डॉ. प्रिया गुमास्ते
मागील भागात आपण आयुर्वेद (Ayurveda) ऋतुचर्या म्हणजे काय, हे समजून घेतले. आता ऋतूंनुसार आपण आपल्या जीवनशैलीत कोणते बदल करायचे आणि ते का करायचे, ते पाहू.
सूर्याच्या स्थितीनुसार वर्षाचे दोन भाग (काल) केले जातात. आदान काल (उत्तरायण) आणि विसर्ग काल (दक्षिणायन). आदान म्हणजे शोषणे किंवा काढून घेणे आणि विसर्ग म्हणजे देणे.
आदान काळ
आदान काळ म्हणजे सूर्याचा उत्तरायण काळ. सूर्य जेव्हा उत्तर दिशेकडे सरकतो. आदान काळात, शिशिर (Winter), वसंत (Spring) आणि ग्रीष्म (Summer) या तीन ऋतूंचा समावेश होतो.
तत्र रविर्भाभिरादानो जगतः स्नेहं वायवस्तीवृक्षाश्चोपशोषयन्तः शिशिरवसन्तग्रीष्मेषुक्रमं रौक्ष्यमुत्पादयन्तो रुक्षां रसांस्तिकषायकटंशचाभिवर्धयन्तो नृणां दौर्बल्यमावहन्ति ||6||
अर्थ : आदानकालात सूर्य त्याच्या उष्ण किरणांसह वातावरणातील आर्द्रता शोषून घेतो. अति कोरड्या वाऱ्यामुळे, त्याच्या शोषक गुणामुळे शिशिर, वसंत आणि ग्रीष्म ऋतूंमध्ये हळूहळू कोरडेपणा येतो, ज्यामुळे अनुक्रमे तिक्त, कषय आणि कटू रस यांचे प्राबल्य वाढते आणि या तिन्ही ऋतूंमध्ये मानवांमध्ये हळूहळू अशक्तपणा वाढतो.
हेही वाचा – आयुर्वेद म्हणजे जीवनाचे विज्ञान
या काळात, सूर्याची उष्णता आणि वारा अधिक शक्तिशाली होतात, ज्यामुळे वातावरणातील आणि शरीरातील जलांश कमी होतो आणि उष्णता वाढते.
विसर्ग काळ
या काळात वर्षा (पावसाळा), शरद आणि हेमंत या तीन ऋतूंचा समावेश होतो. विसर्ग काळ हा सूर्याचा दक्षिणायनाचा काळ. सूर्याचे दक्षिण दिशेस सरकणे सुरू होते. भारत हा उत्तर गोलार्धात (Northenden hemisphere) असल्यामुळे दक्षिणेकडे सरकणाऱ्या सूर्याचा प्रभाव कमी होतो. पावसामुळे वातावरणातील तसेच शरीरातील द्रव अंश वाढतो आणि स्निग्धता बल वाढते, विसर्ग कालामध्ये वर्षा ऋतूत अल्प, शरद ऋतूत मध्यम, हेमंत ऋतूत उत्तम बलवृद्धी होते.
दोष आणि ऋतूचा संबंध
आयुर्वेदानुसार माणसाचे शरीर हे वात, पित्त आणि कफ या तीन दोषांचे बनलेले आहे. या दोषांचा समतोल राखणे म्हणजेच निरोगी राहणे. म्हणून कोणत्या काळात कोणता दोष वाढतो, हे समजून त्यानुसार आहारामध्ये फरक करणे गरजेचे असते.
- उन्हाळ्यात वात दोष जमा होतो आणि पावसाळ्यात तो वाढतो.
- पित्त दोष पावसाळ्यात जमा होतो आणि शरद ऋतूमध्ये वाढतो.
- कफ दोष हिवाळ्यात जमा होतो आणि वसंत ऋतूमध्ये वाढतो.
ऋतुचर्येचे पालन करण्याचे फायदे
आयुर्वेदात हे दोन काळ आणि त्यांच्याशी संबंधित ऋतू समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण ते बदलत्या बाह्य वातावरणाचा आपल्या शरीरावर कसा परिणाम होतो, याबद्दल माहिती देतात आणि ती मिळाल्यामुळे वर्षभर आपल्या आहार आणि विहारात योग्य तो बदल करण्यास मदत होते. ऋतूंनुसार आपण आपल्या जीवनशैलीत बदल करतो, तेव्हा आपल्या शरीराची नैसर्गिक संरक्षण यंत्रणा किंवा रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. तसेच सध्या वाढीस असणार्या मधुमेह (diabetes), हृदयविकार इत्यादी lifestyle diseases ला आळा घालायला मदत होईल.
हेही वाचा – आयुर्वेद अन् ऋतुचर्या
क्रमश:
(आयुर्वेदिक फिजिशियन आणि कॅन्सर कन्सलटन्ट)
(Mobile : 9819340378)