प्राजक्ता अनंत काथे
(ज्योतिष शास्त्री आणि होरा मार्तंड)
मेष
या आठवड्यात नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र, कार्यपद्धतीत बदल करावा लागेल. काम वाढल्यामुळे भोवतालचे मैत्रीचे वर्तुळ बदलेल आणि त्यांच्याशी जुळवून घ्यावे लागेल. आर्थिक प्रगती होईल. किचकट आणि छोट्या कामांतून सुटका होईल. महिलांना नवीन मैत्रिणी मिळू शकतात. त्यांच्याबरोबर बाहेर फिरायला जायचा बेत आखाल. विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने बघावी आणि त्यादृष्टीने प्रयत्न करावेत. मेहनत करा, यश तुमचेच आहे.
वृषभ
या आठवड्यात व्यावसायिकांना समाधान मिळू शकेल. रखडलेली कामे पूर्ण होतील. अडकलेले पैसे मिळतील. योग्य व्यक्तीचे मार्गदर्शन मिळू शकेल. नोकरदार कामात बदल करून सुधारणा करू शकतात. त्यामुळे कामे पटापट होतील आणि वरिष्ठ खूश राहतील. कामात मानसन्मान मिळण्याची शक्यता आहे. पैशाअभावी घरात राहिलेली कामे महिला पूर्ण करू शकतील, घरात नवीन वस्तू घेऊ शकतील. विद्यार्थ्यांना पालकांकडून जास्त पॉकेट मनी मिळू शकतो, त्याचा योग्य वापर करावा.
मिथुन
या आठवड्यात तुम्हाला वेगवेगळ्या लोकांकडून बरे-वाईट अनुभव मिळतील. कामाच्या ठिकाणी कामाचा उत्साह असेल. नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर जास्त अधिकारही मिळतील. पगारवाढ होण्याची शक्यता आहे. महिलांना घरात चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. तसेच, समारंभाच्या निमित्ताने नातेवाईकांचा सहवास लाभेल. विद्यार्थी सामाजिक क्षेत्रात काम करण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवीन ओळखी होतील.
कर्क
या आठवड्यात दुसऱ्यावर विसंबून राहू नका. स्वतः लक्ष दिल्याशिवाय कामात प्रगती होणार नाही आणि हवा तसा परिणाम मिळणार नाही. व्यवसायात बारीक लक्ष ठेवावे लागेल. पण त्याचबरोबर जुने हितसंबंध जपावे लागतील. घरातील मदतनीसांवर अवलंबून न राहता महिलांना जातीने लक्ष द्यावे लागेल. विद्यार्थ्यांनी अतिआत्मविश्वास टाळावा, तसेच दुसऱ्यांवर विसंबून राहू नका.
सिंह
या आठवड्यात व्यावसायिक नवीन योजना हाती घेऊ शकाल. वेगळी कार्यपद्धत वापरू शकाल, पण आधीच त्याचा गवगवा करू नका. ज्यांना नोकरी बदलायची आहे, त्यांनी प्रयत्न जरूर करा. कामासाठी प्रवास करावा लागू शकतो. महिलांनी घरात शांत राहावे, वाद घालू नये. नात्यात गैरसमज होणार नाही, याची काळजी घ्यावी. अभ्यास सांभाळून विद्यार्थी छोटा व्यवसाय करू शकतात. दिवाळी जवळ आली आहे, लाभ होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा – हत्ती… सम्राटांच्या ऐश्वर्याचे प्रतीक
कन्या
या आठवड्यात इतरांच्या मर्जीनुसार आणि गोड बोलून कामे करून घ्यावी लागणार आहेत. त्यामुळे कामे पटापट पूर्ण होतील. व्यवसायात कोणालाही दुखवून चालणार नाही, स्पष्ट बोलणे टाळा. व्यावसायिक स्पर्धकांकडे लक्ष ठेवावे लागेल. महिलांनी भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेऊ नये. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे वागण्याचा आनंद मिळेल, मित्र भेटतील.
तुळ
या आठवड्यात माणसांची खरी पारख होण्याची शक्यता आहे. बरीच कामे करण्याची इच्छा आहे, पण सभोवतालच्या परिस्थितीमुळे शक्य होणार नाही. कामे पुढे-मागे होतील, पण ती पूर्ण करू शकाल. व्यावसायिकांशी बोलताना जपून बोलावे, खरे हितचिंतक समजतील. महिलांना कामाचा ताण जाणवेल; हळूहळू काम पूर्ण करू शकाल. विद्यार्थ्यांनी अभ्यासात मेहनत करावी, फळ नक्की मिळेल.
वृश्चिक
या आठवड्यात व्यावसायिक लोकांसाठी पैशाचा ओघ समाधानकारक राहील. आलेल्या पैशांची योग्य व्यक्तीचे मार्गदर्शन घेऊन गुंतवणूक करा. नोकरीत वरिष्ठांच्या हस्तक्षेपामुळे थोडे निर्बंध येण्याची शक्यता आहे. त्यामुळे चिडून कामात चुका करू नका. महिलांना मनाप्रमाणे खरेदी करता येईल. घरातील लोकांची साथ मिळेल. विद्यार्थी मित्रांबरोबर छोटे प्रवास करण्याची शक्यता आहे.
धनु
या आठवड्यात प्रकृतीची साथ उत्तम असेल. त्यामुळे कामाचा उत्साह राहील. व्यवसायात पैशाचा ओघ उत्तम राहील, त्यामुळे नवीन योजना आखू शकाल. हाताखालील लोकांना बोनस देऊ शकाल. नोकरदारांवर वरिष्ठ खूश राहतील, त्यांना तुमचे महत्त्व समजेल. घरातून काम करून महिला संसाराला हातभार लावू शकतात. विद्यार्थी घरात पालकांना मदत करतील. सामाजिक संस्थांमध्ये काम करायची संधी विद्यार्थ्यांना मिळेल.
मकर
या आठवड्यात प्रकृती उत्तम राहील. व्यवसायात बदल घडण्याची शक्यता आहे. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी नवीन पिढीसारखा विचार करावा लागेल. नोकरदारांना नवीन प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता आहे. त्यासाठी ट्रेनिंगही मिळू शकते. महिलांना बहिणींबरोबर प्रवास होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश मिळेल. इतरही स्पर्धेत भाग घ्यावा.
कुंभ
या आठवड्यात नोकरदारांची आळशीपणामुळे मागे पडलेली कामे पूर्ण होतील. सभोवतालच्या प्रसन्न वातावरणामुळे ताजेतवाने वाटेल. व्यवसायात नवीन कामाचे नियोजन पूर्ण करू शकाल. नवीन योजनेची घोषणा योग्य वेळ बघून करा, तोपर्यंत गुप्तता राखा. महिलांना घरातील कामाचा कंटाळा येईल आणि त्या विश्रांती घेतील. विद्यार्थ्यांनी हातातील पैशाचा विनियोग योग्य कारणासाठी करावा.
हेही वाचा – आयुष्याचं गणित बरोब्बर सोडविणारी… वनिता
मीन
या आठवड्यात खर्च खूप होण्याची शक्यता आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा. नोकरदार जातकांच्या कामावर वरिष्ठ खूश होऊन जास्त अधिकार आणि सवलती मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिक लोकांनी आर्थिक स्थिती बघून नवीन योजना अमलात आणाव्यात, कारण पैशाची सोय होण्याची शक्यता कमी आहे. घरातील बजेट सांभाळताना महिलांना त्रास होण्याची शक्यता आहे. अनावश्यक खर्च टाळा. कला क्षेत्रातील विद्यार्थ्यांची प्रगती होईल. कला क्षेत्रात व्यवसायही करू शकतील.



