पराग गोडबोले
नेहमीप्रमाणेच रविवार उजाडला आणि न्याहारी आणण्यासाठी बाहेर पडलो, कारण बायकोला अतोनात कंटाळा आला होता, सकाळी उठून काही करायचा. काय आणायचं? इडली, वडे, डोसे, खिचडी, उपमा आदी पदार्थ खाऊन कंटाळा आला होता म्हणून म्हटलं, आज अप्पम आणू.
डोंबिवलीला, नेहरू मैदानाच्या प्रवेशद्वारासमोर अगदी छान अप्पम मिळतो. पोहोचलो तिथे, नेहमीप्रमाणे गर्दीत उभा राहिलो आणि समोर बघतो तर काय… पलीकडच्या बाजूला अगदी ठसठशीतपणे लिहिलेली, ‘दडपे पोहे’ अशी पाटी दृष्टीस पडली. चाळवली गेली जिज्ञासा माझी आणि रस्ता ओलांडून पलीकडे गेलो पटकन! असे दडपे पोहे विक्रीला ठेवलेले पहिल्यांदाच अनुभवत होतो.
जामानिमा नव्हता जास्त. एक छोटंसं टेबल… त्यावर पोह्यांचं भांडं आणि शेजारी दुसऱ्या टेबलावर कप्पे असलेल्या प्लॅस्टिकच्या डब्यात कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, खोबरं असे इतर जिन्नस…
माझ्यासारखेच दोन-तीन जण आणखी उभे होते, हे नाविन्य बघत! मी पण विचारलं, “केवढ्याला आहेत पोहे?”
“पंचवीस रुपये काका,” पटकन उत्तर आलं.
आवाज ओळखीचा वाटला म्हणून डोक्यावर धरलेली छत्री बाजूला सारत मी आवाजाच्या दिशेने बघितलं आणि… “चिन्मय तू?” असं पटकन निघून गेलं तोंडून.
“हो काका, मीच आहे आणि ही माझी बायको हर्षदा. नवीन काहीतरी करायचा प्रयत्न करतोय. बाकी सगळं मिळतंय विकत, पण दडपे पोहे नाही दिसले कुठे, म्हणून एक वेगळा प्रयोग… बघा आवडतायत का तुम्हाला?”
हेही वाचा – Indra Nooyi Book : सॅनिटरी पॅड, एक प्रवास….
चिन्मयचे बाबा माझे परिचित. म्हणजे तसं सगळं कुलकर्णी कुटुंबच आमच्या परिचयातलं आणि त्याच कुटुंबातला, स्वतः अभियंता असलेला चिन्मय आणि त्याची पदवीधर बायको वेगळं काहीतरी करताना दिसले, म्हणून अप्रूप वाटलं खूप.
“तीन आठवडे झाले, दर शनिवारी आणि रविवारी आम्ही इथे उभे राहून दडपे पोहे विकतोय. आमच्या कोकणातला अगदी खास पदार्थ. आवडतायत लोकांना आणि चांगला प्रतिसाद सुद्धा मिळतोय!”
“आमच्या नाही, आपल्या कोकणातला म्हण, मी पण कोकणस्थच.” माझी मल्लिनाथी!
दोघांचंही मला खूप कौतुक वाटलं. रस्त्यावर उभं राहून विक्री करताना, ‘हा काय म्हणेल, तो काय म्हणेल,’ याची तमा न बाळगता, लाज वाटून न घेता पाय रोवून उभं राहणं, म्हणजे खरोखर वेगळंच धाडस, सगळ्यांना न जमणारं!
“छोटीशी सुरुवात. बरेच, बरे-वाईट अनुभव येतील, त्यातून तावून-सुलाखून, टक्केटोणपे खाऊन, संघर्ष करून… पुढे जाण्यातच यश दडलेलं आहे,” असं मी त्यांना म्हणालो. हसले दोघंही, मनापासून.
“आणखी काही मराठमोळे पदार्थ पण सुरू करायचा विचार आहे हळूहळू. थोडासा जम बसला की! एखादं छोटंसं दुकानही घेऊ आणि तिथे सुरू करू.”
हेही वाचा – Sanitary pads : विल्हेवाटीची समस्या अन् सामाजिक प्रगल्भतेची गरज
हर्षदाच्या डोळ्यात स्वप्नं होती, उद्याच्या उज्ज्वल भविष्याची… आत्मविश्वास पण होता काहीतरी करून दाखवण्याचा… आणि तोलामोलाची साथ पण होती चिन्मयची.
दोन प्लेट पोहे सांगितले मी. तिथल्या तिथे सगळे जिन्नस एकत्र करून, नीटसपणे बांधून पुडी माझ्या हातात आली.
“आवडतीलच तुम्हाला, पण अभिप्राय नक्की द्या,” असं हसतमुख आर्जवही आलं सोबत.
त्या दाम्पत्याला अगदी मनापासून शुभेच्छा देऊन, पोह्यांचं ते गोड ओझं घेऊन मी घरी पोहोचलो. घरी गेल्यावर, अप्पमऐवजी दुसरंच काहीतरी पाहून जरा तोंड वाकडं झालं, पण मग दडपे पोहे आहेत म्हटल्यावर ते लगोलग खुललं सुद्धा. आम्ही मनसोक्त आस्वाद घेतला पोह्यांचा आणि ‘अन्नदात्री सुखी भवं’ म्हणत तृप्त झालो.
मनातल्या मनात, ‘यशस्वी भव’ असा आशीर्वाद परत एकदा दिला त्या दोघांनाही आणि चहाचं आधण ठेवायच्या तयारीला लागलो. रविवार होता ना, चहा करायचं दायित्व माझं असतं त्या दिवशी! मनं जिंकण्याचा मार्ग पोटातून जातो, हे पटलं मला तंतोतंत.
रविवारची सुरुवात मस्त झाली होती आणि हाच माझा अभिप्राय, मनापासून दिलेला.