हिमाली मुदखेडकर
सकाळच्या वेळेस मुलखाची घाई… स्वयंपाकघरातील नित्यावळी आटोपता आटोपता जीव मेटाकुटीला आलेला… अशात दारावरची बेल वाजली की, सहाजिकच कपाळावर आठी पडते… ती लपवत दार उघडलं… तर आश्चर्याचा सुखद धक्काच बसला…!
दारात सृष्टी उभी!!
सृष्टी… माझी मैत्रिण… पूर्वीची शेजारीण… दोन-तीन वर्षांच्या शेजार सहवासात खूप छान कौटुंबिक जिव्हाळा निर्माण झालेला आमच्या दोन्ही कुटुंबात… तीही माझ्यासारखीच, गृहिणी! दुपारी चहा घेता घेता आमच्या रोज गप्पा चालत तेव्हा… एकमेकींकडे पदार्थांच्या वाट्या पोहोचवणे, हा तर नित्यक्रम होता… पुढे मुलाला कॉलेज दूर पडते म्हणून आम्ही जागा बदलली. पण अधून मधून एकमेकींना भेटत बोलत होतोच…
हेही वाचा – सुलू… हवी मायेची गुंतवणूक!
“तुझं आवर तू… तोवर मी काकूंशी बोलते…” आत येता येता ती म्हणाली आणि सरळ आईच्या खोलीकडे मोर्चा वळवला तिने!
मुलाला डबा, नाश्ता देऊन… मी ओटा आवरता आवरता चहा टाकला… तिला आवडतं म्हणून खास चहाचा मसालाही घातला त्यात! तेवढ्या तीही आलीच किचनमध्ये… डायनिंग टेबलवरील क्रॉकरीमधून तीन बाऊल घेतले तिने… आणि घरून सोबत आणलेला डबा उघडून त्यातील दहीवडे त्यात सर्व्ह केले. वरून छान चाट मसाला… चिंच चटणी… कोथिंबीर घालून… मला आवडते तसेच सजवून बाऊल हातात दिला…
माझ्याकडे थेट पाहात, हसत म्हणाली… “हॅप्पी बर्थडे!”
दहीवडा हा आम्हा दोघींचाही वीक पॉइंट… आणि आम्हाला जोडणाऱ्या अनेक समान दुव्यांपैकी एक…
गेल्या काही वर्षांत व्यापात अडकून काही गोष्टी मागे पडल्या होत्या… त्या स्वतःसाठी करायच्या राहून गेल्या होत्या… स्वतःलाही महत्त्व द्यायचे असते, हे मी विसरत चालले होते…
हेही वाचा – आयुष्याचं गणित बरोब्बर सोडविणारी… वनिता
तिचे हे दहीवडे मला खूप सुखावून गेले… काहीतरी हरवलेले सापडल्याचा आनंद देऊन गेले… माझ्या डोळ्यात तरळलेले पाणी पाहून तिने नजरेनेच, “काय…?” असे खुणावले.
न रहावून मी मिठीच मारली तिला… अशी एक गोड मैत्रीण हवीच… जी असे आश्चर्याचे छोटे सुखद धक्के देऊन लज्जत वाढवते आयुष्याची! अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून केवढं मोठं पाठबळ देते ती… याची कदाचित तिलाही कल्पना नसावी!!
विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,
IXZVpuvKFwKH6gb0NBN51t?mode=r_c
या लिंकला क्लिक करून WhatsApp group जॉइन करा.



खूपच छान