Sunday, October 26, 2025

banner 468x60

Homeललितपंचनामा : ...अन् गावकरी बनले चेष्टेचा विषय!

पंचनामा : …अन् गावकरी बनले चेष्टेचा विषय!

माधवी जोशी माहुलकर

भाग – 2

चरायला नेलेल्या गाई-म्हशी संध्याकाळी परत घेऊन येत असताना धनगर दिनूला, बाभळीच्या झाडावर एका माणसाने गळफास घेतल्याचे पाहिले आणि दरदरून घाम फुटला. कसंबसं स्वतःला सावरत काट्याकुट्यातून धावत त्याने गावाकडे धूम ठोकली. दिनूला कशाचेच भान नव्हते. घामाने ओलेचिंब झालेला दिनू धापा टाकत, जोरजोराने ओरडतच सरळ गावच्या सरपंचांच्या घरामध्ये घुसला. सरपंचांच्या घरची मंडळी आणि गावातले काही लोक आधीपासूनच तिथे बसलेले होते… त्यांच्या गप्पाटप्पा सुरू होत्या. दिनूची आरडाओरड ऐकून सर्व उठून उभेच राहीले. दिनूला कसबसं रामा गड्याने शांत केलं आणि पाण्याचा तांब्या देत “काय झालंय ते नीट सांग…” म्हणून सांगितलं. दिनूने पाण्याचा तांब्या पहिले घटाघटा रीता करून घसा ओला केला. सरपंच, त्यांचं कुटुंब आणि इतर लोक अजूनही दिनूकडे अचंबित नजरेने पहात होते. दिनूने अंगणात बसकण मारली आणि म्हणाला, “सरपंच, नदीच्या काठाला बाभळीच्या झाडावर एक प्रेत लटकतीया… आक्शी डोळे न जीभ भाईर आलीया…”

हे ऐकल्याबरोबर तिथे जमलेलेल्या सगळ्यांचेच धाबे दणाणले… सर्व दिनूकडे आ वासून पाहायला लागली. सरपंचांनी, “तू तिथे काय करत होतास?” असं विचारल्यावर दिनूने एकदमात सगळी हकीकत सांगितली. नंतर सरपंचांनी गावच्या पोलीस पाटलाला बोलावणे धाडलं. एव्हाना बाहेर काळोख चांगलाच दाटला होता. पोलीस पाटील लगबगीने सरपंचांच्या वाड्याकडे पोहोचले. सर्व प्रकार ऐकल्यावर त्यांनी पोलीस चौकीकडे धाव घेतली, परंतु ठाणेदार साहेब कामानिमित्त शहरात गेले होते. आता आली का पंचाईत? ठाणेदार साहेब शहरातून रात्री उशिरा परतणार होते… हे ऐकून पोलीस पाटलांनी तिथल्या दोन शिपायांना तक्रार नोंदवून घेण्याची विनंती केली आणि नदी काठावर नेमकं काय घडल आहे, ते पाहून येऊ म्हणून सांगितलं. या सर्व गडबडीत रात्रीचे दहा वाजले होते. इतक्या रात्री नदीकडे जायचं म्हटल्यावर पोलीस शिपाई मागे-पुढे पाहू लागले… परंतु कामात दिरंगाई झाल्याची कळलं असतं तर, ठाणेदार साहेबांनी चांगलंच फैलावर घेतलं असतं म्हणून ते दोन पोलीस शिपाई, सरपंच, पोलीस पाटील, दिनू आणि गावातील इतर मंडळी असे सर्व नदीकडे जायला निघाले.

मिट्ट काळोखात हातातल्या टॉर्चचा उजेड पाडत दोन शिपाई आणि पोलीस पाटील पुढे, तर, बाकीची लोक मागे असा तो लवाजमा कसेबसा नदीकाठावर पोहचला… तिथे एक प्रकारची भयाण शांतता पसरली होती… नदीच्या पाण्याचा खळखळाट ऐकायला येत होता… रातकिडे किर्र आवाजात सूर लावत होते… मधूनच एखादी टिटवी किंवा घुबडाचं ओरडणं नीरव शांततेचा भंग करत होते… मुख्य म्हणजे, काळोखामुळे दिनूला ते प्रेत नेमकं कुठे आणि कोणत्या दिशेला लटकले आहे, ते लक्षात येत नव्हते. म्हणून त्याची शोधाशोध चालली होती अन् त्यामुळे बाकीचे लोक गोंधळले होते! मनातून तर तसे सगळेच घाबरले होते. परंतु झालेल्या गोष्टीचा शहानिशा करायची होती म्हणून सगळे दिनू सांगेल त्या दिशेने जात होते. शेवटी त्या दोन शिपायांपैकी एकाला टॉर्चच्या उजेडात दूरवर एका झाडाला काहीतरी लटकल्यासारखे दिसले. त्यासरशी त्याने आपल्या साथीदाराला सांगितले. इतक्या अंधारात त्यालाही पुसटसे काहीतरी दिसले…

“समोर जाऊन पाहू,” असं त्याने सांगताच पोलीस पाटलाने सरपंचांना पुढे केलं. आपल्याला आधीच गुडघ्याचा त्रास आहे, असं सांगत सरपंचांनी दिनू आणि गावातील एक दोन तरुणांना त्यांच्यासोबत जायला सांगितलं. समोर जाण्याची कोणाचीच हिंमत होत नव्हती. कसेतरी ते शिपाई थोडे पुढे गेले… पण त्या जागेपर्यंत जाण्यासाठी खूपच अडचण येत होती. खाचखळगे आणि उंचसखल जमिनीमुळे चालायला त्रास होत होता. पाय घसरला तर सरळ नदीच्या पात्रात समाधी होती. शिवाय, जंगली श्वापदांची भीतीपण होतीच! परंतु पोलीस कारवाई करावीच लागणार होती. त्यामुळे रात्रीची वेळ असली तरी, पोलिसांना आपले काम केल्याशिवाय तेथून जाता येणार नव्हते. इतर ‘बघे’ मंडळी पोलीस पाटलासोबत तमाशा पाहात उभी होती.

हेही वाचा – पंचनामा : झाडाकडे पाहून धनगर दिनूची बोबडीच वळली…

सरतेशेवटी, अंधारामध्ये जीव धोक्यात घालण्यापेक्षा हे प्रयत्न सोडून देत पहाटे येऊन ते प्रेत झाडावरून खाली उतरवावे, असे सर्वानुमते ठरले. दोन पोलीस शिपाई तिथे पहाऱ्यावर राहिले आणि सर्व मंडळी परत गावाकडे परतली. त्या रात्री सर्व गाव जागंच होते. त्या प्रेताची चर्चा खूप रंगात आली होती. आया-बाया आपापला कयास लावत होत्या. काहीजण त्या बहाद्दर पोलीस शिपायांनी दाखवलेल्या हिमतीचे कौतुक करत होते. तर, ही पोलीस कारवाई असल्याने आपल्या हातात काही नाही… नाहीतर आपण ते प्रेत झाडावरून काढले असते अशा फुशारक्या काहीजण मारत होते. परंतु नेमके ते प्रेत आहे तरी कोणाचे? हा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. कारण, गावातील कोणाची आत्महत्या किंवा खून झाल्याची तक्रार अजून तरी पोलीस स्टेशनला रजिस्टर झाली नव्हती. तर्क, कुतर्क, शंका अन् कुशंकांनी भारलेल्या गप्पागोष्टींना उधाण आले होते आणि त्याचबरोबर रात्रीचा प्रहर पुढेपुढे सरकत होता.

पहाटे तीन वाजत आले, तसे सगळ्यांना परत नदीकडे जाण्याचे वेध लागले. तोंड पाण्याने खंगाळुन एक एक गरम चहाचा सिंगल मारून सरपंचांसकट सगळे गावकरी पुढील प्रकरण हाताळण्यासाठी घटनास्थळी निघाले… सरपंचीण बाईंनी आठवणीने पहाऱ्यावरच्या शिपायांकरिता दिनूच्या हाती चहाची किटली दिली. कंदील आणि टॉर्चच्या उजेडात सर्वांनी नदीकडे जाणारी वाट धरली. ठाणेदार साहेबपण रात्री उशिरा शहरातून आले होते, तरीपण आपली नैतीक जबाबदारी ओळखून तेही गावकऱ्यांसोबत सामील झाले होते. ते सर्वात पुढे चालले होते, त्यांच्याबरोबर आणखी दोन पोलीस शिपाई होते आणि मागाहून सारा गाव… रात्रभराच्या पहाऱ्याने त्या प्रेतावर पाळत ठेवणारे शिपाई मात्र गारठले होते. एक तर नदीकिनारा… रात्रीची नीरव शांतता… मधूनच ओरडणाऱ्या टिटवीचा आवाज…. घुबडांचा आणि वटवाघळांचा चित्कार… आणि झाडाला लोंबकळणारे अज्ञात प्रेत… अशा भयाण वातावरणात ते आपली ड्युटी करत होते. खरंतर, जेव्हा त्या दोघांना त्या प्रेतावर पहाऱ्यासाठी ठेवलं होतं, तेव्हाच इतक्या भयाण वातावरणात थांबण्याच्या कल्पनेनेच त्यांच्या अंगावर काटा आला होता… परंतु एरवी गावासमोर जोर दाखवणाऱ्या शिपायांना आपला भित्रेपणा उघड करायचा नव्हता. पोलीस कुठल्याही प्रसंगाचा निडरपणे  सामना करू शकतात, हे त्यांना दाखवायचं होतं. शिवाय, नोकरीचाही प्रश्न होता. कुठल्याही नामुष्कीचा प्रसंग त्यांना नको होता.

तिथे पोहचताच दिनूने पटकन चहाचे कप शिपायांसमोर केले. त्या गरम चहाने तसेच तिथे जमलेल्या जमावाने त्यांना जरा धीर आला आणि सोबत ठाणेदार साहेबांना पाहून ते जरा निर्धास्त झाले… ते आता ठाणेदार साहेबांच्या पुढील आदेशाची वाट बघायला लागले. त्यांचा चहा घेऊन झाल्यावर ठाणेदार साहेबांनी पोलीस पाटलांना पंचांना समोर आणायला सांगितले. इतक्या रात्री मग सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील आणि आणखी दोन गावकरी असे पंच गोळा झाले आणि सर्वात महत्त्वाचा साक्षीदार दिनू! त्याची पहिली साक्ष नोंदवली गेली. अशा आणखी दोघा-तिघांच्या साक्ष आणि स्वाक्षरी झाल्यावर ठाणेदार साहेबांनी आपल्या दोन शिपायांना झाडावर चढून प्रेताच्या फाशीची गाठ सैल करून प्रेत खाली उतरवावयास सांगितलं.

या सगळ्या खटाटोपीत साडेचार वाजले होते. आता सगळ्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे ते प्रेत सहीसलामत खाली उतरवणे होते. एव्हाना ते बरेच फुगले होते. बटबटीत डोळे आणि बाहेर आलेली जीभ यामुळे त्या प्रेताचा चेहरा जास्तच भेसूर वाटत होता. प्रेत फुगलेही बरेच होते आणि मयतही आधीच अंगाने धष्टपुष्ट होता. ठाणेदार साहेबांनी ऑर्डर सोडताच दोन तरणेबांड शिपाई पटकन झाडावर दोरीची गाठ सोडण्यासाठी चढले आणि दोन शिपाई झाडाखाली प्रेत उतरवण्यासाठी उभे राहिले. झाडाच्या आजूबाजूला गावकरी मंडळी गर्दी करून उभे राहिले. एव्हाना थोडे झुंजूमुंजू व्हायला लागले होते. पण काळोख होताच… झाडावरून दोघे शिपाई सुरीने गाठ सैल करण्याच्या मागे लागले आणि झाडाखाली दोन शिपाई आ वासून प्रेताकडे वर पाहात उभे राहिले… सगळा गाव श्वास रोखून ती घटना पाहात होता. ठाणेदार साहेबदेखील रुबाबात दगडावर पाय रोवून उभे होते. सरपंच, उपसरपंच आणि इतर गावकरी आपापल्या धोतराचे सोगे सांभाळत अन् डोक्यावरच्या टोप्या हाताने सावरत ठाणेदार साहेबांच्या बाजूला उभे होते.

हेही वाचा – पोतराज… मुख्य प्रवाहात येण्याची गरज!

झाडावरच्या पोलीस शिपायांनी गाठ कापायला सुरुवात करताच लटकलेल्या प्रेताच्या गळ्याची दोरीची पकड सैल व्हायला लागली होती. दुसरा शिपाई एका हाताने ते प्रेत हळुहळु खाली सोडणार होता. जशी त्या प्रेताच्या गळ्याची गाठ सैल झाली तसा त्या प्रेताच्या पोटात असलेला गॅस तोंडातून बाहेर पडला आणि ते प्रेत ‘ई… हींहींही’ असा विचित्र आणि भयानक आवाज करत खाली सरकले. तो भयानक आवाज आणि तोही नदीकाठी नीरव शांततेत घुमला आणि सगळ्यांना वाटले की, त्या प्रेताचा आत्मा तिथे आहे… तो काही आता कोणाला सोडत नाही. गावकऱ्यांची घाबरगुंडी उडाली. सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील आणि पंचांसह इतर गावकरी वाट फुटेल तिकडे पळत सुटले होते. कोणीच कोणासाठी थांबायला तयार नव्हते. झाडावर चढलेल्या शिपायांनी देखील धडाधड खाली उड्या टाकल्या आणि तेदेखील प्रेताला सोडून गावकऱ्यांसोबत धावत सुटले. त्यांनी प्रेत सोडताच ते अजूनच मोठ्याने आवाज करत  खाली उभ्या असलेल्या शिपायांच्या अंगावर धप्पकन येऊन पडले… त्यासरशी त्यांनीपण ‘मेलो,  मेलो’ असे बोंबलत ठाणेदार साहेबांकडे वळूनही न पाहता तिथून पोबारा केला.

“अरे, थांबा, घाबरुन नका. परत या…” असं ठाणेदार साहेब बेंबीच्या देठापासून ओरडत होते, परंतु कोणीच ऐकायला तयार नव्हते. ज्याला त्याला आपला जीव वाचवायची पडली होती.  घटनेचे गांभीर्य साहेबांना समजले होते आणि त्या प्रेताने तसा भयंकर आवाज कशामुळे केला हेपण त्यांच्या लक्षात आले होते… त्यांची हसून हसून पुरेवाट झाली होती… ते सगळ्या गावकऱ्यांना पंचनाम्यासाठी बोलावत होते, परंतु कोणाचेच खेटर कोणाच्या पायात नव्हते. गावकऱ्यांनी घामाझोकळ होतं… हेलपाटत कसाबसा गाव गाठला! त्यांच्या घशाला कोरड पडली होती. गावातील आयाबाया त्यांना विचारत होत्या की, “नदीकाठच्या प्रेताचं काय झालं?” परंतु एकाच्याही तोंडातून शब्द फुटत नव्हता. भीतीमुळे ते सगळे अर्धमेले झाले होते… त्यांची ती अवस्था पाहुन त्या भोळसट बायकांनाही वाटले की, नक्कीच ते भूत या मंडळींना दिसले असणार! भीतीने त्यांचेही चेहरे पांढरेफटक पडले होते.

तिकडे नदीकाठी ठाणेदार साहेबांनी आणि त्यांच्या इतर स्टाफने आपले काम चोख बजावले होते… परंतु त्या अज्ञात प्रेताने गावकऱ्यांच्या मनात मात्र धडकी भरवली होती. त्या प्रेताच्या तोंडातून तसा आवाज का निघाला, हे ठाणेदार साहेबांनी खूप चांगल्या प्रकारे सगळ्यांना समजावून सांगितले, पण आत्म्याची भीती गावकऱ्यांच्या मनातून शेवटपर्यंत गेली नाही. दिनूने तर, त्या दिवसापासून गाई-म्हशी चारण्याचे काम कायमचे सोडून दिले. गावातील आयाबाया आणि इतर मंडळींनी नदीच्या काठावर असलेल्या त्या झाडाजवळ किंवा त्या जागेच्या आसपास जाण्याची हिंमत कधीच केली नाही… आजपर्यंत त्या ठाणेदार साहेबांना ते प्रेत कोणाचे होते, हे विचारण्याची हिंमतही कोणाची झाली नाही. त्या घटनेचा विषय निघाला की, गावकऱ्यांची इतर लोक चेष्टा करतात… तो प्रसंग कथन करण्यास त्यांना सांगतात, परंतु ती जुनी मंडळी मात्र अजूनही त्या घटनेच्या प्रभावाखाली आहेत! आपल्या कानावर हात ठेवून ते त्या प्रसंगाविषयी बोलण्याचे टाळतात…

समाप्त

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!