चंद्रशेखर माधव
साधारण 2013मधील घटना असावी. पुण्यात मी राहतो त्या परिसरात नवीनच एक हॉटेल सुरू झालं होतं. हॉटेल छोटसंच, पण छान होतं. मी नेहमी चहा प्यायला तिथे जायचो. या हॉटेलमध्ये अब्दुल नावाचा एक चुणचुणीत मुलगा वेटर म्हणून कामाला होता. वयाने जरा कमी असला तरी हुशार आणि धीट होता. कधीही गेलं की, दोन मिनिटांत “क्या लावू सर?” असं हसऱ्या चेहऱ्याने विचारात समोर येऊन उभा राहायचा.
एका शनिवारची गोष्ट. सकाळी फारसं काही काम नसल्यामुळे मी चहा घेण्यासाठी हॉटेलमधे गेलो. बसून दोन मिनिटं होत नाहीत, तोच अब्दुल समोर हजर. मी मोबाइलमधून डोकं वर काढून त्याच्याकडे पाहिलं. आज मात्र त्याचा चेहरा थोडा चिंताग्रस्त वाटला.
“क्या रे, क्या हुवा?” मी विचारलं.
“देखिये न सर, मैंने ऑनलाइन मोबाइल मंगावाया है और वह बॉक्स भी खोल दिया है, जैसे तैसे किधर किधर से 2300 रुपये जमा किये हैं । साहब बोले थे आज पगार दूंगा लेकीन वह बाहर चले गए है । उनको आने में एक घंटा लगेगा । अब उस आदमी को बाकी के 900 रुपये कहाँ से दूंगा । आप बात करो न उससे मोबाइल वापस लेने के लिए।” अब्दुल रडवेल्या चेहऱ्याने मला म्हणाला.
“तुझे किसने बोला था ऐसे ऑनलाइन मोबाइल खरीदने को? और वह भी इतना महंगा?” मी म्हणालो (बारा-तेरा वर्षांपूर्वी 3200 रुपये ही रक्कम त्याच्या दृष्टिकोनातून बघितलं तर जास्तच होती)
माझ्याकडून अचानकच झालेला प्रश्नांचा भडीमार ऐकून तो अजूनच गांगरला. पण मग त्याचा चेहरा बघून मलाच दया आली. मी त्याला म्हणालो “ठीक है, रहने दे । दिखा, कहाँ है मोबाइल । और वो डिलिवरीवाला कहाँ है?”
हेही वाचा – अनाहूत सल्ला
“आ रहा होगा सर, आसपास में एक-दो डिलीवरी करके आता हूँ ऐसे बोलकर गया है ।” असं म्हणत अब्दुल तो नवा मोबाइल आणि जमा केलेले 2300 रुपये माझ्या हातात दिले.
पूर्ण पैसे देण्याआधीच अब्दूलने पार्सल उघडल्यामुळे डिलिव्हरीवाल्याची सुद्धा कोंडी झाली असणार, हे माझ्या लगेच लक्षात आलं. मी जरा मोबाइल न्याहाळत असतानाच तो मनुष्य पैसे घेण्यासाठी हजर झाला. ‘मी, माझ्यासमोर टेबलवर असलेला बॉक्स आणि तिथेच उभा असलेला अब्दुल’ हे दृश्य पाहून तोही आमच्यासमोर येऊन उभा राहिला.
एव्हाना या सर्व परिस्थितीचा ताबा मी घेतलेला पाहून अब्दुल जर रिलॅक्स झाला होता. मी परत एकदा अब्दुलकडे पाहिलं, क्षणभर विचार केला अन् पटकन उठलो. डिलिव्हरीच्या माणसाला दोन मिनिटं थांबायला सांगून जवळच्या एटीएममध्ये गेलो आणि 1000 रुपये घेऊन आलो. विचार केला नाहीतरी 30-40 मिनिटांचा तर प्रश्न आहे, देऊन टाकूयात पैसे. पैसे काढून हॉटेलमध्ये येऊन त्या माणसाचे पैस चुकते केले.
हेही वाचा – राजमाची येथील चकवा!
जसा तो माणूस पैसे घेऊन परतला तसं अब्दुलच्या चेहऱ्यावर नेहमीच हास्य झळकलं आणि मला म्हणाला “साहब आतेही आपका पैसे दे दूंगा।” मी त्याच्याकडे पाहून हसून म्हणालो “जा, चाय ला जल्दी।”
माझा चहा पिऊन होत नाही, तोच हॉटेलचे मालक आले. आल्या आल्या थेट माझ्याकडेच येऊन “तुमचे 900 रुपये घ्या आधी” असं म्हणून पैसे माझ्या हातात दिले. माझ्यासाठी ही बाब काही फारशी मोठी नव्हती, पण अब्दुलच्या चेहऱ्यावरचं हास्य मात्र नेहमीपेक्षा जरा वेगळं होतं.