दीपक तांबोळी
भाग -2
सरकारी नोकरीतील 39 वर्षांच्या सेवेनंतर मकरंद कापडे निवृत्त झाला. कोरोना काळातच निवृत्त झाल्याने केवळ पाच जणांच्या उपस्थितीत त्याचा निरोप समारंभ झाला. जड अंत:करणाने तो घरी आला. त्याच्या हाताखालच्या एकाही इंजीनियरने त्याची भेट घेतली नव्हती किंवा साधा फोनही केला नव्हता. इतकं सगळ्यांशी चांगलं वागूनही लोकांनी साध्या शुभेच्छा देण्याचंही सौजन्य दाखवलं नव्हतं. काय कारण असेल? असा तो विचार करत होता.
“साहेब सूर्यवंशी साहेब आलेत…” मुरली म्हणाला. तशी त्याची तंद्री भंगली. त्याने दाराकडे पाहिलं, सूर्यवंशी हातात बुके घेऊन उभा होता.
“या, या, सूर्यवंशी!”
सूर्यवंशी चेहऱ्यावर मोठं हसू घेऊन आत आला. “सॉरी साहेब, आज आपल्या ऑफिसमधला एक जण कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यामुळे सिक्युरिटीने आँफिसमध्ये येऊच दिलं नाही. आम्ही सगळेच इंजिनीअर्स, सुपरव्हायझर्स आलो होतो तुम्हांला भेटायला…”
“असंय का? पण मग मला कसं कळलं नाही?”
“तुमचा आजचा शेवटचा दिवस. तुम्हाला बॅड न्यूज कशाला द्यायची म्हणून कुणी सांगितलं नसेल… असो. पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा सर!” बुके हातात देत सूर्यवंशी म्हणाला.
“थँक्स.”
“एक मिनिट सर” अचानक तो बाहेर गेला आणि परत आला तेव्हा त्याच्या हातात एक छानशी ब्रिफकेस होती.
“सर माझ्याकडून छोटीशी भेट…”
“याची काय गरज होती सूर्यवंशी?”
“असं कसं म्हणता सर? तुम्ही आमच्याशी नेहमीच फ्रेंडली वागलात. आमच्याकडून चुका झाल्या तरी त्या पोटात घातल्या. कधी मेमो दिले नाहीत…” सूर्यवंशींला एकदम गहिवरून आलं. मग टेबलवर ठेवलेल्या ग्लासातल्या पाण्याचे दोन घोट पिऊन त्याने स्वतःला सावरलं.
“तुम्ही जाणार, या कल्पनेनेच कसंतरी होतंय सर…”
“थँक्यू, सूर्यवंशी”
मग सूर्यवंशी एकदम उभा राहिला. हात जोडत म्हणाला, “सर मी येऊ? बाहेर आपले सर्व इंजिनीअर्स आणि सुपरव्हायझर्स उभे आहेत. जमाव करायचा नाही म्हणून एकेकाला सॅनिटाइझ होऊन आत यावं लागतंय. मी एकटाच बोलत बसलो तर सगळ्यांना उशीर होईल.”
“बरं, बरं…”
“सर, पुन्हा एकदा पुढील आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा…”
तो गेला आणि एकापाठोपाठ इंजिनीअर्स आणि सुपरव्हायझर्स येऊ लागले. प्रत्येक जण काही ना काही गिफ्ट घेऊन आला होता. इतरही डिपार्टमेंटचे इंजिनीअर्स आले होते. सगळेच त्याच्या वागण्याची, स्वभावाची स्तुती करत होते. त्याच्यासारखा अधिकारी परत कधी होणार नाही, याचा सतत उल्लेख करत होते.
ते निघून गेल्यावर तो मुरलीला म्हणाला, ” आता कुणी नाही ना? नसेल तर स्वयंपाकाला लाग. मला भूक लागलीय”
मुरली हसला… “साहेब आज काही तुम्हाला लवकर जेवायला मिळत नाही. बाहेर हीss मोठी लाइन लागलीये!”
“काय सांगतोस काय?” त्याचा विश्वास बसेना!
“मग साहेब. आपल्या कॉलनीचा सिक्युरिटी गार्ड एकेकालाच पाठवतोय. आता आपल्या स्टाफचे लोक येताहेत.”
ते ऐकून त्याच्या मनावरचं मळभ, अस्वस्थता हळूहळू दूर होऊ लागली.
आता स्टेनो, क्लार्क, शिपाई एकेक करून येऊ लागले. प्रत्येकाकडून गिफ्ट घेताना तो अवघडून गेला. पण दुकानं बंद असताना या लोकांनी ही गिफ्ट्स आणली कुठून, याचं त्याला आश्चर्य वाटत होतं. त्याने एकाला तो प्रश्न केलाच…
“साहेब काही जणांनी मार्चमध्येच लॉकडाऊन सुरू होण्याअगोदर घेऊन ठेवली होती. बाकीच्यांनी ओळखीच्या दुकानदारांकडून मागच्या दारातून घेतली. काहींनी ऑनलाइन मागवली…”
हेही वाचा – निरोप समारंभ… फक्त खुर्चीलाच मान!
थोड्या वेळाने देवळे गिफ्ट म्हणून बुके आणि ऐतिहासिक पुस्तकांचा सेट घेऊन आले. देवळेंशी त्याला बरंच बोलायचं होतं, म्हणून त्यांना त्याने सोफ्यावर बसायला सांगितलं.
“साहेब ठेकेदार पोपटाणी आलेत,” मुरली म्हणाला; तसा त्याला धक्काच बसला. दुसऱ्याच क्षणाला पोपटाणी हजर झाला. पोपटाणी कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचा अध्यक्षही होता.
“सर जी नमस्ते और कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन की तरफ से आप को रिटायरमेंट लाइफ की बहुत बहुत शुभकामनाएँ…” पोपटाणी हात जोडत म्हणाला.
“आईये पोपटणी जी बैठीये. सॉरी, आप का बिल मैं सँक्शन नहीं कर सका…”
“कोई बात नहीं सर जी. मैंने तो बडे साहब को भी मना कर दिया था. क्योंकी काम पूरा नहीं हुआ था और हमें पता था आप जैसे ईमानदार अफसर अधुरे काम के बिल अप्रूव्ह नहीं करते…”
” ताने मार रहे हैं क्या?”
“नहीं सर जी. सच कह रहे हैं. उल्टा हमें आप पर गर्व है की, आप बिकाऊ नहीं थे. जो बिकते हैं, उन्हीं को खरीदा जा सकता हैं. आज आप जैसे ईमानदार अफसरो की ही जरुरत हैं, साहब. क्यों देवले बाबूजी सही हैं ना?”
देवळेंनी हसत हसत मान डोलावली. तेवढ्यात एक माणूस मोठी सुटकेस घेऊन आला. ती सुटकेस मकरंदच्या हातात देत पोपटाणी म्हणाला, “सर जी आपने हम से कभी कुछ लिया नहीं, अब इसे मना मत कीजिये…”
“पोपटाणी जी मैं सरकारी नौकर हूँ. आप से गिफ्ट लुंगा तो व्हिजिलन्स केस हो जायेगा मेरे ऊपर…” तो आढेवेढे घेत म्हणाला.
“अभी आप रिटायर्ड हैं. दुसरा यह कि, हमने आप को प्रेम से दिया हैं, ना कि किसी बिल को साइन करने के बदले में दिया हैं. बेफिकर रहिये साहब. कुछ नहीं होगा!”
“धन्यवाद पोपटाणी जी…”
” धन्यवाद तो आप का करना चाहिए साहब… आप ने कभी क्वालिटी पर कॉम्प्रमाइज नहीं किया. काम की क्वालिटी मिली आपने कभी बिल को रोका नहीं. जैसा दुसरे पैसों के लालच में करते हैं. हम भी आप जैसे आँफिसर ही चाहते हैं साहब… लेकीन क्या करे जमाना बडा खराब हैं. अच्छा साहब, मैं निकलू? बडी लंबी लाइन लगी हैं बाहर. यह सभी लोग आप को चाहने वाले है साहब… यह सेंड ऑफ की फॉरमॅलिटी नहीं निभा रहे हैं! नमस्ते.”
चार-पाच क्लार्क भेटून गेल्यावर त्याच ऑफिसमधला शिपाई सुनील आला. एक मोठा बॉक्स मकरंदच्या हातात देऊन त्याने नमस्कार केला.
“अरे, हे एवढं जड काय दिलंस मला?”
“सर, काही नाही, एक मिक्सर आहे!”
“अरे बापरे! अरे, याची काय गरज होती? एखादं गुलाबाचं फुलंही मला चाललं असतं…”
“नाही साहेब, आजपर्यंत इतके साहेब आले आणि गेले. मी कोणत्याच साहेबाला कधीच काही दिलं नाही, द्यायची इच्छाच झाली नाही. पण साहेब तुम्ही लई जीव लावला बघा…”
आणि तो एकदम रडू लागला. मकरंदने त्याच्या पाठीवर थोपटलं… “बस, बस शांत हो…”
“साहेब, तुम्हांला आठवतं. एकदा तुम्ही रविवारीही कामावर आलता. तुमचा स्वयंपाकी गावी गेलता म्हणून तुमचा डबा नव्हता. मी तुम्हाला म्हटलं, साहेब, माझ्या डब्यातल्या दोन पोळ्या खावा. तुमी म्हटलं ये आपण टेबलवर बसून एकत्र जेवू. पण माझी हिंमत होईना. मी टेबलवर बसायला नाही म्हणालो तर, तुम्ही जमीनीवर बसून माझ्यासंगं जेवण केलतं. एवढा मोठा साहेब माझ्या भावासारखा माझ्यासोबत खाली बसून जेवला. मला लई कवतिक वाटलं साहेब. वेळप्रसंगी मला पैशाची बी लई मदत केली तुम्ही. तुमची लई आठवण येईल साहेब…”
“कधी नागपूरला आलास की, जरूर घरी ये सुनील!”
“व्हय साहेब…”
रात्री साडेअकरा वाजेपर्यंत लोक येत होते. छोटे-मोठे गिफ्ट्स देत होते. बरेच शेजारचेही आले होते. स्टाफच्या चार-पाच महिलाही आल्या होत्या. एका महिलेने गिफ्ट द्यायला काही मिळालं नाही म्हणून चक्क त्याच्यासाठी स्वेटर विणून आणलं होतं. शेवटचा माणूस निघून गेल्यावर देवळे म्हणाले, “बघा साहेब, तुम्हाला वाटलं असेल माझा सेंड-ऑफ कुणी केला नाही. हा खरा मनातून दिलेला सेंड-ऑफ होता. पटलं ना?”
मकरंद हसला. म्हणाला, “खरंय. मनाला खूप वेदना होत होत्या. आता मी समाधानाने इथून जाऊ शकेन… सॉरी तुम्हाला थांबवून ठेवलं. एक काम होतं तुमच्याकडे…” असं म्हणून तो उठला. आतमध्ये जाऊन बाहेर आला, तेव्हा त्याच्या हातात चेक होता.
हेही वाचा – प्रगल्भ जाणीवेचा ‘मदर्स डे’
“देवळे रिटायरमेंटच्या सगळ्या स्टाफला एक जंगी पार्टी देण्याची मला इच्छा होती. पण कोरोनामुळे ते शक्य झालं नाही. चार-पाच महिन्यांत किंवा हे कोरोनाचं प्रकरण निवळल्यानंतर या सगळ्या लोकांना माझ्यातर्फे एका चांगल्या हॉटेलमध्ये पार्टी देऊन टाका. हा पन्नास हजाराचा चेक ठेवा तुमच्याजवळ. अजून लागले तर सांगा…”
देवळेंनी चेककडे पाहिलं आणि तो परत त्याच्याकडे देत म्हणाले, “साहेब तुम्ही नसताना पार्टी करणं आम्हांला आवडेल का? उलट तुम्हीच हे कोरोना प्रकरण आटोपलं की, तुमच्या फुरसतीने तारीख कळवा. आम्ही पार्टी ॲरेंज करू. मात्र तुम्हाला सहकुटूंब यायचं आहे!”
“देवळे खुर्ची गेली की, माणूस विसरला जातो. पाच-सहा महिन्यांनी तुम्ही मला ओळखही दाखवणार नाहीत!”
“तुम्ही म्हणता ते खरं आहे, पण तुमच्याबाबतीत तसं होणार नाही. खात्री बाळगा.”
“बरं. पण हा चेक तर ठेवा…”
“साहेब, पैसे आहेत आमच्याकडे. तुम्हाला सेंड-ऑफची पार्टी द्यायची म्हणून आम्ही जानेवारीपासूनच पैसे जमा करायला सुरुवात केली. सर्वांनी अगदी उत्स्फूर्तपणे पैसे काढून दिले. इतक्या साहेबांना आम्ही सेंड-ऑफ दिला. पैसे जमवताना फार कटकटी व्हायच्या. हा पहिला अनुभव आहे की, कटकटीविना पैसे जमा झालेत!”
“देवळे खरंच तुम्हाला मानावं लागेल…”
“मला नाही, तुम्हाला मानावं लागेल. तीन वर्षांत तुम्ही पैसा नाही, पण प्रेम कमावलंत. बघितलं ना किती स्वयंस्फूर्तीने लोक आले होते. मोठ्या साहेबांनी ही लाइन पाहिली असती तर, तुमची खरी किंमत त्यांना कळली असती!”
“हं जाऊ द्या… संपला आपला संबंध मोठ्या साहेबांशी.”
देवळे म्हणाले, “तुमच्या ट्रान्सपोर्टवाल्याशी बोलून एक छोटी गाडी या गिफ्ट्ससाठी मी ॲरेंज केलीय. तुमच्या कुटुंबीयांना सांगून ठेवा. ते प्रीकॉशन घेऊनच सगळं सामान घरात घेतील. चला आता मी येऊ?”
“खरंच खूप खूप धन्यवाद देवळे. तुम्ही खूप काळजी घेतलीत माझी…”
“धन्यवाद साहेब. हे फक्त तुमच्यासाठी. ओळख ठेवा. हॅप्पी रिटायर्ड लाइफ…”
देवळे गेल्यावर त्याने मुरलीला हाक मारली. मुरली बाहेर आल्यावर त्याला म्हणाला, “तुलाही खूप उशीर झालाय. सकाळी लवकर यायचंय. तू जा. मी भाजी गरम करून जेवून घेईन…”
“साहेब, तुम्ही सगळ्यांकडून गिफ्ट घेतलंत, माझं गिफ्ट तर राहिलंच!”
तो हसला, “आता तू कशाला गिफ्ट देतोयेस? तीन वर्षं तू मला खूप छान स्वयंपाक करून प्रेमाने जेवू घातलं, ते गिफ्टच तर होतं. तीन वर्षांत माझं वजन चांगलंच वाढवलंय तू!”
“काही नाही साहेब, छोटीशीच गिफ्ट आहे…” असे म्हणत मुरलीने खिशातून एक छोटीशी डबी काढली. मकरंदचे डोळे विस्फारले!
” हे काय मुरली? हे सोन्याचं दिसतंय!”
“पाच ग्रॅमची चेन आहे, साहेब…”
“अरे वेड लागलं की काय तुला? पाच ग्रॅमची चेन! नाही मी अजिबात घेणार नाही…”
“साहेब नाही म्हणू नका. माझी शपथ आहे तुम्हाला…”
” अरे, पण कशासाठी एवढा खर्च?”
“साहेब माझ्या दोन्ही मुलांना तुम्ही नोकरीला लावलंत. एक रुपयासुद्धा घेतला नाहीत. वीस-पंचवीस लाख खर्च करूनही अशा नोकऱ्या मिळत नाहीत!”
“अरे, मी फक्त शब्द टाकला. मला कुठे पैसे खर्च करावे लागले?”
” माझ्या बायकोचं मोठं ऑपरेशन झालं. तुम्ही एका मिनिटात एक लाख रुपये काढून दिले…”
“पण ते पैसे तू फेडले ना!”
“पण त्याचं व्याजही तुम्ही घेतलं नाही…”
“अरे, आपल्या माणसाकडून कुणी व्याज घेतं का?”
” घेतात साहेब. माझ्या भावाकडून मी एकदा पन्नास हजार घेतले होते. त्याने माझ्याकडून तीन वर्षाचं व्याज मागून घेतलं होतं!”
मकरंद नि:शब्द झाला. मुरली पुढे आला… त्याने ती चेनची डबी त्याच्या हातात ठेवली. खाली वाकून पाया पडू लागला, तसं मकरंदने त्याला उचलून छातीशी धरलं.
“साहेब, तुमची लै आठवण येईल…” मुरली रडतरडत म्हणाला
“मला सुद्धा”
“साहेब, एक विनंती आहे. माझ्या सगळ्या कुटुंबाला तुम्हाला भेटायचं आहे. उद्या सकाळी बोलवू?”
” अरे बोलव ना. त्यात काय विशेष!”
“साहेब, आता शेवटची विनंती. मी भाजी गरम करतो जेवून घ्या. रात्रीचे बारा वाजलेत…”
“मुरली तुमच्या सर्वांच्या प्रेमानेच माझं पोट भरलंय. पण आता तू आग्रह करतोच आहेस तर, घेतो जेवून!”
सकाळी मुरली त्याची बायको, दोन मुलं, मुलगी यांना घेऊन आला होता. सगळे मकरंदच्या पाया पडले. मुरलीच्या बायकोने त्याच्यासाठी डबा करून आणला होता. शिवाय, लाडू, चिवडा असे बरेच काही पदार्थही होते. कोरोनाची साथ सुरू असताना असे दुसऱ्याच्या घरचे पदार्थ खायचे नसतात, हे त्यांना सांगायला मकरंदच्या जीवावर आलं. त्याने ते ठेवून घेतलं. ड्रायव्हर आल्यावर तो गाडीत जाऊन बसला. गाडी सुरू झाली आणि त्याचा मोबाइल वाजू लागला…
“साहेब, हॅप्पी जर्नी आणि बेस्ट ऑफ लक फॉर युवर रिटायर्ड लाइफ…” देवळे बोलत होते. तो पुढे जात होता आणि कॉलवर कॉल सुरू झाले होते. शुभेच्छांना उत्तर देतादेता त्याला गहिवरून येत होतं. या अप्रतिम सेंड-ऑफला तो कधीच विसरू शकणार नव्हता.
(समाप्त)


