दतात्रय पांडुरंग मानुगडे
भाग – 2
सर्वसाधारणपणे 1985ची ही कथा. मिरजेच्या मीरासाहेब दर्ग्याबाहेर भिंतीला टेकून एक म्हातारा बसलेला दिसला. तो तब्बल 40 वर्षांनंतर बोलला, तोही माझ्याशी. आसपासच्या सर्वांनाच आश्चर्य वाटले. हॉटेलातून मी त्याच्यासाठी जेवण आणलं… विशेष म्हणजे, माझ्याबद्दल त्याला सर्व माहिती होती!
मी आजोबाला परत म्हणालो, “मी तुम्हाला आजोबा म्हटलं तर चालेल का?”
“मेरे को तू बाबा बोल, तेरे लिये मै बाबा है…,” आजोबा म्हणाले.
आजोबाजवळ बसलेली माणसे आपापल्या घरी गेली. पुढे बिस्मिल्ला खानावळ होती, मी तिथे गेलो आणि त्या हॉटेलवाल्याला सांगितले, “या आजोबांना सकाळी नाष्टा आणि संध्याकाळी जेवण देत चला. त्याच्यासाठी मी तुम्हाला पाचशे रुपये ऍडव्हान्स देतो. पैशांची काही काळजी करू नका. माझा पगार नऊ तारखेला होतो. त्यांना उपाशी ठेवू नका, त्यांच्या जेवणाचे पैसे मी देत जाईन.”
तो हॉटेलवाला म्हणाला, “ठीक आहे, मी जेवण, नाश्ता देत जाईन.”
मी हॉटेलमधून बाहेर आलो आणि सरळ कपड्याच्या दुकानात गेलो. आजोबासाठी पांढरा कपडा खरेदी केला. त्या रस्त्याच्या डाव्या बाजूला एक टेलर होता. त्या टेलरला म्हणालो, “ते पुढे आजोबा दिसतात? त्यांच्या मापाचे कपडे शिवा.” त्याने मान हलवली आणि दोन दिवसांत त्या आजोबाला कपडे देतो, असे तो म्हणाला.
परत मी त्या आजोबाला आंघोळ घालण्यासाठी एक माणूस तयार केला. त्या आजोबाला साबण लावून रोज आंघोळ घालायला सांगितली. या कामाबद्दल महिन्याला दीडशे रुपये ठरविले. तो माणूस म्हणाला, “ठीक आहे, मला सुद्धा कोणी नाही. माझी बायको एक वर्षांपूर्वी गेली आहे. मी सुद्धा बाहेर जेवण करतो. तुमचे काम मी करतो.” हे ऐकून माझ्या मनाला फार समाधान झाले…
हेही वाचा – मीरासाहेब दर्ग्याचे आजोबा…
“मला बाबांची सेवा करायला मिळते, हा आनंद खाण्यापिण्यापेक्षा मला जास्त मोलाचा वाटत होता. बाबांची मी सारी व्यवस्था केली आणि म्हणालो, “बाबा मी आता चालतो, तुमची सारी सोय केली आहे!”
“बेटा यह मेरे को सब मालूम हैं… मैं अभी खुश हो गया बेटा. तेरे जिंदगी में कुछ भी कम पडने वाला नहीं, यह मेरा आशीर्वाद है…” बाबा म्हणाले.
“बाबा, मी आठवड्यातून एक टाइम तुमच्याकडे येणार आहे. मी तुम्हाला भेटलो तर चालेल ना?” मी विचारलं.
“क्यों नहीं तुम मेरा बेटा है, बाप के पास आने को क्या दिक्कत है! अभी तुम बिल्कुल फिकीर मत करो, तुम अभी कराड को जाओ. अभी मेरा देखभाल मैं कुछ दिन के लिये करने वाला है,’ बाबा म्हणाले.
मी बाबांचा निरोप घेऊन मिरज रेल्वे स्टेशनला गेलो, सातारा पॅसेंजरमध्ये बसलो. मला खिडकीच्या कडेला जागा मिळाली होती. काही वेळेतच सातारा पॅसेंजर मिरजहून सुटली. पण माझे सारे लक्ष त्या बाबांकडे लागले होते… हा बाबा नक्की कोण असावा? फकीर, दिव्यशक्तीचा माणूस, का देव? यासंदर्भात माझे मन अडकून पडले होते. कोणत्याही रूपामध्ये देव आपणाला भेटतो, हे माझ्या आईने मला सांगितले होते. परमेश्वराची नक्की काय योजना आहे, हे त्या परमेश्वराला माहीत! चाळीस वर्षं न बोलणारा बाबा आज माझ्याबरोबर बोलला… हे कसलं भाग्य असेल माझे! का पूर्वींच्या आजोबा-पणजोबाची कृपा मला मिळाली असेल का? या जगामध्ये मी फक्त आत्तापर्यंत आई-वडिलांना देव मानत आलो आहे. आई-वडिलांची सेवा करायची, हे माझे ध्येय. केवळ आणि केवळ माझ्या आईने सांगितल्याप्रमाणे त्या नियमाचे पालन करणे हे माझे कर्तव्य मी समजतो.
या विचारामध्ये स्टेशनामागून स्टेशन जात होती आणि मी आज भेटलेल्या बाबांचा विचार मनात करत होतो. मी देव पाहिला नाही, परंतु तो प्रत्येकाच्या अंतकरणात असतो आणि अशा रूपाने भेटतो, याची प्रचिती मला आज मिळाली आहे. त्याला जेवण दिले, कपडे घेऊन दिले, आंघोळीची सोय केली… हे उपकार नसून ही एक सेवा आहे, असे माझ्या मनाला वाटू लागले. काही का असेना आईने सांगितले आहे गोरगरिबांना मदत करणे… ते कार्य तरी झाले. या उघड्या जगामध्ये श्रीमंत माणसे भयंकर आहेत, पण त्यांना रात्री झोप लागत नाही. त्याच्यापेक्षा मी कितीतरी नशीबवान आहे… माझे शिक्षण कमी आहे, परंतु वडिलांच्या जागेवरती मला नोकरी मिळाली, हे काय कमी आहे.
हा बाबा साक्षात कुणीतरी मोठा देव आहे, आज त्याची आणि माझी भेट झाली. पैशाने काही होत नाही, पैसा हा फक्त व्यवहार आहे आणि तो व्यवहार कामापुरता आहे. पॅसेंजर गाडी पुढे पुढे जात होती आणि माझ्या मनामध्ये बाबा नक्की कोण असावेत, याचा मी विचार करत होतो. गाडी कराड रेल्वे स्टेशनला जाऊन थांबली. मी गाडीतून उतरलो रेल्वे क्वॉर्टर्समध्ये गेलो, हात-पाय धुतले. थोडे जेवण केले आणि अंथरुणावर आडवा झालो. बाबांचे विचार डोक्यातून जात नव्हते. मला त्यादिवशी झोप लागली नाही फक्त आणि फक्त मिरजेचे बाबा दिसत होते…
हेही वाचा – आयुष्य… अगदी सरळ रेषेत!
दुसऱ्या दिवशी सुट्टी होती उद्या आणि परत बाबांना भेटायला जाऊया का हा विचार डोक्यात येत होता. त्यांची सारी सोय मी करून ठेवली होती. आईने लहानपणी केलेले संस्कार ते कुठेतरी उपयोगी पडले, असे मनाला वाटू लागले. या जगामध्ये कितीतरी अनाथ माणसे रस्त्याच्या कडेला झोपलेली असतात. श्रीमंताला कोणीही मदत करेल, पण गरिबाला कोण मदत करणार? हा प्रश्न निर्माण होतो.
‘कसं काय बरं चाललं आहे का?’ हे फक्त माणूस माणसाला विचारू शकतो मुक्या जनावराला नाही. मुकी जनावरे, पशुपक्षी यांचा ठरलेला रोजचा दिनक्रम ठरलेला असतो, यात बदल नसतो. दिवसभर भ्रमंती करायची आणि ठरलेल्या ठिकाणी यायचे… त्यात माणूस हा भाड्याच्या खोलीमध्ये सध्या राहतो आहे. माणसाचा आणि देवाचा करार आहे, राहत्या घरातील करार संपला म्हणजे मानवाचा विषय संपतो, एवढे मात्र निश्चित. जिवंत आहे तोपर्यंत हसत-खेळत जीवन जगावे, कशाला भांडण-तंटा? यात काय मिळणार? हा विचार प्रत्येक मानवाने करायला हवा. आपण जगायचे किती दिवस आहे, कशाला दुश्मनी? हा कोणी विचारच करत नाही. प्रत्येकाशी गोड बोलावे एकमेकांच्या अडीअडचणीला धावून जावे, यातच खरा माणुसकीचा फार मोठा अर्थ दडला आहे…
क्रमश: