माधवी जोशी माहुलकर
गरमागरम वाफाळलेले ऑयस्टर मोमोज, सोबत टोमॅटोची तीळ आणि लसूण घातलेली चटणी ही डिश माझ्या मुलीने आमच्या समोर ठेवली, तेव्हा मला खरंच तिला शाबासकी द्यावी लागली. इतके सुंदर टेस्टी व्हेज-मोमोज तिने स्वतःची पद्धत आणि प्रमाण वापरून तयार केले म्हणून तिचे कौतुक करणे आवश्यक होते. तिची स्वतःची ही ऑयस्टर मोमोजची रेसीपी मी खाली दिलीच आहे आणि सोबत मोमोज बद्दलची थोडी माहिती सुद्धा!
मोमोज ही भारताची डिश नाही. ती तिबेटची डिश आहे. नेपाळवरून आलेल्या या डिशने भारतातील स्ट्रीट फूडमध्ये आपली जागा तयार केली. असं म्हणतात की, तिबेटच्याही आधी मोमोज चीनमध्ये बनवले जायचे. मात्र, हे बनविण्याची पद्धत वेगळी होती. मोमोजचा खरा अर्थ वाफेवर बनवलेली चपाती. मोमोज ही डिश सर्वात आधी तिबेटच्या लहासा येथे बनवली गेली. मोमोज हे व्हेज आणि नॉन-व्हेज अशा दोन्ही प्रकारात असते. याशिवाय, मोमोज तळून किंवा उकडून बनविले जातात. बाहेरचं आवरण हे कणिक किंवा मैद्यापासून तयार केलेले असतं तर, आतलं सारण हे कोबी, गाजर, सिमला मिरची आणि आपल्या आवडीच्या भाज्यांचं असतं. नॉन-व्हेज मोमोजमध्ये चिकन, मटण, अंडं आणि काही ठिकाणी मासे सारण म्हणून भरतात.
जेव्हा तिबेटमधील लोक भारतात आले, तेव्हा खऱ्या अर्थाने भारतात मोमोज आले आणि हळूहळू ही भारतातील लोकप्रिय डिश झाली. व्हेज-ऑयस्टर मोमोज प्रामुख्याने तिबेट आणि नेपाळ या देशांतील लोकप्रिय डिश आहे. पारंपरिक मोमोज जरी तिबेटी संस्कृतीचा भाग असले, तरी कालांतराने ‘इंडो-चायनीज’ चवीनुसार त्यात बदल झाले आहेत. यामध्ये वापरला जाणारा ‘ऑयस्टर सॉस’ हा मूळचा चीनमधील आहे, जो या मोमोजला एक वेगळी चव देतो. आजकाल हे मोमोज भारत, भूतान आणि नेपाळमध्ये अत्यंत लोकप्रिय आहेत. आता हे ऑयस्टर मोमोज माझ्या मुलीने तिच्या पद्धतीने कसे केले ते पाहुया!
साहित्य
- ऑयस्टर मशरुम्स – 125 ग्रॅम
- बारीक चिरलेला पान कोबी – मध्यम आकाराची एक वाटी
- गाजर – अर्धी वाटी (बारीक चिरलला)
- पातीचा कांदा – अर्धी वाटी
- लसूण – 12 पाकळ्यांची पेस्ट
- आल्याची पेस्ट – दोन चमचे
- चिली फ्लेक्स – दोन चमचे
- सो/e सॉस – एक चमचा
- व्हेज ऑयस्टर सॉस – दोन चमचे
- कोथिंबीर – चवीपुरती
- मीठ – चवीनुसार
- मैदा – एक वाटी
- तेल – चार टेबलस्पून
मॅरिनेशन सॉस कृती
- दोन टेबल स्पून व्हेज ऑयस्टर सॉस, दोन चमचे आले-लसणाची पेस्ट हे एक टेबलस्पून तेलात मिक्स करून हा सॉस तयार करावा.
मोमोज् कृती
- ऑयस्टर मशरुम्स धुऊन स्वच्छ कापडावर वाळवून घ्यावेत.
- हे मशरुम्स कोरडे सुकले की, एकदम बारीक चिरून घ्यावेत, नंतर मॅरिनेशन सॉसमध्ये 20 मिनिटे मॅरिनेट करून ठेवावेत.
- वीस मिनिटांनंतर एका कढईत एक टेबल स्पून तेल टाकून ते तापले की, मॅरिनेट केलेले ऑयस्टर मशरूम्स त्यात टाकावे.
- मशरूम्स शिजत आले की, थोडे पाणी सुटेल तेव्हाच त्यामध्ये एक चमचा आले-लसणाची पेस्ट, बारीक चिरलेला कोबी, गाजर, कोथिंबीर आणि चिली फ्लेक्स टाकावे.
- त्यानंतर लगेच एक चमचा सोया सॉस टाकून सर्व मिश्रण मंद आचेवर शिजू द्यावे.
- सर्व मिश्रण कोरडे झाल्यावर थंड करून घ्यावे.
- मैद्यामध्ये दोन टेबल स्पून तेल टाकून मैदा नीट मळून घ्यावा. हाताने त्याची मूठ बांधून पाहावी, ती जर पक्की बांधली गेली तर, तेल मैद्याला व्यवस्थित लागले आहे, असे समजावे.
- नंतर हवे तेवढे पाणी टाकून घट्ट मैद्याचा गोळा भिजवून घ्यावा आणि तो ओल्या फडक्याने दहा मिनिटे झाकून ठेवावा.
- दहा मिनिटांनी मैद्याच्या पातळ पातळ करंजी सारख्या पात्या लाटून त्यामध्ये वरील सारण भरावे आणि करंजीला जशी मुरड घालतो त्याप्रमाणे मुरड घालून सर्व मोमोज तयार करून घ्यावेत.
- इडली पात्राला तेल लावून हे मोमोज 20 मिनिटे वाफवून घ्यावे. स्टिमर असेल तर त्यामध्ये हे मोमोज वाफवून घ्यावेत.
- मोमोजचे कव्हर ट्रान्सलुसन्ट होईपर्यंत ते वाफवून घ्यावेत. (ट्रान्सलुस्न्ट आणि ट्रान्सपरन्ट दिसणे यामध्येही फरक आहे, असं माझ्या मुलीने मला सांगितले.)
टिप्स
- मोमोजच्या मैद्याच्या पारीच्या जाडीवर मोमोज वाफवण्याचा वेळ अवलंबून असतो. पारी जर जाड असेल तर मोमोज वाफवायला वेळ लागतो त्यामुळे शक्यतोवर मोमोजच्या सारणासाठी मैद्याची पारी पातळ असावी.
- मोमोजसोबत बहुतेक वेळा शेजवान चटणी किंवा सॉस दिलेला असतो. परंतु माझ्या मुलीने ही टोमॅटोची तीळ घातलेली चटणी मोमोजसोबत सर्व्ह करून त्यात आपला एक देशी चवीचा ट्विस्ट आणला, ज्यामुळे हे मोमोज अफलातून चवीचे झाले होते.
या मोमोजसोबत पारंपरीक चटणी न करता टोमॅटो आणि तिळाची लाल सुक्या मिरच्या आणि लसूण घातलेली चटणी तयार करावी.
कृती
टोमॅटो चटणी करण्याकरिता तीन टोमॅटो बारीक चिरून ते कढईत अगदी थोडे तेल टाकून शिजायला ठेवावे, ते अर्धवट शिजले की, त्यात चार ते पाच लसूण पाकळ्या, चार ते पाच लाल सुक्या मिरच्या आणि एक चमचा तीळ टाकून हे सर्व मिश्रण टोमॅटोमधील पाणी जिरेपर्यंत शिजवून घ्यावे. नंतर त्यात एक चमचा मीठ टाकून मिश्रण थंड झाल्यावर मिक्सरवर वाटून घ्यावे, की झाली तुमची टोमॅटो चटणी तयार.
तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता.
या ईमेलवर किंवा
9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर
तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.


