दर्शन कुलकर्णी
आज, दिनांक : 31 ऑगस्ट 2025; वार : रविवार
भारतीय सौर : 09 भाद्रपद शके 1947; तिथि : अष्टमी 24:56; नक्षत्र : अनुराधा 17:25
योग : वैधृती 15:57; करण : विष्टी 11:53
सूर्य : सिंह; चंद्र : वृश्चिक; सूर्योदय : 06:23; सूर्यास्त : 18:54
पक्ष : शुक्ल; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन
संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127
दुर्गाष्टमी
ज्येष्ठागौरी आवाहन (सायंकाळी 05:25 पर्यंत)
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
हेही वाचा – मला माहेर हवे… स्मिताताई आणि अंजलीचे स्नेहबंध
दिनविशेष
पूर्वप्राथमिक शिक्षणाच्या प्रवर्तक ताराबाई मोडक
टीम अवांतर
प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ आणि महाराष्ट्रातील पूर्वप्राथमिक शिक्षणाच्या प्रवर्तक ताराबाई मोडक यांचा जन्म 19 एप्रिल 1892 साली पुणे जिल्ह्यातील चाकण येथील केळकर घराण्यात झाला. वडील सदाशिवराव आणि आई उमाबाई या बुद्धिमान तसेच सुधारणावादी असल्याने ताराबाईंकडे बुद्धिमत्तेचा वारसा आला. 1914 साली ताराबाई मुंबई विद्यापीठातून बी. ए. झाल्या. महाविद्यालयात असतानाच त्यांची कृष्णा वामनराव मोडक यांच्याशी ओळख होऊन 1915मध्ये त्यांचा नोंदणी पद्धतीने प्रेमविवाह झाला. कृष्णा मोडक हे अमरावती येथे वकिलीव्यवसाय करीत. पुढे ताराबाईंचे भावनगर, राजकोट, अमरावती, विकासवाडी इत्यादी ठिकाणी वास्तव्य झाले. 1922मध्ये राजकोट येथे बार्टन फिमेल ट्रेनिंग कॉलेजमध्ये लेडी सुपरिटेंडन्ट म्हणून ताराबाई रुजू झाल्या. या कॉलेजमध्ये या पदावर काम करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या. त्यानंतर त्यांनी गिजुभाई बधेका यांच्या मदतीने भावनगर येथे माँटेसरी बाईंच्या तत्त्वांवर आधारलेली ‘गीता शिक्षण पद्धती’ निश्चित केली. इथूनच ताराबाईंच्या बालशिक्षण कार्याचा प्रारंभ झाला.
हेही वाचा – मनाचिये गुंती…
शिक्षणाचा खरा पाया बालवयातच घातला जाण्याची शक्यता आणि आवश्यकता असते, या दृष्टीने त्यांनी पूर्वप्राथमिक शिक्षणाचे नवीन पाऊल टाकले. 1923-1932 ही नऊ वर्षे त्यांनी भावनगरच्याच दक्षिणामूर्ती शिक्षणसंस्थेत प्राध्यापिका म्हणून काम केले. 1933 पासून त्यांनी शिक्षणाशी संबंधित ‘शिक्षणपत्रिका’ काढायला सुरुवात केली. 1936 साली त्यांनी नूतन बालशिक्षण संघाची स्थापना केली. पुढे बालशिक्षणाचे हे लोण महाराष्ट्रात पसरले. 1936 ते 1948 या काळात त्यांनी मुंबई येथील दादरच्या हिंदू कॉलनीत शिशुविहार नावाची संस्था स्थापन करून बालशिक्षणाचे प्रसारकार्य केले. या संस्थेने पुढे पूर्वप्राथमिक अध्यापन मंदिर सुरू केले. यातून मराठी आणि गुजराती या दोन्ही भाषांच्या हजारांहून अधिक शिक्षक-शिक्षिकांचे प्रशिक्षण झाले. खेड्यांमध्ये शास्त्रीय पद्धतीने मात्र कमी खर्चात बालवाड्या चालविण्यासाठी 1945मध्ये ताराबाईंनी त्यावेळच्या ठाणे जिल्ह्यातील बोर्डी येथे ग्राम बालशिक्षा केंद्र स्थापिले. या संस्थेतूनच ग्रामीण बालवाडी आणि ग्राम बाल अध्यापन मंदिर या संस्था निघाल्या. या संस्थांचा लाभ आदिवासी मुलांना मिळावा, म्हणून त्यांच्या आदिवासी परिसरात आणि अंगणात बालवाडी चालविण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला. त्यांच्या या शैक्षणिक कार्यास शिक्षणतज्ज्ञ अनुताई वाघ (Anutai Wagh) यांचे मोलाचे सहकार्य लाभले. प्राथमिक शिक्षणासाठी 6 ते 14 वयोगटातील मुलांसाठी सुरू केलेल्या विकासवाडी या प्रकल्पातील अनुभवातून कुरणशाळेचा प्रयोगही त्यांनी सुरू केला. आदिवासी मुले आणि काही मुली पूर्ण दिवस गुरांना रानात चारायला नेत. त्यामुळे मुलांची अनुपस्थिती हा गंभीर प्रश्न लक्षात घेऊन ताराबाईंनी शाळाच रानात नेण्याचा प्रयोग यशस्वी करून दाखवला आणि त्याला कुरणशाळा असे नाव दिले. कुरण शाळेबरोबरच रात्रीची शाळा, व्यवसायशिक्षण हे पूरक प्रकार प्रायोगिक स्वरूपात सुरू करण्यात आले. शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल 26 जानेवारी 1962 रोजी पद्मभूषण हा किताब देऊन भारत सरकारने त्यांचा गौरव केला. 31 ऑगस्ट 1973 रोजी मुंबईत त्यांचे निधन झाले.