Wednesday, July 30, 2025

banner 468x60

Homeफिल्मीखुद खुदा ने आपकी सवारी की...

खुद खुदा ने आपकी सवारी की…

नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते!

आज थोडा वेगळा विषय आहे. सेक्युलॅरिझम वगैरे नाही; पण मी जात, धर्म विशेष मानत नाही. मी जन्माने हिंदू आहे. मला माझ्या धर्माचा अभिमान आहेच आहे. पण म्हणून मी दुसऱ्या धर्मांना कमी लेखणे किंवा अपमानास्पद वागवणे, या गोष्टी मला पटत नाहीत अन् आवडतही नाहीत. माणसाकडे माणूस म्हणून बघणे महत्त्वाचे नाही का?

तर, आज एक आठवण सांगते… रमझानची!

मी मढ येथून कधीच रात्री 11-11.30 वाजल्यानंतर ऑटोने एकटी घरी येत नाही. कितीही दमले असले तरी, बेस्ट झिंदाबाद. तोच प्रवास मला सेफ वाटतो. साधारणत: 10 वर्षांपूर्वी मी ‘बेइंतहा’ हिंदी सीरियलमध्ये काम करत होते. शूटच्या तारखा सलग नव्हत्या, मधे मधे होत्या. अशाच एका रात्री माझं पॅकअप झालं. ऑगस्ट महिना होता. भरमसाठ पाऊस पडत होता. किती वाजले हे मी पाहिलं सुद्धा नाही. प्रॉडक्शनच्या सहकाऱ्यानं स्पॉटदादांना सांगितलं, ‘छत्री लेके मॅडम को छोडके आना… रिक्षा में बिठा देना…’

स्पॉटदादा आणि मी, आम्ही दोघे बाहेर आलो. आइस फॅक्टरीच्या बस स्टॉपपाशी आम्ही उभे राहिलो. तिथे एकच रिक्षा उभी होती. आजूबाजूला कोणीच नव्हतं. दादांनी आवाज दिला. कोई है क्या? आणि एक माणूस धावतच आला. कुठे जायचंय? त्यानं विचारलं आणि तो रिक्षामध्ये बसला.

स्पॉटदादा निघून गेले.

मी रिक्षामध्ये नजर फिरवली. पूर्ण ग्रीन फर्निश… चांद-तारा, ताजियाचे चित्र लटकत होते. उर्दूमध्ये काहीतरी लिहिलं होतं. लोबान लावला होता.

रिक्षा सुरू झाली. मी हळूच पर्समध्ये फोनला टच केलं… बापरे! पाऊण तरी वाजला होता. एवढ्या रात्री मी एकटीच रिक्षाने घरी चालले होते. तेही भरपावसात निघाले होते. थोडीशी नाही, खरंतर जास्तच घाबरले होते. पण भीती चेहऱ्यावर आणू शकत नव्हते.

रिक्षावाले दादा मस्त गप्पांच्या मोडवर होते. मीसुद्धा म्हटलं, या गप्पांमुळं मन जरा डायव्हर्ट होईल.

त्याचं नाव मोहम्मद. मला माझ्या घरी सोडून, रिक्षा बोरिवलीला पार्क करून ते कल्याणला त्यांच्या घरी जाणार होते. ‘काही स्पॉट असे आहेत, जिथे कोणी हात दाखवला तरी गाडी थांबवू नका…’ वगैरे वगैरे असं ते मधे मधे बोलत होते. मग म्हणाले की, पुन्हा कधी रात्री असा उशीर झालाच तर काळजी करू नका… आइस फॅक्टरीच्या स्टॉपजवळ उभे राहून फक्त जोरात हाक मारा – ‘मोहम्मद भाई’. मी लगेच येईन!

मी जरा खूश झाले. पण गेल्या सुमारे 10 वर्षांत मला कधीच पॅकअपला एवढा उशीर झाला नाही. शिवाय, ती रिक्षाही मला कधी दिसलीच नाही. एकूणच त्या मोहम्मद भाईला भेटण्याचा योगच आतापर्यंत आला नाही!

ही घटना मी नेहमीच प्रवासादरम्यान जे मुस्लिम ड्रायव्हर असतात, त्यांना सांगत असते. बऱ्याच जणांनी एकच सांगितलं की, आपका वक्त खराब था. शायद आपके साथ कुछ बुरा होनेवाला था. खूप पुण्य केलंय तुम्ही. खुद खुदा ने आपकी सवारी की. इसलिए बला टल गई.

यावर विश्वास ठेवायचा की नाही? हा मानण्याचा भाग आहे. पण हे सगळं ऐकून भारावून जायला होतं…

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. हर्षा ते गुप्ते यांची खुद खुदाने आपकी सवारी की हा लेख वाचला मनाला खूप भावला अगदी खर आहे परमेश्वर कोणाच्याही रूपात धावून येतो यावर माझा विश्वास आहे खूप छान लिहिलंय सत्यकथा मनाला भावली रुचली आणि अशा बऱ्याच आठवणींमध्ये मी ही रमले खूप खूप शुभेच्छा हर्षाताई तुम्हाला खूप जवळून पाहता आलं एका शॉर्ट फिल्मच्या निमित्ताने आणि मी तुमच्या प्रेमात पडले. जमिनीवर घट्ट पाय रोवून उभे राहणारी ही माऊली. 🌹🙏🏻

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!