्यांचा प्रयत्न असतो.

निनाद आजगांवकर हा मूळ मुंबईचा मुलगा एका प्रतिथयश औषध कंपनीत मेडिकल रिप्रेझेन्टेटिव्ह म्हणून काम करत आहे. याआधी तो संघाचा कार्यकर्ता म्हणून नागालँडमध्ये काम करत होता. त्या कामात तो रमला होता. कदाचित आयुष्यभर त्याने ते काम आवडीने केले असते. पण तीन वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांचे निधन झाले आणि त्याच्यावर आईची जबाबदारी आली. मग तो मुंबईत आला आणि बी.फार्म. शिकला असल्यामुळे या औषध कंपनीत त्याला नोकरी मिळाली आणि महाराष्ट्रातील या शहरात तो आईसह आला. एका भाड्याच्या घरात तो राहतो आहे. मुळचाच हुशार असल्याने त्याचे त्या कंपनीत चांगले काम आहे.

हेही वाचा – कृष्णसर्प… वसुमतींनी रत्नागिरीला बोलावून दिली धक्कादायक माहिती!

 निनादने वेटिंग हॉलमध्ये पाहिले. त्याच्या बरोबरीने अजून तीन वेगवेगळ्या कंपन्यांचे एम.आर. आले होते. सर्वजण त्याच्या ओळखीचे असल्याने त्याने हाय, हॅलो केले. बाहेरच्या मुलीने चौघांची कार्डे घेतली आणि आत डॉ. अंजलीच्या टेबलवर ठेवली. एक एक एम.आर. आत जाऊ लागला. आज निनाद थोडा चिडलेला होता. त्याला डॉ. अंजलीबरोबर सविस्तर बोलायचे होते म्हणून तो सर्वात शेवटी आत गेला. त्याने डॉ. अंजलीला गुडमॉर्निंग केले आणि तो मॅडमना म्हणाला,

‘‘मॅडम, मला तुम्हाला काही विचारायचे आहे. विचारू का?’’

डॉ. अंजली – “विचारा.”

निनाद – ‘‘मॅडम, मी तुम्हाला गेली 3 वर्षे नियमित भेटतोय. माझ्या कंपनीच्या प्रॉडक्ट्सबद्दल तुम्ही उत्सुकता दाखवता, आमच्या आर्यन कॅप्सुल्सचे दर सर्वात कमी आहेत, हे मी तुम्हाला वारंवार सांगतोय. आमची कंपनी ही भारतातील नामवंत कंपनी आहे. असे असताना तुम्ही आमचे प्रॉडक्टस का लिहित नाहीत?’’

डॉ. अंजली – “तुम्ही असे मला डायरेक्ट विचारण्याआधी केमिस्टकडे चौकशी करायला हवी होती.”

निनाद – “कसली चौकशी?”

डॉ. अंजली – “तुमची औषधे उपलब्ध असतात का नाही याची!”

निनाद – “मॅडम, आमच्या कंपनीचे प्रॉडक्टस शहरातील सर्व केमिस्टकडे उपलब्ध आहेत. फक्त…”

डॉ. अंजली – “फक्त काय?”

निनाद – “फक्त या हॉस्पिटलच्या केमिस्टकडे ते उपलब्ध नाहीत….”

डॉ. अंजली – “तुम्हाला माहिती आहेच की, या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर्स जे प्रिस्क्रिप्शन लिहितात ते आमच्या हॉस्पिटलमधील केमिस्टकडेच जाते. आमच्या हॉस्पिटलचा तसा नियम आहे. आम्ही पेशंटना सक्त ताकिद दिलेली असते, औषधांची खरेदी आमच्या केमिस्टकडेच करायची. कारण बाहेरून औषधे आणली तर, बाहेरचे केमिस्ट दुसरीच औषधे देऊ शकतात.”

निनाद – “सॉरी डॉक्टर, पण तुमचा गैरसमज झालाय. एकवेळ बाहेरचे केमिस्ट तुम्ही लिहिलेली औषधे बरोबर देतील, पण तसे तुमच्या हॉस्पिटलमधील केमिस्टबद्दल सांगता येणार नाही.”

डॉ. अंजली – “सांभाळून बोला मिस्टर.”

निनाद – “मॅडम, तुमची परवानगी घेऊनच हा विषय तुमच्याशी बोलतोय. राग नसावा.”

डॉ. अंजली – “ओके. मी तुमचे दोन प्रॉडक्टस लिहिले होते. परंतु आमच्या केमिस्टनी फोन करून सांगितले, हे उपलब्ध नाहीत. दुसरी औषधे लिहा.”

निनाद – “का उपलब्ध नाहीत, हे तुम्ही विचारले नसेल!”

डॉ. अंजली – “एवढा वेळ मला नसतो. पेशंट तपासायचे असतात, ऑपरेशन्स असतात आणि त्या टाईपचे दुसरे औषध मिळत असेल तर मी गप्प राहते.”

निनाद – “याबाबतीत मला तुमच्याशी बोलायचे आहे. तुमच्या वडिलांना किंवा आईला हे बोलून उपयोगाचे नाही. कारण त्यांना सर्व माहिती आहे किंवा या दोन सीनिअर डॉक्टरांच्या परवानगीने हे सर्व सुरू आहे. पण तुमच्याबद्दल आशा आहे. तुमच्या या केबिनमध्ये तुम्ही साने गुरुजींचा फोटो लावलाय.”

डॉ. अंजली – “होय. माझे आदरस्थान आहेत साने गुरुजी. पुण्यात असताना डॉ. अनिल अवचट यांच्या शिबिरात मी जॉइन झाले होते. त्यांचे समाजासाठीचे काम बघून मी नतमस्तक झाले. आम्ही कॉलेजमधील मित्रमंडळी आनंदवनमध्ये डॉ. बाबा आमटेंकडच्या शिबिरात सामिल झालो होतो. डॉ. विकास आमटे, डॉ. प्रकाश आमटे, मंदाकिनी आमटे यांचे काम पाहिले. त्यामुळे ज्यांची ऐपत नाही, अशा पेशंटचे पैसे मी घेत नाही. ऑपरेशनमध्ये सुद्धा त्यांना मी सवलत देते.”

निनाद – “मॅडम, मला आपले कौतुक आहे. परंतु तुमच्या हॉस्पिटलमधील फार्मसीमध्ये ठराविक कंपन्यांची औषधे का मिळतात? माझ्या कंपनीसारख्या अनेक कंपन्यांची औषधे का मिळत नाहीत? याची आपण चौकशी केली नसेल.”

हेही वाचा – कृष्णसर्प… उदय सरांचं खरं रूप ऐकून राजेंद्र आणि सविता हादरलेच!

डॉ. अंजली – “खरचं सांगते. मी फार्मसीच्या व्यवहारात लक्ष घालत नाही किंवा खरंतर मी आमच्या हॉस्पिटलच्या व्यवहारातपण लक्ष घालत नाही. आईबाबा सर्व पाहात असतात. बाबा म्हणतात, यात लक्ष घाल. तू एकच मुलगी आमची म्हणून तुलाच हे पहायचे आहे. पण का कोण जाणे पैशांच्या व्यवहारापासून मी अलिप्त असते. त्यापेक्षा माझे पेशंट, त्यांना कमीत कमी खर्चात कसे बरे करता येईल हे मी पाहाते… पण तुमची औषधे आमच्या फार्मसीमध्ये का मिळत नाहीत?”

निनाद – “ते तुमच्या फार्मसीमधील केमिस्टना विचारा.”

डॉ. अंजलीने केमिस्टला फोन करून केबिनमध्ये बोलावून घेतले. दोन मिनिटांत केमिस्ट हजर झाला.

डॉ. अंजली – “सातपुते, मला सांगा हे आजगांवकर म्हणत आहेत की, आपल्या फार्मसीमध्ये ठराविक कंपन्यांचीच औषधे उपलब्ध असतात. या आजगांवकराच्या कंपनीची औषधे मी लिहिते, पण तुम्ही दुसऱ्याच कंपनीची औषधे देता, असे का?”

सातपुते – “मॅडम, सरांची तशी ऑर्डर आहे. ते सांगतील त्याच कंपनीची औषधे आम्ही ठेवतो.”

डॉ. अंजली – “अहो, पण अनेक कंपन्यांची औषधे मी लिहिते, ती मिळत नाहीत. काय चाललंय हे?”

सातपुते – “ते आपण सरांना विचारा मॅडम. मी नोकर माणूस.”

डॉ. अंजली – “ठीक आहे सातपुते, तुम्ही या. आजगांवकर, आज शुक्रवार आहे. मला पप्पांशी याबाबत सविस्तर बोलावे लागेल. आज उद्या जमणार नाही कारण आज पप्पांची ऑपरेशन्स आहेत. उद्या सकाळपासून माझी आहेत. आम्ही तिघे एका घरात राहात असलो तरी आमची व्यवस्थित भेट रविवारी होत असते. रविवारी सकाळी ब्रेकफास्टच्या वेळी आम्ही तिघे व्यवस्थित भेटतो. त्यावेळी आम्ही रोजच्या कटकटीपासून रिलॅक्स असतो. अनेक विषयांवर गप्पा होतात. मग कुठे जायचे असेल किंवा काही खरेदी करायची असेल तर ते सर्व रविवारी. तेव्हा आजगांवकर तुम्ही रविवारी सकाळी 8 वाजता आमच्या घरी या.”

निनाद – “मॅडम, मी तुमच्या घरी? मला असे मोठ्या माणसांकडे नाश्त्याला, जेवणाला जायची सवय नाही.”

डॉ. अंजली – “तुम्ही कसलीच काळजी करू नका. रविवारी आम्ही आमच्या डिग्री, व्यवसाय, मोठेपणा विसरलेलो असतो. त्यादिवशी सर्वसाधारण पाटील कुटुंबीय असतो. तुमचा मोबाईल नंबर या कार्डावर आहे ना?”

असं म्हणून डॉ. अंजलीने निनादचा फोन त्याच्या कार्डावरुन सेव्ह केला.

डॉ. अंजली – “तुम्ही रविवारी आमच्या सदाशिव नगरमधील घरी या. सकाळी 8 वाजता. मी वाट पाहते.”

निनाद ओके म्हणून उठला.

रविवारी सकाळी 8 वाजता निनाद डॉ. पाटील यांच्या सदाशिव नगरमधील घरी पोहोचला. काल रात्री डॉ. अंजलीने स्वतः फोन करून रविवारी सकाळी 8 वाजता येण्याची आठवण करून दिली. तसेच व्हॉट्सॲपवर लोकेशन मॅप पाठविला. निनादला डॉ. अंजलीचे कौतुक वाटले. श्रीमंत आणि खूप शिकलेल्या मुलींमध्ये जो अहंगंड असतो, तो या मुलीमध्ये अजिबात नाही. पुण्याच्या शिक्षण काळात तिच्यावर झालेले संस्कार हे कारण असेल कदाचित.

डॉ. पाटील यांच्या घरी मोठं दगडी कंपाऊंड त्यावर आकर्षक वेल सोडलेले, मोठ्ठे लोखंडी गेट उघडून व्यवस्थित कापलेल्या फुलांच्या ताटव्यामधून असलेल्या वाटेने निनाद आत गेला. मोठ्ठा बंगला समोर दिसत होता. समोरील सुंदर बाग आणि हिरवेगार लॉन. निनाद त्या लॉनवरुन चालत बंगल्याच्या दिशेने जाऊ लागला. एवढ्यात त्याचे लक्ष गेले… कोपऱ्यात एक टेबल लावले होते आणि सभोवती पाच खुर्च्या. एका बाजूला कॉफी मशीन आणि छोट्या गॅसवर एक जीन्स आणि टॉप घातलेली तरुणी पॅनवर काहीतरी पदार्थ करत होती. आपण नेमके कुठे जावे बंगल्यात की बागेतील खुर्चीत बसावे असा विचार करत असताना, त्या तरुणीने मोकळे सोडलेले केस झटकले आणि तिने मागे पाहिले. निनादला पाहून ‘गुड मॉर्निंग आजगांवकर,’ असे म्हणताच, निनाद आश्चर्यचकित झाला. ती तरुणी डॉ. अंजली होती. हॉस्पिटलमध्ये अंजली नेहमी सुती साड्या आणि लांब कोपरापर्यंत ब्लाऊज अशा वेशात असायची. आजच्या या वेशात ती खूपच तरुण आणि आकर्षक दिसत होती. तो पटकन म्हणाला, ‘गुड मॉर्निंग डॉक्टर.’

‘‘नाही नाही, रविवारी आम्ही कुटुंबीय डॉक्टर नसतो. रोजच्या व्यापातून वेगळे होण्यासाठी हा रविवार असतो. आज मी फक्त अंजली. या दिवशी आम्ही तिघे भरपूर गप्पा मारतो. रोज आम्ही तिघेजण एवढे घाईत असतो की, एकत्र जेवण किंवा गप्पा शक्यच नसतात… बसा ना. पप्पा एवढ्यात येतील. तो पर्यंत आपण कॉफी घेऊ.’’

तिने कॉफी मशीनमधून कॉफी कपात घेतली आणि एक कप निनादच्या हातात दिला. अंजली पण एका कपातून कॉफी घेऊ लागली.

‘‘कोण कोण असतं घरी तुझ्या?’’

‘‘मी आणि आई’’

‘‘अच्छा! म्हणजे लग्न झालं नाही का?’’

‘‘नाही अजून.’’

“का?”

“नाही कारण असं काही नाही, मी सहा वर्षे संघाचा प्रचारक होतो नागालँडमध्ये. तीन वर्षांपूर्वी या लाइनमध्ये आलो.”

“अरे वा! मी समाजवादी विचारसरणीची असले तरी संघाच्या प्रचारकांबद्दल आदर आहे माझ्या मनात आणि कौतुकही आहे! मोठमोठे शिक्षण घेतलेली तरुण-तरुणी आपलं कुटुंब, करिअर सोडून संघ कार्यासाठी झोकून देतात. सोपं नाही ते. मग तू या प्रोफेशनमध्ये कसा आलास?”

“वडील वारले आणि आईची जबाबदारी माझ्यावर आली. तिच्यासाठी पैसे मिळवणं आवश्यक होतं.” “बरोबर आहे. ते आवश्यकच आहे,” असे अंजली म्हणेपर्यंत डॉक्टर पाटील पती-पत्नी बाहेर आली. त्यांना आदर दाखविण्यासाठी निनाद खुर्चीतून उठला.

क्रमश:


मोबाइल – 9422381299

प्रदीप केळुस्कर
प्रदीप केळुस्कर
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कुडाळ तालुक्यातील पाट गावात वास्तव्य. स्वतःचा व्यवसाय आणि बागायती असून गेल्या पाच वर्षांत 120 कथा लिहिल्या. आतापर्यंत तीन कथासग्रह प्रकाशित झाले असून स्वतःचे युट्यूब चॅनेल आहे. त्यावर सर्व कथा आपल्या आवाजात रेकॉर्डिंग केल्या आहेत.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!