माधवी जोशी माहुलकर
विदर्भात, विशेषतः बुलढाणा जिल्ह्यात गणपतीचे किंवा नवरात्रीचे भंडारे असोत, घरातील लग्नकार्य किंवा वाढदिवस असोत अशावेळी जेवणात मिरचीची भाकरी, भाजी ही आपले अव्वल स्थान टिकवून ठेवते. विशेषतः, ग्रामीण भागांमध्ये अशा कार्यक्रमांत मिरचीची भाजी आणि भाकरी आवर्जून केली जाते. इतकेच नाही तर, सुगीच्या दिवसांत तर शेतांमधून, मळ्यांमधून या मिरचीची भाजी आणि भाकरीच्या पार्ट्या होतात. मिरचीची भाजी ही थोडी पातळसर असते. अतिशय चविष्ट अशा या भाजीत भाकरी कुसकरून खाण्याची मजा कुछ औरच आहे. ही मिरचीची भाजी-भाकरी ज्याने एकदा चाखली तो याचा जबरदस्त फॅन होतो. या भाजीकरिता विदर्भातील अनेकजण स्वतः तर अशा पार्ट्या, भंडारे, लग्नांमध्ये हजेरी लावतातच, शिवाय आपल्या कुटुंबातील लोकांकरिता ही भाजी नेण्यासाठी घरून डबेही घेऊन येतात.
एकूण कालावधी – तयारीसह सुमारे 45 मिनिटे
साहित्य
- तूरडाळ – एक वाटी
- जाड्या हिरव्या मिरच्या – 10 ते 12
- तिखट लवंगी मिरच्या – 5 ते 6
- आंबटचुका – एक पाव मिरचीला 1 किलो आंबटचुका
- पालक – ऐच्छिक
- शेंगदाणे – अर्धी वाटी
- खोबऱ्याचे काप – अर्धी वाटी
- लसूण पाकळ्या – 10 ते 12
- आले – 1 इंच
- हळद – 2 चमचे
- लाल तिखट – 2 लहान चमचे (भाजीला रंग येण्याकरिता)
- तेल – 2 पळ्या
- गरम मसाला – 2 छोटे चमचे
- मोहरी – 1 लहान चमचा
- जिरे – 1 लहान चमचा
- तमालपत्र – 1
- दालचिनी –
- धणे पावडर – 2 चमचे
- बारीक चिरलेली कोथिंबीर – अर्धी वाटी
- कच्चा टोमॅटो – 2 मध्यम
- मीठ – चवीनुसार
हेही वाचा – Recipe : नागपूरची खासियत… तर्री पोहे
कृती
- प्रथम आंबटचुका आणि पालक बारीक चिरून घ्यावा.
- अर्धी वाटी शेंगदाणे भाजून घ्यावेत, त्यामधील थोड्या शेंगदाण्यांचे जाडसर कूट करून घ्यावे.
- काही खोबऱ्याच्या कापांचे थोडे जाडसर कूट करून घ्यावे. बाकीचे काप तसेच राहू द्यावेत.
- आले, लसूण आणि चार ते पाच हिरव्या मिरचीची जाडसर पेस्ट करावी. यामधे हिरवी लवंगी मिरची वापरू शकता.
- जाड हिरव्या मिरच्यांचे तुकडे करून घ्यावेत.
- आता प्रेशर कुकरमध्ये एक वाटी तूरडाळ, बारीक चिरलेला आंबटचुका, पालक, जाड्या मिरच्यांचे तुकडे, खोबऱ्याचे काप, उरलेले शेंगदाणे, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकावी.
- नंतर यामध्ये एक चमचा हळद टाकावी आणि एक ते दीड पेला पाणी टाकून हे मिश्रण शिजायला ठेवावे.
- फोडणीकरिता एका कढईत दोन पळ्या तेल तापत ठेवावे. तेल तापल्यावर त्यामध्ये मोहरी टाकावी, नंतर जिरे टाकावे. हे दोन्ही तडतडले की, त्यामध्ये एक लहान चमचा हिंग टाकावा, तमालपत्र, दालचिनी आणि नंतर कच्चा टोमॅटो टाकावा.
- टोमॅटो शिजत आला की, शेंगदाणे आणि खोबऱ्याचे कूट तेलावर परतून घ्यावे.
- कूट थोडे लालसर झाले की, त्यामध्ये जाडसर कुटलेल्या आले, लसूण, मिरचीची पेस्ट टाकावी आणि हे मिश्रण तेल सुटेपर्यंत परतावे.
- त्यानंतर त्यात एक चमचा हळद, दोन चमचे लाल तिखट, दोन चमचे धणे पावडर, दोन छोटे चमचे गरम मसाला टाकावा आणि परत हे मसाले तेलावर छान परतून घ्यावे.
- कडेने तेल सुटायला लागले की, थोडे पाणी घालावे आणि मसाले थोडे शिजू द्यावेत.
- आता कुकरमधील आंबटचुका आणि तुरडाळीचे मिश्रण रवीने चांगले घोटून एकजीव करावे आणि फोडणी केलेल्या कढईत ओतावे.
- मसाल्यांसकट ही भाजी चांगली एकजीव करावी. यामध्ये नंतर पुन्हा एक ते दीड पेला पाणी घालावे आणि भाजी चांगली ढवळून घ्यावी.
- त्यात चवीनुसार मीठ टाकून चांगली उकळू द्यावी.
- अशी ही तयार झालेली मिरचीची भाजी गरमा गरम भाकरीचा कुस्करा करून आडव्या हाताने पोट भरेपर्यंत मनसोक्त खावी.
हेही वाचा – Recipe : विदर्भ स्पेशल… तुरीच्या उसळीतील दिवसे!
टीप्स
- थोडा पालक देखील वापरला जातो. पालकाने या भाजीला टेक्श्चर छान येत.
- तिखट मिरची आवडत असेल तर जाड्या मिरचीऐवजी ती वापरू शकता.
- ही भाजी फक्त मिरच्या वापरून केली जाते, त्यामुळे त्याचे प्रमाण आवडीनुसार ठरवा.
- टोमॅटो सहसा कच्चा वापरावा, चव छान येते.
- कांदा देखील आवडीनुसार वापरू शकता.
- ही भाजी करताना काही ठिकाणी खड्या मसाल्याचा वापरही केला जातो. परंतु सहसा घरी केल्या जाणाऱ्या भाजीमध्ये हे खडे मसाले वापरले जात नाहीत. मात्र, खसखसचा वापर होऊ शकतो. खसखस, खोबरे, कांदा भाजून घेऊन त्यांची पेस्ट टाकावी लागते.
- विदर्भात या भाजीची रेसिपी गावानुसार थोडीफार बदलत जाते.
- खूपजण या मिरची भाजीला ‘डाळगंडोरी’ही म्हणतात.
तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता. मात्र, त्यासाठी तुम्हाला वरील फॉरमॅटमध्ये ही रेसिपी द्यावी लागेल.
या ईमेलवर तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.


