मनोज जोशी
दोन दिवसांपूर्वी युट्यूबवर शॉर्ट्स बघत असताना ‘कपिल शर्मा शो’मधील एक सीन दिसला. कपिल शर्माच्या समोर मौसमी चॅटर्जी आणि रीना रॉय बसल्या होत्या. एका पाठोपाठ एक असे प्रश्न कपिल विचारत होता आणि रीनाच्या आधी मौसमीच ते प्रश्न पटापट टोलावत होती. त्यात त्याने एक प्रश्न केला, असा कोणता हीरो होता की त्याला बघायला सर्वात जास्त गर्दी व्हायची. मौसमीने काका अर्थात राजेश खन्नाचं नाव घेतलं. तर, रीना लगेचच विनोद खन्ना म्हणाली…
त्यावरून मला विनोद खन्ना गेला तो दिवस आठवला. 27 एप्रिल 2017… त्या दिवशी, ‘ती’बातमी अखेर खरी ठरली! महिन्याभरापूर्वी म्हणजेच मार्च 2017मध्ये विनोद खन्ना याच्या चेहऱ्याशी साधर्म्य असलेल्या, पण अतिशय किरकोळ शरीरयष्टीच्या व्यक्तीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. ‘ब्लॅडर कॅन्सरमुळे आकर्षक व्यक्तिमत्त्व असलेल्या विनोद खन्ना या लोकप्रिय अभिनेत्याची अशी अवस्था झाल्याचे’ त्या फोटोबरोबर दिलेले असायचे. तर दुसरीकडे, ‘विनोद खन्ना ठीक आहे,’ याच्यापलीकडे त्याच्या कुटुंबीयांकडून कुठलाही खुलासा होत नव्हता. म्हणूनच त्या फोटोबद्दल साशंकता, संभ्रम कायम राहिला होता.
शम्मी कपूर, देव आनंद यांचे चाहते असले तरी, अमिताभ, शशी कपूर आणि विनोद खन्ना यांचे चित्रपट बघतच आमची पिढी मोठी झाली. त्यामुळे विनोद खन्नाचे ‘ते’ छायाचित्र डोळ्यासमोरून हटत नव्हतं. अगदी कुठेही त्या फोटोबद्दल चर्चा सुरू झाली तर, अगदी ठामपणे मी सांगायचो, ‘छे, बिल्कुल नाही, तो विनोद खन्ना असणे शक्यच नाही !’ तरी मनाच्या कोपऱ्यात भीती होतीच! आणि त्याच्या मृत्यूची बातमी समोर आली… त्या बातमीने ‘ते’छायाचित्र खरे होते, यावर विश्वास ठेवायला भाग पाडले. पण तो गेला, असं पुढील काही काळ म्हणवतंच नव्हते, मन मान्य करायलाच तयार नव्हते.
हेही वाचा – थिंक पॉझिटिव्ह
शांत, संयमी चेहरा असलेला हा अभिनेता सर्वांना धक्का देऊनच गेला. ‘अमर अकबर अँथनी’ सिनेमात ‘साला आपून..’ अशी भाषा बोलत प्रेक्षकांच्या शिट्या आणि टाळ्या मिळविणाऱ्या ‘अँथनी’(अमिताभ बच्चन) समोरील संयत अभिनयाने वेगळी छाप उमटवणारा ‘अमर’…, ‘हाथ की सफाई’मध्ये ‘बच्चे जिस स्कूल में तुम पढते हो, उस स्कूल का मैं प्रिन्सिपल रह चुका हूँ…, असं राजूला (रणधीर कपूर) सुनावणारा शंकर ऊर्फ कुमार…, ‘हेराफेरी’ चित्रपटात ‘ये वक्त की हेराफेरी हैं…’, असं म्हणत ‘चोरावर मोर’ ठरणारे विजय (अमिताभ) आणि अजय… ‘मेरे अपने’मधील छेनू (शत्रूघ्न सिन्हा) आणि श्यामची वरचेवर होणारी ठसन…, याच सिनेमातील ‘कोई होता जिसको अपना…’ हे अजरामर गाणं… असे अनेक चित्रपट, गाणी कशी विसरता येणार?
हीरोची पर्सनॅलिटी असतानाही खलनायकी भूमिकाही त्याने तेवढ्याच ताकदीने स्वीकारल्या. पण त्या माझ्यासारख्या अनेकांना पचनी पडल्या नाहीत, हे अलाहिदा! त्याची फिल्म करिअरची सुरुवातच खलनायकच्या भूमिकेने झाली. 1968मध्ये त्याचा पहिला सिनेमा ‘मन का मीत’ हा होता. ‘आन मिलो सजना’ या सिनेमातही त्याने खलनायकी भूमिका केली. पण दुसरा हीरो म्हणूनच मी त्याला त्या सिनेमात पाहिलं.
2007मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रिस्क’ सिनेमातील त्याची खालिद बिन जमालची निगेटिव्ह भूमिका वेगळी छाप पाडून गेला. पण खलनायक म्हणून विनोद खन्नाची सर्वांत भावलेली भूमिका ‘मेरा गांव मेरा देश’ या चित्रपटातील. ‘जब्बर सिंग’ !! (आता या चित्रपटाचे कथानक ‘शोले’सारखेच आहे. हा चित्रपट 1971मध्ये प्रदर्शित झाला तर, शोले याच्या चार वर्षांनी म्हणजे 1975मध्ये).
विनोद खन्नाने ‘जब्बर सिंग’डाकूची भूमिका दहशत निर्माण करणारी आहे. त्यात त्याच्यासाठी भाषेचा करण्यात आलेला वापरही वैशिष्ट्यपूर्ण आहे. हिंदी भाषेचा बाज सांभाळणारे संवाद त्याच्या तोंडी आहेत. गावच्या जत्रेत तो पोलिसांच्या हातातून निसटतो. त्यानंतर नक्की कोणी दगाबाजी केली, हे शोधण्याचा प्रयत्न करतो. आपल्या साथीदारांना एका रांगेत उभे करून सर्वांकडे संशयाने बघतो. तो विचारतो – ‘कौन है विश्वासघाती?’
हेही वाचा – असंच काहीसं आवडलेलं…
अशा रुबाबदार हीरोची झालेली दारूण स्थिती एका फोटोद्वारे समोर येणे आणि महिन्याभरातच त्याच्या मृत्यूची बातमी येऊन थडकणे; अशा परिस्थितीत ‘कौन है विश्वासघाती?’ असंच विचारावंसं वाटतं!
हँडसम पर्सनॅलिटी अशी ओळख असलेला विनोद खन्ना काळाच्या पडद्यामागे जाऊन आठ वर्षं झाली. आता त्याचा मुलगा अक्षय खन्ना बॉलिवूडमध्ये आहे. वडिलांसारखी पर्सनॅलिटी नसली तरी, आपल्या संयत अभिनयाने वेगळेपण जपत आहे. ताल, दिल चाहता है, दृष्यम 2 या चित्रपटांतील त्याच्या भूमिकांनी वेगळी उंची गाठली आहे. तर, अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘छावा’ चित्रपटातील त्याने साकारलेली औरंगजेबची भूमिका त्या सर्वांवर कळस ठरली, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.