प्रणाली वैद्य
भाग – 5
शौनकच्या इच्छेखातर सगळी मोठी मंडळी त्याच्याशी बोलायला तयार झाली. गावच्या चावडीवर सगळे जमल्यावर शौनकने काल रात्री जे जे घडलं, ते विस्तृतपणे सांगायला सुरुवात केली…
आधी त्याने श्लोकसोबत घडलेली घटना सांगितली… कशा प्रकारे संमोहित झाल्यागत त्याने दरवाजा उघडून बाहेर जाण्याचा प्रयत्न केला, पण त्याला शाल्मलीने अडवले… उघड्या दरवाजासमोर शाल्मली एकटीच उभी पाहिल्यावर मला तिची काळजी वाटली. ती शांत आणि निश्चल होती… तिच्या चेहऱ्यावर भीती नसून राग दिसत होता… समोर जे कोणी होतं त्यावर तो व्यक्त करत होती…
जेव्हा मी तिच्याजवळ गेलो, जणू मलाही कोणी ओढून घेत आहे, असे वाटले… समोर पाहिले तर नखशिखांत हिरे-रत्नांनी मढलेली एक सुंदर स्त्री होती… एक अनामिक शक्ती मला तिच्याकडे ओढून घेत होती… त्याच वेळेस शाल्मलीने पुन्हा एकदा मधे हात घालून मला अडवलं… पण तिच्या स्पर्शासरशी मी वाड्याच्या आत फेकला गेलो…
त्याच वेळेस शाल्मली त्या स्त्रीशीही बोलली… “अजून भूक क्षमली नाही का तुझी? अजून किती वर्षे अशीच लोकांना त्रास देत राहणार आहेस?”
शाल्मलीच्या पाठून जाऊन मी दरवाजा लावला आणि त्यासरशी शाल्मली बेशुद्ध होऊन पडली…
हे जे काही घडलं ते मला, श्लोकला कदाचित शाल्मलीला आठवत असेल!… मला माहीत आहे, तुम्ही काही तरी लपवत आहात किंवा खोटं बोलताय! या मागची पार्श्वभूमी तुम्हा सर्वांना ठाऊक आहे…, शौनकने सर्वांच्या नजरेला नजर देत स्वतःचं मत मांडलं.
हेही वाचा – वाळवंटातले हादरे…
जमलेली ती मंडळी शांत होती… एकमेकांकडे पाहत त्यांनी शौनकचं मत खरं असल्याचं सांगितलं… या सर्व गोष्टींवर आमच्याकडे काहीच उपाय नाही. याचा आम्हाला त्रास होत नाही… पण बाहेरून आलेल्या आणि त्या स्थानाविषयी कुतूहल असणाऱ्या व्यक्तीला याचा त्रास होतो…
तुम्ही असे पाहिले आहात की, ज्यांनी ही गोष्ट अनुभवून सुद्धा स्वतःचे अस्तित्व टिकवलं…! या शाल्मली ताईच्या तोंडी अशी वाक्य… आम्हालाही याचं आश्चर्यच वाटतंय!! त्यांचा या गावाशी काही संबंध होता का? आज निव्वळ त्यांच्यामुळेच तुम्ही दोघेही वाचलात… अन्यथा मनुष्य कुठे जातो, त्यांचं काय होतं… काहीच कळत नाही. कित्येक लोक इथे बेपत्ता झालेली आहेत. पण आता तुम्हा सर्वांना विनंती करतो की, तुम्ही इथून लवकरात लवकर निघावं… उगाच पुन्हा कोणत्याही विचित्र अवस्थेत अडकायला नको… भविष्यात पुन्हा तुमचा या गावाशी संबंध येईल, असे वाटत नाही. त्यामुळे इथे आलेल्या अनुभवाची तुम्ही कुठे ही वाच्यता न केलेली बरी…, गावकऱ्यांनी अपेक्षा व्यक्त केली.
शौनकने त्या सर्वांचा निरोप घेतला वाड्यावर आला… सर्वांना निघायच्या सूचना दिल्या… वाड्यातल्या नोकर मंडळी, पाटलीण बाई सर्वांचा सगळ्यांनी निरोप घेतला… निघता निघता पाटील वाड्यावर आले, त्यांना भेटून शौनकने आपलं कार्ड दिलं… ‘कधी शहरात आले तर, आमच्याकडे नक्की,’ या असं आग्रहाचं निमंत्रण दिलं…
श्लोकचा तापही आता बऱ्यापैकी उतरला होता… शाल्मलीही ठीक वाटत होती… सगळे रॉकर्स आपापल्या बॅग्ज घेऊन बसकडे रवाना झाले… त्यांना ‘बाय’ करायला गावातील काही मंडळी आली होती… ज्यात विशेष करून त्यांच्यासोबत त्या वाळवंटात गेलेली तरुण मंडळी होती. शौनकने त्या मुलांनाही आपले कार्ड दिले.
बसने चंदन नगरच्या बाहेरचा रस्ता धरला आणि मुलांनी सुटकेचा श्वास घेतला…
ट्रेकवरून परतल्यावर सगळेजण आपापल्या कामाला लागले… चंदन नगर ट्रेकच्या आठवणी बनून गेल्या… मात्र श्लोक, शौनकच्या मनातून काही केल्या तो अनुभव जाईना…!
श्लोकला तर तिथून आल्यापासून स्वप्नात तेच तेच सारखं दिसे आणि भीतीने झोप उडे… त्यावेळेसही तो घामाने चिंब भिजून जाई… त्याचं मन सतत खात होतं… त्याने रॉकर्सपासून काहीतरी लपवलं होतं… आणि आता तेच त्याला त्रास देऊ लागलं होतं.
हेही वाचा – श्लोकने वाड्याचा दरवाजा उघडला अन्…
इथे शाल्मलीच्या स्वप्नातही काही दगडी कोरीव मूर्ती दिसत… पण त्यातही एक मूर्ती जी अतिशय उत्तम कोरीव कामाचा नमुना असावा… मूर्तीतील ही स्त्री नखशिखान्त अलंकाराने मढलेली, चेहऱ्यावर मग्रुरी अन् अतिशय हाव असे भाव दिसून येत… हे असं आधी कधी घडलं नव्हतं, ना अशा मुर्ती कधी पाहिल्याचं तिला आठवत होतं… असं का होऊ लागलंय, याचं मात्र तिला आश्चर्य वाटत होतं…
श्लोकने फोन करून शौनक आणि शाल्मलीला भेटायला बोलावलं. स्वतःच्या घराशिवाय दुसरं सुरक्षित ठिकाण नव्हतं. शौनक आणि शाल्मलीला घरचेही आधीपासून ओळखत होते, त्यामुळे त्याने त्या दोघांना घरीच बोलावलं.
अगदी ठरलेल्या वेळेला म्हणजेच दुपारी 4 वाजता शौनक आणि शाल्मली श्लोककडे आले… “एका महत्त्वाच्या ट्रेकबद्दल बोलायचं आहे तर, कुणीही डिस्टर्ब करू नका,” असं सांगून श्लोकने घरातल्यांना तशा सूचना दिल्या…
त्या दोघांनाही घेऊन तो आपल्या रूममध्ये गेला… रूममध्ये जाताच त्याने सरळ मुद्द्यालाच हात घातला… “सगळ्यात आधी मी संपूर्ण रॉकर्स आणि तुम्हा दोघांची माफी मागतो. माझ्यामुळेच तो चंदन नगरचा ट्रेक ठरला आणि मग तुम्हाला विचित्र त्रासाला सामोरं जावं लागलं. चंदन नगरची माहिती मिळवत असताना तिथे गुप्तधन आहे, अशीही माहिती मला मिळाली होती आणि माझ्या मनात त्याची लालसा उत्पन्न झाली… आपण जेव्हा त्या वाळवंटी भागाची पाहणी करत होतो, त्याचवेळेस मी त्या गुप्तधनाच्या लालसेने त्या दगडी भागांची पहाणी करत होतो… पहाणी करताना एक ठिकाणी माझी नजर ओढली गेली. तो भाग जरा उकरला तसं मला त्या ठिकाणी ही मोहोर मिळाली…” असं म्हणत त्याने ती मोहोर काढून दाखवली!
आतापर्यंत श्लोकचं ऐकून घेणारे ते दोघे त्याच्या हातातली मोहोर आश्चर्यानेच पाहू लागले… शौनक आणि शाल्मलीच्या चेहऱ्यावरचे भाव जणू, ‘तू आम्हाला आत्ता सांगतो आहेस,’ असेच सुचवत होते…
“तू हे आपल्यासोबत आणलंस म्हणूनच कदाचित आपल्याला त्या रात्री तसा अनुभव तर, आला नसेल?” शौनकने आपली शंका बोलून दाखवली.
“तिथून आल्यापासून मला रोज रात्री काही दगडी मूर्ती दिसतात… त्यात एक मूर्ती तर विशेष लक्ष वेधून घेते… जी नखशिखान्त अलंकार परिधान केलेल्या स्त्रीची असावी…” शाल्मली म्हणाली.
शाल्मलीच्या असे बोलण्याने शौनक चमकला… “त्या रात्री श्लोक तू दरवाजा उघडून निघाला होतास तेव्हा शाल्मलीने तुला अडवलं… ती तशी दरवाजासमोर का उभी आणि तिचा रागीट अविर्भाव कोणासाठी असेल, या विचाराने मी दरवाजाबाहेर पाहिलं तेव्हा बाहेर लांबवर नखशिखान्त हिरे-माणकानी मढलेली एक सुंदर स्त्री दिसली… अचानक मीही त्या स्त्रीकडे ओढला जाऊ लागलो…. जणू एक अदृश्य शक्ती खेचून घेत असावी… पण त्याच वेळेस शाल्मलीने मला अडवलं आणि मी वाड्याच्या आतल्या भागात पडलो…” शौनकच्या डोळ्यासमोर पुन्हा एकदा तो प्रसंग उभा राहिला.
“त्या क्षणाला शाल्मलीमध्येही एक अफाट शक्ती असल्याचा मला अनुभव आला… शाल्मली, खरंतर तू इतकी नाजूक… पण त्यादिवशी निव्वळ तुझ्या स्पर्शाने मी फेकला गेलो होतो… खूप अनाकलनीय प्रसंग होता तो…” शौनक म्हणाला.
“पण असं काही मी केल्याचं मला आठवतच नाही…” शाल्मली विचारात पडली… नंतर म्हणाली, “श्लोक तुझी काही हरकत नसेल तर, आपण ही मोहोर माझ्या बाबांना दाखवायची का? माझे बाबा पुरातत्व खात्यातच काम करतात आणि त्यांचा या विषयाचा गाढा अभ्यासही आहे…”
“हो, काहीच हरकत नाही… तुझ्या बाबांना ज्यादिवशी वेळ असेल, त्या दिवशी आम्ही येऊन भेटू त्यांना…” श्लोक म्हणाला.
“Ok… done… मी कळवते तसं तुम्हा दोघांना… मग तुम्ही या…” शाल्मली म्हणाली.
असेच काही दिवस सरले… शाल्मलीच्या बाबांनाही वेळ नव्हता, त्यामुळे त्यांची भेट होऊ शकली नाही… मधल्या काळात शाल्मलीने तिच्या मैत्रिणीमार्फत तिला दिसणाऱ्या मूर्तीचं चित्र रेखाटलं…
क्रमशः