डॉ. विवेक वैद्य
तो ऑफिसमधून आला आणि सोफ्यावर बसला. तशी घाईघाईने त्याची बायको एका हातात पाण्याचा ग्लास घेऊन आली. त्याचवेळी मोबाईलवर “हे आले आहेत. नंतर करते फोन…” म्हणाली.
“काय ग कोणाचा फोन?”
“माझ्या आईचा होता!”
“काय म्हणतात सासूबाई?”
“काय म्हणतील? वहिनीशी रोज भांडणं होतात. कंटाळून गेली आहे अगदी. आता जरा अतिच झाले आहे… दादाही काही बोलत नाही वहिनीला…”
“असं? चहा घेऊ आणि जाऊन येऊ तुझ्या माहेरी!”
“आत्ता? पन्नास किलोमीटरवर आहे माहेर… जवळ आहे का?”
“कार आहे आपल्याकडे… तासभराचा रस्ता…”
हेही वाचा – …अन् अंकूसोबत नव्याने संसार सुरू केला!
आपला नवरा सीरियसली बोलतो आहे का, की असंच? तेच तिला कळेना. त्याच्या हातात चहाचा कप ठेवत ती म्हणाली, “कशाला त्यांच्या भानगडीत पडता? तुम्ही जाल, माझ्या भावाला बोलाल आणि उगाचच वाईटपणा घ्याल!”
“नाही बोलणार.”
“पण कशाला एवढ्या तडकाफडकी? मी रविवारी जाऊन येते आधी… बघते काय करायचे ते.”
चहा पिऊन झाल्यावर लगेच बूट घालत तो म्हणाला, “तू गाऊनवरच येतेयेस?”
ती निमूटपणे जाऊन साडी नेसून आली.
तिथे पोहतचाच काहीस आश्चर्यमिश्रित स्वागत झाले. एकदम कसे काय वगैरे… चहा नास्ता होताच तो मेव्हणा शालक याला म्हणाला, “एक विनंती करायला आलो आहे तुम्हाला.”
“कसली?”
“आमच्या मुलांना आणि मुलाच्या आईला आजीची फार आठवण येते आहे. तर थोडे दिवस मी आईंना घेऊन जाऊ का?”
थोडंफार हा ना करत, नंतर शालक हो म्हणाला.
तो लगेच पत्नीला म्हणाला, “जा आईची बॅग भर…”
गावाच्या बाहेर गाडी येताच तो मागे वळून सासूला म्हणाला, “आई… आता तुम्ही आमच्याचकडे राहायचे कायमचे.”
हेही वाचा – अनिता… भूतकाळ अन् वास्तव!
ड्रायव्हिंग करत असलेल्या आपल्या नवऱ्याकडे बघताना तिला भरून आले…. मागे वळून आई झोपली आहे, याची खात्री करून ती हळूच म्हणाली… “Thanks!”
तिच्याकडे न बघता तो म्हणाला, “दोन वर्षे माझी आई अंथरुणावर खिळून होती. तू तिची सेवा केली… तेव्हा मी तुला एकदा तरी thanks म्हणालो का?”


