ॲड. कृष्णा पाटील
भाग – 2
बापाने दादूच्या बायको, मुलीला घराबाहेर काढले. गावातच दादूच्या एका मित्राच्या घरी रिंकू आणि आई राहू लागली. एकेकाळी सोन्याच्या धूरात वावरणारी मुलगी… गावी आलं की इथ ठेवू की तिथं ठेवू, अशी करणारी विधवा आत्या… मुंगळ्यासारखे चिकटणारे काका आणि आजोबा… अँसिडच्या धूरात घरच्यांसाठी बापाने उभी हयात घालवली. मिळवला तेवढा पैसा घरी दिला. पण करोडो रुपये ज्यांच्यासाठी खर्च केले त्यांनीच पाठ फिरवली!
रिंकूला खूप वाईट वाटे… डोळे पाझरू लागत. बाप होता तोपर्यंत घरच्यांच रूप वेगळं होतं. माणसं इतकी नीच असू शकतात? जनावराच्या काळजाची असतात? रिंकूच डोकं भणभणायचं. पण इलाज नव्हता. रिंकू तसेच सहन करीत होती. तिला राहून राहून एकच वाटत होतं, माझा बाप आम्हाला उघड्यावर सोडून जाणार नाही…
रिंकूने ठरवले जमिनीचे पेपर्स काढून पाहू. दोन-तीन महिने असेच गेले. रिंकूने काही कागदपत्रे जमा केली आणि मला फोन केला. रिंकू ऑफिसला आली. मी सर्व कागदपत्रे पाहिली. पण सर्व मिळकती, ज्याच्या त्याच्या नावावर होत्या. 25 एकर जमीन… पाच हजार चौरस फूटाचा भव्य बंगला… सर्व मिळकती घरच्यांच्या नावावर, पण कुठेच दादूचं नाव नव्हतं! नाईलाजाने मी रिंकूला म्हणालो, “आपलं काही चालेल असं वाटत नाही. तरी पण एकदा खरेदी दस्त काढून पाहू.”
आठवडा गेला. सर्व खरेदी दस्त काढले. पण दादूचे नाव कुठेच नव्हते. आता मात्र पुरता इलाज संपला. रिंकू आणि आई निराश होऊन घरी गेल्या. पण मला राहवत नव्हतं. शंका ही होती की, दादू असं करणार नाही. दादूचं शिक्षण कमी होतं. पण व्यवहार चातुर्य जास्त होतं. तो फसणं किंवा आंधळेपणाने व्यवहार करणं शक्यच नव्हतं!
दुसऱ्या दिवशी मी रिंकूला बोलावून घेतले. दादू ज्या स्टॅम्पवेंडरकडे दस्त करीत असे, त्याच्याकडे गेलो. त्याला विचारले तर, तो म्हणाला, “दादू प्रत्येक मिळकत घरातील व्यक्तींच्या नावावर करायला सांगत असे. मात्र दरवेळी एक 100 रुपयांचा स्टॅम्प-पेपर नेत असे. त्या स्टॅम्पचे काय करीत होते, मलाही माहीत नाही!”
आम्ही परत फिरलो. रिंकूला सांगितले, घरी सर्व कपाटे तपासून बघ. आणखी काही कागदपत्रे आहेत का, वगैरे. स्टॅम्प कुठे ठेवलेत का? पण काहीच सापडले नाही. पुन्हा निराशाच पदरी आली.
हेही वाचा – दादू… घराचेच वासे फिरले!
दिवस असेच जात होते. रिंकूने जॉब करायचे ठरवलं. आई घरी होती. गावकरी मदत करीत होते.
माझं मन साशंकच होतं. मला झोप येत नव्हती. खूप अस्वस्थ होतो… आठ दिवसांनी पुन्हा रिंकूला बोलावलं. केरळात दादू कोणाकोणाकडे जात होता चौकशी केली. पण रिंकूला काहीच माहीत नव्हतं. तिने एका गिर्हाईकाला फोन लावला. त्याने सांगितले, “दादू काहीही करताना सुब्रमण्यम वकिलांचा सल्ला घेत असे. तुम्ही इकडे या. आपण त्यांची गाठ घेऊ.”
मी ई- पास काढला. रिंकू, रिंकूची आई, मामा आणि मी असे केरळला गेलो. सुब्रमण्यम वकील एकदम सीनियर… वयस्कर… त्यांना भेटलो आणि आश्चर्य घडले. त्यांच्याकडे सर्व पेपर्स तयार होते. दादूने सर्व मिळकती घरातल्या लोकांच्या नावे केल्या होत्या. पण दरवेळी शंभर रुपये स्टॅम्पवर करारपत्र करून घेतले होते. त्यात, दादूने पैसे घातले आणि या मिळकती खऱ्या अर्थाने दादूच्या आहेत. मात्र, हे बेनामी व्यवहार आहेत, असे स्टॅम्प-पेपर होते.
माझा आनंद गगनात मावेना. रिंकूला यातलं काही समजत नव्हतं. मी इतकंच सांगितलं, “आता काळजी नको. आपण जिंकलोय.”
गावी परत आलो. सरपंच, पोलीस पाटील यांना बोलावून घेतलं. सर्व प्रकार सांगितला. सरपंच आश्चर्यचकित झाले. म्हणाले, “आता सांगतो एकेकांना.”
पुन्हा बैठक बसली. सरपंचानी सर्व कागदपत्रे दाखवली. सरपंच म्हणाले, “या मिळकतीमध्ये तुमचा काहीएक संबंध नाही. सर्व मिळकती दादूच्या वारसांना जाणार आहेत.”
तरीही वडील, बहीण ऐकेनात. ते म्हणाले, “हे सर्व खोटं आहे. आमचे स्टॅम्प-पेपर नाहीत. आमच्या सह्या पण नाहीत!”
दोन दिवस गेले. मग रिंकूला सांगून कलेक्टर आणि एसपीकडे तक्रार केली. कलेक्टरने सर्वांना बोलावले. ‘दहा दिवसांत रिंकूला ताबा द्या, अन्यथा कायदेशीर कारवाई करावी लागेल,’ या कलेक्टरच्या आदेशावर सर्वांचे चेहरे काळवंडले. कागदावर सह्या करून गपगुमान निघून गेले.
चार-पाच दिवस असेच गेले. सहाव्या दिवशी पुन्हा बैठक बसली. सरपंच, पोलीस पाटील गावकरी हजर होते. दादूचा बाप खाली मान घालून बसलेला. विधवा बहीण जमीन टोकरत बसलेली. महादू आभाळाकडे बघत विमनस्क होऊन बसलेला. भावजय आतच होती.
सरपंच म्हणाले, “काका, घर आणि जागा कधी खाली करताय?” तसा बाप धाय मोकलून रडायला लागला. दादू किती चांगला होता… तो किती उदार होता… त्याला मी लहानाचं मोठं कसं केलं… वगैरे वगैरे सांगत राहिला.
सरपंच म्हणाले, “काका, स्वतःच्या पोराला जाळायला जागा दिली नाही. इतकं उरफाटं काळीज बापाचं असू शकतं? दादू गेला. उणेपुरे चार-पाच दिवस झाले नाहीत. तोवर तुम्ही सगळ्या मिळकतीचे मालक झाला. त्याच्याच बायकापोरांना घराबाहेर हाकलून दिले. त्यांना देशोधडीला लावलं. करोडपती बापाची मुलगी गावातच भाड्याने घर घेऊन राहिली. तुमच्याकडं हजारवेळा याचना केली. पण तुम्हाला जरा सुद्धा पाझर फुटला नाही. आता रडून तरी काय उपयोग? जमीनजुमल्याच्या लोभान तुम्ही आंधळे झाला. स्वतःच्या लेकराचं पण वाईट वाटलं नाही. ॲसिडमध्ये काम करून त्याने इस्टेट मिळवली. या इलाख्यात तुमच्या घराचं नाव त्यानेच केलं. ॲसिडमुळेच त्याला कावीळ झाली. पण याची जाणीव कधी तुम्हाला झाली नाही. तो गेल्यावर तर सारंच संपलं. ज्यांच्यासाठी केलं तीच माणसे उलटली. आता तुमचीपण वेळ निघून गेली. उचला गबाळं, व्हा चालते. तुमची जी घरची मिळकत आहे, तेथे रामाचं राज्य करा.”
तसा महादू उठला. सरपंचाच्या पाया पडू लागला. गयावया करू लागला. सरपंच म्हणाले, “महादू लेका, तू तर तुरुंगात आयुष्य काढलंस. दादूनं तुझ्या बायकापोरांना सांभाळलं. इतकं की, त्यांना कधी एकटेपणा वाटला नाही. तुला तुरुंगातसुद्धा मटणाचा डबा पोहोचायचा. दरवेळी चार-पाच हजार देऊन जायचा. तुझी सुद्धा बुध्दी पालटली?”
हेही वाचा – स्वाभिमानी की हेकेखोर?
एवढ्यात विधवा बहीण पुढे आली. तीही सरपंचांना विनंती करू लागली. सरपंच म्हणाले, “आक्का, तुला तरी कळायला पाहिजे होतं. रामा महिन्याभराचा असताना पती वारला. तू इथंच राहिलीस. दादूने तुला घराची मालकीण केलं. रामाला लहानाचं मोठं केलं. पोटच्या मुलापेक्षा चांगलं सांभाळलं. तुला कधी रोजगार करू दिला नाही. तुझ्यावर विश्वास ठेवून 70 लाखाचं घर बांधलं. दादू गेल्यावर तू सगळं विसरलीस. आता वेळ गेल्यावर रडून काय उपयोग? उठून बोऱ्या-बिस्तारा गुंडाळा. इलाजच नाही”.
महादू आणि बाप धाय मोकलून रडू लागले. रडत रडत सामान भरू लागले. तास – दीड तास झाला असेल. निम्मे अर्धे सामान भरले असेल. एवढ्यात रिंकू उभी राहिली. तिने सरपंचांना सांगितले, “थांबवा, हे काका. मेलेल्यांना मारून काय उपयोग? ही सगळी जण मागतकरी होती. तशीच राहतील. माझा बाप देणारा होता. तो उदार आणि दिलदार होता. आम्हाला तोच वारसा त्यांनी दिलाय. यांनी चूक केली म्हणून आपण करायला नको. या प्रत्येकाला चार-चार एकर जमीन द्या. राहण्याकरता घर द्या. त्यांना बाहेर काढले तर माझ्या बापाला वाईट वाटेल. त्यांनी कधी कुणाला दुखावले नाही. आम्हा दोघींना किती जमीन लागणार आहे? आणि हो, माझ्या लग्नाची काळजी करू नका. बापाने त्याची तजवीज करून ठेवलेली आहे…” रिंकू धाड धाड बोलत राहिली.
सरपंच, पोलीस पाटील यांचे डोळे विस्फारले. सगळे स्तब्ध झाले. दादूच्या लेकीचा उदारपणा पाहून गाव गहिवरला. सरपंच लांबूनच म्हणाले, “शाब्बास पोरी, शाब्बास.. जिगरबाज बापाची लेक म्हणून गावाला तुझा कायम अभिमान वाटेल. आज दादूच्या आत्म्याला पण शांती मिळाली असेल…!!”
समाप्त
मोबाइल – 9372241368